पुस्तक परिचय : A Grave For Two (Anne Holt)

चांगल्या इंग्लिश थ्रिलर्सची मी फॅन आहे. किंडलवर साहजिक तशी पुस्तकं धुंडाळली जातातच. या कॅटेगरीत ’नॉर्डिक थ्रिलर्स’ किंवा ’स्कँडेनेव्हिया थ्रिलर्स’ असा एक प्रकार सतत दिसतो. बरीच आधी न ऐकलेली पुस्तकं त्यात कळली. लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे यात बर्‍याच स्त्री-लेखिका आहेत. त्यात हे एक पुस्तक सारांशावरून चांगलं वाटलं म्हणून घेतलं.

नॉर्वेची वर्ल्ड नं. वन स्कीइंग चॅम्पियन कुणाच्याही ध्यानीमनी नसताना एका डोपिंग प्रकरणात अडकते. तिचं करिअर तर पणाला लागतंच, शिवाय काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विंटर ऑलिंपिक्समधल्या नॉर्वेच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह लागतं. तिचे वडील म्हणजे नॉर्वेच्या स्कीइंग फेडरेशनमधलं एक प्रभावी व्यक्तिमत्व असतं. त्यांच्या आपल्या मुलीच्या स्कीइंग-करिअरवर खूप आशा असतात. त्यांची खात्री असते, की आपल्या मुलीला यात गोवलं गेलं आहे. ते एका स्त्री वकिलाकडे ही केस सोपवतात. मात्र कोर्टात लढण्यासाठी नव्हे, तर त्यापूर्वीचा गुपचूप तपास करण्यासाठी.

ही वकील एकेकाळी नावाजलेली, पण आता परागंदा होण्याच्या वाटेवर असलेली. परागंदा होण्याची कारणं त्या स्कीअरच्या वडिलांना माहिती असतात. त्यातून तिला बाहेर काढण्याचा मार्गही त्यांना माहित असतो. गुपचूप तपास करायचा की नाही हे तिचं ठरत नसतं. दरम्यान नॉर्वेच्याच वर्ल्ड नंबर वन पुरुष स्कीअरचा मृत्यू होतो. तो अपघात, आत्महत्या की घातपात, असा प्रश्न उभा राहतो. या दोन्ही प्रकरणांचा आपांपसांत काही संबंध आहे की हा निव्वळ योगायोग आहे, असाही प्रश्न असतो. तळ्यात-मळ्यात करणारी वकील हळूहळू या तपासात ओढली जाते. तिच्या जोडीला एक स्थानिक पत्रकार असतो.

हा तपास अगदी edge of the seat thriller नाही, पण निवेदनाच्या स्टाइलमुळे ते सगळं वाचायला मजा येते. स्कीइंगची बॅकग्राऊंड, त्याची जार्गन, त्यातली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि कुरघोडी, आपल्याकडे जशी चिल्लीपिल्ली सुद्धा घरात क्रिकेट खेळतात, तशी तिथली मुलं लहान असल्यापासून अगदी सहज स्कीइंग करायला शिकतात ... हे सगळं आपल्याला तसं अपरिचित आहे. वाचताना ती नॉव्हेल्टी वाटते.
शिवाय नॉर्वेतल्या कडक हिवाळ्याचा वातावरणनिर्मितीसाठी खूप छान उपयोग करून घेतला आहे. धीम्या गतीनं सस्पेन्सचा एक-एक पदर उलगडत जातो, त्यात ती बर्फाळ हवा उत्कंठा वाढवायला मदत करते.
२०१८ सालचं प्यॉन्गचॅन्ग विंटर ऑलिंपिक्स, त्यात नॉर्वेला मिळालेली पदकं, टॉप पोझिशन हे प्रत्यक्षातले तपशील कथानकात वापरले आहेत, ते पण मला आवडलं. (मुख्य डोपिंग कथानकाचाही प्रत्यक्षातल्या घटनांशी काही संबंध असेल तर कल्पना नाही.)

यात तीन-चार उपकथानकं आहेत. त्यातलं एक या पुस्तकापुरतं मर्यादित असावं. बाकीची या वकीलीण-तपास-सिरीजला नजरेसमोर ठेवून रचली गेली असावीत असं मानायला जागा आहे. तरी त्यांचा फाफटपसारा वाटत नाही. (हे पुस्तक म्हणजे त्या सिरीजचा पहिला भाग आहे.)

एकूणात स्कीइंगची पार्श्वभूमी, या क्रीडाप्रकाराचं नॉर्वेच्या मातीत भिनलेलं असणे आणि या गोष्टीचा कथानकात करून घेतलेला उपयोग, यामुळे मला हे पुस्तक आवडलं.

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)