Posts

चार पायऱ्यांचा पर्वत

पेपरमध्ये एका ट्रेकची जाहिरात बघून तिचे डोळे एकदम चमकले. हातातला कॉफीचा कप तिनं ताबडतोब बाजूला ठेवला. डोक्यात भराभर विचारचक्रं फिरायला लागली... जायचं का? करू का फोन?... रविवारीच आहे, पहाटे उठून नवऱ्याचा आणि मुलाचा स्वयंपाक करून जाऊ... नवरा घरी असल्यामुळे मुलाचीही काळजी नाही... सगळी आखणी मनातल्यामनात झरझर तयार झाली आणि तिनं जाहिरातीत दिलेला नंबर फिरवला... "हॅलो, यूथ हॉस्टेल... " फोनमधून आवाज आला. 'अरे वा! लगेच लागला! ’ ती खूष झाली. तिनं चौकशी केली... प्रबळगड, कलावंतीण दुर्ग... माथेरानजवळ आहे म्हणे! तिचं भटकं मन लगेच माथेरानच्या आकाशात घिरट्या घालायला लागलं. "सकाळी सात वाजता पनवेल एस. टी. स्टँड वर जमायचं आहे" - पलिकडून पुढली माहिती आली. म्हणजे घरातून साडे-पाचला तरी निघायला हवं... त्यापूर्वी दोघांचा स्वयंपाक... बाप रे! म्हणजे चारला उठायला हवं... जमणार का?... स्वतःलाच विचारलेल्या या प्रश्नासरशी माथेरानच्या आकाशातून ती धाडकन जमिनीवर आली. "रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत परत येता येईल."... म्हणजे फार उशीर नाही होणारे... नावनोंदणीसाठी अजून चार दिवस हाताशी होते...

डॅनी बॉयलचं जगप्रसिध्द त्रिकूट...!

झोपडपट्टी, कुत्रा आणि गर्भश्रीमंत हे तीन शब्द कधी कुणी एकत्र म्हटले असते का? पण डॅनी अंकलनी ते तसे म्हटले। या तीन गोष्टींचा आपापसांत संबंध जोडायचाच झाला तर असा जोडावा लागेल की झोपडपट्टीच्या आसपास कुत्री असतात आणि गर्भश्रीमंतांकडेही (षौक म्हणून) कुत्री असतात। आता, ‘अ’ चा ‘ब’ शी संबंध असेल आणि ‘ब’ चा ‘क’ शी असेल तर ‘अ’ चा ‘क’ शी ही संबंध असतो असा बीजगणिताचा नियम आहे. आधीच गणित आणि त्यात वर बीजगणित - मग त्या नियमाला कोण आव्हान देणार? त्यापेक्षा तो नियम मुकाटपणे पाळलेला बरा. त्यामुळे ‘झो’, ‘कु’ आणि ‘ग’ यांना अ, ब, क च्या जागी (मुकाटपणे) substitute करून (substitution शिवाय बीजगणित म्हणजे भांडणांविना संसार, निवडणुकांविना भारत देश, आरत्यांविना गणेशोत्सव आणि कुत्र्यांविना - पुन्हा कुत्री! - दत्ताची तसबीर) - तर तसं substitute करून हे सिध्द होतं की झोपडपट्टी, कुत्रा आणि गर्भश्रीमंत यांचा आपापसांत (बीजगणिती) घनिष्ठ संबंध आहे. बीजगणिताच्याच अजून एका नियमानुसार कधी कधी अ, ब, क च्या जागी ३-३ गोष्टींचे अनेक गट चपखल बसू शकतात। उदाहरणार्थ मॅकडॉनल्ड्स, बर्गर आणि राजकीय पक्ष। मॅकडॉनल्ड्सचा बर्गर जगप्रसि...

कोण ही ’टवळी’... ??

(या लेखात कुठलेही राजकीय भाष्य करण्याचा हेतू नाही। तसंच कुठल्याही (एकाच) राजकीय मतप्रवाहाला पाठिंबा देण्याचाही हेतू नाही. आमच्याच नात्यात माझ्या जन्मापूर्वी घडलेला (मी माझ्या आजीकडून ऐकलेला) हा एक प्रसंग आहे. तो सर्वांना सांगावासा वाटला इतकंच. काळ-वेळाचे संदर्भ थोडे पुढे-मागे झाले असल्यास कृपया वाचकांनी सांभाळून घ्यावे ही विनंती.) तो १९५० किंवा फार फार तर १९६० च्या दशकाचा काळ असावा। स्वातंत्र्यानंतरचा सुवर्णकाळ म्हणून हा काळ ओळखला जातो। पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांची भाषणं, देशांतर्गत-आंतरराष्ट्रीय दौरे यांना जोरदार प्रसिध्दी मिळत असे. देशातल्या जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रांतून झळकणारी त्यांची छबी ही तेव्हा अनेकांना आश्वासक, स्वतंत्र भारताच्या भरारीच्या स्वप्नांची मूर्तरूप वाटत असणार.पण एका विशिष्ट राजकीय मतप्रवाहाची मंडळी मात्र आतून अजूनही धुमसत होती. स्वातंत्र्य तर मिळालं होतं पण त्याच्यासोबत समाधान होतंच असं खात्रीशीर सांगता येत नव्हतं; कुठेतरी, काहीतरी चुकतंय अशी भावना होती. स्वातंत्र्य मिळलं तरी ते ज्या पध्दतीनं मिळलं, त्यासाठी जी ’किंमत’ मोजावी ल...

मतदान आणि आनंदाश्रू

मी सुयश काटकर. एफ. वाय. बी. एस्स. सी. मागच्या आठवड्यात पेपरमध्ये एक छोटीशी बातमी वाचली - मुंबई अतिरेकी हल्यानंतरची एक उपाययोजना म्हणून गेट-वे च्या समुद्रातल्या सगळ्या होडी, बोटी हटवण्यात येणार आहेत म्हणे! का? तर अतिरेकी समुद्रातून आले म्हणून! यडचाप आहेत का हे राजकारणी, पोलीस? बोटी हटवणार काय... त्याच नियमानं मग लोकलगाड्यांत बॉंबस्फोट होतात म्हणून लोकलगाड्या बंद करा किंवा WTC वर विमानं धडकली म्हणून अमेरिकेतली विमानं बंद करा! अरे, काय हे! इनको कोई लेके जाओ या ऽ ऽ र! बोटी बंद केल्या तर मग लोकांनी एलिफंटा केव्हज पहायला जायचं कसं? तो तुमचा सांस्कृतिक ठेवा की काय आहे ना? अरे, साधा विचार करा... बोटी बंद झाल्या, एलिफंटाची वर्दळ कमी झाली की हेच अतिरेकी एक दिवस तिथेही आपला अड्डा बनवतील! आणि उद्या, म्हणे, समुद्रात तुम्ही शिवाजीमहाराजांचं भव्य वगैरे स्मारक उभारणार आहात! मग तिथेही लोकांनी कसं जावं असं तुमचं म्हणणं आहे? पोहत की उडत? कॉलेज कॅंटीनमध्ये सगळ्यांना ही बातमी सांगितली. ते ऐकून सम्या लगेच उठला आणि म्हणाला, "चला, बिना बोटींचा गेट-वे चा समुद्र कसा दिसतो ते बघून येऊ"! हा सम्या सुद्...

सुजी, की आणि जागतिक बदलाचे वारे

मी सुजाता काटकर। इ. ९ वी. सध्या आमच्या वर्गात वार्षिक परिक्षेनिमित्त निबंधलेखनाचा सराव चालू आहे। तसा प्रत्येक विषयाचा काही ना काही सराव चालूच आहे. तरी गणितं किंवा सायन्सचं जर्नल त्यातल्या त्यात बरं असतं - म्हणजे पुस्तकातून तश्या प्रकारची गणितं पहायची आणि ती पाहून ही सोडवायची. सायन्सच्या जर्नलमधल्या आकृत्या वगैरे तर सरळ सरळ पुस्तकातून कॉपी करायच्या असतात. पण भूगोलाचे नकाशे किंवा निबंध आला की वाट लागते. निबंधाला तर फुल्ल आपापलंच डोकं चालवावं लागतं. गेला आठवडाभर त्या बराक ओबामाच्या शपथविधीनं आणि निबंधानं डोकं पकवलं. वीस लाख लोक जमले होते म्हणे त्या शपथविधीच्या जागी! दुसऱ्या दिवशी एक फॉरवर्डेड मेल आली होती, ती दादा दाखवत होता बाबांना - त्या गर्दीत एक माणूस ’ARREST BUSH’ असा फलक घेऊन उभा आहे असा एक फोटो होता. (असल्या काही मेल्स आल्या की दादा अगदी लगेच शिष्ठासारखा बाबांना बोलावून दाखवतो. मला मात्र तेव्हा कॉंप्युटरच्या आसपासही फिरकू देत नाही!) तरी त्यादिवशी मी त्यांच्या मागे उभं राहून पाहिलीच ती मेल. तो फोटो आणि तो फलक पाहून दादा एकदम खूप एक्साईट झाल्याचं दाखवत होता... उगीच! (मुंबईवर अतिरे...

अश्वेत राष्ट्राध्यक्ष आणि अश्वेत टी. व्ही. स्क्रीन!

मी कीर्ती सुपुत्रे. इ. ९ वी. सध्या आमच्या वर्गात वार्षिक परीक्षेसाठी निबंधलेखनाचा सराव चालू आहे. आमच्या बाई म्हणतात की "नेहमीच्या ’दूरदर्शन : शाप की वरदान’, ’फलाटाचे आत्मवृत्त’, ’जिचे हाती पाळण्याची दोरी... ’ यांसारख्या हमखास येणाऱ्या विषयांव्यतिरिक्त - (त्याला आम्ही मैत्रिणी ’हमखास भेडसावणारे विषय’ म्हणतो! ) - तर त्यांव्यतिरिक्त चालू घडामोडींपैकी एखाद्या विषयावर पण निबंध लिहिता आला पाहिजे. " आला पाहिजे तर आला पाहिजे! पण आजच्या ’चालू घडामोडी’ या परीक्षेच्या वेळेपर्यंत ’घडून गेलेल्या घडामोडी’ नाही का होणार? मग आता केलेल्या सरावाचा काय उपयोग तेव्हा? आणि परीक्षेच्या वेळी ज्या घडामोडी चालू असतील त्यावर तेव्हा बिनसरावाचा निबंध कसा काय लिहायचा? मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर बाईंनी आम्हाला "त्यासंदर्भात एकतरी निबंध येणारच" असं ठामपणे सांगितलंय. "पुढचे काही दिवस रोजचा पेपर वाचा, अग्रलेख वाचा, त्या विषयाची तयारी करून ठेवा" असंही त्या सांगत असतात. पण रोजच्या पेपरमध्ये त्याविषयी जास्त काही माहिती मिळतच नाही. ’कसाब आमचा नाही’ आणि ’तुमच्या देशातले अतिरेकी तळ उद्ध्...

पु. ल. आणि आजकालची मुलं

स्त्री मासिकाच्या जुलै-२०१२च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला. ---------------------------------------------------- लहानपणी शाळेत असताना जून महिन्यात नवीन वर्षाची पाठ्यपुस्तकं आणली की त्यातलं मराठी (बालभारती)चं पुस्तक मी सगळ्यात आधी अधाश्यासारखं वाचून काढायचे। इयत्ता सातवी किंवा आठवीत मराठीच्या पुस्तकात ’परोपकारी गंपू’ असा एक धडा होता. तो मला वाचल्यावाचल्याच अतिशय आवडला होता. आमच्या सुदैवानं तेव्हा शाळा-शिक्षकही चांगले होते. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावरही बाई तो धडा केव्हा शिकवायला घेतील याची मी आतुरतेनं वाट पाहिल्याचं मला आजही चांगलं आठवतंय. ’पु. ल. देशपांडे’ या असामीशी ती माझी पहिली भेट होती. आमच्या अजून एका मोठ्या सुदैवानं त्या धड्याच्या सुरूवातीलाच कंसात एक टीप दिलेली होती की हा धडा पु. ल. देशपांडे लिखित ’व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातून घेतलेला आहे. वाचनालयातून ताबडतोब आणून तेही पुस्तक मी अधाश्यासारखं वाचून काढलं होतं... त्याच्या पुढच्याच वर्षी (बहुतेक इयत्ता नववीत) ’अपूर्वाई’ पुस्तकातला एक उतारा धडा म्हणून होता. सविस्तर उत्तरे लिहा, संदर्भासहित स्पष्टीकरण द्या, लेखकाचा दृष्टीक...