पुस्तक परिचय : The Naturalist (Andrew Mayne)
एका विज्ञान संशोधक विद्यार्थिनीचा जंगलात अभ्यासासाठी गेलेली असताना मृत्यू होतो. पोस्टमार्टेममध्ये दिसतं की हा अस्वलाने केलेला हल्ला आहे. पोलीस हादरतात. जोरदार शोधमोहिम सुरू करतात. आणि अखेर त्या अस्वलाला गाठून ठार मारतात.
आधी पोलिसांना ही खुनाची घटना वाटत असते. त्या संशोधक विद्यार्थिनीचा जुना विज्ञान प्रोफेसर हा पोलिसांचा प्राइम सस्पेक्ट असतो. पोलीस त्याला चौकशीसाठी धरतात. पण पुरेशा पुराव्याअभावी त्याला जाऊ देतात. त्यामुळे प्रोफेसरचा या प्रकरणातला इंटरेस्ट वाढतो. नाहीतर त्याचा त्या मुलीशी आता काहीही संपर्क उरलेला नसतो.
प्रोफेसरचं
विज्ञान संशोधक डोकं त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो इंटरनेटवर या केसशी संबंधित तपशील
शोधतो. आपल्या परीने डॉट्स जोडायला लागतो. त्यासाठी लॉजिक, ए.आय., bio-informatics
वगैरेची मदत घेतो. त्यातून काही शक्यता समोर येतात. त्या तो पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न
करतो. पण पोलिसांनी एव्हाना अस्वलाला पकडून मारलेलं असल्यामुळे ते याला भीक घालत नाहीत.
पण प्रोफेसर
हळूहळू त्या केसमध्ये ओढला जातो. तो एकटा पोलिसांपासून लपूनछपून पण शिस्तीत तपास सुरू
करतो. हा तपास पूर्णपणे सायन्सवर आधारित असतो. त्यातून त्याला काय काय सापडत जातं,
कोण कोण भेटत जातं, त्यातून कोणती तथ्यं समोर येतात, त्याच्या हातून होणार्या खंडीभर
चुका, त्यामुळे त्याच्या जीवावर बेतणं, हे सगळं म्हणजे हे पुस्तक.
यातला
सायन्स-पार्ट भारी आहे. बर्यापैकी जेन्युइन वाटतो. निव्वळ फॉरेन्सिक सायन्स नव्हे
तर त्यात इतरही बरंच काय काय आहे. लॉजिकचा वापर तर आहेच. अस्वलाचा नेमका कसा संबंध
ते सुद्धा हळूहळू उलगडत जातं. ते सगळं वाचायला मजा येते.
त्या मानाने प्रोफेसरचा survival part काही काही ठिकाणी अति ताणलेला वाटतो. पण निदान
दहा गुंडांना लोळवून अंगावर एक ओरखडाही न उठणे इतका अति नाहीये.
रहस्य
शेवटपर्यंत टिकवून ठेवलं आहे. सायन्सचा धागाही शेवटपर्यंत आहेच. त्यामुळे मला वाचायला
मजा आली.
Comments