सांगड : झेंडावंदनाची, दहीहंडीची आणि विज्ञानाची!

किर्ती

समाजशास्त्राचं प्रोजेक्ट संपलं तशी शाळेत पंधरा ऑगस्टच्या विज्ञान-प्रदर्शनाची गडबड सुरू झाली. पण आमच्या पाचजणींपैकी कुणीच त्यात भाग घेतलेला नसल्यामुळे जरा बरं होतं. प्रदर्शनात भाग घेतलेला नसला तरी प्रदर्शन बघायला आम्हाला आवडतं. ते आम्ही करणारच आहोत. पण दरम्यान आम्ही आपापसांत एक वेगळाच प्लॅन केला होता. प्रज्ञाच्या आत्याच्या घराजवळ एका मुलींच्या गोविंदा-पथकाची रोज रात्री प्रॅक्टिस असते. प्रत्यक्ष गोकुळाष्टमीदिवशी गर्दीत जाऊन ‘लाईव्ह दहीहंडी’ कधीच बघता येत नाही. म्हणून आम्ही काल ती प्रॅक्टिस बघायलाच गेलो होतो. प्रज्ञाची आई आमच्या बरोबर आली होती. एखाद्या हिंदी सिनेमाच्या जाहिरातीसाठी नाही का ते ‘द मेकिंग ऑफ अमूक’, ‘बिहाईंड द सीन्स् ऑफ तमूक’ दाखवत असतात सारखं... कधी कधी प्रत्यक्ष सिनेमापेक्षा ते कार्यक्रमच जसे छान वाटतात, तसंच टी. व्ही. वर दरवर्षी ज्या दहीहंड्या दाखवतात त्यापेक्षा हा सराव बघायलाच जाम मजा आली. त्या मुली सहा-सात थर तर लावतच होत्या पण आठव्या थरासाठीही त्यांचा प्रयत्न चालू होता. सहाव्या आणि सातव्या थरावर चढणाऱ्या मुली तश्या लहानच होत्या - तिसरीचौथीतल्या. पण त्यांच्या इतर सगळ्या ताया त्यांची खूप काळजी घेत होत्या.
त्यांची सरावाच्या निमित्तानं जी धमाल चालली होती ना, ती पाहून मलाही त्यांच्यात सामिल व्हावंसं वाटलं. तसंही, मला बैठ्या कामांपेक्षा हे असलं काहीतरी करायला आवडतंच.
"तू चढून चढून किती चढणार? पहिल्या, नाहीतर दुसऱ्या थरापर्यंत... त्यापेक्षा इथे तिसऱ्या मजल्यावरून सराव बघायला मिळतोय ना... मग बघ की गुपचूप" ही सुजी तर माझे पाय खेचायला नेहमी तयारच असते.
"की, तू चढलीस ना तर खालचे थर खाली बसतील आणि तुझ्या खांद्यावर कुणी चुकूनमाकून चढलंच तर तूच खाली बसशील! " प्रज्ञानं त्यात आपली भर घातली.
"मग आपण बैठी दहीहंडी करायची! " सूज्ञा, प्रज्ञाची धाकटी बहीण, चिवचिवली!
बैठ्या दहीहंडीची आयडीया फारच भारी होती.
"अजून अश्या कुठल्या कुठल्या दहीहंड्या होतील, गं? " तिनं प्रज्ञाला विचारलं.
"एका पायावरची लंगडी दहीहंडी, पाठमोरी दहीहंडी - म्हणजे गोलात सगळ्यांनी बाहेरच्या बाजूला तोंड करून उभं रहायचं... "
दहीहंडीचे काय पण एकएक प्रकार!
कालपरवाच मी पेपरमध्ये ‘राजकीय दहीहंडी’ असाही एक शब्दप्रयोग वाचला होता. पण माझ्यामते, राजकीय नेते आपापल्या फायद्यासाठी इतरांचे पाय कसे खेचतात त्याबद्दलची ती बातमी होती. मग खरंतर त्याला दहीहंडी म्हणून उपयोग नाही. खऱ्या दहीहंडीत एकमेकांचे पाय खेचणं तर दूरच, उलट सर्वांनीच सर्वांना आधार द्यायचा असतो. आपण स्वतः कितव्या थरावर आहोत त्याला महत्त्व न देता आपल्या वरच्या थरांकडे लक्ष केंद्रित करायचं असतं. खालच्यांचा भार हलका करण्याची तयारी ठेवायची असते.
यंदा गोकुळाष्टमी आणि स्वातंत्र्यदिन लागोपाठ आले आहेत. तेव्हा, जास्तीत जास्त काय करता येईल तर झेंडावंदनाच्यावेळीच राजकीय दहीहंडीही लावता येईल. झेंड्याच्या खांबाजवळच या राजकीय नेत्यांना दहीहंडीचे थर लावायला सांगायचे. म्हणजे मग झेंड्यासाठी वेगळी रस्सी बांधण्याची गरज पडणार नाही आणि सर्वात वर चढून कोण झेंडा फडकवणार यावरून त्या नेत्यांच्यातच ‘रस्सी’खेच होईल! ती खरी ‘राजकीय दहीहंडी’ ठरेल!
इकडे या खऱ्याखुऱ्या दहीहंडीचा सराव रंगत होता. ६-७ थर लावायचे म्हणजे शरीराचा, मनाचा किती कणखरपणा हवा, आत्मविश्वास हवा! सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची तयारी हवी, आपापसांत जबरदस्त समन्वय हवा... अरेच्च्या! आज शाळेत कुलकर्णी सरांनी हेच तर सांगितलं होतं!! आज आम्हाला एक ‘ऑफ पिरियड’ मिळाला होता - मराठीचा. राजेबाई आल्या नव्हत्या म्हणून त्यांच्या ऐवजी कुलकर्णी सर वर्गावर आले. हे सर आमच्या आख्ख्या वर्गाचे लाडके आहेत. आम्हाला ते कुठलाच विषय शिकवत नाहीत पण तरीही ते आम्हाला आवडतात. आमच्याशी ते नेहमीच खेळीमेळीनं बोलतात, निरनिराळ्या विषयावर आमच्याशी गप्पा मारतात. भारतीय स्वातंत्र्यलढा हा त्यांच्या खास जिव्हाळ्याचा विषय! त्याबद्दल बोलतानाच त्यांनी हे शब्द वापरले होते - मनाचा कणखरपणा, आत्मविश्वास, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची तयारी...
स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडीची अशी सांगड घालता येईल असं कुणालातरी वाटलं असेल का?!

प्रज्ञाच्या आत्याच्या घरून आम्ही रात्री दहा वाजता निघालो. प्रज्ञाची आई बरोबर असल्यामुळे तशी चिंता नव्हती. वाटेत रस्त्यावर ठिकठिकाणी उद्याची तयारी म्हणून रोषणाई केलेली होती, निरनिराळ्या दहीहंड्यांचे मोठमोठे फलक लावलेले होते. प्रत्येक फलकावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो, त्यांचा जयजयकार, दहीहंड्यांसाठी त्यांनी लावलेली बक्षिसं... आणि शेवटी आठवल्यासारखं कुठेतरी एका कोपऱ्यात तोंडी लावायला म्हणून आपल्या राष्ट्रध्वजाचं छोटंसं चित्र !...

तो राष्ट्रध्वज आहे म्हणून हे नेते आहेत आणि त्यांच्या या राजकीय दहीहंड्या आहेत... ज्यादिवशी त्यांना हे उमगेल त्यादिवशी आपल्या देशातली सर्वात मोठी, सर्वात उंच दहीहंडी यशस्वीरीत्या रचली जाईल... हे वाक्य पण कुलकर्णी सरांचंच!

सुजाता

परवा शाळेत एक विचित्र प्रकार घडला. ग्राऊंडवर रोजच्या सकाळच्या प्रार्थनेसाठी सगळे जमलेले होते. दहावीची मुलं जिथे उभी असतात त्या दिशेनं राष्ट्रगीत संपता संपता एकदम गडबड ऐकू आली. ३-४ मुलांना पी. टी. च्या सरांनी वेगळं काढलं. आम्ही आपापल्या वर्गांकडे परत जाताना पाहिलं की सर त्यांना मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये घेऊन चालले होते. नंतर कळलं की त्या मुलांना राष्ट्रगीताची चेष्टा करताना पकडलं. त्यांच्या वर्गात एक आशिष मोघे नावाचा मुलगा आहे - खाली मुंडी, चष्मा आणि भलताच स्टूडियस वगैरे आहे तो. तर ती चार मुलं राष्ट्रगीत सुरू असताना दबक्या आवाजात त्याला ‘... तव शुभ आशिष मोघे’ असं चिडवत होती. खरं सांगू का? राष्ट्रगीताची चेष्टा, अपमान करायचा नाही हे आम्हाला एकदम मान्य आहे पण ती ओळ ऐकल्यावर आधी पटकन हसूच आलं आम्हाला. त्या चार मुलांच्या विनोदबुद्धीला दिलेली दाद म्हणूया त्याला हवं तर! अर्थात विनोदबुद्धीचा वापर इतर ठिकाणी करावा; राष्ट्रगीताला त्यासाठी लक्ष्य करणं केव्हाही चुकीचंच!
"यापुढे हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत... नियमांची कडक अंमलबजावणी केली जाईल... एकीकडे युनेस्कोसारख्या संस्थेनं आपल्या राष्ट्रगीताला सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवल्याची बातमी येते आणि इथे आपल्याच देशातली उगवती पिढी त्याचा मान राखत नाही म्हणजे काय! "... कालच्या प्रार्थनेच्या वेळी झेंडे सर, आमचे मुख्याध्यापक, भयंकर चिडले होते.
त्यांचं बाकी सगळं बरोबर होतं पण युनेस्कोच्या बातमीत काही तथ्य नाही असं दादा सांगत होता. त्याला तशी एक फॉरवर्डेड मेल आली होती. युनेस्कोच्या वेबसाईटवर पण त्याचा काही उल्लेख नाहीये म्हणे! मग ही सुद्धा आपल्या राष्ट्रगीताची एक प्रकारे चेष्टाच नाही का? ज्या कुणी ही बातमी पसरवली असेल त्यांना कोण धरणार? कुठल्या मुख्याध्यापकांसमोर त्यांना उभं करायचं? त्यांना काय शिक्षा करायची?
एकीकडे हे चित्र आणि दुसरीकडे - हिंदी अस्मिताची मावशी सांगत होती की अमेरिकेत त्यांच्या शेजारी एक मराठी कुटुंबच राहतं. आपलं राष्ट्रगीत कधी ओझरतं जरी ऐकू आलं तरी त्या शेजारणीचे लगेच डोळे भरून येतात! बीजिंग ऑलिंपिक्समध्ये नेमबाजीच्या स्पर्धेत अभिनव बिंद्रा शेवटच्या तीनांत पोहोचल्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ झळकताच पुढचा तास-दीड तास ती टी.व्ही. समोर बसून होती... म्हणे की जर तो जिंकला तर आपल्या राष्ट्रगीताची धून ऐकायला मिळेल!
या पंधरा ऑगस्टला दादा आणि त्याचे मित्र राजगडावर जाणार आहेत. त्यांच्या ट्रेकींग गृपचा तिथे झेंडावंदनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी त्यांनी तयार करून घेतलेला झेंडा त्यानं मला दाखवला. झेंड्याची मापं काटेकोरपणे ठरवलेली असतात म्हणे. कुठलाही झेंडा त्या मापांतच तयार केला गेला पाहिजे असा दंडक आहे. मला हे माहितच नव्हतं! दादाकडून कधीकधी अश्या इंटरेस्टिंग गोष्टी कळतात.
पंधरा ऑगस्टला शाळेत आम्हाला साडेसात वाजता झेंडावंदनासाठी जायचं आहे. त्यानंतर विज्ञान प्रदर्शन आहे. दरवर्षीच असतं. विद्यार्थ्यांचा सहभाग ऐच्छिक असतो. भाग घेणारे विद्यार्थी खूप छानछान प्रयोग, प्रतिकृती, घोषणाफलक बनवतात. यंदाच्या प्रदर्शनाचे विषय आहेत - वाऱ्यापासून वीजनिर्मिती, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी-शुद्धीकरणाच्या पद्धती.प्रदर्शनाचे विषय समजल्यावर मराठी अस्मिताची ताबडतोब प्रतिक्रिया आलीच.
"घनकचरा व्यवस्थापन हा विज्ञान-प्रदर्शनाचा विषय कसा काय होऊ शकतो? तो तर समाजशास्त्राचा विषय झाला. " समाजशास्त्राचा उल्लेख केल्याशिवाय हिला तर चैनच पडत नाही!
"घनकचरा व्यवस्थापन नीट केलं नाही तर रोगराई पसरते, आरोग्यावर परिणाम होतो आणि मग तो विषय विज्ञानाच्या दिशेला वळतो, कळलं? " हिंदी अस्मितानं तिचं शंकानिरसन करण्याचा प्रयत्न केला.
"हे वळण प्रदर्शनातल्या प्रतिकृतीत कसं काय दाखवणार, बरं? " ‘की’ची एक शंका.
"आणि ‘वाऱ्यापासून वीजनिर्मिती’चं काय? १५ ऑगस्टला कधीच वारा नसतो! झेंडावंदनानंतर कधीतरी झेंडा फडकताना बघितलाय का आजपर्यंत? मग प्रदर्शनातही वाऱ्यापासून वीजनिर्मिती होताना कशी दाखवणार? "
"अगं, मग तुला कुठला विषय हवा आहे प्रदर्शनात? " हिंदी अस्मिता चक्क वैतागली.
"दहीहंडी! "
"काऽऽय? बरी आहेस ना? भाग घेणारे विद्यार्थी काय चार तास दहीहंडीचे थर लावून उभे राहणार का आपापल्या स्टॉल्सवर? "
"तसं नाही. पण नीट विचार करून बघा. एखाद्या दहीहंडीचे ७-८ थर लावले जातात तेव्हा फिजिक्सचे किती नियम, संकल्पना पाळल्या जातात... "
"... आणि बायॉलॉजीचे पण! " प्रज्ञाला कल्पना एकदम पटली.
"आता यात बायॉलॉजी कुठून आलं? "
"अगं, प्रत्येक थराचं वर्तुळ करताना साधारण समान उंचीचे लोक निवडावे लागत असतील ना? नाहीतर वरच्या थरांना प्रॉब्लेम नाही का होणार? "
"हो. शिवाय सगळ्यांच्या हातापायांच्या स्नायूंत चांगली ताकद पाहिजे, ती येते सकस आहार आणि व्यायामामुळे आणि हे आपण बायॉलॉजीतच शिकतो! "
"ओक्के! मग असं कर, पुढच्या वर्षीच्या प्रदर्शनाच्या वेळी सायन्सच्या बाईंना जाऊन हा विषय सुचव। मग तर झालं? "
"नकोऽऽ! त्यापेक्षा मी दहीहंडीच्या सातव्या थरावर चढेन एकवेळ! "
"आणि तिथून कडमडलीस, म्हणजे? "
"फिजिक्सचे नियम व्यवस्थित पाळले तर कडमडणार नाही। आणि जर कडमडलेच तर मग बायॉलॉजी आहेच की मला बरं करायला!"

दहीहंडीची ही केमिस्ट्री सायन्सच्या बाईंना कळली तर त्या फीट येऊन पडतीलच बहुतेक!!

----------------------------------------------------------------------------------------------
(दिनांक १३ ऑगस्ट २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीतला हा लेख. http://www.loksatta.com/daily/20090813/viva01.htm )

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)