पुस्तक परिचय : Don't Worry, He Won't Get Far on Foot (John Callahan)

 जॉन कॅलाहान हा अमेरिकेतला (पोर्टलंड) एक प्रसिद्ध कार्टूनिस्ट. अगदी लहान वयातच दत्तक घेतला गेलेला, त्याबद्दल कल्पना असलेला, दत्तक आई-वडिलांनी सर्व कर्तव्य निभावून मोठा केलेला, घरात लहान भावंडं असलेला.

तरूण वयात त्याला दारूचं भयंकर व्यसन लागलं. त्यापायी २१व्या वर्षी एका भीषण अपघातातून तो मरता मरता वाचला. पण कमरेपासून खाली पूर्ण अपंग झाला. अपघाताच्या वेळी तो इतका नशेत होता की अपघाताची त्याच्या मनात कोणतीही स्मृती नव्हती.


त्यानंतरचे उपचार, रिहॅबिलिटेशन, तरीही पुढची ७-८ वर्षं दारूचं अतोनात व्यसन सुरूच राहणे, मग एक दिवस अचानक साक्षात्कार झाल्यासारखं अल्कॉहॉलिक्स अ‍ॅनॉनिमसला फोन, व्यसन सोडण्याचे प्रयत्न, त्यातून आपल्या हातात चित्र काढायची कला असल्याची जाणीव, आणि मग झपाटल्यासारखी कार्टून्स काढून ती विविध पब्लिकेशन्समध्ये प्रकाशित करणे .... हा सगळा प्रवास त्याने स्वतःच्या शब्दांत लिहिला आहे.

इतका ड्रामा असूनही अगदी प्रांजळ निवेदन, हलकीफुलकी सोपी भाषा, खुसखुशीतपणा यामुळे पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे. अगदी पटापट वाचून झालं.
व्हीलचेअरवरचं आयुष्य, त्यातल्या अडचणी, रोजची दैनंदिन कर्मं उरकतानाचे प्रश्न - हे अगदी सविस्तर लिहिलेलं आहे. ते खूप चित्रदर्शी आहे. एका टप्प्यावर त्यानं आपल्या जन्मदात्यांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला होता. त्याबद्दलही सविस्तर लिहिलं आहे.

पुस्तकात त्याची बरीच कार्टून्स दिलेली आहेत. ती खूप मार्मिक आणि भेदक आहेत. चित्रांची शैलीही वेगळीच आहे. अपघातामुळे त्याला हातात जेमतेम पेन-पेन्सिल धरता यायचं. एका हाताने ते धरून, तो हात दुसर्‍या हाताने धरून तो चित्रं काढायचा. हे लक्षात घेतलं तर ती चित्रं सॉलिड आहेत.
पुस्तकाचं शीर्षक आहे, ते देखील त्याचं एक प्रसिद्ध चित्र आहे.

२ वर्षांपूर्वी या पुस्तकावर सिनेमा आला आहे. प्राइमवर आहे. तो पण नंतर पाहिला. Joaquin Phoenix नं ती भूमिका केली आहे. सिनेमाही तितकाच आवडला. त्याच्या आयुष्याचं नेमकं मर्म पकडलं आहे.

नक्की वाचावं असं पुस्तक.


Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)