पुस्तक परिचय : Milk Teeth (Amrita Mahale)


Lockdown book #5

१९९० च्या दशकाच्या अखेरीस कात टाकू पाहणारं मुंबई शहर आणि त्या पार्श्वभूमीवरची माटुंग्यातल्या एका जुन्या इमारतीची कथा - असं साधारण synopsis वाचून हे पुस्तक घ्यावंसं वाटलं.

इमारत खूप जुनी झाली आहे, तिथल्या भाडेकरूंना बाहेर काढून त्याजागी काहीतरी चकाचक टोलेजंग उभं करण्याचा मालकाचा डाव आहे. त्याविरोधात भाडेकरू एकत्र येऊन काही एक धोरण ठरवण्याचं बघतायत. त्यांच्यात मतभेद आहेत, गटबाजी आहे...
इमारतीचं भवितव्य काय असेल या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर एक प्रेमकथा, एक प्रेमाचा त्रिकोण, तेव्हाच्या मुंबईतली तरुणाई, त्यांच्या बालपणीच्या आठवणी, जागतिकीकरणाचे छोटे छोटे पैलू, मुंबईसारख्या शहराची त्यामुळे होणारी घुसळण... अशी ही कादंबरी आहे.

बाबरी घटना, जातीय दंगली, बॉम्बस्फोट हे सर्व झेलून जागतिकीकरणाला सामोरी जाणारी मुंबई- मराठी मध्यमवर्गीय नायिकेच्या दृष्टीकोनातून मांडलेली- पुस्तकात छान उतरली आहे. मुंबईवर प्रेम असणार्यां वाचकांना ते बारीकसारीक सगळं टिपायला आवडेल.

कथानकात इमारतीचं रूपक माझ्या अपेक्षेपेक्षा अगदीच थोडं वापरलं आहे. प्रेमाच्या त्रिकोणावर जास्त भर आहे. कदाचित लेखिकेला तसंच अभिप्रेत असावं; पण मग synopsis वेगळा असायला हवा होता, असं वाटलं.

प्रेमाच्या त्रिकोणातल्या एका कोनाचं वाचकांपुढे आधी एक आदर्श रूप उभं राहतं, उत्तरार्धात त्याला कलाटणी मिळते. त्याच धाग्याला धरून केलेला कादंबरीचा शेवट मला आवडला.
ठामठोक शेवट असणारी पुस्तकं आवडणार्या मंडळींना कदाचित तो आवडणार नाही.

पुस्तक गुंतवून ठेवणारं आहे, मात्र काही काही ठिकाणी लांबलेलं वाटलं. पुस्तकाची लांबी कमी करून आणखी crisp केलं असतं तर वाचायला आणखी मजा आली असती.

हे या लेखिकेचं पहिलंच पुस्तक आहे असं नेटवर समजलं.

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)