पुस्तक परिचय : Permanent Record (Edward Snowden)
एडवर्ड स्नोडेननं २०१३ साली केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल मला जुजबी माहिती होती. तेव्हाच्या पेपरात आलेल्या बातम्या काही दिवस मी फॉलो केल्या असतील, नसतील. मात्र नंतर त्याबद्दल विसरायला झालं होतं.
पण नुकतंच हे पुस्तक वाचलं. मला आवडलं.
त्यात
प्रत्यक्ष गौप्यस्फोटाचा भाग शेवटच्या ७०-८० पानांमध्ये येत असेल. ते थ्रिलिंग
आहेच. पण त्यापूर्वीची शाळकरी वयापासूनची त्याची जडणघडण, कम्प्युटर आणि इंटरनेटवर
त्याचं बालपण, teens पोसलं जाणं, त्यातून त्याचं geek बनत जाणं, देशासाठी काहीतरी करायचं या प्रेरणेनं सुरू केलेली नोकरी - हा भागही
खूप वाचण्यासारखा आहे. त्यानं तो अगदी प्रामाणिकपणे, प्रांजळपणे, आडपडदा न ठेवता
लिहिलाय. तो वाचकांच्या पुढ्यात बसून गप्पा मारतोय असं वाटतं. कम्प्युटर, इंटरनेट,
त्याच्याशी जोडलेलं तंत्रज्ञान, माणसाच्या दैनंदिन जीवनात त्याचा होणारा अधिकाधिक
वापर, या सगळ्याबद्दल सांगताना त्यानं जागोजागी तात्विक पातळीवर भाष्य केलं आहे. ते
शोधायला, वाचायला खूप मजा आली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं माणसाच्या जीवनातलं महत्व काय याचा तात्विक पातळीवर विचार स्नोडेनच्या मनात सतत नकळत सुरू होता, की या पुस्तकाच्या निमित्ताने त्याचं हे चिंतन घडलं हे समजायला मार्ग नाही. पण तंत्रज्ञानात बुडवून काढलेल्या या माणसाने त्याचा बेछूट वापर किती मारक ठरू शकतो हे ओळखलं होतं. त्याचवेळी त्या तंत्रज्ञानावर, गॅजेट्सवर त्याचं मनापासून प्रेमही होतं.
अमेरिकी
सरकारचा छुप्या सर्वेलन्सचा उद्देश त्याच्या कसा लक्षात आला, त्या शंकेची पाल मनात
चुकचुकण्यापासून ते त्याची खातरजमा होईपर्यंतचे उलटसुलट विचार, घालमेल, पुढे
त्याबद्दलचे पुरावे गोळा करण्याच्या खटपटी, त्यासाठीही त्याचं techno-geek असणं कसं कामी आलं, त्याने शांत
डोक्याने सर्व परिस्थितीचा विचार करून कशी योजना बनवली, हे सगळं वाचता वाचता सतत
प्रश्न पडत होता, की इतक्या तरुण वयात हे त्याने कसं काय जमवलं! म्हणजे
नैतिक-अनैतिकचं द्वंद्व तरुण वयात कमी सतावतं, असं मानलं जातं. असं द्वंद्व
त्याच्या मनात एकदा सुरू झाल्यावर त्याने ते कधीही झटकून टाकण्याचा, डिनायलचा प्रयत्न
केला नाही, हे विशेष वाटलं.
गोपनीय
माहितीचे तुकडे बाहेर नेणे, भांडेफोड, गौप्यस्फोट, हेरगिरी - या शब्दांच्या अर्थछटांमध्ये
काय काय फरक आहे हे त्यानं सविस्तर लिहिलं आहे. ते सुद्धा वाचायला आवडलं. (अमेरिकेनं
त्याच्यावर हेरगिरीचा आरोप लावला आहे. पण त्यानं हेरगिरी केलेली नाही. गोपनीय
माहिती कुणा बाहेरच्या देशाला नव्हे, तर अमेरिकेच्या पत्रकारांना दिली.)
आज तो रशियात
राहतो आहे. तिथपर्यंत तो कसा पोचला, त्यासाठी जगाच्या दुसर्या टोकावरच्या अनोळखी
लोकांनी हातचं न राखता त्याला कशी मदत केली, त्याची गोष्टही थरारक आहे.
अमेरिकी
सरकारच्या छुप्या सर्वेलन्समुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कॉल रेकॉर्ड्सची,
इंटरनेटवापराची इत्थंभूत माहिती सरकारकडे गोळा होणार, तिथे ती कायमस्वरूपी राहणार
(पर्मनण्ट रेकॉर्ड), अतिरेकी कारवाया टाळण्याच्या नावाखाली भविष्यात त्या माहितीचा
कसाही वापर होऊ शकतो, हे जगाला कळावं यासाठी एडवर्ड स्नोडेननं त्याचे अनुभव पुस्तकरूपाने
’पर्मनण्ट रेकॉर्ड’ करून ठेवले आहेत.
(स्नोडेनच्या
गौप्यस्फोटानंतर इंटरनेट वापरासंबंधित काही बदल, नियम नव्याने झाले का, त्याचा काही
उपयोग झाला का, की आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, हे शोधून वाचायचं ठरवलं आहे.)
Comments