पुस्तक परिचय : Hello, Bastar (Rahul Pandita)


Lockdown book #4


पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर पहिली प्रतिक्रिया - Mixed feelings!

नक्षलवादी चळवळीबद्दल माझ्यासारख्यांना पेपरमध्ये वगैरे वाचून तेवढं माहिती असतं. आदिवासी भागात, जंगलात त्यांची चळवळ, सुरक्षा दलांवरचे हल्ले, यांच्या त्या-त्या वेळच्या बातम्या मागे पडल्या की तो विषय शहरी विचारांच्या परिघाबाहेर जातो; पुन्हा तशी काही घटना घडेपर्यंत...

हे पुस्तक (परत एकदा, माझ्यासारख्यांना) त्यापलिकडे नेतं. लेखक राहुल पंडिता या पुस्तकाची पूर्वतयारी म्हणून नक्षलवाद्यांच्या दलाबरोबर जंगलात राहिले. त्याशिवाय त्यांनी काही मोठ्या माओवादी नेत्यांच्या मुलाखती घेतल्या.

नक्षलवादी, खरंतर माओवादी चळवळीचा (दोन्हींत नेमका काय फरक आहे ते पुस्तकात सुरुवातीला सांगितलं आहे) इतिहास, कार्यपद्धती, देशाच्या वेगवेगळ्या भागांतला त्यांचा प्रभाव, राजकीय नेत्यांची या प्रश्नावरची 
भूमिका, त्या चळवळीत वेळोवेळी उदयाला आलेले नेते, शक्य तिथे त्या नेत्यांची पार्श्वभूमी, अशी सगळी माहितीची भरपूर जंत्री पुस्तकात येते. या चळवळीची माहिती देणं हाच पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.

एक-दोन ठिकाणी असा माहितीपर मजकूर जरा कंटाळवाणा झाल्यामुळे पुस्तक मध्येच सोडून द्यावंसंही वाटलं मला; पण ते तत्वात बसत नाही. त्यामुळे पुस्तक संपूर्ण वाचलं जाणार याची खात्री होती. (कदाचित पूर्ण करायला वेळ लागला असता; पण सुदैवाने ते ही झालं नाही.)

स्वातंत्र्योत्तर काळातली ग्रामीण आणि निमशहरी भागांतली जमीनदारी, भूमिहीन मजूर-शेतकरी, समाजातली पराकोटीची आर्थिक विषमता, गरीबांचं शोषण, या सगळ्यातून प.बंगालमधल्या नक्षलबारी इथे या चळवळीचा उदय झाला हे नव्याने सांगायला नको.
त्याला समांतर आधुनिक महानगरी भारताचं चित्र पुस्तकात मांडलेलं आहे, त्याने मात्र डोक्यात भुंगा सोडलाय. शहरी भागांमध्ये या चळवळीचा अजून म्हणावा तितका जम बसलेला नाही. चळवळीतल्या मोठ्या नेत्यांची ती कायमची इच्छा आहे, त्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत. पुस्तकांत म्हटलंय, ती चळवळ पसरू शकेल असं वातावरण आता महानगरी भारतात आढळून येतं. मूठभर लोकांकडे एकवटलेली प्रचंड संपत्ती, महानगरांच्या झोपडपट्ट्यांमध्ये किडा-मुंग्यांसारखे राहणारे कष्टकरी, त्यांच्या कष्टांच्या बदल्यात त्यांना मिळणारा अत्यल्प मोबदला, त्यांचं पराकोटीचं आर्थिक शोषण ... ही दरी आपण कमी करू शकलो नाही तर एक दिवस शहरी नक्षलबारी घडायला वेळ लागणार नाही.

पुस्तकात येणारी काही माओवादी नेत्यांची नावं माहिती होती - चारू मुजुमदार, कोबाद गांधी, वरवरा राव, इ. मात्र, अनुराधा गांधी (पूर्वाश्रमीची अनुराधा शानबाग) हे नाव माझ्या कधीही वाचनात आलं नव्हतं आणि त्याचं माझं मलाच आश्चर्य वाटलं.

आजवर पोलीस आणि इतर सुरक्षा दलांची मोठी शक्ती नक्षलवाद्यांशी लढण्यात खर्ची पडली आहे. अनेक उच्च पोलीस अधिकार्यांनी त्यासाठी प्रामाणिक कष्ट घेतले आहेत. सुरुवातीला ’mixed feelings’ म्हटलं ते या पार्श्वभूमीवर. अनेकदा असं म्हटलं जातं, की माओवाद्यांची तत्वं चांगली आहेत, मात्र त्यांचा सशस्त्र चळवळीचा मार्ग चुकीचा आहे. त्याचे अनेक दाखले पुस्तकात आहेत. हे सारं एकत्र केलं की कोण चूक, कोण बरोबर हे ठरवणं कठीण होऊन बसतं.

तिथेच खरी मेख असते.

खरंतर, आपल्या घराच्या सुरक्षित चौकटीत बसून असे चूक-बरोबरचे पटापट निर्णय घेता आले म्हणजे बरं वाटतं; कारण त्याविना मनाला येणारी अस्वस्थता आपल्याला नको असते. हे पुस्तक वाचून मनाला अशी अस्वस्थता आली.

आधुनिक भारताच्या इतिहासाचा एक पदर या चळवळीशी जोडला गेलेला आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. असे विविध सामाजिक पदर जाणून घेण्याची इच्छा असणार्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावं. 

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)