पुस्तक परिचय : Em and The Big Hoom (Jerry Pinto)
Lockdown book #2
जेरी पिंटो हे पत्रकार म्हणून ठाऊक होते, पण त्यांनी कादंबरीलेखनही केलंय हे किंडलमुळे समजलं.
'एम अँड द बिग हूम' ही त्यांची कादंबरी म्हणजे त्यांच्या मनोविकारग्रस्त आईची कथा आहे. त्यांच्या आईच्या या विकारांचा स्पॅन खूप मोठा होता. विनाकारण बडबड, फकाफका बिड्या पिणं, गोड खाण्याला धरबंध नसणं (एका चहाच्या कपात ६-७ चमचे साखर) ते नर्वस ब्रेकडाऊन, हॅलुसिनेशन्स, डिप्रेशन अटॅक्स, घरातच आत्महत्येचे अनेकवेळा प्रयत्न, त्यातले काही गंभीर - इथपर्यंत सर्व प्रकारांना त्या कुटुंबाने तोंड दिलं.
जेरी पिंटो आणि त्यांची सख्खी मोठी बहीण दोघांनी आपल्या आईशी मारलेल्या गप्पांमधून प्रामुख्याने सर्व कथा समोर येते. त्यांची आई गप्पीष्ट होती, मोकळ्याढाकळ्या स्वभावाची होती, सेक्ससारख्या अवघड विषयांवरही ती आपल्या मुलांशी खुला संवाद साधायची. त्यांच्या गप्पा आणि लेखकाचं प्रथमपुरूषी निवेदन - या सगळ्यावर आईच्या विकारांचं मळभ आहे, तरी भाषा खुसखुशीत आहे.
![]() |
Add caption |
Em - म्हणजे मुलांनी आपल्या आईचं ठेवलेलं लाडकं नाव. पुस्तकात आईचं नाव 'इमेल्डा' आहे. बोलता बोलता आईनं काही बेधडक किंवा अचाट विधान केलं की मुलं तिला 'Em!' असं म्हणतात. (आई! काय बोलतेयस तू हे! - अशा अर्थाने).
The Big Hoom - म्हणजे त्यांचे वडील. ते काहीसे अबोल, पण कुटुंबाचा आधार असलेले, कणखर, मुलांनी काही सांगितलं किंवा विचारलं की 'हुं...' असा हुंकार देणारे, म्हणून मुलांनी त्यांचं नाव असं ठेवलेलं असतं. (पुस्तकात त्यांचं नाव ऑगस्टिन).
इमेल्डा आणि ऑगस्टिन यांची बालपणीची पार्श्वभूमी पुस्तकात थोडक्यात आणि तुकड्यातुकड्यात येते. मग मुंबईतलं त्यांचं प्रेमप्रकरण (तब्बल १० वर्षं), घरच्यांच्या संमतीने लग्न, मुलांचा जन्म. त्याच्याच आगेमागे इमेल्डाच्या मनोविकारांची सुरूवात होते. अमेरिकन कौन्सुलेटमधली नोकरी तिला सोडावी लागते. आर्थिक आघाडीवर कुटुंबाची परिस्थिती खाऊनपिऊन जेमतेम सुखी अशी असते. ४००-४५० स्क्वे.फुटांचं घर असतं.
या सगळ्यात हे कुटुंब मानसिक पातळीवर कसं भरडून निघतं, तरी चौघांचा एकमेकांना किती खंबीर आधार असतो, याचे बारीकसारीक तपशील निवेदनातून वाचकांनी जाणून घ्यायचे आहेत आणि ते हेलपाटून टाकणारे आहेत.
पन्नाशीनंतर कधीतरी इमेल्डाचा नैसर्गिक मृत्यू होतो. तेव्हा मुलं विशीत असतात. मृत्यू, त्यानंतरचे १-२ दिवस यांच्या वर्णनावर कादंबरी संपते. ते वर्णन खूप अंतर्मुख करणारं आहे. खूप साधं तरी सुंदर आहे.
कुटुंबावर काय प्रसंग ओढवला, आईचा विकार किती भयानक होता, याबद्दल कुठेही गळा न काढता कुटुंबपद्धतीची, निकटच्या नातेसंबंधांची खणखणीत बैठक स्पष्ट करणारं, साधीसोपी, पण पकड घेणारी भाषा असलेलं, विषय गंभीर असला तरी आवर्जून वाचावं असं पुस्तक आहे.
Comments