पुस्तक परिचय : Educated (Tara Westover)

अमेरिकेतल्या Idaho राज्यात राहणारं एक कुटुंब. नवरा-बायको आणि ७-८ मुलं. नवरा-बायको कट्टर Mormon पंथीय. या पंथाच्या लोकांचा आधुनिक जगावर, वैज्ञानिक प्रगतीवर अजिबात विश्वास नसतो. आधुनिक शिक्षण, वैद्यकीय उपचार इ. गोष्टी म्हणजे सैतानाशी सामना. त्यापासून दूर राहायचं. आयुष्यात येणारं प्रत्येक संकट देवाने परीक्षा घेण्यासाठी धाडलं असल्याप्रमाणे सहन करायचं. त्यातून जमेल तसं तरुन जगणं पुढे सुरू ठेवायचं. ही यांची रीत.

हे कुटुंबही तसंच. वडिलांचा भंगार व्यवसाय. सगळी मुलं तिथे पडेल ते अंगमेहनतीचं काम करण्यात तरबेज असतात. पण एकूण जीवनशैली पुरती रासवट.

टॅरासुद्धा १५ वर्षांची होईपर्यंत असंच रासवट जगत होती. पण तिला हळूहळू बाहेरच्या जगाचं वारं लागायला लागलंच. आपलं विनाशिक्षित असणं तिला जाणवायला लागलं. यातून बाहेर पडण्याची गरज भासायला लागली. तो निर्णय तिच्यासाठी खूप अवघड होता. बाहेर पडायचं तर कसं, याचा शोध तिचा तिलाच घ्यायचा होता. मोठा सामाजिक, आंतरिक, तात्विक झगडा होता तो तिच्यासाठी. पण तिने एक-एक पाऊल टाकायला सुरुवात केली. आणि आयुष्याची पहिली १५ वर्षं शाळेचं तोंडही न पाहिलेली ही मुलगी पुढच्या १० वर्षांत हार्वर्डमधून पी.एच.डी. झाली. त्या झगड्याची गोष्ट म्हणजे हे आत्मकथनपर पुस्तक.

आपला झगडा तिने अगदी आत्मीयतेने तरीही कमालीच्या तटस्थतेने मांडला आहे. हा झगडा तीन पातळ्यांवरचा होता. पहिलं, म्हणजे वडिलांच्या विचारसरणीचा मनावरचा जबरदस्त पगडा उलथवून टाकणं, आपण करतोय ते योग्य आहे ना या मनातल्या शंकेला सतत उत्तरं देणं. दुसरं, बाहेरच्या जगात पावलोपावली समोर येणार्‍या ’आपण आणि इतर’ यातल्या फरकाशी (वेशभूषेपासून ते जगाबद्दलच्या ज्ञानाच्या अभावापर्यंत) दोन हात करावे लागणं. आणि तिसरं, घरापासून, कुटुंबियांपासून, त्या प्रदेशापासून दुरावलं जाण्याची तयारी करणं.

टॅरा राहत होती तो डोंगराळ भाग होता. Buck's Peak हे तिथलं महत्वाचं शिखर. त्या डोंगराळ भागावर, बक्स पीकवर तिचा अतिशय जीव होता. तिथले ऋतू, हवामान याचं पुस्तकात निवेदनाच्या ओघात जागोजागी फार छान वर्णन आहे. हे मुद्दाम ठरवून केलेलं निसर्गाचं वर्णन नाही. तो प्रदेश कसा तिच्या असण्याचा एक भाग होता हे त्यातून ती वेळोवेळी, अगदी सहज आणि नकळत सांगते. शिक्षणासाठी बाहेर पडल्यावर सुट्टीत ती जेव्हा जेव्हा घरी यायची तेव्हा आधुनिक जीवन बाजूला सारून तेवढे महिना-दोन महिने रासवट जगण्याला जवळ करायची. तेव्हा तो प्रदेश, ते शिखर हेच तिचा मोठा आधार होते. एका टप्प्यावर तिला जाणवलं, की त्या डोंगराळ भागाला कायमचं अंतर दिल्याशिवाय आपलं liberation पूर्णत्वाला जाणार नाही. Mormonism च्या पिंजर्‍यातून मुक्तता मिळवण्यासाठी ते करणं अनिवार्य आहे हे तिला जसजसं लक्षात येत गेलं तसतसं तिच्या मनःस्वास्थ्यावर त्याचा परिणाम व्हायला लागला. मध्ये वर्ष-दोन वर्ष पी.एच.डी.चं काम ठप्प झालं. या झगड्याचे कित्येक सूक्ष्म बारकावे पुस्तकात समोर येतात.

वेस्टओव्हर कुटुंबियांच्या रासवट जीवनशैलीतल्या दैनंदिन व्यवहारांचं पुस्तकातलं वर्णन एकाच वेळी मनोरंजक, तोंडात बोटं घालायला लावणारं, धक्कादायक, थक्क करणारं, हतबल वाटायला लावणारं, डोक्यावर हात मारून घ्यावंसं वाटायला लावणारं आहे. ते वाचताना सतत हे लक्षात ठेवावं लागतं, की आपण वाचतोय हे फिक्‍शन नव्हे, तर खरंखुरं घडलेलं आहे. यात सगळ्यात अंगावर येणारे प्रसंग म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारे अपघात. अपघातामुळे होणार्‍या इजा कितीही गंभीर असल्या तरी त्यांना तोंड देण्याच्या या कुटुंबियांच्या तर्‍हा बघून हसावं की रडावं कळत नाही. तुम्ही असं का करताय, असंही कुठे कुठे ओरडून विचारावंसं वाटतं. भयंकर शारीरिक इजांना असं तोंड देण्याची ताकद कुठून मिळवतात हे लोक, याचं एकमेव उत्तर म्हणजे त्यांची विचारसरणी.

ती विचारसरणी आणि त्याचे पक्के पाईक असणारे टॅराचे वडील, हाच तिच्या आत्मोन्नतीच्या मार्गातला मोठा अडसर होता. तो दूर करण्यात तिची सर्वाधिक मानसिक ताकद खर्ची पडली. तिच्या थोरल्या भावंडांमधला एक भाऊ, शॉन, abusive होता. वरकरणी भावंडांमधली चेष्टा-मस्करी, मारामारी असे वाटणारे प्रसंग प्रत्यक्षात फार जुलुमी, शरीराहूनही मनावर प्रचंड आघात करणारे होते. शॉनच्या कचाट्यातून तात्विक पातळीवर सुटका करून घेणं, हा टॅराचा दुसरा सर्वात अवघड झगडा होता. तात्विक पातळीवरची अशी मनाची आंदोलनं तिने अतिशय साध्या भाषेत आणि प्रांजळपणे मांडली आहेत.

घरात असे झगडे सुरू असताना कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीत तिला काही फार चांगले शिक्षक, गुरू भेटले. काही मोजके चांगले सवंगडीही भेटले. त्यांनी तिच्या शिक्षणाला, liberation ला दिशा मिळायला मदत झाली. या व्यक्ती तिला भेटल्या नसत्या तर शिक्षण घेण्याच्या आपल्या निर्णयापासून ती निश्चित मागे हटली असती. तसे अनेक प्रसंग पावलोपावली तिच्यासमोर आले. पण त्या सगळ्याला ती पुरून उरली. कॉलेज, युनिव्हर्सिटी, हॉस्टेल; विद्यार्थीदशेतली आर्थिक चणचण, तरीही शिक्षण घेण्याची आस असणं; ज्ञानाचा, माहितीचा पुरता अभाव असला तरी wisdom ची साथ असणं; आपल्या मनाचा कल आणि कौल ओळखून निर्धाराने पुढे पुढे जात राहणं; या सगळ्याचं वर्णनही अगदी गुंतवून ठेवणारं आहे. यातल्या कशातही तिला आपल्या आई-वडिलांची जराही साथ नव्हती, हे लक्षात घेतल्यावर तर तिची शैक्षणिक वाटचाल आणखी उंचीवर जाते.

ज्या दोन विरुद्ध टोकांच्या जगात तिच्या अस्तित्वाचा झगडा सुरू होता, त्यात तिची जी दमछाक होत होती तो प्रवास वाचक म्हणून आपल्यालाही पुरता दमवतो, थकवतो. त्यामुळेच पुस्तकाच्या शेवटी ती ज्या प्रकारे Educated या शीर्षक-समेवर येते ते वाचून तिला आनंदाने, आणि मुख्य म्हणजे आत्यंतिक आदराने घट्ट मिठी माराविशी वाटते.

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)