तेव्हा आणि आता

(या प्रसंगांमधला ‘तेव्हा’ म्हणजे साधारण वीस वर्षांपूर्वीचा काळ आणि ‘आता’ म्हणजे सध्याचा काळ समजावा.)
---------------------------------------------------------------------
तेव्हा
मुलगी (वय वर्षे १४) : आई, शाळेच्या युनिफॉर्मला इस्त्री करू?
आई : युनिफॉर्मला काय करायचीये इस्त्री-बिस्त्री? उगीच नुसते नखरे नकोयेत शाळेत जाताना ... !!

आता
आई : अगं, किती हा आळशीपणा... युनिफॉर्मला जरा इस्त्री-बिस्त्री कर ना.
मुलगी (वय वर्षे १४) : असू दे गं! मला बोअर होतं रोज-रोज इस्त्री करायला...

------------------------------------------------

तेव्हा
वडील (आपल्या शाळकरी मुलाला) : अरे, काय सारखी रेडियोवरची गाणी ऐकत बसतोस... जरा कधीतरी बाहेर खेळत जा...

आता
वडील (आपल्या शाळकरी मुलाला) : अरे, काय सारख्या व्हिडीओ गेम्स खेळत असतोस... जरा कधीतरी गाणी-बिणी पण ऐकत जा... !!!

------------------------------------------------

तेव्हा
मुलगा : आई, या सुट्टीत पण बालनाट्य बघायला नेशील ना, प्लीऽऽऽज...

आता
मुलगा : या सुट्टीत पण बालनाट्य?? नको ऽऽऽ... आई, प्लीऽऽज!

------------------------------------------------

तेव्हा
मुलगा (आपल्या मित्राला) : या रविवारी माझा सगळा अभ्यास झाला की माझे बाबा मला त्यांचा कॅल्क्युलेटर देणारेऽऽत खेळायला ...

आता
मुलगा (वैतागून आपल्या मित्राला) : रविवारी बाबा घरात असतात. माझा अभ्यास झाल्यावरसुध्दा मला मोबाईलवरच्या गेम्स खेळू देत नाहीत.

------------------------------------------------

तेव्हा
बायको : आज ऑफिसला नको ना जाऊस...
नवरा : नाही, नाही... मला जायला पाहिजे.

आता
नवरा : आज कंटाळा आलाय, आज मी नाही जात ऑफिसला.
बायको : काऽऽ ? जा ना! तू गेला नाहीस की माझं सगळं रुटीन बिघडतं...

------------------------------------------------

तेव्हा
मैत्रीण (दुसर्‍या मैत्रिणीला) : शी! आमच्या सासूबाईंना मी ड्रेस घातलेला पण चालत नाही...!

आता
मैत्रीण (दुसर्‍या मैत्रिणीला) : शी! आमच्या सासूबाई स्लीव्हलेस ड्रेस घालतात... मला अजिब्बात आवडत नाही!!

------------------------------------------------

तेव्हा
तरूणी (आपल्या होणार्‍या नवर्‍याला) : लग्नानंतर आपण वेगळं रहायचं हं... मला नाही रहायचं तुझ्या आईसोबत...

आता
बाई (आपल्या तरूण मुलाला) : लग्नानंतर तुम्ही दोघं वेगळे रहा हं... मला नाही रहायचं तुझ्या बायकोसोबत...

------------------------------------------------

तेव्हा
कॉलेज युवक (मित्राला) : मला रेडियोवरची गाणी बोअर होतात. मी फावल्या वेळात टी।व्ही.च बघतो.

आता
कॉलेज युवक (मित्राला) : मला टी.व्ही. सीरियल्स बोअर होतात. मी फावल्या वेळात मोबाईलवर एफ.एम. रेडीयो ऐकत बसतो.

------------------------------------------------

तेव्हा
आजी (खिडकीतून बाहेर बघत त्रासल्या चेहर्‍यानं) : छे! किती कोसळतोय हा पाऊस! सप्टेंबर उजाडला। देवा, आता जरा उघडीप मिळू दे रे, बाबा!

आता
आजी (खिडकीतून बाहेर बघत त्रासल्या चेहर्‍यानं) : छे! किती उकडतंय! ऑगस्ट सरला। देवा, आता तरी थोडा पाऊस पडू दे रे, बाबा!

------------------------------------------------

जमाना खरंच बदललाय, नै!

Comments

changes is the spice of life

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)