पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

 बंगलोरमध्ये राहणारी तरुण नायिका. दक्षिण भारतीय. तिचं कुटुंब आधुनिक विचारांचं आहे. कुटुंब म्हणजे आता फक्त वडील. आईने सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केलेली. आई मानसिक रुग्ण असते. त्यापायी अधूनमधून तिचं वागणं कधी अति मनस्वी, तर कधी पार तर्‍हेवाईक होत असतं. एरवी हे इतर चारचौघांसारखंच कुटुंब. सुट्ट्यांमध्ये ट्रिपला जाणारं, घरी पार्ट्या आयोजित करणारं, मित्रमंडळींना जेवायला बोलावणारं. सगळ्यात आईचाच पुढाकार. पण या पार्ट्या, ट्रिप्स सुरळीतपणे पूर्ण होतीलच याची शाश्वती नाही, त्याला कारणही आईचा आजार. वडील आणि मुलीला त्याची कल्पना असते. दोघं शक्यतो आईला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतात.

मात्र, आईचा आजार आणि त्यांची कौटुंबिक वीण हे कादंबरीचं मुख्य कथानक नाही. या गोष्टी नायिकेच्या बालपणीच्या फ्लॅशबॅकमधून आपल्याला समजतात. मुख्य कथानक आहे ते Far Field, म्हणजे काश्मिर खोर्‍यातलं.
नायिकेच्या लहानपणी त्यांच्या घरी एकदा काश्मिरी गालिचे, हस्तकला वस्तू वगैरे विकणारा एक विक्रेता येतो- बशीर अहमद. आईची बशीरशी ओळख वाढते. दुपारच्या वेळी तो दारावर आला की आई त्याला घरात घ्यायला लागते. त्याच्याशी तासन तास गप्पा मारते. मुलीसाठी त्याच्याकडून क्वचित काही ना काही खरेदी करते. पण मुख्य उद्देश गप्पा. बशीर त्यांना काश्मिरच्या, तिथल्या माणसांच्या, निसर्गाच्या गोष्टी सांगतो. त्याच्या मनात काहीही काळंबेरं नसतं. किंवा त्या दोघांच्यात प्रेम वगैरेही निर्माण होत नाही. शिवाय या गप्पाही काही रोजच्या रोज होत नसतात. बशीर २-४ महिन्यांतून एखादेवेळी येत असतो. पण त्याच्या गप्पा ऐकताना आपली आई बर्‍यापैकी ताळ्यावर असते हे शाळकरी नायिका मनातल्या मनात टिपते.
एकदा असाच तो ४ महिन्यांनी येतो, तेव्हा बर्‍यापैकी उद्ध्वस्त झालेला वाटत असतो. तर आई त्याला चक्क आपल्या घरीच ठेवून घेते. वडीलही त्याच्याशी ओळख करून घेतात. पहिल्यांदाच आपण एका काश्मिरी व्यक्तीला प्रत्यक्ष पाहतोय याची त्यांना मौज वाटत असते. बशीर काही दिवस राहतो, घुम्यासारखा, गेस्ट रूममध्ये दार सतत बंद करून, आणि मग एका रात्री गुपचूप निघून जातो. नायिकेला दाट संशय असतो की आपली आईही त्याच्याबरोबर निघून जाणार. पण तसं काही होत नाही. आणि त्यानंतर बशीर पुन्हा कधीच त्यांच्या घरी येत नाही.

नायिकेचं शिक्षण संपतं. तिची आई आत्महत्या करते. एका मित्राशी नायिकेचं प्रेम जुळता जुळता राहतं. एका एनजीओमधली तिची नोकरी सुटते. या सगळ्या गोष्टींची संगती लावताना ती सैरभैर होते.

आणि एक दिवस अत्यंत गोंधळलेल्या मनःस्थितीत ती बशीर अहमदचा शोध घेण्याचा निर्णय घेते.
त्यासाठी थेट काश्मिर खोरं गाठते. लहानपणीच्या त्याच्या गोष्टींमधले काही संदर्भ तिला अंधुक आठवत असतात. इंटरनेटच्या मदतीने ती त्यावरून आणखी शोधाशोध करते आणि तो किश्तवाड भागात राहत असावा असा अंदाज बांधून सरळ कुणाला काही न सांगता तिथे जाऊन धडकते. तिथे एक-एक संपर्क शोधत, बशीरचं गाव शोधते. त्याचं घर शोधते.

त्याच्या घरी त्याची बायको, मुलगा, सून, लहान नातू असतात. बशीर मात्र कुठेच दिसत नाही. नायिकेचा, तिच्या आईचा बंगलोर रेफ़रन्स घरात सगळ्यांना माहित असतो. नायिका तिथे चक्क मुक्काम ठोकते. सुनेची आणि तिची मैत्री होते. गावातल्या इतरही काही लोकांशी तिची चांगली ओळख होते. पण बशीरचा मुलगा मात्र तिच्यापासून चार हात लांबच असतो. बशीरच्या म्हातार्‍या बायकोला काश्मिरीशिवाय इतर कोणतीही भाषा येत नसते. त्यामुळे तिच्याशीही काहीच संवाद शक्य नसतो.
गावकर्‍यांची दैनंदिनी, त्यांची कामकाजाची पद्धत, भारतीय लष्कराचं अस्तित्व, त्याबद्दल गावकर्‍यांना काय वाटतं, हे सगळं खूप बारकाईने वर्णन केलेलं आहे. असे बरेच दिवस जातात आणि मग एक दिवस अचानक नायिकेला बशीर अहमदचा ठावठिकाणा समजतो. ती त्याला भेटते. थोड्या वेळापुरतीच. गुपचूप.
बशीरवर नेमका कोणता प्रसंग गुदरला, ज्यामुळे तो गायब झाला, ज्यामुळे अजूनही तो लपूनछपून राहतोय, हे नायिकेला गावच्या सरपंचाकडून समजतं. ते सुद्धा लगेच नाही, बरेच दिवस नेटाने प्रयत्न करत करत ती त्यांच्याकडून हे काढून घेते.

एकीकडे बशीरचा मुलगा हळूहळू ओपन-अप होत असतो. त्याला काश्मिरमध्ये राहण्याची इच्छा नाही. वडिलांसारखं एखाद्या मोठ्या शहरात जाऊन काहीबाही व्यवसाय करायचा आहे. तो नायिकेला मदत करण्याची विनंती करतो. ती तयार होते. पण त्याला तिथून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांमुळे लष्कराला तिच्यावर संशय यायला लागतो.
दरम्यान नायिकेच्या वडिलांचा एक मित्र काश्मिर खोर्‍यातच ब्रिगेडिअर असतो. त्यांच्याकरवी वडिलांना नायिकेचा पत्ता लागतो. ब्रिगेडियर तिला काश्मिर खोर्‍यातून जम्मूत यायला मदत करतो. तिथून ती घरी परतते- निव्वळ रिकामपण घेऊन. तिला क्लोजर मिळतच नाही...

किंवा खरं म्हणजे चारशे-साडे चारशे पानांच्या पसार्‍यातून वाचकांनाच हाती काही लागत नाही !!
कादंबरी लिहिण्यापूर्वी लेखिका काश्मिर खोर्‍यात राहून, तिथलं जनजीवन समजून घेऊन आलेली असणार, इतकंच जाणवतं. लेखनामागची मेहनत जाणवते. पण शेवटी ’कहना क्या चाहती हो??’ अशी भावना होते.

काश्मिरशी नायिकेचा संबंध कसा येतो त्याचं कारण म्हणजे खरंतर कथानकाचा पाया आहे. त्याला जोडून वातावरणनिर्मितीही चांगली केली आहे. आईच्या मनोवस्थांची आंदोलनं दाखवायलाही त्याचा वापर चांगला केला आहे. पण तरी मला ते मूळ कारणच फारसं पटलं नाही. त्यामुळे तिथे वाचक म्हणून कादंबरी हातून जरा जरा सुटायला सुरुवात झाली.

ती किश्तवाडमध्ये पोचते. तिथे एका मध्यमवयीन काश्मिरी जोडप्याशी तिची गाठ पडते. त्यांच्या होम-स्टेमध्ये ती सुरुवातीला राहते. तिथे जनरल पर्यटकांसाठी म्हणून होम-स्टे नसतो. तर काश्मिरमध्ये अचानक गायब झालेल्या आपल्या जवळच्या व्यक्तीला शोधण्यासाठी आलेल्या लोकांची सोय केली जात असते. त्या जोडप्याचा तरुण मुलगा असाच काही वर्षांपूर्वी गायब झालेला असतो. तेव्हापासून त्या दोघांनी या कामी वाहून घेतलेलं असतं. सरकारकडे वेळोवेळी निवेदनं पाठवणं, वकिलांमार्फत कायदेशीर हालचाली, इ. नायिका तिथे ८-१० दिवस असते. त्या ८-१० दिवसांच्या वर्णनात ऑलमोस्ट ७०-८० पानं खर्ची केली आहेत. त्यामुळे वाचताना वाटायला लागतं, की त्यांच्या संपर्कातून ती बशीरचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार. त्या शोधाची गोष्ट पुढे येणार.
पण तसंही काही होत नाही. तिला अगदी सहजी बशीरच्या गावाची माहिती मिळते. Uhoh त्या जोडप्याच्या कथानकाचा धागा तसाच अधांतरी सोडून दिलाय. पुढे त्याचा कुठेही संदर्भ येत नाही.

पुढे बशीरच्या घरातला तिचा दीर्घ मुक्काम तर मला अजिबातच पटला नाही. आगा ना पिछा, बंगलोर रेफरन्स तिथे सर्वांना माहिती असला तरी असं कोण दीर्घ मुक्काम ठोकेल आणि घरचे तरी कसे तयार होतील?
गावातल्या शाळेत शिक्षिकेच्या नोकरीची ऑफर सरपंच देतात. हो-नाही करत ती नोकरी स्वीकारायचा निर्णय घेते. कशाच्या जोरावर? आईशी तिची खूप जवळीक असते, तिच्या आत्महत्येनंतर तिला बंगलोरमध्ये राहण्यात काही अर्थ नाही असं वाटत असतं, हे मान्य. तरी ती लहानपणापासून शहरी, उच्चभ्रू वातावरणात राहिलेली, इतक्या दुर्गम भागात राहून नोकरी करण्याचा निर्णय घेण्यामागे तेवढं कन्व्हिन्सिंग काही कारणही कथानकात येत नाही. त्यामुळे गावातल्या तिच्या मुक्कामादरम्यान कादंबरी माझ्या हातातून आणखी सुटली.
आणि शेवटी ब्रिगेडियरच्या जम्मूच्या घरात नायिकेचा आणि ब्रिगेडियरचा चक्क एक सेक्स-सीन अगदी सविस्तर दिलाय. तिथे तर वाचक म्हणून मोठी फसगत झाल्याची भावना निर्माण झाली.

शेवटी तिच्या हाती काही लागत नाही, याबद्दलही तितकीशी तक्रार नाही. पण कादंबरी म्हणून त्या पात्राचा काही ना काही ग्राफ दिसायला हवा. काहीतरी गवसलं, काही हरवलं, त्या अनुभवांमधून ते पात्र ग्रो झालेलं दिसायला हवं, तर तसंही काही नाही.

२-३ वर्षांपूर्वी लोकसत्ता-बुकमार्कमध्ये या पुस्तकाबद्दल वाचलं तेव्हा हे विशलिस्टला टाकून ठेवलं होतं. इंटरनेटवर या पुस्तकाला लोकांनी डोक्यावर घेतलं आहे. किंडलवर पुस्तकाची किंमत सतत चार आकडी दिसायची. एकदाच योगायोगाने एका डीलमध्ये अगदी स्वस्तात दिसलं तेव्हा मी झडप घालून विकत घेतलं.
पण माझा तरी टोटल भ्रमनिरास !
कधीतरी व्हायचंच असं... Lol

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)