पुस्तक परिचय : One Part Woman (मूळ लेखक - पेरुमल मुरुगन)

शंभर-एक वर्षांपूर्वीच्या तामिळनाडूतल्या एका खेड्यातल्या जोडप्याची (पोन्ना आणि काली) ही कथा आहे. लग्नाला १०-१२ वर्षं होऊनही त्यांना मूलबाळ नाही म्हणून गावातल्या लोकांकडून, नातेवाईकांकडून त्यांना टोमणे ऐकून घ्यावे लागत असतात. दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम असतं. पोन्ना मूल व्हावं म्हणून बर्यापैकी डेस्परेट असते; कालीचं म्हणणं असतं आपण दोघं एकमेकांच्या साथीला असणं जास्त महत्वाचं. त्या काळात त्यांच्या गावात, पंचक्रोशीत ज्या प्रथा, परंपरा, रूढी, अंधश्रद्धा असतात त्यानुसार दोघं नाना उपाय करतात. या पूजाअर्चा, नवस, विविध देवाची सेवा यांची पुस्तकात खूप सविस्तर वर्णनं येतात. माझ्यासारख्या व्यक्तीला एका टप्प्यानंतर त्याचा कंटाळा यायला लागतो. तरी दोघांचं त्यामागचं डेस्परेशन या त्यातल्या एका धाग्याने मला बांधून घातलं. त्या वर्णनातली पोन्ना आणि कालीची इंटरअॅक्शन काही काही ठिकाणी खूप बारकाव्यांसहित आणि नकळत वाचकांसमोर येते. त्यांच्यातलं नातं त्यातून छान समजतं. या पूजा, उपासतपास, नवस कशाचाच उपयोग होत नाही. शेवटी दोघांच्या आया एक मार्ग सुचवतात. त्या भागातल्या मंदिरात दरवर्षी एका उत्सवाच...