Wednesday, June 17, 2009

एव्हरेस्ट आणि अस्मिता

(१८ जून २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत आलेला हा लेख.)

॥१॥ किर्ती

आमच्या वर्गात अस्मिता नावाच्या दोन मुली आहेत... एक अस्मिता देशपांडे आणि दुसरी अस्मिता शर्मा. एकीला हाक मारली की दोघीही वळून बघतात. म्हणून आम्ही त्यांची ‘मराठी अस्मिता’ आणि ‘हिंदी अस्मिता’ अशी नावं ठेवलीयेत. तशी अस्मिता शर्माही चांगलं मराठी बोलते. सातवीपासून आहे आमच्या वर्गात. पण घरी तिला हिंदी बोलायची सवय आहे. त्यामुळे शाळेत आमच्याशी बोलताना ती मधूनच कधीतरी हिंदीत सुरू करते. त्यामुळेही ती नावं त्यांना अगदी ‘फिट्ट’ बसतात. शिवाय, ‘काल अस्मिता भेटली होती... कोण अस्मिता? शर्मा की देशपांडे?... देशपांडे’ इतकी लांबड लावण्यापेक्षा ‘काल मराठी अस्मिता भेटली होती’ असा सोप्पा शॉर्टकटही मारता येतो आम्हाला!

या त्यांच्या नावांवरून एकदा फुल्ल कॉमेडीच झाली - रोज सकाळी शाळेत ग्राऊंडवर प्रार्थनेनंतर ताज्या बातम्या माईकवरून सगळ्यांना वाचून दाखवल्या जातात. ते काम गेली अनेक वर्षं आमच्या समाजशास्त्राच्या आचरेकर बाईच करतात. त्यादिवशी कृष्णा पाटीलनं एव्हरेस्ट सर केल्याची प्रमुख बातमी होती. ती वाचून दाखवताना बाईंनी ‘मराठी अस्मिता उंचावेल अशी एक घटना काल घडली आहे... ’ अशी सुरूवात केली. ते ऐकल्याऐकल्या अस्मिता देशपांडे नुसती एकदा टाचा उंच करून उभी राहिली. झालं, आम्हाला सगळ्यांना इतकं हसू यायला लागलं! त्यात, ग्राऊंडवरच्या त्या ‘सावधान! ’ पोझमध्ये - हसणे वगैरे ‘फालतू’ प्रकारावर जेव्हा कडक बंदी असते - साध्यासाध्या गोष्टींचंही जरा जास्तच हसू येतं!

आता, आचरेकर बाईंसमोर उंचावायला आधी ही मराठी अस्मिता त्यांच्या तासाला जागृत तर असायला हवी! कारण, समाजशास्त्राचा तास तिला जाम बोअर होतो. त्यातच आठवड्यातले चार दिवस तो तास मधल्या सुट्टीनंतर लगेच असतो. त्या तासाला तिला बाईंनी किमान दोन-तीनदा तरी, ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना ‘कॉट नॅपिंग’, अगदी तसं पेंगताना पकडलंय! बाई एकदा कसल्यातरी नोटस देत होत्या आणि त्या लिहून घेताना ही भरल्यापोटी मस्तपैकी पेंगत होती. त्यामुळे वहीत काही ओळींवर अक्षरं वेडीवाकडी, तिरकी आली होती. हे बाईंच्या लक्षात आलं बहुतेक... त्यांनी नेमकी तिचीच वही मागितली बघायला... आणि नंतर तिला आणि सगळ्या वर्गालाच लांबलचक लेक्चर दिलं! (लेक्चर देण्यात आचरेकर बाई एकदम पटाईत आहेत. कित्येक वेळेला त्यांच्या तासाला मूळ विषयाऐवजी भलत्याच विषयाला पकडून आम्हाला लंबीचौडी भाषणं देत असतात!)

त्यादिवशी ग्राऊंडवरून परत वर्गात जाताना आम्ही सगळ्यांनी अस्मिता देशपांडेची तिच्या आणि आचरेकर बाईंच्या या खास(!) गट्टीवरून जाम खेचली. आजकाल जसं पेपरमध्ये, टी. व्ही. वर ‘मराठी अस्मिता’ या शब्दांचा सतत गजर, शंख, धोशा, मारा चालू असतो, तश्याच हेडलाईन्स बनवून टाईमपास सुरू केला... आमचा वर्ग दुसऱ्या मजल्यावर आहे. त्यादिवशी बडबडण्याच्या नादात अस्मिता शर्मा जिना चढताना मध्येच एका पायरीला अडखळली. त्यावर बातमीदाराच्या थाटात तोंडासमोर माईक धरल्याचं ऍक्टिंग करत सुजी लगेच म्हणाली - ‘मराठी अस्मितेला हसतहसता हिंदी अस्मिताच ठेचकाळली. आता यातून ती लवकर सावरेल असं वाटत नाही. ’... युनिट टेस्टला अस्मिता शर्माला इतिहासात सर्वात जास्त मार्क्स मिळाले. त्यावर अजून एक ब्रेकिंग न्यूज बनली - ‘आचरेकर बाईंमुळे हिंदी अस्मिता मराठी अस्मितेपेक्षा वरचढ ठरली’!...

`मराठी अस्मिता दुखावली’ काय, ‘हिंदी अस्मिता जायबंदी झाली’ काय... अकला पाजळण्यात तर सगळ्याजणी एव्हरेस्टपेक्षाही जास्त उंची गाठायला आधी तैय्यार! मात्र, आम्ही आमचे हे तारे तोडतो ते फावल्या वेळेत - मधल्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर किंवा ऑफ पिरियडलाच. आमची ही असली बडबड जर आमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचली तर...? तर काही नाही, त्या कृष्णा पाटीलनं एव्हरेस्टची उंची गाठली; या उंचावलेल्या-ठेचकाळलेल्या सगळ्या अस्मिता, किर्ती, प्रज्ञा, सुजाता मग परिक्षेत त्या उंचीइतक्याच खोल खड्ड्यात पडतील!

॥२॥ सुजाता

"... ही प्रादेशिक अस्मिता म्हणजे नक्की काय प्रकरण आहे हे कुणी सांगेल का एकदा? कधी कधी वाटतं ती पिसासारखी किंवा कागदासारखी हलकी असेल, फुलासारखी नाजुक असेल कारण साध्या, छोट्याछोट्या गोष्टींनी तिला ठेच लागते, ती दुखावली जाते, तिला हानी पोहोचते! कधी वाटतं ती एखाद्या ज्वलनशील पदार्थासारखी असेल. खुट्ट झालं की पेट घेते, अजून दहा घरं जाळते!... " ९ वी(अ) मधला मोहित राजवाडे अगदी रंगात येऊन भाषण देत होता. हा आमच्या शाळेतला वक्तृत्त्व स्पर्धेचा ‘स्टार प्लेअर’ आहे - युवराज सिंगसारखा. दरवर्षीच तो निरनिराळ्या आंतरशालेय वगैरे स्पर्धांत भाग घेतो आणि बक्षिसंही मिळवतो. सलग नऊ वर्षं बक्षिस मिळवण्याचं त्याचं रेकॉर्ड आहे म्हणे... आणि सलग नऊ वर्षं ही असली निरनिराळी भाषणं ऐकणं हे आमचं रेकॉर्ड आहे! (युवराज सिंगनं तर सहाच सिक्सर्स मारले एका दमात; आम्ही तब्बल नऊ मारलेत! ) स्पर्धेची फायनल ज्या शाळेत असेल तिथे आम्हाला सगळ्यांना कंपल्सरी नेऊन बसवतात. बरं दांडी मारायचीही सोय नाही, तिथे सर्वांची हजेरी घेतात! मग आम्ही शक्यतो मागच्या जागा पकडतो. समोरचा बोलणारा बोअर करायला लागला की निदान आपापसांत गप्पा तरी मारता येतात. आता त्यादिवशीही तो राजवाडे चांगलं बोलत होता, नाही असं नाही. पण विषय किती चावून चोथा झालेला!

बोलता बोलता त्याच्या भाषणात एव्हरेस्ट, कृष्णा पाटील आणि मराठी अस्मितेचा मुद्दा आलाच! त्याच्या त्याच सुरात ‘की’ म्हणाली - "ही प्रादेशिक, राष्ट्रीय इत्यादी इत्यादी अस्मिता म्हणजे नक्की काय हे कुणी सांगेल का एकदा? बचेंद्री पाल एव्हरेस्टवर पोहोचली तेव्हा भारतीय अस्मितेला अभिमान वाटला. पाठोपाठ उत्तरांचली अस्मितेला आठवलं असेल की आपल्यालाही अभिमान वाटला पाहिजे... "

"उत्तरांचली नाही गं, हिमाचली... " अस्मिता देशपांडेला चुकून भूगोल आठवला!

"ए, बचेंद्री पाल उत्तरांचलची आहे... "

"गप ए, तेव्हा होतं का तरी उत्तरांचल? "

"पण आता आहे ना? "

"अगं पण अभिमान आत्ता नाही, तेव्हाच वाटला होता! "

"बरं! ऽऽ तिची जी कुठली प्रादेशिक अस्मिता असेल ती... तिनं तिचा वेगळा, स्वतंत्र अभिमान जाहीर केला असेल तेव्हा! नंतर काही वर्षांनी संतोष यादव दोनदा एव्हरेस्ट चढली... "

"ए, चढली काऽऽय? ‘चढला’ म्हण! " प्रज्ञा तिच्या हातावर चापटी मारत म्हणाली. संतोष यादव ही एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली भारतीय ‘महिला’ आहे याचा या देसाईकुलोत्पन्न प्रज्ञामॅडमना पत्ताच नव्हता!

"ए यप्पड, संतोष यादव! संतोषीमाता! बाई आहे ती! " अस्मिता शर्मानं तिला गप्प केलं. संतोष यादवचं जेंडर बदलल्यामुळे तिची व्याकरणी अस्मिता उफाळून आली बहुतेक!

"... आणि हळू बोल जरा. त्या संतोष यादवच्या हरियाणी अस्मितेनं ऐकलं तर तिलाही हा राजवाडे म्हणतो तशी ठेच लागेल, हानी पोहोचेल, ती दुखावली जाईल! "...

नंतर कितीतरीवेळ आमचा असा टाईमपास सुरू होता.

एकदम टाळ्यांचा कडकडाट ऐकू आल्यावर आमच्या लक्षात आलं की मोहित राजवाडे आपलं भाषण संपवून केव्हाच अंतर्धान पावला होता.

आम्ही त्याचं भाषण नीट ऐकलं नाही त्यामुळे त्या स्पर्धेतल्या आमच्या शालेय अस्मितेला धक्का पोहोचणार असं आता आम्हाला वाटायला लागलंय. ते होऊ नये, आमच्या शाळेची अस्मिता पुन्हा होती त्याच उंचीवर राहावी म्हणून कुठली कृष्णा पाटील येईल आमच्या शाळेच्या मदतीला? आणि तिला कुठलं एव्हरेस्ट सर करावं लागेल त्यासाठी?

Tuesday, June 16, 2009

घरपोच सुख!

आपण घाईघाईनं आवरून घराबाहेर पडतो. विशिष्ट वेळेत आपल्याला कुठेतरी पोहोचायचं असतं. दवडायला एक मिनिटही हाताशी नसतं. सुदैवानं कोपर्‍यावरच एक सोडून दोन रिक्षा दिसतात. आपण तिथे पोहोचण्यापूर्वी त्या रिक्षांना दुसरं कुणीही बोलवत नाही. त्यामुळे दुप्पट घाई करून आपण तिथे जाण्याचं सार्थक होतं. रिक्षावाला आपण सांगितलेल्या ठिकाणी ताबडतोब यायला तयार होतो. आपल्या चेहेर्‍यावर तिप्पट आनंद झळकायला लागतो. आपण सुटकेचा निःश्वास टाकून रिक्षात बसतो... सुख सुख म्हणजे तरी दुसरं काय असतं हो? उपलब्ध सार्वजनिक वाहनानुसार या प्रसंगातले तपशिल थोडेफार इकडे-तिकडे होतील इतकंच!
बसस्टॉपवर पोहोचलं की जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटांत बस यावी, बसमध्ये थोडीफार गर्दी असली तरी हरकत नाही, व्यवस्थित उभं रहायला मिळालं तरी पुष्कळ आहे किंवा टॅक्सीवाल्यानं अजिबात खळखळ न करता आपण म्हणू त्याठिकाणी यायला लगेच तयार व्हावं... इतक्याच तर माफक अपेक्षा असतात आपल्या! पण आपल्यासारख्या साध्याभोळ्या, गरीब बिचार्‍या मध्यमवर्गीय माणसांच्या नशिबी हे असं सार्वजनिक-वाहन-सुख फार अभावानंच येतं। तरी कधीकधी आपल्या पदरातही अनपेक्षितरीत्या असं एखादं दान पडतं की अगदी आनंदानं गदगदून, गलबलून जावं! असा गदगदून जाण्याचा प्रसंग नुकताच माझ्यावर आला. म्हणजे, ते अनपेक्षित दान तसं प्रत्यक्षात माझ्या नवर्‍याच्या पदरात पडलं पण त्यानं मीच जास्त गलबलून गेले!

झालं असं की नवर्‍याला ऑफिसच्या कामानिमित्त परगावी जायचं होतं। येताजाता विमानप्रवास, तिथली राहण्याची व्यवस्था वगैरे सगळी बडदास्त ऑफिसतर्फे केली गेलेलीच होती. त्याबाबतीत हयगय नाही! फक्त, नेहेमीप्रमाणे, निघायच्या दिवशी दिवसभर ऑफिसचं काम उरकून मग रात्री उशीरा प्रवासाला सुरूवात होईल अशी तजवीज केली गेलेली होती. थोडक्यात, विमानाची वेळ रात्री दहाची होती. त्याआधी दीड तास विमानतळावर पोहोचायचं म्हणजे साडेआठ आणि त्याआधी तासभर घरातून निघायचं म्हणजे साडेसात! आमच्या घराजवळ दिवसाच टॅक्सी मिळण्याची मारामार; त्यात अंधार पडल्यावर तर विनातक्रार, प्रेमानं विमानतळावर नेऊन सोडणारा कुठला माई का लाल (की काळा-पिवळा??) सापडणार! या सगळ्याची आगाऊ कल्पना आल्यामुळे नवर्‍यानं जवळच्या(च) टॅक्सीस्टँडवर (जो दोन कि.मी. दूर होता) मी त्याला नेऊन सोडावं यासाठी तजवीज करायला सुरूवात केली; मला कार‍ऐवजी स्कूटीची सवलतही देऊ केली आणि वर ‘तुलाच ट्रॅफिकमध्ये जास्त वेळ अडकायला होणार नाही ना’ ही मखलाशी! जणू मी या गोष्टीला दोन चाकांवर आणि एका पायावर तयार होणार होते! मी पण त्याची ही असली मागणी धुडकावून लावण्याचा माझा जन्मसिध्द हक्क बजावायला लगेच सुरूवात केली.
दरम्यान, आमच्या दोघांच्याही सुदैवानं (ते सुदैव वगैरे नंतर ठरलं अर्थात!) ऑफिसमधल्या कुणीतरी ‘कॉल अ टॅक्सी’चा पर्याय सुचवला। आता बायकोच्या मिनतवार्‍या कराव्या लागणार नाहीत या आनंदातच नवरा त्यादिवशी घरी आला आणि विजयी मुद्रेनं त्यानं मला तो पर्याय सांगितला. टॅक्सीला ‘कॉल’ तर नेहमीच करावं लागतं, मग आता हा काय नवीन प्रकार? मी बावळट चेहेर्‍यानं बघत राहिले. ही माहिती ऐकताना ऑफिसमध्ये आपला चेहरा जसा झाला होता अगदी तस्साच बायकोचाही कसा झाला ही शंका स्वतःच्या चेहर्‍यावर येऊ न देता नवर्‍यानं त्या टॅक्सीसेवेचं ऑफिसमधलं एक जुनं माहितीपत्रक माझ्यापुढे नाचवलं.
त्यावर एका पंचरंगी पोपटाप्रमाणे रंगवलेल्या कारचं चित्र होतं। ही टॅक्सी? इतकी रंगीबेरंगी? वास्तविक, टॅक्सी म्हटलं की तिचा काळा-पिवळा रंग डोक्यात इतका पक्का बसलेला असतो की तिच्यावर तिसरा रंग चुकून जरी दिसला तरी रस्त्यात ट्रॅफिक-पोलीस शिट्टी वाजवून ती टॅक्सी बाजूला घ्यायला लावेल आणि चिरीमिरी मागेल असं वाटतं... आणि या चित्रातल्या गाडीला टॅक्सी म्हणायचं?? माझं गलबलून येणं तिथेच सुरू झालं!
त्यावर एका पंचरंगी पोपटाप्रमाणे रंगवलेल्या कारचं चित्र होतं। ही टॅक्सी? इतकी रंगीबेरंगी? वास्तविक, टॅक्सी म्हटलं की तिचा काळा-पिवळा रंग डोक्यात इतका पक्का बसलेला असतो की तिच्यावर तिसरा रंग चुकून जरी दिसला तरी रस्त्यात ट्रॅफिक-पोलीस शिट्टी वाजवून ती टॅक्सी बाजूला घ्यायला लावेल आणि चिरीमिरी मागेल असं वाटतं... आणि या चित्रातल्या गाडीला टॅक्सी म्हणायचं?? माझं गलबलून येणं तिथेच सुरू झालं!
ते रंगीत वाहन ‘कॉल’ करण्यासाठीचा फोन नंबर खाली दिलेला होता। सोबत त्यांच्या वेबसाईटचं नावही होतं. मग काय! रिकामा सर्फर, लिंकवर क्लिक करी! मी दुसर्‍या दिवशी लगेच ती वेबसाईट उघडली. तर पार्श्वभूमीला तोच - पंचरंगी पोपटाचा रंग! तो रंग नसेल तर त्यांच्या वेबसाईटला कुणी ओळख देणार नाही अशी खात्री असेल बहुतेक त्यांची. ‘सगळे ग्राहकांना आकर्षित करायचे धंदे’ असं मनाशी म्हणत मी माहिती वाचायला सुरूवात केली. आम्हीच कसे सर्वोत्तम, तुम्ही आमच्याच सेवेचा कसा फायदा घेतला पाहिजे वगैरे नेहेमीची पालुपदं हजर होतीच. पण त्यापुढच्या ‘टॅक्सीतच मूलभूत सेवासुविधा पुरवल्या जातील’ या वाक्यासरशी माझा चेहरा पुन्हा एकदा बावळट झाला! चित्रातल्या टॅक्सीचा आकार तर सर्वसाधारण चारचाकीसारखाच दिसत होता. मग लांबच्या प्रवासात मोठी बसही जिथे प्रवाश्यांना ‘मूलभूत सेवासुविधा’ पुरवण्यासाठी वाटेत दोन-तीन ठिकाणी थांबते तिथे या टॅक्सीत आतल्याआतच ते काम कसं काय उरकायचं ते मला काही लक्षात येईना. बरं तर बरं, नवर्‍याचं त्या टॅक्सीतलं वास्तव्य अर्ध्या-एक तासापुरतंच असणार होतं. त्यामुळे त्याच्यावर ‘ती’ वेळ बहुतेक येणार नाही अशी मी स्वतःचीच समजूत काढली.
पुढे दर-आकारणीचा तक्ता दिलेला होता। टॅक्सी बोलावून थांबवून ठेवली तर मिनिटागणिक अमुक इतके पैसे आकारले जातील अशी धमकीवजा सूचना होती. तरीच म्हटलं, इतका वेळ उपकाराची भाषा कशी सुरू झाली नव्हती? साध्या काळ्या-पिवळ्या टॅक्स्या तुमच्यासाठी थांबायची तसदीही घेत नाहीत, आम्ही तुमच्या दाराशी येतो, त्याक्षणी तुमची निघायची तयारी झाली नसेल तर मग जास्तीचे पैसे भरण्याची तयारी ठेवा! हे मात्र लक्षात ठेवायला हवं... मी स्वतःलाच बजावलं. प्रवासाच्या शेवटी छापील पावती मिळते, त्यामुळे दर-आकारणीत फसवाफसवी होत नाही, टॅक्सीत आपली काही वस्तू विसरली तर अमुक‍अमुक करायचं वगैरे ग्राहकांची काळजी वाहणार्‍या सूचनाही होत्या.
इतकं सगळं वाचल्यावरही ‘आपण फोन केल्यावर ही टॅक्सी आपल्या दारात येऊन उभी राहील’ यावर माझा अजून विश्वास बसलेला नव्हता। पण प्रयत्न तर बघू करून; नाहीतर आहेच मग दोन कि.मी.वरचा पर्याय अशी स्वतःची समजूत काढून नवर्‍याच्या प्रवासाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मी माहितीपत्रकावरचा तो फोन नंबर फिरवला. पलिकडून मंजूळ स्त्री-आवाजात ‘गुड इव्हिनिंग, वेलकम्‌’ वगैरे ऐकू आलं. मी ‘वुई वॉंट अ टॅक्सी फॉर...’ इ.इ. शब्दांची जुळवणी करेपर्यंत तिकडून पुन्हा एकदा आवाज आला - "युअर करंट नंबर इज वन फॉर्टी सिक्स." माझा चेहरा तिसर्‍यांदा बावळट आणि पहिल्यांदाच चिंताग्रस्त झाला. तिसर्‍यांदा बावळट कारण मला कळेना की हिला कळलं कसं की आम्हाला टॅक्सी हवी आहे आणि चिंताग्रस्त कारण आमचा एकशेसेहेचाळीसावा नंबर! आता पुढे तिच्याशी बोलायचं की नाही बोलायचं, फोन बंद करायचा की चालू ठेवायचा काही नक्की ठरेना. तितक्यात पुन्हा एकदा पलिकडून तोच आवाज आला - "युअर करंट नंबर इज वन ट्वेंटी वन." आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला! त्या फोननंबरवर लोकं टॅक्सी मागवण्यासाठीच फोन करणार, तब्ब्येतीच्या चौकश्या करण्यासाठी नाही... म्हणजे मी फोन केला तो टॅक्सीसाठीच हे ओळखून फोन उचलल्या उचलल्या त्याक्षणीचा आमचा क्रमांक आम्हाला कळवला गेला. मी माझ्या चेहर्‍यावरचे हावभाव बदलण्यात व्यग्र असतानाच तो थोडा वर सरकला होता. ती प्रगतीही लगेच कळवण्यात आली. एक-दीड मिनिटांत पंचवीस क्रमांकांनी वर सरकण्याचा वेग काही वाईट नव्हता. वास्तविक दिपवून टाकणाराच होता. मला पुन्हा एकदा गदगदून आलं! मी विजयी मुद्रेनं नवर्‍याकडे बघितलं. माझी बा.चिं. मुद्रा बघताबघता विजयी बनल्यामुळे आता (दुसर्‍यांदा) बावळट चेहरा करायची त्याची पाळी होती. तोपर्यंत इकडे आमचा क्रमांक अजून पंधरा-वीस पायर्‍या वर चढला. १००, ८९, ७२, ५५, ४७, ३८... करता करता १२, ९, ७, ४ आणि.... आणि फोन कट्‌ झाला!! आता याला काय म्हणावं?! ‘सिंगापूरसारखी टॅक्सी-सुविधा आता भारतातही...!’ ही ठळक बातमी म्हणून वगैरे ठीक आहे पण त्याआधी त्याच भारतातली दूरध्वनीसेवा धड चालली पाहिजे हे कुणाला उमगलेलंच नसावं! मी पुन्हा एकदा फोन लावला. यावेळी मात्र आमचा क्रमांक त्रेपन्नावा(च) होता आणि तो साडे-सात मिनिटांत एकपर्यंत येऊन पोहोचला. मला ‘हुश्श’ करायचीही संधी न देता पलिकडून लगेच आमच्या घरच्या पत्त्याची विचारणा झाली. मग घरचा पत्ता, प्रवास करणार्‍या व्यक्तीचं नाव, मोबाईल नं., टॅक्सी किती वाजता हवी ती वेळ इ. माहिती मी पुरवली. त्यावर कहर म्हणजे दुसर्‍या दिवशी येणाऱ्यार्‍या टॅक्सीचा नंबर, तिच्या ड्रायव्हरचं नाव, त्याचा मोबाईल नंबर इ. माहिती मलाच पलिकडून पुरवली गेली! मला तिसऱ्यांदा गलबलून जाण्यावाचून मग पर्यायच उरला नाही!

आता दुसर्‍या दिवशी संध्याकाळी साडेसातपर्यंत वाट बघण्याशिवाय करण्यासारखं काही नव्हतं। टॅक्सी थांबवून ठेवली तर जास्तीचे पैसे भरावे लागतात याची मी नवर्‍याला इतकी भीती घालून ठेवली होती की त्यानं दुसर्‍या दिवशी पाच वाजताच ऑफिसमधून पळ काढला. तो घरी येऊन सामानबिमान भरत असताना त्या टॅक्सी ड्रायव्हरचा फोन आला - घराचा रस्ता विचारण्यासाठी. मी त्याला आसपासच्या खाणाखुणा सांगायला सुरूवात केली तर त्या सगळ्या त्याला माहीत होत्या आणि त्यांवरून माग काढत तो आमच्या गल्लीत कधीच येऊन पोहोचला होता. तिथून फक्त आमच्या सोसायटीपर्यंत कसं यायचं ते विचारत होता. भलतेच हुशार निघाले की हे ड्रायव्हर लोक! परिसरातल्या सगळ्या खाणाखुणा पाठ होत्याच, हळूहळू सगळ्या गल्ल्याही पाठ झाल्या असत्या... चुकूनमाकून ती ड्रायव्हरची नोकरी सुटलीच तरी गेलाबाजार पोस्टमनची नोकरी तरी त्यांना नक्कीच मिळाली असती!ती टॅक्सी आमच्या सोसायटीपाशी पोहोचण्यापूर्वीच आम्ही दोघं सामानासकट खाली येऊन उभे होतो. मला मुख्य उत्सुकता होती ती म्हणजे त्या ‘मूलभूत सेवासुविधा’ टॅक्सीच्या नक्की कुठल्या भागात पुरवल्या जाणार ते पाहण्याची! जरा इकडच्या तिकडच्या खिडकीतून डोकावून पाहण्याचा मी प्रयत्न केला. अधिक तपासाअंती त्या सुविधा म्हणजे टिश्यू पेपर आणि एफ.एम. रेडीयो आहेत असं कळलं!! मी गहिवरून कोलमडायचीच शिल्लक होते!!!...माझ्यावर ओढवलेली ही आपत्ती नवर्‍याच्या गावीही नव्हती. सामानासकट तो टॅक्सीच्या मागच्या सीटवर केव्हाच विसावला होता, घामेजलेला चेहरा पहिल्या मूलभूत सुविधेनं टिपण्यात गुंतलेला होता. दरम्यान ड्रायव्हरनं दुसरी मूलभूत सुविधा सुरू केली.दोन माणसं आणि दोन सुविधा यांच्यासकट तो पंचरंगी पोपट बघताबघता दिसेनासा झाला. तासाभरानं नवर्‍यानं फोन करून सांगितलं की तो विमानतळावर सुखरूप पोहोचला. माझं गलबलून, गदगदून येणंही साधारण तेव्हाच पूर्णत्वाला पोहोचलं असावं!

Monday, June 8, 2009

एक्झिट पोल

(२८ मे २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत प्रकाशित झालेला हा लेख. किर्ती आणि सुजाता या दोन मैत्रिणी पुन्हा एकदा आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत.)

॥१॥ सुजाता

आई म्हणते - त्या ‘जागतिक बदलाचे वारे’ निबंधापासून एक बरं झालंय... मी ऑलमोस्ट दररोज पेपर वाचायला लागलेय... ‘ऑलमोस्ट’ म्हणे! मला तर आईचं काही कळतच नाही... एखादी गोष्ट केली तरी बोलायचं; नाही केली तरी बोलायचं! पण ते जाऊ दे। तर मी काय सांगत होते की रोजचा पेपर... आता तो वाचायलाच हवा ना... बाई कधी कश्यावर लिहायला सांगतील काही नेम नाही. आणि पेपर वाचून सुद्धा काय काय नवीन नवीन गमती जमती कळतात!...
३-४ दिवसांपूर्वीचे सगळे पेपर्स त्या ‘एक्झिट पोल्स’नि भरून वाहत होते। ‘शपथविधी’सारखाच ‘की’नं याचाही विग्रह केलाय (मराठीच्या बाईंची ही एवढी एकच सूचना ती इमानेइतबारे पाळते) - पोल्सनंतर, म्हणजेच निवडणुकांनंतर, आपली ‘एक्झिट’ होणार की नाही हे प्रत्येक पक्षाला चाचपून पहायचं असतं म्हणून ते जी पाहणी करतात त्याला ‘एक्झिट पोल्स’ म्हणतात म्हणे! काय पण लांबलचक विग्रह!... आणि वर म्हणते कशी - हा ही मध्यमपदलोपी समासच, फक्त यात बऱ्याच मध्यमपदांचा लोप होतोय म्हणे!! (समासाचा हा एवढा एकच प्रकार तिच्या लक्षात आहे बहुतेक! मराठीच्या तासाला झोपा काढल्यावर दुसरं काय होणार! )
मला तर हे ‘एक्झिट पोल्स’ म्हणजे परिक्षेत प्रत्येक पेपर देऊन बाहेर आल्यावर आम्ही जी आपापसांत मार्कांबद्दल चर्चा करतो ना तसंच वाटतं। म्हणजे आम्ही नाही का अंदाज बांधत असतो इतके मार्क्स मिळतील, इतक्या मार्कांचं चुकलंय वगैरे तसेच तर असतात हे ‘एक्झिट पोल्स’! आणि जसे आमचे मार्कांचे अंदाज चुकतात तसेच हे ही चुकतात... बऱ्याचदा!यंदा माझ्या दादानं प्रथमच मतदान केलं. गेले दोन महिने म्हणजे अगदी निवडणुका जाहीर झाल्यापासूनच तो भलताच उत्साहात होता - मतदान म्हणजे अगदी काहीतरी जगावेगळं करतोय असा भाव होता त्याच्या चेहेऱ्यावर! त्यात, त्याच्या कोऱ्याकरकरीत निवडणूक ओळखपत्रात चक्क एकही चूक नव्हती! त्यामुळे तर तो अजूनच बागडत होता! टी. व्ही. वरच्या ‘एक्झिट पोल्स’ना नाक लावून बसला होता बाबांच्या बरोबरीनं. तो अभ्यास सोडून हे सगळं करतो म्हणून आत आईची बडबड सुरू होती! दादानं ‘मदर्स डे’निमित्त आईला दिलेल्या ग्रीटींग-कार्डचा प्रभाव संपुष्टात आला होता बहुतेक! आठवडाभर आय. पी. एल. च्या मॅचेस, जोडीला हे ‘एक्झिट पोल्स’... एका ग्रीटींग-कार्डच्या बदल्यात सवलती तरी किती घ्यायच्या!
पण बोलण्यात काही अर्थ नाही। दादाविरुद्ध काडी लावायला जावं तरी पंचाईत. आई लगेच माझ्यावर घसरते! मग मागच्या परिक्षेनंतरचे तिचे-माझे ‘एक्झिट पोल्स’, चुकलेले अंदाज - सगळं बाहेर निघतं! मग आम्ही आपल्या उभ्या - आरोपीच्या पिंजऱ्यात! तिकडे त्या कसाबला पण आपली बाजू मांडायची संधी मिळते, तो अजून अल्पवयीन आहे वगैरे त्याचा वकील बिनधास्त तारे तोडतो पण इथे म्हणजे आई काही ऐकूनच घेत नाही! आईचं म्हणजे आपल्या न्यायालयांसारखं नाहीये... सर्वांना आपली बाजू मांडायची समान संधी-बिंधी काही नाही! आईला साक्षीदार वगैरेंचीही काही गरज भासत नाही अश्या वेळी. त्यापेक्षा तिच्या बडबडीकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं असतं.
निवडणुकांचे प्रत्यक्ष निकाल जाहीर झाले तेव्हाही दादा असाच टी. व्ही. समोर बसला होता... तेव्हा पुन्हा आई अशीच चिडली होती... आणि मग मी तिची आणि दादाची मजा बघितली होती!...

॥२॥ कीर्ती

आपल्याकडे प्रसारमाध्यमांत अमेरिकेतल्या निवडणुकांची ३-४ महिने चर्चा झाली... आता आपल्या निवडणुकांवर तश्याच प्रकारे तिकडे चर्चा घडत असतील का? - असा सुजीला प्रश्न पडला होता। ही सुजी सुद्धा ना, कुठूनतरी कानाकोपऱ्यातून काहीतरी शंका काढत असते! आता, दहावी-बारावीच्या निकालांची, त्यांतल्या टॉपर्सची जशी चर्चा होते तशी आठवी किंवा नववीच्या परिक्षांची होईल का? अमेरिकेनं जागतिक बदलाचे वारे आपल्या दिशेनं पुन्हा एकदा नव्यानं वळवले, त्याचे शंभर दिवस पूर्ण झाल्याची पण बातमी झाली. ते सध्या आपल्या त्याच मस्तीत मश्गूल असतील. ‘सर्वात मोठी संसदीय लोकशाही’ वगैरे सगळं आपल्यासाठी... हे असले शब्द केवळ शिखर परिषदांत वापरण्यासाठी असतात हे त्यांना काय नव्यानं सांगायला हवं?? त्यांना काय पडलीये आपल्या निवडणुकांवर चर्चा-बिर्चा करण्याची? पण असल्या शंका ही सुजीच काढू जाणे. वर तिला हे सगळं शाळेत तास सुरू असताना सुचतं!
त्यात गेले ४-५ दिवस त्या ‘एक्झिट पोल्स’नि तिच्या डोक्यात जोरदार एंट्री मारली होती। तिच्या मते हे असले अंदाज चुकतात कारण मत देऊन बाहेर आलेले मतदार त्या ‘एक्झिट पोल’ घेणाऱ्या लोकांना खरंखुरं उत्तर देतच नसतील... ‘मी कुणाला मत दिलं?? - नाही सांगत, जा! ’ असं... किंवा मत देऊन बाहेर येईपर्यंत ते विसरत असतील आपण कुणाला मत दिलंय ते आणि बाहेर येऊन भलतंच उत्तर देत असतील! ते ‘एक्झिट पोल’वाले तरी ठरवणार कसं की समोरचा माणूस खरं बोलतोय की खोटं! त्यांना जे उत्तर मिळेल तेच ते नोंदवून घेणार! प्रत्येकाचा खरेखोटेपणा सिद्ध करायचा तर त्यासाठी ‘लाय-डिटेक्टर’ वापरायला पाहिजे, जे शक्य नाही... मग नेतात बिचारे तसंच निभावून... त्यांची दुकानं कशी चालणार नाहीतर!
माझं तर म्हणणं, लाय-डिटेक्टर वगैरे सगळं नंतर, आधी प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर एकएक ‘मतदार-डिटेक्टर’ बसवावा लागेल. एक्झिट पोल्स कसले घेता, आधी मतदार शोधा!
न्यूज-चॅनलवाले असे एक्झिट पोल्स घेणाऱ्या निरनिराळ्या संस्थांना हाताशी धरतात आणि निवडणूक निकालांच्या काळात २४ तास बरळत राहतात। त्यांनाही आपापल्या पोटांची काळजी वाहायलाच पाहिजे! आधी अंदाज वर्तवायला चर्चा करायची, त्यानंतर प्रत्यक्षात जे निकाल लागतील त्यांवर चर्चा करायची, जोडीला आधीचे अंदाज चुकले कसे त्याचीही चर्चा करायची... म्हणजे झाली ना मग महिन्याभराची बेगमी! त्यातून एखाद्याचे अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळपास जाणारे आलेच चुकूनमाकून तर आहेच मग सर्वश्रेष्ठ, सर्वात पुढे, सर्वांच्या आधी, बातमी आधी वगैरेचा डंका!
निवडणुकांचे निकाल जाहीर झाले की काही राजकीय पक्षांचे ‘निक्काल’ लागतात, काही नेते निकालात निघतात... पण त्याहीपेक्षा न्यूज-चॅनलवाल्यांना ते आई म्हणते तसं मांडवदळ लागत असेल! घरातला एखादा मोठा समारंभ संपला, पाहुणेरावणे परतले की यजमानांना दुसऱ्या दिवशी कसं मरगळल्यासारखं वाटत राहतं तसं...!
मग आहेच पुन्हा, नवीन काहीतरी खाद्य शोधा, त्यावर चर्चा घडवून आणा... ते संपेपर्यंत नवीन सरकारचे शंभर दिवस बिवस पूर्ण होतात, मग त्यावर चर्चा! आणि अश्या तऱ्हेनं त्यांचं दुकान (त्यांच्यामते) नफ्यात चालू राहतं...! दर पाच वर्षांनी का होईना पण निवडणुका, एक्झिट पोल्स इ। नसते तर हे शक्य झालं असतं का?

Wednesday, May 13, 2009

ऐन वसंतात भल्या सकाळी...

आचार-विचार, पद्धती, संभाषण, कालगणना या सगळ्यांतच आपण अति आंग्लाळलेलो असल्यामुळे ‘ऐन वसंतात’ म्हटल्यावर - म्हणजे नक्की कधी बरं? - वसंत म्हणजे चैत्र - वैशाखवणव्याच्या आधीचा उन्हाळा - म्हणजे परिक्षांचे दिवस - म्हणजे मार्च-एप्रिल... अशी आपली विचारांची गाडी जाते। त्याशिवाय त्या ‘ऐन वसंतात’चा कालावधी नक्की करताच येत नाही! मग मार्च-एप्रिलमध्ये, भर उकाड्यात, भल्या सकाळी कोण कोण काय काय करत असतात? वेगळं काही नाही. नोकरदार आणि कष्टकरी मंडळी कामाला निघायच्या घाईत असतात. परिक्षा सुरू असल्या तर विद्यार्थीवर्ग लवकर उठून वह्या-पुस्तकांत डोकं खुपसून बसलेला असतो किंवा सुट्ट्या सुरू झाल्या असल्या तर डाराडूर झोपलेला असतो. निवृत्त ज्येष्ठ नागरिक सूर्य वर यायच्या आत फिरून-बिरून आलेले असतात...
मी आणि माझा चौदा वर्षांचा मुलगा मात्र ऐन वसंतात एका रविवारी भल्या सकाळी लोकलची गर्दी सहन करत कुलाब्याला निघालो होतो...

मुंबईतल्या लोकलच्या गर्दीला रविवार, साप्ताहिक सुट्टी वगैरेशी तसंही काही देणंघेणं नसतंच! खचाखच भरलेली लोकल... पहाटे साडेपाचला घरातून निघून, लांबलचक रांगेत उभं राहून तिकीटं काढून, सहाची लोकल पकडल्याची माझी मर्दुमकी कुठल्याकुठे विरून गेलेली... गाडीत जेमतेम उभं रहायला जागा मिळालेली होती। "मी कॉलेजला जायचे तेव्हा पीक-अवर्सना एवढी गर्दी असायची... " मुलाला सांगता सांगता विरणाऱ्या मर्दुमकीला मी गतस्मृतींच्या मदतीनं परत बोलवू पाहत होते. प्रचंड उकडत होतं. घामाच्या धारा फक्त सूर्य उगवायची वाट पाहत होत्या. मी हळूच माझ्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. गर्दी, उकाडा आणि अपुरी झालेली झोप यामुळे आता तो कुठल्याही क्षणी माझ्यावर वैतागेल असं मला सारखं वाटत होतं आणि तो तसा वैतागला जरी असता तरी ती त्याची चूक ठरली नसती. मग त्याच्या (आणि माझ्याही) रविवारच्या झोपेचा विचका करण्याचं मला तरी काय नडलं होतं? असं कुठलं कारण होतं की ज्यामुळे मुलाचा वैताग, चिडचिड सहन करायची माझी तयारी होती? असं काय होतं की जे या सगळ्याच्या मागून डोकं उंचावून आम्हाला खुणावत होतं...?
-------------------------------------
आदल्या आठवड्यात लोकसत्ता-व्हिवा पुरवणीतल्या एका निवेदनाकडे अगदी योगायोगानं माझं लक्ष गेलं होतं - ‘वृक्षमैत्र’ या उपक्रमाअंतर्गत कुलाब्याला मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सागर उद्यानात त्या रविवारी वृक्षपरिचयाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार होता। खाली संपर्कासाठी एक मोबाईल क्रमांक दिलेला होता. बस्स, निवेदन असं म्हणावं तर एवढंच होतं... काय उपक्रम, कुठलं सागर उद्यान काहीही माहीत असण्याची सुतराम शक्यता नव्हती पण कसं कोण जाणे, मला ते वाचून तिथे जावंसं वाटलं. माझी उपजत भटकी प्रवृत्ती त्याला कारणीभूत ठरली असावी बहुतेक! या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईच्या कुलाबा परिसरात एक फेरफटका होईल असा पहिला विचार मनात आला. शाळा आणि कॉलेजचं एक वर्ष केल्यानंतर गेलं जवळजवळ पाव शतक मुंबईशी फारसा संपर्क राहिला नव्हता पण मुंबईबद्दलचं आकर्षण मात्र कायम होतं. कॉलेजच्या दिवसांतही घर ते कॉलेज आणि कॉलेज ते घर एवढ्यापुरतीच मुंबई माहीत होती. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राबाहेरहून ठाण्यात मुक्काम हलवल्यानंतर मात्र ती कसर भरून काढायचं तसंही मी ठरवलंच होतं आणि त्यासाठी याहून चांगलं निमित्तं दुसरं कुठलं असणार होतं? शिवाय वृक्षपरिचयासारखा विषय असल्यामुळे माझ्या मुलाच्या कानावरही चार चांगले शब्द पडतील असा आपला माझा साधा-सरळ, मध्यमवर्गीय दृष्टीकोन होता. त्यामुळे जरा घोळात घेऊन मी माझ्या मुलाला माझ्यासोबत येण्यासाठी तयार केलं आणि दिलेल्या नंबरवर फोन करून सगळी माहिती विचारली.
व्हिवा’शी किंवा फारफारतर त्या उपक्रमाशी संबंधीत असलेल्या कार्यालयातली कुणी स्त्री-कर्मचारी पलिकडून माहिती देत असावी अश्या अंदाजानं मी ४-५ मिनिटं ज्यांच्याशी बोलले त्या प्रत्यक्षात ‘व्हिवा’च्या संपादिका शुभदा पटवर्धन होत्या! ही गोष्ट मला अगदी शेवटी फोन ठेवता ठेवता त्यांच्याकडूनच समजली। एक सेकंद माझा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता... खोटं कश्याला बोलू! मी आधी थोडी बुचकळ्यातच पडले. मला कळेना की कार्यालयातल्या एखाद्याकडे हे काम न सोपवता त्या स्वतःच सर्वांना ही माहिती का बरं देत होत्या? मुळात, त्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक त्या निवेदनासोबत का दिला? शिवाय त्या स्वतः त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर असणार होत्या असंही त्यांनी सांगितलं. या सगळ्या गोष्टींचा उलगडा कदाचित तिथे प्रत्यक्ष पोचल्यावरच होऊ शकला असता...
-------------------------------------
... आणि तो रविवार उजाडला। उजाडला कुठला? तो उजाडायच्या आतच खरं म्हणजे आम्ही निघालो होतो. ठाण्याहून सी. एस. टी. मार्गे कुलाब्याला पोचायला दोन तास लागले. (मी जुन्या कॉलेजच्या सवयीनं व्ही. टी.-व्ही. टी. म्हणत होते तर माझा मुलगा ‘अशी कशी आपली आई मागासलेली... सी. एस. टी. म्हणायच्या ऐवजी व्ही. टी. म्हणतीये’ अश्या नजरेनं माझ्याकडे बघत होता!)
लहानपणी आई-बाबांबरोबर आम्ही चार्ली चॅप्लीनचा सिनेमा पहायला जिथे गेलो होतो त्या ‘रीगल’ थियेटरवरून पुढे गेल्यावरच कुलाबा येतं हे समजल्यावर आनंद झाला! मुंबईबद्दलच्या आपल्या सामान्यज्ञानात भर पडली असं उगीचच वाटायला लागलं। पण ज्यासाठी इतकी तकतक करतोय तो कार्यक्रम मात्र प्रत्यक्षात कसा असणार आहे त्याची काहीच कल्पना करता येत नव्हती.
साडेसात वाजता सागर उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो तेव्हा तिथे आमच्यासारखीच अजून १०-१२ उत्साही मंडळी हजर होती। त्यांतली काही वृक्षप्रेमी किंवा जाणकारही असतील कदाचित पण उत्साही होती एवढं मात्र मी नक्कीच सांगू शकले असते! सर्वजण जमल्यावर शुभदाताईंनी एक छोटंसं प्रास्ताविक केलं. फोनवर त्यांच्याशी बोलल्यानंतर मला जे नवल वाटलं होतं त्याचा त्या प्रास्ताविकानंतर अपेक्षेप्रमाणे उलगडा झाला.
'विस्तार’ नावाची त्यांची संस्था आहे जिच्या अंतर्गत निरनिराळे सामाजिक उपक्रम चालवले जातात। विशेषतः अंध आणि अनाथ मुलांसाठी त्यांनी बरंच काम केलेलं आहे. असे उपक्रम राबवताना पैशांचा सढळ हस्ते वापर, भरघोस देणग्या हे किंवा असंच स्वरूप आपल्या डोळ्यांसमोर येतं. पण त्याहीपलिकडे जाऊन संवेदनशील मनानं करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात - जसं अंध मुलांना पुस्तकं वाचून दाखवणं... त्या मुलांसाठी त्याचं मोल पैश्यांच्या राशीपेक्षाही जास्त ठरतं. तर अश्या प्रकारे त्या करत असलेल्या कार्याची त्यांनी थोडक्यात माहिती दिली. प्रत्येक वर्षाची एकएक संकल्पना नक्की करून त्यानुसार विविध उपक्रम आखले जातात. यंदाची संकल्पना आहे - ‘पर्यावरण मैत्री आणि संवर्धन’ आणि त्याअंतर्गत वृक्षपरिचयाचे असे कार्यक्रम दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केले जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं.
आमचा उद्यानातला फेरफटका सुरू झाला। वृक्षांची माहिती देण्यासाठी मेधा कारखानीस या शुभदाताईंच्या स्नेही तिथे आलेल्या होत्या. बँकेत नोकरी करता करता केवळ आवड, छंद म्हणून मेधाताईंनी झाडांचा अभ्यास केलेला आहे. पुढचे दोन तीन तास त्यांचं बोलणं ऐकताना त्या हे केवळ छंदापोटी करताहेत यावर विश्वासच बसत नव्हता. निरनिराळी वैशिष्ट्यं असलेल्या विविध झाडांपाशी थांबून त्या त्यांची खरंतर शास्त्रोक्त माहिती देत होत्या पण ती ही तांत्रिक शब्दांच्या कुठल्याही जंजाळात न अडकता... सोबतीला शुभदाताईंच्या गप्पाही होत्याच. त्यांनीदेखील भरपूर भटकंती करून झाडांबद्दल खूप माहिती मिळवलेली आहे. त्या माहितीशी संबंधित काढलेल्या फोटोंचा एक मोठा अल्बम त्यांनी बरोबर ठेवला होता. ते फोटो, माहिती आणि सर्वांच्या गप्पा यात २-३ तास अक्षरशः पळत निघून गेले. सकाळचा लोकलमधला उकाडा आम्ही केव्हाच विसरून गेलो होतो. उद्यानाच्या अंतर्भागात पोचल्यावर तर आपण मुंबईत आहोत हे ही विसरायला झालं होतं.झाडांबद्दलच्या अनेक समजुती-गैरसमजुतींना त्यादिवशी छेद दिला गेला. उदाहरणार्थ ज्याला आपण अशोक वृक्ष म्हणून ओळखतो तो खरा अशोक नाहीच... तो आसूपालव! लंकेत सीता ज्या झाडाखाली बसली होती तोच खरा अशोक. मग आम्ही सगळ्यांनी या दुसऱ्या अशोकाला ‘खोटा अशोक’ असं नाव दिलं! (कोण म्हणतं खऱ्याखोट्याची दुनिया राहिलेली नाही...! जोपर्यंत मनुष्यप्राणी आहे तोपर्यंत ती राहणारच!) गुजराती लोकही त्याला 'आसोपालव’ म्हणतात हे मला आमच्या गुजरातमधल्या काही वर्षांच्या वास्तव्यामुळे माहीत होतं. तेव्हा मी त्यांना नाकं मुरडायचे! ‘अशोक’ नाव किती सुटसुटीत, छान आहे... आसोपालव हे कसलं नाव, वगैरे!... ज्या त्या गोष्टीत मराठी बाणा दाखवायची खोड... ती या ‘आसूपालव’नं अशी उघडकीस आणली!
मेधाताईंनी निदर्शनास आणून दिल्यावर सगळ्यांच्याच लक्षात आलं की आसूपालव (ऊर्फ खोटा अशोक) सरळसोट, उंच वाढतो। त्याचा आडवा विस्तार नसतो. त्यामुळे त्याची सावलीही फारशी नसते. मग अश्या तुटपुंजी सावली देणाऱ्या वृक्षाखाली बसून सीता अशोकवनातले आपले खडतर दिवस कसे काढेल?... अगदी साधी सरळ गोष्ट आहे ही! पण आपल्यापैकी किती जणांनी असा विचार केला असेल... खरं म्हणजे अशोक आणि आसूपालव या दोघांच्यात ती दोन्ही झाडं आहेत यापलिकडे काहीही साम्य नाही. मग हा नावांचा गोंधळ का आणि कधी झाला असेल कोण जाणे!
त्यावर विचार करायला फारसा अवधी मिळालाच नाही कारण तसाच ‘शिरीष’ आणि ‘रेन-ट्री’च्या बाबतीतला प्रकार मेधाताईंनी दाखवून दिला... छोट्याश्या पांढरट गुलाबी फुलांच्या ज्या झाडाला आपण शिरीष म्हणून ओळखतो ते झाड प्रत्यक्षातलं रेन-ट्री आहे। शिरीषाची फुलं हिरव्या पांढऱ्या रंगसंगतीची असतात. तरी, अशोक-आसूपालव इतकी तफावत इथे नव्हती... फुलांच्या रंगात फरक असला तरी रूपात नव्हता. अश्या कितीतरी गमती-जमती त्यादिवशी आम्हाला समजल्या! अगदी माझा मुलगाही त्याला अपवाद नव्हता! मेधाताईंनी गुंजांचं झाड आणि त्याखाली पडलेल्या गुंजा दाखवल्यावर तो खाली बसून दिसतील तितक्या गुंजा वेचण्यात इतका दंग झालेला होता की मी बघतच राहिले!... तुतीच्या झाडावरून पडलेली ताजीताजी तुती चाखून बघितल्यावर ती चव आवडल्यामुळे त्याचे डोळे जे चमकले ते पाहून मलाच जास्त आनंद झाला!
सोनमोहोर, काटेसावर, गोरखचिंच, ताम्हणी हे सगळे वृक्ष मी त्यादिवशी प्रथम ‘निरखले’। ही सगळी झाडं याआधीही अनेकदा समोर आली असतील. पण त्यांची वैशिष्ट्यं जाणून घ्यायचा मी कधी प्रयत्नच केलेला नव्हता असं आता म्हणावं लागेल. (गोरखचिंच म्हणजेच बाओबाब ट्री हे कळल्यावर माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरही ओळखीचे भाव उमटले!) सुंदर जांभळ्या फुलांचे गुच्छ मिरवणारं ‘ताम्हणी’ हे तर आपल्या महाराष्ट्राचं राज्यफूल आहे! (‘प्रत्येक राज्याचं राज्यफूल’ असा काही प्रकार असतो हे तोपर्यंत माझ्या गावीही नव्हतं.)

‘सागर’ उद्यानातल्या त्या फेरफटक्यानं मला कणभर का होईना पण वृक्षसाक्षर बनवलं आणि त्याची प्रचिती मला दुसऱ्या दिवशी लगेचच आली... नित्यनेमाप्रमाणे सकाळी चालायला गेले असताना मी रस्त्याकडेच्या झाडांकडे प्रथमच मान उंचावून बघितलं। तिथे मला सोनमोहोर दिसला, (खरा) शिरीष ओळखता आला. अजूनही १-२ झाडं परिचयाची वाटली, भले त्यांची नावं मला त्याक्षणी आठवली नसतील! माझं मलाच आश्चर्य वाटलं. माझ्यासारख्या झाडांचं अतिशय तुटपुंजं ज्ञान असलेल्या व्यक्तीत त्या २-३ तासांमुळे असा इतका फरक पडला??...

दर महिन्याच्या अश्या प्रकारच्या कार्यक्रमांना हजर रहायचा माझा निश्चय तर केव्हाच पक्का झाला होता। तरीही, काही घरगुती कारणांमुळे मी त्यापुढच्या फिरोजशाह मेहता उद्यानातल्या म्हणजेच ‘हँगिंग गार्डन’ला झालेल्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाही. पण नंतरचा जिजामाता उद्यानातला - राणीच्या बागेतला - कार्यक्रम मात्र मी चुकवला नाही. ५३ एकरात पसरलेल्या जिजामाता उद्यानात तर वृक्षांच्या २२५ जाती आहेत. तिथल्या प्राणीसंग्रहालयाच्या विस्तारासाठी त्यांतले अनेक वृक्ष तोडले जाणार असं मध्यंतरी कानावर आलं होतं. ते कळल्यावर त्याला जोरदार विरोध करणाऱ्यांत शुभदाताई आघाडीवर होत्या हे मला तिथे समजलं...
‘वृक्षमैत्र’ या उपक्रमाला मिळणारा वाढता प्रतिसाद, पर्यावरणप्रेमींची सततची वाढती संख्या यामुळे ‘विस्तार’मार्फत त्यांनी चालवलेल्या या चळवळीला अधिकाधिक बळ मिळेल हे नक्की कारण नेहेमीच्या चाकोरीपलिकडे जाऊन काहीतरी करण्याची ऊर्मी आणि उत्साह अंगात असणारे अगणित लोक या जगात असतात... प्रश्न असतो तो फक्त त्या ऊर्मीला योग्य दिशा देण्याचा!...
... नाहीतर ऐन वसंतात एका भल्या सकाळी एक गृहिणी रोजच्याप्रमाणे स्वयंपाकघरात झटापट करत न बसता निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी घराबाहेर पडली नसती... आणि एक शालेय विद्यार्थी अंथरुणात उशीरापर्यंत न लोळता झाडांशी परिचय वाढवण्यासाठी निघाला नसता...!

Thursday, April 16, 2009

कीर्तनाचे रंगी... ??

एका रविवारची दुपार... टी.व्ही. वर देव आनंदचा ‘तेरे घर के सामने’ पाहत बसले होते. पुढ्यात टी-पॉयवर टी. व्ही., डीश टी. व्ही., म्युझिक सिस्टीम आणि होम-थिएटरचा प्रत्येकी एक रीमोट, एक ए. सी. चा रीमोट आणि दोन सेल फोन असा सगळा संसार मांडलेला होता. इतक्यात दोनपैकी एका सेल फोनचा ‘दिल का भॅंवर’ पुकार करायला लागला. बघितलं तर बहिणीचा फोन होता. रविवारची दुपार आणि सख्ख्या बहिणीचा फोन म्हणजे किमान अर्धा तास तरी गप्पा ह्या ठरलेल्या! तोपर्यंत टी. व्ही. म्यूट केलेला बरा असा विचार करून पुढे झाले तर त्या ढीगभर रीमोटस मधून नक्की कुठला पटकन उचलायचा तेच क्षणभर कळेना. स्वतःवरच वैतागत एकदाचं त्या देव आनंदला गप्प केलं आणि फोन उचलला....
आजकाल हे असंच होतं... सी। डी. लावून गाणी ऐकत असताना ए. सी. कमी किंवा जास्त करावासा वाटतो, एखादं छान ठेक्याचं गाणं लागलं की म्युझिक सिस्टीमचा ‘बास बूस्टर’ चालू करावासा वाटतो... आता या सगळ्या गोष्टी बसल्या जागेवरूनच करता येत असतील तर जागचं उठतंय कोण आणि कश्याला! ते करत असतानाच सेलफोन वाजतो आणि मग पुढ्यातलं नक्की कुठलं चपटं यंत्र उचलून त्यावरची बटणं दाबायची ते त्याक्षणी ध्यानातच येत नाही पटकन. बरं यातलं एखादं यंत्र जरी हाताशी नसलं तरी लगेच आयुष्य व्यर्थ वगैरे वाटायला लागतं. म्हणजे घरात असताना सतत हा जामानिमा जवळ बाळगलाच पाहिजे... दुसरा इलाज नाही आणि आपल्याला दोनच हात असल्यामुळे एकाच वेळेला तीन किंवा चार यंत्रं वापरायची वेळ आली की गडबडायला होतं... निदान मला तरी होतंच होतं. मग टी. व्ही. चा आवाज कमी-जास्त करण्यासाठी सेलफोनची बटणं दाबली जातात, सी. डी. वरचं एखादं गाणं फॉरवर्ड करायचं असलं की ए. सी. चा रीमोट त्याच्यावर उगारला जातो...!
माझी तर एक फजिती कायम ठरलेली... माझा काँप्युटरचा माऊस आणि एक सेलफोन साधारण एकाच रंगाचे आणि मापाचे आहेत। शेजारी शेजारी ठेवलेले असतील तर स्क्रीनकडे बघता बघता माझा हात हमखास माऊसऐवजी सेलफोनवर जातो आणि मग मला एकदम दचकायला होतं. डोकं ठिकाणावर असेल तर स्वतःच्याच अश्या फजितीचं हसू येतं, नसेल तर चिडचीड होते!

परवा अशीच एक गंमत झाली। दूधवाला महिन्याचं बील न्यायला आला. मी दुधाचा सगळा हिशेब सेलफोनच्या ‘नोटस’मध्ये नोंदवून ठेवलेला होता. आता, एका लिटरला तेवीस रुपये पन्नास पैसे या हिशेबाने तेवीस लिटर गाईचं दूध अधिक एकोणतीस रुपयांच्या हिशेबाने साडे अकरा लिटर म्हशीचं दूध ही आकडेमोड तोंडी कोण करतंय... म्हणून मी कॅल्क्युलेटरपण काढला. मग एका हातात सेलफोन आणि दुसर्‍या हातात कॅल्क्युलेटर घेऊन, दूधवाल्याशी बोलता बोलता तो हिशेब करताना अर्ध्या-एक मिनिटांत इतका गोंधळ उडाला की काही विचारू नका! साडेतेवीस गुणीले तेवीस करून मेमरी प्लस करत असतानाच दूधवाल्यानं काहीतरी विचारलं. त्याला उत्तर देऊन माझा मोहरा पुन्हा कॅल्क्युलेटरऐवजी सेलफोनकडेच वळला... आपल्याला काय करायचं होतं आणि आता त्यासाठी सेलफोनवरचं नक्की कुठलं बटण दाबायचं हे आठवेना. डोक्यात प्रकाश पडून कॅल्क्युलेटर सरसावेपर्यंत एकोणतीस गुणीले म्हशीचं किती दूध ते विसरले... पुन्हा मोहरा सेलफोनकडे वळवावा लागला. तोपर्यंत त्याच्या स्क्रीनवर अंधार पडला होता. तिथं दिवा लावून म्हशीचं दूध मोजेपर्यंत पुन्हा दूधवाला काहीतरी म्हणाला... गोंधळ संपेच ना! एकदा कॅल्क्युलेटर धरलेला डावा हात वर, एकदा सेलफोन धरलेला उजवा हात वर असं हातांचं लेफ्ट-राईट करत मी आपली उभी...!
वास्तविक तो हिशेब मला ती दोन्ही यंत्रं न वापरता पण करता आला असता, जरा जास्त वेळ लागला असता इतकंच। पण एकदा सवय झाली की झाली. थोड्याथोड्या वेळानं असल्या कुठल्या ना कुठल्यातरी चपट्या यंत्रावरची बटणं दाबल्याशिवाय आजकाल कुणाला चैनच पडत नाही.
घरात टी। व्ही. चा रिमोट वापरायची चांगली सवय आहे म्हणावं तर बाहेर कुणाकडे गेलं की पंचाईत होते. प्रत्येक घरातल्या रिमोटसची रचना वेगवेगळी... कधी वेळ आलीच तर त्यांवरची आपल्याला हवी असलेली बटणं शोधे-शोधेपर्यंत टी. व्ही. पाहण्यातला उत्साहच संपून जातो. मला एक कळत नाही की जर आता तमाम टी. व्ही. पाहणारं जग रिमोटस वापरणार तर त्यांची रचना, त्यांवरच्या बटणांच्या जागा या एकसारख्या का नाही ठेवत? जसं कुठलीही कार चालवली तरी गिअर्स डाव्या हाताला, दिव्यांची बटणं उजव्या हाताला... सोपं जातं की नाही जरा? तशीच या रिमोटसची पद्धत असती तर लोकांनी दुवाच दिला असता ना ते बनवणार्‍या कंपन्यांना! पण नाही...
मागच्या वर्षी आमच्या घरी डीश टी। व्ही. आला. त्याच्या रिमोटवरची आणि आधीपासून सवयीच्या असलेल्या टी. व्ही. च्या रिमोटवरची आवाज आणि चॅनेलच्या बटणांची जागा बरोब्बर उलट-पालट होती. तो बदल अजूनही माझ्या अंगवळणी पडलेला नाही. आवाज कमी-जास्त करायचा असेल की सवयीमुळे चॅनेलचंच बटण दाबलं जातं... मग आमच्या चिरंजीवांची टी. व्ही. -समाधी भंग पावते, छोटासा वाद झडतो, ‘आईला जमतच नाही नीट’ यावर नव्यानं शिकामोर्तब होतं... काही काही रिमोटसवर तर इतकी भारंभार बटणं असतात की विचारायची सोय नाही. त्यांतली निम्मी तर कधी वापरलीही जात नसावीत.
कोणे एके काळी कॅल्क्युलेटर ही अशी एकच हाताच्या पंज्यावर मावणारी वस्तू होती की ज्याच्यावरची छोटी-छोटी काही बटणं दाबून हिशेब, आकडेमोड अशी थोडीफार कामं करता यायची। किंबहुना फक्त आकडेमोडीसाठीच कॅल्क्युलेटरची ती छोटी-छोटी बटणं वापरण्याची वेळ यायची. म्हणजेच दिवसभरातला अगदी थोडाच वेळ ते उपकरण आपल्या वापरात असायचं. आता मात्र या सगळ्या चपट्या यंत्रांविना आपला दिनक्रम जरा कल्पून बघा...

घराबाहेर पडल्यावर या विविध प्रकारच्या रीमोटसचा पसारा तरी सांभाळायचा नसतो। पण आता हातांवर आणि बोटांवर त्या टीचभर सेलफोनचं राज्य असतं.
काही वर्षांपूर्वी ‘पेजर’ नामक एक सेलफोनचं अल्पायुषी भावंड अनेकांकडे दिसायचं। विविध निरोपांची देवाणघेवाण (म्हणजे आताच्या भाषेत एस. एम. एस. ) करण्याची सवय लोकांना खरी त्या पेजरनं लावली. पेजरमुळेच कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या नवऱ्याला एकदम आयत्यावेळी बायकोचा वाढदिवस आठवला तर कपाळावर हात मारून घ्यायचं कारण आता उरलं नाही! नुसतं तिला ‘डियर’, ‘डार्लिंग’ इ. शब्द वापरून पेज करायचं की काम फत्ते! पेजरसारख्या अत्याधुनिक यंत्राचा वापर करून नवर्‍यानं पाठवलेल्या शुभेच्छांमुळे इकडे बायकोही खूष!तेव्हा त्या पेजरच्या आठ-दहा आकडी मोठ्या नंबरांची मौज वाटायची किंबहुना एवढ्या मोठ्या नंबरांमुळेच ते काहीतरी अद्भुत यंत्र वाटायचं. खरं तर चार-दोन शब्दांचे त्रोटक निरोप लिहायचे आणि त्याला धडधडीतपणे ‘पेज’ म्हणायचं हा म्हणजे मोठा विनोदच होता. त्यामुळे थोड्याच काळात लोकांना त्याचा कंटाळा आला असावा. परिणामी, सेलफोनसारखं त्या पेजरचं हरहुन्नरी, हिकमती भावंड जन्माला आलं. ‘आखूड शिंगी, बहुदुधी’ हा माणसाचा हव्यास इथेही कामी आला आणि मग या सेलफोननं तमाम लोकांना अक्षरशः नादी लावलं. पेजरप्रमाणे निरोपांची देवाणघेवाण हे तर त्या सेलफोनरूपी हिमनगाचं फक्त एक टोक आहे. त्या टीचभर चपट्या पेटीत ज्या काही करामती, गमती-जमती सामावलेल्या आहेत त्या पाहून मला तर अवाक व्हायला होतं कधी कधी.
आमचा जुना सेलफोन म्हणजे चांगला भारदस्त, वजनी ऐवज होता। गळ्यात लटकवला की मला एखादी धोंड अडकवल्यासारखं वाटायचं. त्याच्या तुलनेत आजचे सेलफोन्स म्हणजे एखादी झाड की पत्तीच म्हणायला पाहिजे! पूर्वी मला कित्येक दिवस ‘तुमच्याकडे कुठला फोन आहे?’ या प्रश्नाला नक्की काय उत्तर द्यायचं तेच कळायचं नाही... म्हणजे नोकिया सांगायचं की आयडीया, सोनी म्हणायचं की बीपीएल... माझा प्रचंड गोंधळ उडायचा! विविध नेटवर्क्सची नावं आणि हॅंडसेटसची नावं यांतला फरक कळायला अनेक दिवस जावे लागले...

भर गर्दीच्या रस्त्यात सेलफोनवर अगदी रमत गमत गप्पा मारत जाणारी माणसं बघितली की मला अतिशय नवल वाटतं। मी आजही सार्वजनिक ठिकाणी फोनवर कुणाशीही नीट गप्पा-बिप्पा मारूच शकत नाही. रस्त्यात असताना कुणाचा फोन आला किंवा कुणाला फोन करायची वेळ आलीच तर अर्ध्या अधिक वेळा त्या पलिकडच्या व्यक्तिचं बोलणं आसपासच्या कोलाहलामुळे मला नीट स्पष्टपणे ऐकूच येत नाही. काही वेळा माझ्या फोनचं नेटवर्क खराब असतं, काही वेळा पलिकडच्या फोनचं... अगदी एक दोन वाक्यांत संपणारे महत्त्वाचे निरोप जरी असले तरी ते सांगताना अथवा ऐकताना मला चार-चारदा "आंऽऽ? काऽऽय?" करावं लागतं. मग त्यापेक्षा एस. एम. एस. हे प्रकरण मला जास्त आवडतं. कधीतरी एखाद्या मैत्रिणीशी गप्पा मारायची हुक्की येते. पण तिला वेळ असेल, नसेल असा विचारही येतो. अश्या वेळी एखादा मेसेज पाठवला की काम भागतं. मग पलिकडची व्यक्ती कामात असेल, आपल्या मेसेजला थोड्या वेळानं उत्तर मिळालं तरी बिघडत नाही. अश्या मेसेजेस मार्फत गप्पा तर काय तास-दोन तासही चालू शकतात. त्यांना वेळेचं बंधन उरत नाही मग.
मेसेजेस् टाईप करत बसायचा ज्यांना कंटाळा येतो असे लोक मात्र रस्त्यात चालता चालता, बागेत, बसस्टॉपवर, लोकलट्रेनमध्ये अगदी मज्जेत तासनतास आपापल्या सेलफोनवर गप्पा मारताना दिसतात। त्या हॅंडस-फ्रीच्या वायर्स कानात खुपसलेल्या असतील तर काय विचारायलाच नको. मग संभाषणानुरूप हातवारे काय करतात, एकटेच हसत काय असतात! आमच्या लहानपणी शाळेत येता-जाता रस्त्यात एखादा माणूस स्वतःशीच बडबड करताना दिसला की आम्ही आपापसांत ‘वेडा वेडा’ म्हणून खुसफुसत हसायचो. आता कदाचित ज्याच्याकडे सेलफोनच नसेल किंवा जो सार्वजनिक ठिकाणी आपले हॅंडस फ्री ठेवत नसेल त्याला आजची पिढी वेडं ठरवेल!
माझा एक सेलफोन अगदी साधासुधा आहे बिचारा... म्हणजे कॅमेरा नाही, ब्लू-टूथ नाही, काही नाही; ज्याला आधुनिक भाषेत ‘व्हनिला मॉडेल’ म्हणतात असा आहे... तर त्याला माझा मुलगा ‘मागासलेला फोन’ असं म्हणतो! तो फोन उचलून हातात घेणंही त्याला ‘शान के खिलाफ’ वाटतं। सेलफोन म्हणजे कसा... ढीगभर रिंगटोन्स हवेत, पोतंभर डाऊनलोडस हवेत, जगभरातल्या गेम्स हव्यात, निरनिराळ्या थीम्स् हव्यात, दोन मेगापिक्सेल तर दोन पण कॅमेरा हवा. म्हणजे मग सतत काही ना काही कारण काढून त्याच्यावरची बटणं कचाकच दाबली गेली पाहिजेत. तल्लीन होऊन काही करण्याचा दुसरा मार्गच उरलेला नाहीये ना आजकाल!

सेलफोनवरच्या गेम्स् खेळतानाची माझ्या मुलाच्या चेहेर्‍यावरची ती तल्लीनता पाहिली की मला नेहेमी कसे कोण जाणे पण कीर्तनात तल्लीन झालेले श्रोते आठवतात। देवळात टाळ, मृदुंग, चिपळ्यांच्या साथीनं मधाळ आवाजात कीर्तन करणारे कथेकरी बुवा, त्यांच्या पुढ्यात रंगून गेलेला श्रोतृवर्ग... हे दृश्य मी स्वतःतरी आजपर्यंत फक्त जुन्या मराठी चित्रपटांतच पाहिलेलं आहे. तबल्यावर किंवा मृदुंगावर थाप पडते, तंबोर्‍याची तार झंकारते, घरी गणपतीच्या आरतीच्या वेळी टाळ ऊर्फ झांजा वाजवलेल्या असल्यामुळे त्याचाही आवाज कसा आहे ते माहीत आहे पण त्या चिपळ्यांच्या आवाजाचं शब्दांत वर्णन कसं करतात ते मात्र मला माहीत नाही. पण कीर्तन, टाळ, मृदुंग आणि तल्लीनता ही चौकट चिपळ्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही हे मात्र नक्की! पूर्वी खेड्यापाड्यात दिवसभर राबून, कष्ट करून थकली भागलेली मंडळी आपला शीण घालवायला रात्री कीर्तनात रमायची. आताच्या जगात तर काय रात्रीपर्यंत थांबायचीही गरज नाही. की-बोर्ड वरची बटणं दाबायचा कंटाळा आला की सेलफोन, सेलफोनचा कंटाळा आला की पुन्हा की-बोर्ड, संध्याकाळी घरी आलं की टी. व्ही., व्हिडीयो चे रिमोट हातात असतात. टी. व्ही. वरचे कार्यक्रम कंटाळवाणे असतील तर पुन्हा सेलफोन असतोच दिमतीला... थोडक्यात काय, तर आताची ही सगळी चपटी यंत्रं म्हणजे आधुनिक जगातल्या चिपळ्याच आहेत. त्यांत माणसं इतकी रंगून जातात की टाळ, मृदुंगासारख्या इतर कुठल्या गोष्टींची उणीवही त्यांना भासत नाही... किंबहुना गरजच पडत नाही!

तेव्हा बोला - पुंडलिऽक वरदे हऽऽरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाऽऽराम...

॥ मोबाईल बोले रिमोटला, नाच माझ्या संगं ॥
॥ माणसं ही सगळीऽऽऽ झाली आहेत दंग ॥

Sunday, March 29, 2009

चार पायऱ्यांचा पर्वत

पेपरमध्ये एका ट्रेकची जाहिरात बघून तिचे डोळे एकदम चमकले. हातातला कॉफीचा कप तिनं ताबडतोब बाजूला ठेवला. डोक्यात भराभर विचारचक्रं फिरायला लागली... जायचं का? करू का फोन?... रविवारीच आहे, पहाटे उठून नवऱ्याचा आणि मुलाचा स्वयंपाक करून जाऊ... नवरा घरी असल्यामुळे मुलाचीही काळजी नाही... सगळी आखणी मनातल्यामनात झरझर तयार झाली आणि तिनं जाहिरातीत दिलेला नंबर फिरवला...
"हॅलो, यूथ हॉस्टेल... " फोनमधून आवाज आला.
'अरे वा! लगेच लागला! ’ ती खूष झाली.
तिनं चौकशी केली... प्रबळगड, कलावंतीण दुर्ग... माथेरानजवळ आहे म्हणे! तिचं भटकं मन लगेच माथेरानच्या आकाशात घिरट्या घालायला लागलं.
"सकाळी सात वाजता पनवेल एस. टी. स्टँड वर जमायचं आहे" - पलिकडून पुढली माहिती आली. म्हणजे घरातून साडे-पाचला तरी निघायला हवं... त्यापूर्वी दोघांचा स्वयंपाक... बाप रे! म्हणजे चारला उठायला हवं... जमणार का?... स्वतःलाच विचारलेल्या या प्रश्नासरशी माथेरानच्या आकाशातून ती धाडकन जमिनीवर आली.
"रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत परत येता येईल."... म्हणजे फार उशीर नाही होणारे...
नावनोंदणीसाठी अजून चार दिवस हाताशी होते. तिनं ट्रेकची सगळी माहिती विचारून फोन ठेवून दिला... खात्रीशीर काहीही न ठरवता.
चला, फोन केला, सुरूवात तर झाली होती... आता तिला पुढची ‘जमेल ना आपल्याला... इतक्या वर्षांनंतर?? ’ ची पायरी चढायची होती...

लहानपणापासूनच तिला भटकंतीची प्रचंड आवड होती. प्रवासाची, नवनवी ठिकाणं-माणसं जाणून घ्यायची सुरूवातीपासूनच हौस... शाळा-कॉलेजमधले मित्रमैत्रिणी किंवा घरातले तिच्यासारखेच काही भटके नातेवाईक यांच्यासोबतच्या ट्रेकच्या, सहलींच्या कितीतरी आठवणी... प्रत्येकवेळच्या आठवणींची आपापली खासीयत होती. सहलींचं ठिकाण तसं तिच्या दृष्टीनं नेहेमी दुय्यम असायचं. कारण जाऊ तिथे नवीन आनंददायी काहीतरी गवसतंच यावर तिचा ठाम विश्वास होता. जाणं महत्त्वाचं आणि रोजची चाकोरी विसरून सर्वांनी एकत्र मिळून धमाल करणं त्याहूनही महत्त्वाचं. पण हा ट्रेक म्हणजे... माणसं फारशी माहितीतली नव्हती... अगदीच अनोळखीही नव्हती म्हणा! तिचा मुलगा याच ग्रुपबरोबर मागच्या वर्षी ट्रेकला जाऊन आलेला होता... त्यामुळेच तर फोन करायचा श्रीगणेशा इतक्या पटकन झाला होता.

‘जमेल ना? ’ ची पायरी मात्र लवकर सुटेना. लग्नापूर्वी भरपूर भटकलो असलो म्हणून काय झालं... ती झाली पंधरा-वीस वर्षांपूर्वीची गोष्ट! लग्नानंतर मात्र तिचे असे ट्रेक्स झालेच नव्हते. मुलगा लहान... जायचं तर त्याला कुठे ठेवायचं हा प्रश्न ‘आ’ वासून उभा असायचा... आता मुलगा मोठा होता, बऱ्यापैकी स्वावलंबी होता... आता त्या प्रश्नानं तोंड उघडायचंही कारण नव्हतं...
आता न जाण्याला खरं म्हणजे कुठलंच कारण नव्हतं! पण म्हणूनच निर्णय पटकन होत नव्हता. वीस वर्षं झाकून ठेवलेली सव्वा लाखांची मूठ उघडायची का आता?... पण दिवसभर भटकंती, ऊन, गड चढायचा, आपलं सामान आपणच सांभाळायचं... जमेल ना? तीन चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर सचिन तेंडुलकरसुद्धा आधी सराव सामने खेळतो आणि मगच कसोटी क्रिकेटला उभा राहतो. वीस वर्षांच्या खंडानंतर आपल्याला तर किती सराव करावा लागेल... रोजचे चार जिने चढणं वेगळं आणि गड चढणं वेगळं... लिफ्टमुळे ते जिनेही क्वचितच चढले जायचे! जिने‘च’ चढायचा अनेकदा केलेला निर्धार समोर लिफ्ट दिसल्यावर ढासळायचा. ’ठरवल्यासरशी चार जिने नाही चढू शकत आपण नियमित आणि म्हणे गड चढणार!! ’... तिच्या डोक्यात आता वादविवाद स्पर्धा अगदी रंगात आली होती. कॉलेजमध्ये असताना केलेली भटकंती, ट्रेक्स आठवता आठवता कपातल्या कॉफीची कोल्ड कॉफी झाली होती!

पुढच्या चार दिवसांतले दोन दिवस अश्याच विचारांत तिनं घालवले. जावं की नाही, जावं की नाही? लवकर उत्तर मिळत नव्हतं. पण भटकण्याची ऊर्मीही स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी तिनं पैसे भरून ट्रेकसाठी नावनोंदणी केलीच... ‘पुनःश्च हरी ॐ’ कधीतरी करायलाच हवं होतं...
पुढचे पंधरा दिवस ती त्याच नादात होती। मनातल्या मनात रोज एकदातरी तो न पाहिलेला प्रबळगड चढून उतरायची. या निमित्तानं कोपऱ्यात धूळ खात पडलेले तिचे स्पोर्टस शूज बाहेर निघाले, जरा स्वच्छ धुतले गेले. दिवसभर पाठीवर वागवता येईल अशी एक सॅक तिनं माळ्यावरून शोधून काढली. एकीकडे, जाताना बरोबर काय काय न्यायचं, घरातल्या दोघा खादाडांसाठी काय काय करून ठेवायचं याचा विचार सुरूच होता. लग्नापूर्वी हे झंझट नव्हतं. घरकामात लक्ष कमी म्हणून आई आधी चिडायची पण जाताना काय-काय छानछान पदार्थ करून द्यायची बरोबर! आता मात्र आपणच करा आणि आपणच खा! शिवाय दोन दिवस आधीपासून त्याची तयारी... ‘एक दिवसभर एकटीनं बाहेर जायचं तर किती कटकटी... मग नको जाऊस ना... नाही पण मला जायचंय... मग कर सहन त्या सगळ्या कटकटी! ’ - तिचं नेहेमीचं स्वगत सुरू झालं. मध्ये मध्ये तोंडी लावायला "आई, तू खरंचच जाणारेस ट्रेकिंगला? " ही मुलाची रेकॉर्ड - ‘खरंच’ला वर अजून एक ‘च’ जोडून!... "जमणारे का गड चढायला? रोज चार-सहा मजले चढायची प्रॅक्टीस कर" ही नवऱ्याची ना धड इशारा, ना धड चेष्टा अशी सूचना... या सगळ्यांत तिनं ‘जमेल का? ’च्या पायरीवरून ’जमेल, जमेल’ च्या तिसऱ्या पायरीवर कसंबसं पाऊल ठेवलं होतं. अर्थात, मन अजून साशंक होतंच. स्वतःबद्दलच खात्री देता येत नव्हती आणि ही वेळ तिनंच स्वतःवर ओढवून घेतली होती. इतकी वर्षं स्वतःच्या आवडीनिवडींकडे का आपण दुर्लक्ष केलं इतकं? - अजून एक वादविवाद स्पर्धा...! पण आता हा ट्रेक पार पडेपर्यंत तरी निदान त्या निघून गेलेल्या वर्षांचा विचार करायचा नाही असं तिनं मनाशी पक्कं ठरवून टाकलं.

... आणि तो रविवार उजाडला. आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी तिनं सगळी तयारी करून ठेवली, चारचा गजर लावला आणि ती आडवी झाली. पण चारला जाग येईल की नाही या विचारानं कितीतरी वेळ तिला झोपच लागेना! आता हे काय नवीन? ती स्वतःवरच वैतागली. आधीच पहाटे उठायचं म्हणजे तिला नेहेमीच संकट वाटायचं... ‘बाप रे, जमेल ना’ची सुरूवात या पहाटे उठण्याच्या विचारानं तर झाली होती...
रात्रीचा एक वाजून गेला... ‘आता तर शक्यच नाही जाग येणं, अजूनही वेळ गेलेली नाही, जाणं रद्द करावं का? ’ अश्या विचारांतच दोननंतर कधीतरी तिचा डोळा लागला...
चार वाजता गजरानं आपलं कर्तव्य इमादारीत बजावलं... तिनं तो गजर झोपेतच बंद करून टाकायचं आपलं कामही इमानदारीत केलं!

... ती एकदम खडबडून जागी झाली तेव्हा पाच वाजून गेले होते! ती स्वतःवरच पुन्हा एकदा वैतागली. नकटीच्या लग्नाला येणार नाहीत इतकी विघ्नं तिच्या ट्रेकींगला येऊ पाहत होती! तरी, बरोबर न्यायचे खाद्यपदार्थ आदल्या रात्रीच करून ठेवल्याबद्दल तिनं स्वतःचीच पाठ थोपटली. गड चढायला जमेल की नाही याची खात्री नसली तरी पहाटे असा काहीतरी गोंधळ होणार याची बहुधा तिला पक्की खात्री होती!
कसंबसं साडेपाचला घर सोडलं आणि कशीबशी ती सहाची एस. टी. मिळाली.
तासाभराच्या एस. टी. च्या प्रवासात मात्र ती स्वतःवरच तुडुंब खूष होती. शेवटी एकदाचं आपण बाहेर पडलो तर!... तिला अजून खरंच वाटत नव्हतं. बस लागते म्हणून ती बहुतेकवेळा बसचा प्रवास टाळायची, पण त्यादिवशी नाही! आपल्याला बस लागते, खूप उकाडा आहे, गर्दी आहे या गोष्टी तिला त्यादिवशी जाणवल्याही नाहीत!...
विश्रांतीनंतरच्या सराव सामन्यासाठी तैय्यार झालेल्या सचिन तेंडुलकरसारखी ती आता दोन्ही पाय घट्ट रोवून ‘जमेल, जमेल’च्या तिसऱ्या पायरीवर उभी होती!

पनवेल एस. टी. स्टॅंडवर ठरलेल्या ठिकाणी ट्रेकमधले इतर काहीजण आधीच जमलेले होते. तिनं सगळ्यांकडे एकेकदा नजर टाकली... सगळे तिच्यापेक्षा वयानं लहान, तरूण होते. ‘बाप रे! जमेल ना आपल्याला यांच्या वेगाशी जुळवून घ्यायला? ’... हरदासाची कथा पुन्हा मूळपदावर आली. पण आता परत फिरणंही अशक्य होतं. ‘जमेल ना’ काय... ’जमणारच! ’... तिच्या नकळत ती अजून एक पायरी चढली.
त्यानंतर पाऊणएक तासात सर्वजण गडाच्या पायथ्यापाशी पोचले. गृप-लीडरनं प्रबळगडाची थोडक्यात माहिती दिली. वर उंचावर दिसणारी प्रबळमाची हा पहिला थांबा होता.
‘इतक्या उंचावर आणि म्हणे पहिला थांबा! ’ ती स्वतःशीच म्हणाली.
नंतर तिथून वर डावीकडे दिसणाऱ्या कलावंतिणीच्या सुळक्यावर चढाई करायची होती. एखाद्या कलावंतानं कोरीव काम करून काढल्यासारखा मुख्य गडापासून तो सुळका वेगळा दिसतो म्हणून त्याचं ते नाव.
इथून दिसणारी उंची फसवी आहे, प्रत्यक्षात गड खूप उंच आहे, दम राखून ठेवा - लीडरनं परत परत सगळ्यांना बजावलं आणि सर्वांनी चालायला सुरूवात केली. एव्हाना थोड्या-फार ओळखी झाल्या होत्या. इतरांप्रमाणेच तिनं जुजबी गप्पा मारत मार्गक्रमणेला सुरुवात केली. उत्साहात थोडे फोटो-बिटो काढले. चढ सुरू झाला तसं मात्र इतक्या वर्षांतल्या तिच्यातल्या गृहिणीपणानं आपले रंग दाखवायला सुरूवात केली. हे तिला अनपेक्षित होतं.
‘इतक्या लवकर आपल्याला दम लागला? पहिल्याच सराव सामन्यात सचिन तेंडुलकर शून्यावर आऊट झाला? कसं शक्य आहे? आता वर पोचेपर्यंत राखून काय ठेवणार? डोंबल!... नाही, नाही! आत्ता गप्पा मारत मारत चढलो म्हणून असेल... आता तोंड बंद! आता श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवायचं’... तिनं (बहुतेक) स्वतःचीच समजूत काढली.
पण हा निश्चयही पुढच्या पंधरा मिनिटांतच गळून पडला. थोडं चढून गेलं की असा दम लागायचा की विचारता सोय नाही. फुफ्फुसं लगेच असहकार आंदोलन सुरू करायची. धपापणारं हृदय छातीचा पिंजरा तोडून कुठल्याही क्षणी बाहेर उडी मारेल असं वाटायचं. स्वतःची ही अवस्था पाहून तिला नाही म्हटलं तरी थोडा धक्काच बसला. वीस वर्षांत स्टॅमिनातला थोडफार फरक तिनं गृहित धरलेला होता. पण इतका...?? हे म्हणजे पैज लावायची पन्नास जिलब्या खाण्याची आणि दुसऱ्या जिलबीलाच पाणी मागायचं असं झालं!
दम खायला थोडं थांबलं की पाच मिनिटांत पठ्ठी पुन्हा टुणटुणीत होऊन काही झालंच नाही अश्या थाटात चालायला लागायची. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या! डोळ्यांसमोर काजवे, चांदण्या, लिफ्ट, (न चढलेले)जिने, नवरा, मुलगा, (मध्येच सोडून दिलेली) योगासनं - सगळे आळीपाळीनं फेर धरून नाचायला लागायचे. तिची ही अवस्था पाहून असेल कदाचित पण लीडर तिच्यापुढे हाकेचं अंतर राखून चालत होता. त्यातल्यात्यात नशीब म्हणजे डिसेंबरचा महिना असल्यामुळे डोंगरावरची हवा आल्हाददायक होती. वाऱ्याची सततची मंद झुळूक काम अर्धा टक्का का होईना हलकं करत होती. बरोबरचे बाकी सगळे पुढे निघून गेलेले होते. लांबून मध्येच कुणी दृष्टीस पडायचं, मध्येच कुणाचा आवाज कानावर पडायचा. ‘माझ्यासाठी जरा थांबा’ असं शक्यतो कुणाला सांगायचं नाही असं तिनं ठरवलं होतं पण मनोमन तिची पक्की खात्री झाली होती की पुढच्या वेळी पेपरमध्ये ट्रेकची जाहिरात देताना हे लोक नक्की त्यात वयोगटाचा उल्लेख करणार. पुढच्या वेळच्या त्यांच्या जाहिरातीत पस्तिशीपुढच्या लोकांनी, विशेषतः गृहिणींनी चौकशीकरताही फोन करू नये असं वाक्य नक्की पहायला मिळेल... त्या तश्या अवस्थेतही आपल्याला विनोद सुचताहेत हे पाहून तिचं तिलाच जरा बरं वाटलं.

हपापत, घामानं निथळत... घशाला कोरड पडलेली, पाय भरून आलेले - अश्या अवस्थेत पुढचा तास-दीड तास तिनं अक्षरशः किल्ला लढवला! म्हणे सव्वा लाखाची झाकलेली मूठ; आता तिच्यात सव्वा रुपया तरी शाबूत होता की नाही कोण जाणे! पुढे गेलेले वाटेत थोडे थांबलेले दिसले की तिला तात्पुरता उत्साह यायचा. पण ती त्या जागी पोचेपर्यंत त्यांची विश्रांती झालेली असायची आणि ते उठून चालायला लागायचे!
माचीच्या थोडं अलिकडे एका पडक्या चौथऱ्याजवळ सावलीत सर्वजण पुन्हा एकदा थांबले. डिसेंबरचा महिना असला तरी दुपारचा बाराचा सूर्य आपलं काम करतच होता. कुणीतरी लीडरला विचारलं, "अजून पोचायला किती वेळ लागेल? "
"ते या मॅडमवर अवलंबून आहे." लीडरनं तिच्याकडे बोट दाखवत चेष्टेत उत्तर दिलं.
पण तिला त्याचा राग नाही आला. तेवढी खिलाडू वृत्ती तिच्यात होती. आणि तसंही, तो खरं तेच बोलत होता की! वीस वर्षांनंतर आपलं हे असं होणार आहे याची तिला तरी कुठे कल्पना होती! जुने दिवस आठवत, उसनं अवसान आणत तिनं पुन्हा सर्वांच्या मागून चालायला सुरूवात केली...

माचीवर पोचल्यावर आदिवासींच्या दहा-पाच झोपड्या दृष्टीस पडल्या. एका झोपडीसमोर चांगलं मोठं सारवलेलं अंगण दिसलं. सगळेजण तिथेच थोडे विसावले. थंडगार पाण्यानं हात-तोंड धुवून जरा वेळ बसल्यावर तिलाही बरं वाटलं. सिंहगडावर एकदा ती गृपमध्ये पैज लावून पहिल्या तीनजणांत वरपर्यंत पोचली होती. देवटाक्याचं थंडगार पाणी पिताना मागून दमत भागत चढणाऱ्यांना ’लवकर या, लवकर या’ म्हणून बोलावत होती. आजही त्या आदिवासी झोपडीबाहेरच्या माठातलं पाणी तसंच थंडगार होतं पण ते पिणाऱ्यांमध्ये ती शेवटच्या तीनांत होती!
साधारण अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा सगळे उठले... अजून सुळक्यावरची चढाई शिल्लकच होती. तिच्या अवसानानं मात्र आता उधार-उसनवारी बंद केली. पुन्हा एकदा ‘जाऊ की नको, जाऊ की नको’ची एक मिनी-वादविवाद स्पर्धा डोक्यात सुरू झाली. भटकंतीची आवड आणि मनाचा निर्धार एवढ्या भांडवलावर ती इथपर्यंत तर येऊन पोचली होती. पण पुढच्या प्रवासाला ते भांडवल पुरेसं पडेलच याची खात्री नव्हती. शिवाय आत्तापर्यंतच्या चढाईपेक्षा पुढची वाट जास्त बिकट आहे हे डोळ्यांना स्वच्छ दिसत होतं. लीडरसकट सगळे तिला पुढे चलण्याचा आग्रह करत होते. तिला एकदम तिचा कोणे एके काळचा रायगड-ट्रेक आठवला. गड चढून गेल्यावर पुढे लांबवर दिसणाऱ्या टकमक टोकाकडे जायला तीच आधी सरसावली होती... इतरांना चलण्याचा आग्रह करत होती! पण त्यादिवशी मात्र - कुणाच्या आग्रहाला बळी न पडता - तिनं न जाण्याचं ठरवलं. तिच्या या निर्णयाचा तिला अजिबात धक्का बसला नाही. वीस वर्षांच्या खंडानंतर ’जायचं का?, जमेल ना?, जमेल-जमेल.., जमणारच! ’ या चार पायऱ्यांचं गिर्यारोहण तिनं निर्धारानं पूर्ण केलं होतं...

शिवाय अजून एक निश्चय आता तिच्या मनाशी पक्का झाला होता... घरी परतल्यावर दुसऱ्या दिवसापासून लिफ्ट न वापरण्याचा, जिने आणि फक्त जिनेच चढण्याचा...

तिच्या या निश्चयाचा मात्र तिला स्वतःलाच आश्चर्यकारक धक्का बसला होता...!!

Thursday, March 19, 2009

डॅनी बॉयलचं जगप्रसिध्द त्रिकूट...!

झोपडपट्टी, कुत्रा आणि गर्भश्रीमंत हे तीन शब्द कधी कुणी एकत्र म्हटले असते का? पण डॅनी अंकलनी ते तसे म्हटले। या तीन गोष्टींचा आपापसांत संबंध जोडायचाच झाला तर असा जोडावा लागेल की झोपडपट्टीच्या आसपास कुत्री असतात आणि गर्भश्रीमंतांकडेही (षौक म्हणून) कुत्री असतात। आता, ‘अ’ चा ‘ब’ शी संबंध असेल आणि ‘ब’ चा ‘क’ शी असेल तर ‘अ’ चा ‘क’ शी ही संबंध असतो असा बीजगणिताचा नियम आहे. आधीच गणित आणि त्यात वर बीजगणित - मग त्या नियमाला कोण आव्हान देणार? त्यापेक्षा तो नियम मुकाटपणे पाळलेला बरा. त्यामुळे ‘झो’, ‘कु’ आणि ‘ग’ यांना अ, ब, क च्या जागी (मुकाटपणे) substitute करून (substitution शिवाय बीजगणित म्हणजे भांडणांविना संसार, निवडणुकांविना भारत देश, आरत्यांविना गणेशोत्सव आणि कुत्र्यांविना - पुन्हा कुत्री! - दत्ताची तसबीर) - तर तसं substitute करून हे सिध्द होतं की झोपडपट्टी, कुत्रा आणि गर्भश्रीमंत यांचा आपापसांत (बीजगणिती) घनिष्ठ संबंध आहे.
बीजगणिताच्याच अजून एका नियमानुसार कधी कधी अ, ब, क च्या जागी ३-३ गोष्टींचे अनेक गट चपखल बसू शकतात। उदाहरणार्थ मॅकडॉनल्ड्स, बर्गर आणि राजकीय पक्ष। मॅकडॉनल्ड्सचा बर्गर जगप्रसिध्द आहे आणि आपले राजकीय पक्ष बर्गरच्या मराठी भावंडाला जगप्रसिध्द करायच्या प्रयत्नात असतात. म्हणजे मॅकडॉनल्ड्स आणि राजकीय पक्ष यांचा संबंध प्रस्थापित होतो... अजून एक उदाहरण - महेंद्रसिंग धोणी, क्रिकेट आणि व्याकरणातले काळ! धोणी क्रिकेट खेळतो, क्रिकेटचे ३ प्रकार असतात आणि व्याकरणातल्या काळाचेही भूत, भविष्य आणि वर्तमान असे ३ मुख्य प्रकार असतात. कसोटी क्रिकेट हे भूत, एक दिवसीय क्रिकेट म्हणजे वर्तमान आणि ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट म्हणजे भविष्य! म्हणजेच धोणीचा आणि व्याकरणाचा संबंध प्रस्थापित झाला... अशी अनेक त्रिकुटं पैदा करता येतील. (असेल पायथागोरस श्रेष्ठ भूमितीतज्ज्ञ, म्हणून इतरांनी आपापली तऱ्हेतऱ्हेची triplets काढूच नयेत की काय!)

जर अशी अनेक त्रिकुटं उपलब्ध होती तर मग डॅनी अंकलनी झो-कु-ग हेच त्रिकूट का बरं निवडलं असेल? त्यांनी McGrill Political Farce किंवा Dhoni's Cricket (T/S)ense असा सिनेमा का नाही काढला? क्रिकेटवरचा सिनेमा तर भारतात धो-धो चालला असता। ‘झो-कु-ग’ला म्हणे निवडक प्रेक्षकवर्गच लाभला आणि त्यांतल्या निम्म्यांना तो गरिबीचा बाजार वगैरे वाटला. त्यापेक्षा धोणीचा क्रिकेट सेन्स ऊर्फ टेन्स पहायला लोकांना जास्त आवडलं असतं. धोणीला क्रिकेट सेन्स आहे आणि तोच भारतीय क्रिकेटचा future tense आहे असं त्या सिनेमात दाखवलं असतं म्हणजे ‘वास्तववादी दृष्टीकोन’ वगैरे पण सांभाळला गेला असता. ऑस्कर तर काय डॅनी अंकलच्या नशीबात होतंच, ते कुठे पळून जाणार होतं? शिवाय क्रिकेटवरच्या सिनेमाला ऑस्कर म्हणजे जाता-जाता ‘लगान’ला खुन्नस देता आली असती... अशी खरं म्हणजे एका दगडात अनेक कुत्री केकाटली असती, पण...

... पण, गरीबी आणि गर्भश्रीमंतीला एकत्र आणणारा कुत्रा ही (मध्यवर्ती) कल्पना अंकलना इतकी म्हणजे इतकी आवडली की त्यांनी त्याला पर्याय म्हणून दुसर्‍या कशाचा विचारच केला नाही आणि ‘झो-कु-ग’ काढायचं नक्की केलं!
संपूर्ण जगात झो-कु-ग या तीन गोष्टी फक्त भारतातच एकत्र नांदतात हे त्यांच्यातल्या चाणाक्ष दिग्दर्शकानं लगेच ताडलं। युरोप-अमेरिकेत कुत्री आहेत, श्रीमंती आहे पण बकाल गरीबी नाही. (म्हणजे आपल्याला तरी तसंच दर्शवलं जातं - जसं भारतात फक्त गरीबी आहे हे तिकडच्या लोकांना दाखवलं जातं); आफ्रिकेत कुत्री आहेत, बकाल गरीबी आहे पण गर्भश्रीमंत शोधावे लागतील; रशिया-चीनमध्ये झो-कु-ग पैकी काय काय आहे आणि काय काय नाही याचा बाहेर कुणाला पत्ताच लागू दिला जात नाही; दक्षिण अमेरिकेत जायचा डॅनी अंकलनाच कंटाळा आला होता. राहता राहिला भारतीय उपखंड आणि त्यातही आपला भारत देश... !!

परदेशात सर्वात जास्त प्रसिध्द असलेलं आपलं शहर म्हणजे मुंब‌ई! आर्थिक राजधानी वगैरे सगळं आपल्यासाठी... ‘मुंबाऽऽय’ म्हटलं की परदेशी लोकांना आठवतं ते हॉलीवूडशी ओढूनताणून यमक जुळवलेलं बॉलीवूड! (पूर्वी Bombay होतं तेव्हा बॉलीवूड म्हणणं एक वेळ ठीक आहे। पण आता ‘मुंबाऽऽय’मुळे त्याला मॉलीवूडच म्हटलं पाहीजे।) मुंब‌ईत ये‌ऊन सिनेमा काढायचा तर बॉलीवूडची सोबत पाहिजेच आणि हॉलीवूड आपली सोबत-मदत मागतंय म्हटल्यावर मग काय... इथे त्यांच्यासाठी (नेहेमीप्रमाणे) पायघड्या अंथरल्या गेल्या तर त्यात नवल ते काय!
‘बाँबे ड्रीम्स’मुळे ए. आर. रेहमान त्या लोकांना आधीपासूनच माहिती होता. दक्षिण भारतीय चित्रपट आणि त्यांतलं संगीत जसंच्या तसं हिंदीत येत असल्यामुळे रेहमानलाही फारसं काम नव्हतंच! त्यामुळे तो ही ‘झो-कु-ग’ला संगीत द्यायला तयार झाला. गुलजार तर काय all time favourite आहेच. लोकेशन आणि इतर कलाकार धारावीत आयते तयार होतेच... अशी ‘झो-कु-ग’ची सगळी भट्टी जमली. (म्हणजे, आता ‘जमली’ म्हटलं पाहिजे. तेव्हा कुठे कुणाला स्वप्न पडलं होतं की या सिनेमाचं पुढे हे असं होणार आहे ते!)
॥ जमली अशी सगळी भट्टी, त्यातच होता रसूल पुकुट्टी ॥
॥ रेहमानची दोन-पुकुट्टीचं एक, डॅनी काकांना उरलेली पाच-एक॥
॥ खूष हो‌ऊन अनिल कपूर नाचला, धारावीत शूटींग-जो तो धावला॥
॥ सगळा देश गातोय ’जय हो’, पण त्या धारावीतल्या मुलांचं काय हो?॥