सुजी, की आणि जागतिक बदलाचे वारे

मी सुजाता काटकर। इ. ९ वी.
सध्या आमच्या वर्गात वार्षिक परिक्षेनिमित्त निबंधलेखनाचा सराव चालू आहे। तसा प्रत्येक विषयाचा काही ना काही सराव चालूच आहे. तरी गणितं किंवा सायन्सचं जर्नल त्यातल्या त्यात बरं असतं - म्हणजे पुस्तकातून तश्या प्रकारची गणितं पहायची आणि ती पाहून ही सोडवायची. सायन्सच्या जर्नलमधल्या आकृत्या वगैरे तर सरळ सरळ पुस्तकातून कॉपी करायच्या असतात. पण भूगोलाचे नकाशे किंवा निबंध आला की वाट लागते. निबंधाला तर फुल्ल आपापलंच डोकं चालवावं लागतं.

गेला आठवडाभर त्या बराक ओबामाच्या शपथविधीनं आणि निबंधानं डोकं पकवलं. वीस लाख लोक जमले होते म्हणे त्या शपथविधीच्या जागी! दुसऱ्या दिवशी एक फॉरवर्डेड मेल आली होती, ती दादा दाखवत होता बाबांना - त्या गर्दीत एक माणूस ’ARREST BUSH’ असा फलक घेऊन उभा आहे असा एक फोटो होता. (असल्या काही मेल्स आल्या की दादा अगदी लगेच शिष्ठासारखा बाबांना बोलावून दाखवतो. मला मात्र तेव्हा कॉंप्युटरच्या आसपासही फिरकू देत नाही!) तरी त्यादिवशी मी त्यांच्या मागे उभं राहून पाहिलीच ती मेल. तो फोटो आणि तो फलक पाहून दादा एकदम खूप एक्साईट झाल्याचं दाखवत होता... उगीच! (मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर पण तो आणि त्याचे कॉलेजमधले मित्रमैत्रिणी - मैत्रिणीच जास्त! - मारे अगदी तिथे मेणबत्त्या वगैरे लावायला गेले होते. मी रात्री अभ्यास करत असेन आणि एखादेवेळी लाईट गेले तर हा माझ्या टेबलवर नाही कधी आपणहून मेणबत्ती वगैरे आणून ठेवत! तिथे गेट-वे ला मात्र गेला होता शायनिंग मारायला...!)

पण एकंदरच गेले काही दिवस जरा जास्तच ’चालू घडामोडी’ चालू आहेत...

त्या अतिरेक्यांच्या म्होरक्यानं त्यांना सांगितलं असेल - जा, जाऊन मुंबईची चालू घडी मोडा। बॉंबस्फोट-बॉंबस्फोट तरी किती करायचे, माणूस शेवटी कंटाळणारच की! म्हणून या वेळी कराची ते मुंबई बदलाचे वारे समुद्रामार्गे वाहत आले! त्यावर जरा बदल म्हणून पोलिसांनी रायफल्स चालवल्या; रायफल्सना तो बदल मानवला नाही... त्या लगेच बंद पडल्या! न्यूज चॅनल्सवाल्यांनाही थोडा बदल मिळाला... गेट-वे समोरच्या रस्त्यावर लोळून-बिळून रिपोर्टिंग करायला मिळालं.
तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बदलले. जरा बदल म्हणून जॉर्ज बुश इराक-अफगाणिस्तानात गेले ’टा-टा’ करायला, तर त्यांच्यावर एका इराकी वार्ताहरानं आपले बूट भिरकावले. त्यालाही बदल हवाच होता. तोच तोच बुटांचा जोड वापरून तो कंटाळला होता. प्रेस कॉंफरन्सला जाता जाता वाटेत त्यानं नवे बूट घेतले. बुशसमोर बसल्या बसल्या तो ते घालत होता, जुने टाकून देताना वाटेत बुश आले त्याला तो तरी काय करणार?! त्या जुन्या बुटांनाही थोडा बदल मिळाला - नाहीतर ते कचऱ्यात किंवा भंगारवाल्याकडे गेले असते, आता मात्र ’एक्झिबीट नं. १’ म्हणून अजूनही ते अमेरिकन सैन्याच्या ताब्यात असतील! दर वेळी प्रेस कॉंफरन्समध्ये तीच तीच सरधोपट वाक्यं बोलून बुशनाही कंटाळा आला असणार, त्यांना हा बदलही बरा वाटला असेल! त्यांनी दोन्ही बुटांचे नेम मात्र काय चुकवलेत! ए-वन!
नवीन राष्ट्राध्यक्षांनी वीस लाख लोकांसमोर शपथ घेतली। "त्या वीस लाख लोकांचे चाळीस लाख बूटसुद्धा काढून घेतले असतील का गं तिथल्या कडक सुरक्षारक्षकांनी? " - ही ’की’ची शंका! ’की’ म्हणजे कीर्ती. हो, तीच; मला ’सुजी गधडी’ म्हणणारी! हा सगळा ’चालू घडामोडी आणि बदलाचे वारे’चा टाईमपास आम्हीच दोघी करत बसलो होतो एका ऑफ-पिरीयडला. अश्या वेळेला ’की’ला सॉल्लिड चेव चढतो. तिच्या मते ओबामांना शपथ देणाऱ्या सरन्यायाधीशांना मात्र काही बदल मिळाला नसेल बऱ्याच दिवसांत, म्हणूनच ते यावेळी शपथ देताना चुकले आणि ओबामांना पुन्हा शपथ घ्यावी लागली. दुसऱ्यांदा शपथ देण्यापूर्वी ते ओबामांना म्हणाले असतील - आधीची सुटली म्हण!!
"ए, बराक ओबामा हसल्यावर कस्सले हॅंडसम दिसतात ना! "... पुढच्या बेंचवरच्या प्रज्ञानं आता आपलं तोंड उघडलं। सायन्सचं जर्नल पूर्ण करता करता तिचे कान आमच्याकडेच होते. ’की’ला नवीन कोलीत मिळालं! ती लगेच म्हणाली, "ब्रेकिंग न्यूज : जागतिक बदलाचे वारे खरे प्रज्ञा देसाईंपासूनच सुरू झालेत. इतके दिवस त्यांना फरहान अख्तर आवडायचा; नुकत्याच त्या ओबामा फॅन क्लबमध्ये सामिल झालेल्या आहेत! " ते ऐकता ऐकता प्रज्ञानं जर्नलमध्ये ’Chemical Effects of Electric Current’ असं लिहायच्या ऐवजी ’Electric Effects of Chemical Current’ असं लिहिलं. दुसऱ्या दिवशी जर्नल तपासून परत आलं तेव्हा सायन्सच्या बाईंनी त्यात लाल पेनानं एक मोठा भोपळा आणि त्याच्या आत एक प्रश्नचिन्ह काढलेलं होतं! जर्नलमधला इतका साधा बदल सायन्सच्या बाईंना चालत नाही, मग जागतिक बदलाच्या वाऱ्यांना त्या कश्या तोंड देणार? त्यांना मराठीच्या बाईंकडे पाठवलं पाहिजे! निबंध लिहावा लागेल तेव्हा कळेल! मग त्याच्या पेक्षा Chemical Current परवडला असं वाटेल त्यांना...

"हा आपला सग्गळा टी। पी. निबंधात टाकला तर काय होईल गं? " मी ’की’ला विचारलं. तिला तर काय... प्रत्येक नवीन वाक्य हे एक नवीन कोलीतच असतं! तिचं उत्तर तयारच होतं - "तर काय होईल? सुजे, गधडे, मग जागतिक बदलाचे वारे बिरे विसर...! जागतिक बदलाचं एक वावटळ येईल वावटळ! मग प्रज्ञाच्या जर्नलवर हात ठेवून सरन्यायाधीश तिसऱ्यांदा शपथ घेतील, जॉर्ज बुश निबंधाच्या वह्या गोळा करून सायन्सच्या बाईंना देतील, त्यात Magnetic, Chemical कुठलाच करंट न दिसल्यानं त्या ओबामांना भोपळा देतील आणि ही वावटळ आपल्या घरात शिरू नये म्हणून दारं खिडक्या घट्टं लावून घेऊन मराठीच्या बाई घरात दडून बसतील!"
छे! ही की म्हणजे अशक्य मुलगी आहे! हिच्या तोंडाला कुलूप लावणारी ’की’ आधी शोधली पाहिजे मला...

--------------------------------------------------------

आज मंगळवार। गुरुवारी निबंधाच्या वह्या शाळेत द्यायच्या आहेत। आमच्या टी. पी. चा काही भाग निबंधात टाकायची कितीही इच्छा असली तरी ते शक्य नाहीये हे आम्हाला पक्कं ठाऊक आहे. त्यामुळे बुशच्या प्रेस कॉंफरन्ससारखी सरधोपट वाक्यं टाकण्याशिवाय पर्याय नाहीये! रफ वहीत निबंधाचे मुद्दे लिहून ठेवलेत. त्यांत ’९/११’, ’डोळ्यांत झणझणीत अंजन’, ’गुलामगिरीचं मानसिक जोखड’, ’स्वातंत्र्याचा खरा अर्थ’, ’संघर्षातून संपन्नतेकडे’, ’विकासाच्या दृष्टीनं’, ’प्रगतिपथावर वाटचाल’ असे नेहेमीचे यशस्वी शब्दप्रयोग वापरायचे की झाला निबंध तयार! हाय काय अन नाय काय!

कारण, जगभर कितीही बदलाचे वारे, वावटळी, झंझावात, वादळं - काहीही आलं तरी या शब्दांपर्यंत ते कधीही पोचू शकणार नाही...
...आणि सुजी आणि की ला निबंधात पंधरापैकी आठ-दहा मार्क्स मिळण्यापासून रोखू शकणार नाही...!!!

(लोकसत्ता डॉट कॉम वरील या लेखाची लिंक : http://www.loksatta.com/daily/20090312/viva01.htm)

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)