अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

 स्टॉकहोममधल्या आमच्या भटकंतीचा तो दुसरा दिवस होता. स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी. सर्वच युरोपियन राजधान्यांच्या शहरांमध्ये इतकं काही बघण्यासारखं असतं की एक वारी कमीच पडते. त्यात कला, स्थापत्यशास्त्र, इतिहास, म्युझियम्स सगळ्यांतच रस असेल तर आणखीच धांदल उडू शकते. तुम्हाला केवळ भोज्यांना शिवायचं आहे, की निवांत आरामात फिरत एक-एक गोष्टी पहायच्या आहेत यावरही बरंच अवलंबून असतं. ज्याचा त्याचा आपापला पर्यटकी choice. आम्हाला निवांत फिरायचं होतं. अमुक इतक्या गोष्टी बघायच्याच आहेत असा आमचा आग्रह नव्हता. एखादं म्युझियम आवडलं तर तिथेच ३-४ तास घालवण्याची आमची तयारी होती. अचानक दिसलेली एखादी बाग छान वाटली तर अर्धा दिवस तिथेच घालवायलाही आमची हरकत नव्हती.

स्टॉकहोममध्ये पाय ठेवल्यापासूनच तिथल्या भुयारी रेल्वे नेटवर्कच्या प्रेमात पडलो होतो. त्यामुळे ठिकाण कोणतंही असो, तिथे जाण्यासाठी भुयारी रेल्वे घ्यायचीच हे पक्कं होतं. तर त्यादिवशी तसंच मुक्कामाच्या ठिकाणापासून दोन ठिकाणी ट्रेन्स बदलून मध्य स्टॉकहोममध्ये अवतरलो. जमिनीखाली ४-५ मजल्यांवर शांतपणे इकडे-तिकडे धावणार्‍या state of the art trains, स्टॉकहोमच्या लोकसंख्येला मानवेल इतपतच तिथली वर्दळ; बाहेर रस्त्यावर आलं की सगळी गजबज- याची मजा वाटत होती. जुलैचा महिना होता. तिथल्या उन्हाळ्याचे दिवस. पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ९-१० वाजेपर्यंत उजेडच उजेड. दिवस मावळायचं नावच घेत नाही. तोच तिथला उत्साही ऋतू. Summer. मात्र आपल्यासाठी ती थंडीच. गुलाबी. त्यादिवशी सकाळपासून जरा ढगाळ हवा होती. गरम कपडे, छत्र्या, बूट, असा सगळा जामानिमा करूनच निघालो होतो. भुयारी ट्रेनच्या गोतावळ्यातून वर आलो तर भुरभूर पाऊस सुरू झाला होता. 

मध्य स्टॉकहोम, गमला स्तॉन, म्हणजे स्टॉकहोमचा सर्वात जुना भाग. The Old Town. या भागाला तेराव्या शतकापासूनचा इतिहास आहे. एकंदर स्टॉकहोम शहर Lake Malaren मधल्या १२-१५ लहानमोठ्या बेटांवर मिळून वसलेलं आहे. गमला स्तॉन त्यातल्याच एका लहानशा बेटावर आहे. आम्हाला निरुद्देश भटकायचं होतं, त्यामुळे आम्ही रस्त्यावर एक दिशा पकडली आणि निघालो. साधारण १० मिनिटं चालल्यानंतर एका waterfront पाशी जाऊन पोचलो. तिथे असे असंख्य waterfronts. स्थानिकांना कदाचित त्याचं कौतुक नसेल सुद्धा. पण आपले पाय थबकतातच. तसं तिथे थांबलो. समोर १८० अंशात सुंदर नजारा होता. जुन्या-नव्या इमारती, रस्ते वाहतूक, पायी चालणारी माणसं, पाण्यातून निघालेल्या प्रवासी बोटी. पण तिथे भणाण वारा होता. तो काही पाच मिनिटंही शांतपणे उभं राहू देईना, की फोटो-बिटो काढू देईना. नुसता वारा चाललाही असता एकवेळ, पण पावसामुळे प्रचंड बोचरा गारठाही होता. बूट-मोजे घातलेले होते तरी आत पावलं गारठायची वेळ आली. असं आपण फार वेळ बाहेर भटकू शकणार नाही हे लक्षात आलं.

समोर काही अंतरावर एक भव्य इमारत दिसत होती. तिथे माणसांची गजबजही होती. फोनवरच्या नकाशात पाहून समजलं की तो स्टॉकहोमचा राजवाडा होता. पर्यटकांना तिकिटं काढून तो आतून बघता येतो असंही समजलं. एरवी आम्ही असे राजवाडे वगैरे सहसा बाजूला सारतो. पु.ल. म्हणतात ना, ‘स्वतःच्या पैशांनी दुसर्‍याची श्रीमंती बघणे...’ तसं काहीसं कारण. पण त्यादिवशी मात्र त्या राजवाड्याचा कोण आधार वाटला. आम्ही तडक तिथे गेलो, तिकीट काढून आत शिरलो. भणाणणारा बोचरा वारा बंद झाला आणि काय बरं वाटलं!

मग राजवाड्यात फिरायला लागलो. दालनंच्या दालनं- सुंदर सजावटीने नटलेली, पुरातन स्थापत्य, भिंतींवर भव्य चित्रं, प्रशस्त जिने, लाकडी कोरीव काम, नाजूक कलाकुसरीची अवाढव्य झुंबरं. इतका वेळ थंडी-वार्‍यामुळे इतर काही सुचतच नव्हतं, ते आता जरा आसपास लक्षपूर्वक बघता यायला लागलं. पर्यटकांसाठी विशिष्ट मार्ग आखलेले होते. त्या मार्गावरून पुढे पुढे जात रहायचं, एखाद्या ठिकाणी वाटलं तर रेंगाळायचं...

असंच तळमजल्यावरचं एक दालन फिरत फिरत आम्ही त्याच्या दुसर्‍या टोकाला आलो. तिथे उजव्या हाताला वळून एक भलामोठा दरवाजा होता. दरवाजाची दिशा दर्शवणारा एक बाणही तिथे होता. आम्ही प्रतिक्षिप्त क्रियेने उजवीकडे वळून त्या दरवाजातून पुढे आलो आणि एक कमाल संगमरवरी शिल्प अचानक पुढ्यात ठाकलं- मोठ्या खडकावर नाहीतर लाकडाच्या बुंध्यावर बसलेला एक तरूण पुरुष, आणि त्याच्याकडे झेपावलेली एक तरूण स्त्री. दोघंही अनावृत्त, त्यांचा एक उत्कट क्षण त्या शिल्पात गोठवलेला होता. शुभ्र संगमरवराचा दिमाख सोडला तर त्यात इतर विशेष बारीक कोरीव काम म्हणावं असं काहीही नव्हतं. आसपासच्या श्रीमंती कलाकुसरीच्या तुलनेत ते अगदीच साधं भासत होतं. आणि कदाचित त्यामुळेच नजरबंदी करणारं होतं. शेजारी एका लहानशा पाटीवर शिल्पाचं नाव दिलेलं होतं- The Wave And The Beach.


ते नाव वाचलं आणि त्याच्या ‘कमाल’ परिणामाने एकदम उंच झेपच घेतली. लाट किनार्‍याशी येऊन फुटण्याच्या किंचित आधीचा तो क्षण... बघताना कानात समुद्राची गाज ऐकू यायला लागली. त्या तरुण स्त्रीच्या शरीराच्या एक-एक तपशीलातून किनार्‍याकडे झेपावणार्‍या लाटेचा आवेग जाणवत होता. त्या आवेगातही एक ठहराव होता. लाटेचा वेग, जोर, तिचं उसळून किनार्‍याकडे झेपावणे, किनार्‍याने एका जागी निश्चल असणे, तरी लाटेला स्वतःत सामावून घेण्यासाठी आसुसलेलं असणे- सगळंच बघणार्‍याचा ठाव घेत होतं. 

शेजारच्या पाटीवर शिल्पकाराचं नावही होतं- Theodor Lundberg. त्याने १८९८ साली हे शिल्प घडवलं. पुढची पाच-दहा मिनिटं मी एकटक ते शिल्प बघत उभी होते. अशा वेळी त्या कलाकाराच्या मनात डोकावून पहावंसं वाटतं. एका बोजड, निश्चल दगडातून अशा मनुष्याकृती घडवताना किती एकाग्रचित्त करावं लागत असेल, तो आवेग दगडात उतरवताना आसपासचं जग त्याने मनाने स्तब्ध केलं असेल का, मुळात लाट आणि समुद्रकिनारा यांना अशा रुपात त्याने कसं काय पाहिलं असेल- अनेक प्रश्न पडतात.

आपली कलाजाणीव कणाकणाने वाढवत नेणारे हे क्षण. युरोपमध्ये फिरताना असे क्षण वेचू तितके कमी असतात, फक्त आपली नजर आणि मन त्यासाठी तयार असलं की झालं.

त्याआधीच्या आठवड्यातली गोष्ट. आम्ही नॉर्वेच्या राजधानीत, ऑस्लोत होतो. सकाळची वेळ होती. तो संपूर्ण दिवस पुढ्यात रिकामा पडलेला होता. दिवसभराचा प्लॅन असा काहीच नव्हता. airBnB च्या खोलीतल्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ऑस्लोचा मोठा पर्यटन-नकाशा सापडला. मग कॉफी पिता पिता तोच समोर पसरला. अनोळखी ठिकाणाचा नकाशा वाचणे हे एक माझं आवडतं काम. त्या अनोळखी शहराशी संवाद सुरू करण्याचं ते हक्काचं साधन असतं. त्या शहरात निरुद्देश भटकायचं तर आधी नकाशावर निरुद्देश हिंडलेलं चांगलं. तर असं त्या नकाशात इकडेतिकडे करताना वरच्या डाव्या कोपर्‍यात Frogner Park, Open Air Sculpture Museum, Open 24 hours, Free Entry हे शब्द दिसले. खुलं शिल्प संग्रहालय, २४ तास सुरू असणारं, बघायला तिकीट नाही- सगळंच अद्‍भुत! एका मिनिटांत त्या दिवसाचा प्लॅन पक्का झाला.

गुस्ताव विजेलण्ड (Gustav Vigeland) हा नॉर्वेचा एक प्रसिद्ध शिल्पकार. १९२० ते १९४० अशी दोन दशकं त्याने याठिकाणी खपून ब्रॉन्झ आणि ग्रॅनाइटमधली २१२ शिल्पं घडवली. ती इथे ओळीने मांडून ठेवली. तेच हे संग्रहालय. या शिल्प संग्रहालयाची ही ओळखच इतकी अवाक करणारी होती की तिथे काय काय बघायला मिळेल वगैरे काहीही विचार न करता कोर्‍या पाटीने तिथे जाऊन थडकलो.

प्रवेशद्वारापासूनच एक-एक शिल्पांनी जी काय मोहिनी घातली, की विचारू नका. सगळी शिल्पं मनुष्याकृतींचीच, पण ती अतिशय साधीसुधी होती. त्यांच्या रचनेत कोणताही डामडौल नव्हता. आणि त्यात दर्शवली होती तुमच्या-आमच्यासारखी सर्वसामान्य, कुटुंबवत्सल माणसं. घरगुती, छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद, समाधान शोधणारी; लहानग्यांना लडिवाळपणे खेळवणारी; कधी दुसर्‍यावर चिडणारी, भांडणारी, मारामारी करणारी सुद्धा. पण त्या मारामारीतही हिंस्त्र असं काही नव्हतं. सगळ्याच शिल्पांच्या रचनेत गेयता होती... मोठ्या माणसाचं बोट धरून चालत निघालेलं लहान मूल, त्या मुलाची देहबोली अशी काही दर्शवलेली, की तो मोठा माणूस म्हणजे त्याचा बाबाच असला पाहिजे असंच वाटतं. बाबा मुलाला काहीतरी सांगतोय, मूल चालता चालता ते लक्षपूर्वक ऐकतंय... त्यांच्या चालण्याचा वेगही आपल्याला जाणवतो. आणखी एक शिल्प लहानग्याला हातांना धरून झुल्यासारखं झुलवणार्‍या बाबाचं. त्या मुलाचा आनंदाने खिदळण्याचा आवाज नकळत आपल्या कानांमध्ये घुमतो. रिकामे केस घेऊन हुंदडणारी एक तरुणी, लुटुपुटूच्या भांडणात समोरच्याला खांद्यांवर उचलून खाली पाडायच्या बेतात असलेला तरूण, लहान बाळाला खेळवणारा त्याचा बाबा, काका नाहीतर मामा... एक क्षण गोठलेली मानवी हालचाल, त्याच्या आधीचा आणि नंतरचा दोन्ही क्षण आपण जाणतो, स्तब्ध अस्तब्धतेचे ते क्षण आपल्याला दिसतातही, लहान मुलं ‘स्टॅच्यू’चा खेळ खेळतात, तसं काहीसं. वाटतं, कोणत्याही क्षणी समोर पुढचं दृश्य अवतरेल... आणि मग उत्सुकता वाटते, शिल्पकाराने तोच विशिष्ट क्षण का बरं निवडला असेल? कोणते निकष वापरले असतील त्याने? 

  

ती साधेपणातली कला, शिल्पं घडवताना लडिवाळपणे चाललेली शिल्पकाराची अवजारं, या जगात अचल असं काहीच नसतं हे सांगण्याचा त्याचा हा प्रयत्न असेल का? याची उत्तरं मिळतातच असं नाही, पण प्रश्न पडणे हेच महत्वाचं. बघणार्‍याच्या जिवंतपणाचं ते लक्षण असतं.

या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारापासून आत काही अंतरापर्यंतची ५०-६० शिल्पं ब्रॉन्झमधली आहेत. मग मध्यभागात एक मोठं कारंजं आहे. या कारंजाची संकल्पनाही विजेलण्डचीच. कारंज्याच्या भोवतालच्या प्रशस्त, दगडी गोलावरही बाहेरून अनेक छोटी छोटी शिल्पं घडवलेली आहेत. 

आधीच्या ब्रॉन्झ शिल्पांच्या तुलनेत यांचा आकार अगदी चिमुकला, पण तपशील तितकेच ठळक, साधेपणा त्याच तोडीचा, त्यांतली माणसंही आपल्या आसपास सहज दिसावीत अशीच. माणसा-माणसांतल्या नात्यांना इतकं बारकाईने त्यात दर्शवलेलं. ती नाती आपण सगळेच जाणतो, अनुभवतो, म्हटलं तर त्यात नवीन काहीच नाही. ज्या प्रकारे ती आपल्या समोर येतात, आपल्याला थबकण्यास भाग पाडतात त्यात त्यांचं नावीन्य आहे. आणि पुन्हा एकदा प्रत्येक शिल्पात जाणवणारी गेयता. स्तब्ध अस्तब्धता.

त्यांतल्या एका शिल्पात एका चौकोनात तळाशी फक्त एक लहान बाळ दर्शवलेलं होतं. एकटंच. त्याला अजून पालथंही वळता येत नसावं. पण ते छान हात-पाय झाडत खेळणारं नक्की असणार. तिथून पुढे त्याला हालचालीचे एक-एक मार्ग गवसत जाणार आहेत, त्याचं आयुष्य बघताबघता गतिशील होत जाणार आहे, याची त्याला अजून कल्पना नाहीये. पण ते आपल्याला जाणवतं. आपल्या सर्वांचीच, या जगाचीच अचलपणाची सुरुवात तिथून होते, यात काय नवीन! पण ते ज्या तर्‍हेने तिथे जाणवतं, ते कमाल म्हणायला हवं.

आणि इथे पुन्हा म्हणावंसं वाटतं, की या जाणीवा आपल्यापर्यंत पोहोचण्याची वाटच बघत असतात, आपण त्यासाठी किती तयार आहोत, यावर बरंच अवलंबून असतं.

उत्तर युरोपची आमची दीर्घ भटकंती संपता संपता एक दिवस अशीच आणखी एक शिल्प-गेयता अनपेक्षितपणे अनुभवायला मिळाली. डेन्मार्कमधल्या हेलसिंगॉरचा क्रॉनबोर्ग कॅसल बघायला निघालो होतो. हा क्रॉनबोर्ग कॅसल म्हणजे शेक्सपियरच्या ‘हॅमलेट’ नाटकामुळे जगभर प्रसिद्ध झालेला. पंधराव्या शतकात पहिल्यांदा बांधला गेलेला हा किल्ला उत्तर युरोपमधला रेनेसाँ काळातला एक महत्वाचा किल्ला मानला जातो. कोपनहेगनहून रेल्वेने हेलसिंगॉर स्टेशनला उतरून नकाशानुसार चालत क्रॉनबोर्गकडे निघालो होतो. सकाळी १०-११ वाजताची वेळ, छान हवा, छान ऊन, शांत रस्ते, आम्ही आरामात निघालो होतो. एका चौकात ट्रॅफिक सिग्नल होता म्हणून थांबलो होतो. इकडेतिकडे बघताना उजव्या हाताला एक लहानशी बाग दिसली. आत एक कारंजं होतं. त्यावरच्या तीन शिल्पांकडे लक्ष गेलं. तेवढ्यात पादचार्‍यांचा सिग्नल हिरवा झाला. परत येताना तिथे थांबून बघू अशी मनाशी नोंद करून पुढे झालो.

दिवसभर क्रॉनबोर्गमध्ये इतकं काही बघण्या-करण्यासारखं होतं, की त्यात या शिल्पांबद्दल विसरायलाच झालं. पण परत जाताना पुन्हा त्या चौकात थांबलोच आणि पुन्हा ती बाग आणि कारंजं दिसलंच. ती तीन शिल्पं म्हणजे तीन ‘बॅलेरिना’ आहेत- एल्मा, ग्रेथ आणि एमिली. तिघींनी गोल फेर धरलाय, तिघींचा एक-एक पाय हवेत, दुसरा अलगद जमिनीवर टेकवलेला. तिघी अगदी तल्लीन होऊन नृत्य करताहेत, त्यांच्यातली एकतानता आपल्याला बघताना जाणवते, तरी प्रत्येकीची स्वतःची अशी उत्फुल्लताही दिसते. कारंज्याच्या पाण्याकडे एकटक पाहत राहिलं तर त्या तिघी कारंज्याच्या ठेक्यावर नृत्य करताहेत, कारंजं थांबलं तर त्या सुद्धा थांबतील, असं वाटतं. त्यांच्या लयदार हालचाली कशा असतील त्याची आपण कल्पना करायची, त्या कल्पनेची पार्श्वभूमी जणू कारंज्यामुळे तयार होणारी. रुडॉल्फ टेग्नर या शिल्पकाराने १९१२-१३ साली हे शिल्प घडवलं.

आपण कितीही घाईगडबडीत असू, अशी अस्तब्ध स्थब्धता आपल्याला बांधून घालतेच. असं बांधून घेण्यासाठी आपण स्वतःला उपलब्ध करून देण्यात मजा असते. देशा-परदेशातल्या भटकंतीला जर आटापिटा म्हटलं तर हे बांधून घालणं त्या आट्यापिट्याचं सार्थक म्हणू शकतो.


Comments

Popular posts from this blog

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)