पुस्तक परिचय : The Courier (Kjell Ola Dahl)

Lockdown मध्ये वाचलेलं पहिलं पुस्तक : The Courier (Kjell Ola Dahl)

१९४२ साली ऑस्लोत झालेली एका तरुण स्त्रीची हत्या, तिच्या नवर्यावरच त्या हत्येचा आळ, पण तो त्याच रात्री गायब होतो, त्यांची मुलगी तेव्हा काही महिन्यांची असते.
पुढे तो माणूसही मृत घोषित होतो, मात्र २५ वर्षांनंतर पुन्हा ऑस्लोत अवतरतो, आपल्या मुलीला भेटण्यासाठी, आणि आपल्यावरच्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी...

१९४२ आणि १९६७ सालांमध्ये कथानक आळीपाळीने ऑस्लो-स्टॉकहोम-ऑस्लो अशा पुढेमागे उड्या मारतं. सुरूवातीला आणि शेवटी सध्याच्या काळाचा संदर्भ येतो. त्या कुटुंबाला ओळखणारी, नाझी रेझिस्टन्सशी संबंध असणारी इतर पात्रं कादंबरीत आहेत. १९४२ सालातल्या घटना दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर घडतात. मात्र ही पार्श्वभूमी गरजेपुरतीच घेतली आहे. एकूण रहस्याची उकल, पात्रांचे दृष्टीकोन खूप बारकाईने येतात. ते समजून घेण्यासाठी ती पार्श्वभूमी उपयोगी ठरते. त्यामुळे वातावरणनिर्मिती जबरदस्त झाली आहे. कादंबरी अगदी गुंगवून ठेवते.

मला रिलेट झालेली आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे - आमच्या उत्तर युरोप सहलीदरम्यात ऑस्लोत आम्ही चालत चालत जिथे जिथे फिरलो त्याच सगळ्या जागा, रस्ते, बागा, मॉन्युमेंट्स कादंबरीत येतात. हा निव्वळ योगायोग झाला. पण त्यामुळे त्या-त्या ठिकाणी ते-ते प्रसंग घडताना दिसले आणि वाचायला आणखी मजा आली. (आधी हे पुस्तक वाचून मग ऑस्लोत फिरले असते तर कदाचित असं इतकं रिलेट झालं असतं की नाही शंका आहे.)

गुडरीडसवर याचे मिक्स्ड रिव्ह्यूज आहेत. पण मला पुस्तक खूप आवडलं. मूळ नॉर्वेजिअन भाषेतलं पुस्तक आहे. मी किंडलवर इंग्लिश अनुवाद वाचला.

लेखक Nordic Noir मधला अग्रणी मानला जातो असंही नेटवर समजलं. म्हणून त्याची इतर पुस्तकं शोधली. पण त्याचं हेच एक पुस्तक सर्वात जास्त लोकप्रिय आहे असं दिसतं. तरी आणखी एक पुस्तक शॉर्ट-लिस्ट केलं आहे.


Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)