पुस्तक परिचय : CARELESS PEOPLE (Sarah Wynn-Williams)
लेखिका फेसबुकमध्ये ७ वर्षं पब्लिक पॉलिसी डायरेक्टर होती.
ती मूळची न्यूझीलंडची. अमेरिकेत नोकरी करत असताना ख्राइस्टचर्चचा भूकंप झाला. त्यात तिचे घरचे सापडले. आई-वडिलांशी काही दिवसांत सम्पर्क झाला, पण बहीण बेपत्ता होती. पुढे बहिणीशीही संपर्क झाला तो फेसबुकच्या मदतीने.तोपर्यंत लेखिकेला फेसबुकबद्दल फारसं माहिती नव्हतं. या निमित्ताने फेसबुकसारख्या माध्यमाची ताकद तिला समजली.
आपण इथे नोकरी करायलाच हवी असं तिच्या मनाने घेतलं.
तोवर ती डिप्लोमॅटिक क्षेत्राशी संबंधितच काम करत होती. तिच्या स्किल्सचा, 'पब्लिक पॉलिसी' या गोष्टीचा फेसबुकमध्ये काय उपयोग, मुळात गरजच काय, असं फेसबुकच्या टॉप ब्रासचं मत होतं.
पण आपल्या अनुभवाचा फेसबुकला उपयोग होईल हे तिने त्यांच्या गळी उतरवलं. त्यांच्या खनपटीला बसून तिच्यासाठी वेगळी पोस्ट निर्माण करायला लावली.
हा सगळा भाग रंजक, क्रिस्प आहे. तिच्या द्रष्टेपणाचं कौतुक वाटतं.झुकरबर्गने आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संबंध वाढवायला हवेत हा विचार तिने पहिल्यांदा फेसबुकमध्ये मांडला. त्यासाठी जमेल तो सगळा आटापिटा केला. या टप्प्यावर पुस्तक अधूनमधून रटाळ व्हायला सुरुवात झाली. काही ठिकाणी नरेशन भरकटतं. तरी आपण पुढे वाचत राहतो.
झुकरबर्ग दावोसला जातो तेव्हा महत्वाच्या नेत्यांशी बोलता यावं, किमान
शेजारी/जवळ बसून जेवता यावं यासाठी जमेल त्या /वाट्टेल त्या बारीकसारीक
नाना खटपटी, लटपटी केल्या जातात. त्याचं भाषण/talk अमुक नेत्यांच्या
आगेमागे ठेवावं यासाठी आर्जंवं/विनंत्या केल्या जातात. कधी त्या यशस्वी
होतात, कधी नाही.
ते वाचणं म्हणजे करमणूक आहे.
आणि फेसबुकच्या दृष्टीने 'किंमत' नसणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना कशा प्रकारे डावललं जातं ते वाचून अचंबा वाटतो.
पुढे फेसबुकी नेत्यांचा दुटप्पीपणा, स्त्रीद्वेष्टेपण अशा अनेक गोष्टी
येतात. बारीकसारीक तपशील, संवाद, इमेल्स, समज-गैरसमज, त्यातून लेखिकेला
नोकरी सोडावी कशी लागली त्याचं वर्णन.
हा सगळा भाग नीट संपादित करून द्यायला हवा होता असं वाचताना वाटलं.
एकूण पुस्तकाचं Content चांगलं आहे. पण जरा रटाळ, पाल्हाळीक आहे.
अनेक fb posts एकत्र केल्या असाव्यात असं वाटतं.
हे पुस्तक प्रकाशित होऊ नये म्हणून फेसबुकने खूप आटापिटा चालवला होता. लेखिकेला पुस्तकाचं प्रमोशन करण्यावरही बंदी घातली होती. इतकं भयंकर काही पुस्तकात लिहिलेलं नाही. जे लिहिलंय ते सगळ्याच गब्बर माजखोर कंपन्या करतच असतात.
Comments