चार पायऱ्यांचा पर्वत

पेपरमध्ये एका ट्रेकची जाहिरात बघून तिचे डोळे एकदम चमकले. हातातला कॉफीचा कप तिनं ताबडतोब बाजूला ठेवला. डोक्यात भराभर विचारचक्रं फिरायला लागली... जायचं का? करू का फोन?... रविवारीच आहे, पहाटे उठून नवऱ्याचा आणि मुलाचा स्वयंपाक करून जाऊ... नवरा घरी असल्यामुळे मुलाचीही काळजी नाही... सगळी आखणी मनातल्यामनात झरझर तयार झाली आणि तिनं जाहिरातीत दिलेला नंबर फिरवला...
"हॅलो, यूथ हॉस्टेल... " फोनमधून आवाज आला.
'अरे वा! लगेच लागला! ’ ती खूष झाली.
तिनं चौकशी केली... प्रबळगड, कलावंतीण दुर्ग... माथेरानजवळ आहे म्हणे! तिचं भटकं मन लगेच माथेरानच्या आकाशात घिरट्या घालायला लागलं.
"सकाळी सात वाजता पनवेल एस. टी. स्टँड वर जमायचं आहे" - पलिकडून पुढली माहिती आली. म्हणजे घरातून साडे-पाचला तरी निघायला हवं... त्यापूर्वी दोघांचा स्वयंपाक... बाप रे! म्हणजे चारला उठायला हवं... जमणार का?... स्वतःलाच विचारलेल्या या प्रश्नासरशी माथेरानच्या आकाशातून ती धाडकन जमिनीवर आली.
"रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत परत येता येईल."... म्हणजे फार उशीर नाही होणारे...
नावनोंदणीसाठी अजून चार दिवस हाताशी होते. तिनं ट्रेकची सगळी माहिती विचारून फोन ठेवून दिला... खात्रीशीर काहीही न ठरवता.
चला, फोन केला, सुरूवात तर झाली होती... आता तिला पुढची ‘जमेल ना आपल्याला... इतक्या वर्षांनंतर?? ’ ची पायरी चढायची होती...

लहानपणापासूनच तिला भटकंतीची प्रचंड आवड होती. प्रवासाची, नवनवी ठिकाणं-माणसं जाणून घ्यायची सुरूवातीपासूनच हौस... शाळा-कॉलेजमधले मित्रमैत्रिणी किंवा घरातले तिच्यासारखेच काही भटके नातेवाईक यांच्यासोबतच्या ट्रेकच्या, सहलींच्या कितीतरी आठवणी... प्रत्येकवेळच्या आठवणींची आपापली खासीयत होती. सहलींचं ठिकाण तसं तिच्या दृष्टीनं नेहेमी दुय्यम असायचं. कारण जाऊ तिथे नवीन आनंददायी काहीतरी गवसतंच यावर तिचा ठाम विश्वास होता. जाणं महत्त्वाचं आणि रोजची चाकोरी विसरून सर्वांनी एकत्र मिळून धमाल करणं त्याहूनही महत्त्वाचं. पण हा ट्रेक म्हणजे... माणसं फारशी माहितीतली नव्हती... अगदीच अनोळखीही नव्हती म्हणा! तिचा मुलगा याच ग्रुपबरोबर मागच्या वर्षी ट्रेकला जाऊन आलेला होता... त्यामुळेच तर फोन करायचा श्रीगणेशा इतक्या पटकन झाला होता.

‘जमेल ना? ’ ची पायरी मात्र लवकर सुटेना. लग्नापूर्वी भरपूर भटकलो असलो म्हणून काय झालं... ती झाली पंधरा-वीस वर्षांपूर्वीची गोष्ट! लग्नानंतर मात्र तिचे असे ट्रेक्स झालेच नव्हते. मुलगा लहान... जायचं तर त्याला कुठे ठेवायचं हा प्रश्न ‘आ’ वासून उभा असायचा... आता मुलगा मोठा होता, बऱ्यापैकी स्वावलंबी होता... आता त्या प्रश्नानं तोंड उघडायचंही कारण नव्हतं...
आता न जाण्याला खरं म्हणजे कुठलंच कारण नव्हतं! पण म्हणूनच निर्णय पटकन होत नव्हता. वीस वर्षं झाकून ठेवलेली सव्वा लाखांची मूठ उघडायची का आता?... पण दिवसभर भटकंती, ऊन, गड चढायचा, आपलं सामान आपणच सांभाळायचं... जमेल ना? तीन चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर सचिन तेंडुलकरसुद्धा आधी सराव सामने खेळतो आणि मगच कसोटी क्रिकेटला उभा राहतो. वीस वर्षांच्या खंडानंतर आपल्याला तर किती सराव करावा लागेल... रोजचे चार जिने चढणं वेगळं आणि गड चढणं वेगळं... लिफ्टमुळे ते जिनेही क्वचितच चढले जायचे! जिने‘च’ चढायचा अनेकदा केलेला निर्धार समोर लिफ्ट दिसल्यावर ढासळायचा. ’ठरवल्यासरशी चार जिने नाही चढू शकत आपण नियमित आणि म्हणे गड चढणार!! ’... तिच्या डोक्यात आता वादविवाद स्पर्धा अगदी रंगात आली होती. कॉलेजमध्ये असताना केलेली भटकंती, ट्रेक्स आठवता आठवता कपातल्या कॉफीची कोल्ड कॉफी झाली होती!

पुढच्या चार दिवसांतले दोन दिवस अश्याच विचारांत तिनं घालवले. जावं की नाही, जावं की नाही? लवकर उत्तर मिळत नव्हतं. पण भटकण्याची ऊर्मीही स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी तिनं पैसे भरून ट्रेकसाठी नावनोंदणी केलीच... ‘पुनःश्च हरी ॐ’ कधीतरी करायलाच हवं होतं...
पुढचे पंधरा दिवस ती त्याच नादात होती। मनातल्या मनात रोज एकदातरी तो न पाहिलेला प्रबळगड चढून उतरायची. या निमित्तानं कोपऱ्यात धूळ खात पडलेले तिचे स्पोर्टस शूज बाहेर निघाले, जरा स्वच्छ धुतले गेले. दिवसभर पाठीवर वागवता येईल अशी एक सॅक तिनं माळ्यावरून शोधून काढली. एकीकडे, जाताना बरोबर काय काय न्यायचं, घरातल्या दोघा खादाडांसाठी काय काय करून ठेवायचं याचा विचार सुरूच होता. लग्नापूर्वी हे झंझट नव्हतं. घरकामात लक्ष कमी म्हणून आई आधी चिडायची पण जाताना काय-काय छानछान पदार्थ करून द्यायची बरोबर! आता मात्र आपणच करा आणि आपणच खा! शिवाय दोन दिवस आधीपासून त्याची तयारी... ‘एक दिवसभर एकटीनं बाहेर जायचं तर किती कटकटी... मग नको जाऊस ना... नाही पण मला जायचंय... मग कर सहन त्या सगळ्या कटकटी! ’ - तिचं नेहेमीचं स्वगत सुरू झालं. मध्ये मध्ये तोंडी लावायला "आई, तू खरंचच जाणारेस ट्रेकिंगला? " ही मुलाची रेकॉर्ड - ‘खरंच’ला वर अजून एक ‘च’ जोडून!... "जमणारे का गड चढायला? रोज चार-सहा मजले चढायची प्रॅक्टीस कर" ही नवऱ्याची ना धड इशारा, ना धड चेष्टा अशी सूचना... या सगळ्यांत तिनं ‘जमेल का? ’च्या पायरीवरून ’जमेल, जमेल’ च्या तिसऱ्या पायरीवर कसंबसं पाऊल ठेवलं होतं. अर्थात, मन अजून साशंक होतंच. स्वतःबद्दलच खात्री देता येत नव्हती आणि ही वेळ तिनंच स्वतःवर ओढवून घेतली होती. इतकी वर्षं स्वतःच्या आवडीनिवडींकडे का आपण दुर्लक्ष केलं इतकं? - अजून एक वादविवाद स्पर्धा...! पण आता हा ट्रेक पार पडेपर्यंत तरी निदान त्या निघून गेलेल्या वर्षांचा विचार करायचा नाही असं तिनं मनाशी पक्कं ठरवून टाकलं.

... आणि तो रविवार उजाडला. आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी तिनं सगळी तयारी करून ठेवली, चारचा गजर लावला आणि ती आडवी झाली. पण चारला जाग येईल की नाही या विचारानं कितीतरी वेळ तिला झोपच लागेना! आता हे काय नवीन? ती स्वतःवरच वैतागली. आधीच पहाटे उठायचं म्हणजे तिला नेहेमीच संकट वाटायचं... ‘बाप रे, जमेल ना’ची सुरूवात या पहाटे उठण्याच्या विचारानं तर झाली होती...
रात्रीचा एक वाजून गेला... ‘आता तर शक्यच नाही जाग येणं, अजूनही वेळ गेलेली नाही, जाणं रद्द करावं का? ’ अश्या विचारांतच दोननंतर कधीतरी तिचा डोळा लागला...
चार वाजता गजरानं आपलं कर्तव्य इमादारीत बजावलं... तिनं तो गजर झोपेतच बंद करून टाकायचं आपलं कामही इमानदारीत केलं!

... ती एकदम खडबडून जागी झाली तेव्हा पाच वाजून गेले होते! ती स्वतःवरच पुन्हा एकदा वैतागली. नकटीच्या लग्नाला येणार नाहीत इतकी विघ्नं तिच्या ट्रेकींगला येऊ पाहत होती! तरी, बरोबर न्यायचे खाद्यपदार्थ आदल्या रात्रीच करून ठेवल्याबद्दल तिनं स्वतःचीच पाठ थोपटली. गड चढायला जमेल की नाही याची खात्री नसली तरी पहाटे असा काहीतरी गोंधळ होणार याची बहुधा तिला पक्की खात्री होती!
कसंबसं साडेपाचला घर सोडलं आणि कशीबशी ती सहाची एस. टी. मिळाली.
तासाभराच्या एस. टी. च्या प्रवासात मात्र ती स्वतःवरच तुडुंब खूष होती. शेवटी एकदाचं आपण बाहेर पडलो तर!... तिला अजून खरंच वाटत नव्हतं. बस लागते म्हणून ती बहुतेकवेळा बसचा प्रवास टाळायची, पण त्यादिवशी नाही! आपल्याला बस लागते, खूप उकाडा आहे, गर्दी आहे या गोष्टी तिला त्यादिवशी जाणवल्याही नाहीत!...
विश्रांतीनंतरच्या सराव सामन्यासाठी तैय्यार झालेल्या सचिन तेंडुलकरसारखी ती आता दोन्ही पाय घट्ट रोवून ‘जमेल, जमेल’च्या तिसऱ्या पायरीवर उभी होती!

पनवेल एस. टी. स्टॅंडवर ठरलेल्या ठिकाणी ट्रेकमधले इतर काहीजण आधीच जमलेले होते. तिनं सगळ्यांकडे एकेकदा नजर टाकली... सगळे तिच्यापेक्षा वयानं लहान, तरूण होते. ‘बाप रे! जमेल ना आपल्याला यांच्या वेगाशी जुळवून घ्यायला? ’... हरदासाची कथा पुन्हा मूळपदावर आली. पण आता परत फिरणंही अशक्य होतं. ‘जमेल ना’ काय... ’जमणारच! ’... तिच्या नकळत ती अजून एक पायरी चढली.
त्यानंतर पाऊणएक तासात सर्वजण गडाच्या पायथ्यापाशी पोचले. गृप-लीडरनं प्रबळगडाची थोडक्यात माहिती दिली. वर उंचावर दिसणारी प्रबळमाची हा पहिला थांबा होता.
‘इतक्या उंचावर आणि म्हणे पहिला थांबा! ’ ती स्वतःशीच म्हणाली.
नंतर तिथून वर डावीकडे दिसणाऱ्या कलावंतिणीच्या सुळक्यावर चढाई करायची होती. एखाद्या कलावंतानं कोरीव काम करून काढल्यासारखा मुख्य गडापासून तो सुळका वेगळा दिसतो म्हणून त्याचं ते नाव.
इथून दिसणारी उंची फसवी आहे, प्रत्यक्षात गड खूप उंच आहे, दम राखून ठेवा - लीडरनं परत परत सगळ्यांना बजावलं आणि सर्वांनी चालायला सुरूवात केली. एव्हाना थोड्या-फार ओळखी झाल्या होत्या. इतरांप्रमाणेच तिनं जुजबी गप्पा मारत मार्गक्रमणेला सुरुवात केली. उत्साहात थोडे फोटो-बिटो काढले. चढ सुरू झाला तसं मात्र इतक्या वर्षांतल्या तिच्यातल्या गृहिणीपणानं आपले रंग दाखवायला सुरूवात केली. हे तिला अनपेक्षित होतं.
‘इतक्या लवकर आपल्याला दम लागला? पहिल्याच सराव सामन्यात सचिन तेंडुलकर शून्यावर आऊट झाला? कसं शक्य आहे? आता वर पोचेपर्यंत राखून काय ठेवणार? डोंबल!... नाही, नाही! आत्ता गप्पा मारत मारत चढलो म्हणून असेल... आता तोंड बंद! आता श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवायचं’... तिनं (बहुतेक) स्वतःचीच समजूत काढली.
पण हा निश्चयही पुढच्या पंधरा मिनिटांतच गळून पडला. थोडं चढून गेलं की असा दम लागायचा की विचारता सोय नाही. फुफ्फुसं लगेच असहकार आंदोलन सुरू करायची. धपापणारं हृदय छातीचा पिंजरा तोडून कुठल्याही क्षणी बाहेर उडी मारेल असं वाटायचं. स्वतःची ही अवस्था पाहून तिला नाही म्हटलं तरी थोडा धक्काच बसला. वीस वर्षांत स्टॅमिनातला थोडफार फरक तिनं गृहित धरलेला होता. पण इतका...?? हे म्हणजे पैज लावायची पन्नास जिलब्या खाण्याची आणि दुसऱ्या जिलबीलाच पाणी मागायचं असं झालं!
दम खायला थोडं थांबलं की पाच मिनिटांत पठ्ठी पुन्हा टुणटुणीत होऊन काही झालंच नाही अश्या थाटात चालायला लागायची. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या! डोळ्यांसमोर काजवे, चांदण्या, लिफ्ट, (न चढलेले)जिने, नवरा, मुलगा, (मध्येच सोडून दिलेली) योगासनं - सगळे आळीपाळीनं फेर धरून नाचायला लागायचे. तिची ही अवस्था पाहून असेल कदाचित पण लीडर तिच्यापुढे हाकेचं अंतर राखून चालत होता. त्यातल्यात्यात नशीब म्हणजे डिसेंबरचा महिना असल्यामुळे डोंगरावरची हवा आल्हाददायक होती. वाऱ्याची सततची मंद झुळूक काम अर्धा टक्का का होईना हलकं करत होती. बरोबरचे बाकी सगळे पुढे निघून गेलेले होते. लांबून मध्येच कुणी दृष्टीस पडायचं, मध्येच कुणाचा आवाज कानावर पडायचा. ‘माझ्यासाठी जरा थांबा’ असं शक्यतो कुणाला सांगायचं नाही असं तिनं ठरवलं होतं पण मनोमन तिची पक्की खात्री झाली होती की पुढच्या वेळी पेपरमध्ये ट्रेकची जाहिरात देताना हे लोक नक्की त्यात वयोगटाचा उल्लेख करणार. पुढच्या वेळच्या त्यांच्या जाहिरातीत पस्तिशीपुढच्या लोकांनी, विशेषतः गृहिणींनी चौकशीकरताही फोन करू नये असं वाक्य नक्की पहायला मिळेल... त्या तश्या अवस्थेतही आपल्याला विनोद सुचताहेत हे पाहून तिचं तिलाच जरा बरं वाटलं.

हपापत, घामानं निथळत... घशाला कोरड पडलेली, पाय भरून आलेले - अश्या अवस्थेत पुढचा तास-दीड तास तिनं अक्षरशः किल्ला लढवला! म्हणे सव्वा लाखाची झाकलेली मूठ; आता तिच्यात सव्वा रुपया तरी शाबूत होता की नाही कोण जाणे! पुढे गेलेले वाटेत थोडे थांबलेले दिसले की तिला तात्पुरता उत्साह यायचा. पण ती त्या जागी पोचेपर्यंत त्यांची विश्रांती झालेली असायची आणि ते उठून चालायला लागायचे!
माचीच्या थोडं अलिकडे एका पडक्या चौथऱ्याजवळ सावलीत सर्वजण पुन्हा एकदा थांबले. डिसेंबरचा महिना असला तरी दुपारचा बाराचा सूर्य आपलं काम करतच होता. कुणीतरी लीडरला विचारलं, "अजून पोचायला किती वेळ लागेल? "
"ते या मॅडमवर अवलंबून आहे." लीडरनं तिच्याकडे बोट दाखवत चेष्टेत उत्तर दिलं.
पण तिला त्याचा राग नाही आला. तेवढी खिलाडू वृत्ती तिच्यात होती. आणि तसंही, तो खरं तेच बोलत होता की! वीस वर्षांनंतर आपलं हे असं होणार आहे याची तिला तरी कुठे कल्पना होती! जुने दिवस आठवत, उसनं अवसान आणत तिनं पुन्हा सर्वांच्या मागून चालायला सुरूवात केली...

माचीवर पोचल्यावर आदिवासींच्या दहा-पाच झोपड्या दृष्टीस पडल्या. एका झोपडीसमोर चांगलं मोठं सारवलेलं अंगण दिसलं. सगळेजण तिथेच थोडे विसावले. थंडगार पाण्यानं हात-तोंड धुवून जरा वेळ बसल्यावर तिलाही बरं वाटलं. सिंहगडावर एकदा ती गृपमध्ये पैज लावून पहिल्या तीनजणांत वरपर्यंत पोचली होती. देवटाक्याचं थंडगार पाणी पिताना मागून दमत भागत चढणाऱ्यांना ’लवकर या, लवकर या’ म्हणून बोलावत होती. आजही त्या आदिवासी झोपडीबाहेरच्या माठातलं पाणी तसंच थंडगार होतं पण ते पिणाऱ्यांमध्ये ती शेवटच्या तीनांत होती!
साधारण अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा सगळे उठले... अजून सुळक्यावरची चढाई शिल्लकच होती. तिच्या अवसानानं मात्र आता उधार-उसनवारी बंद केली. पुन्हा एकदा ‘जाऊ की नको, जाऊ की नको’ची एक मिनी-वादविवाद स्पर्धा डोक्यात सुरू झाली. भटकंतीची आवड आणि मनाचा निर्धार एवढ्या भांडवलावर ती इथपर्यंत तर येऊन पोचली होती. पण पुढच्या प्रवासाला ते भांडवल पुरेसं पडेलच याची खात्री नव्हती. शिवाय आत्तापर्यंतच्या चढाईपेक्षा पुढची वाट जास्त बिकट आहे हे डोळ्यांना स्वच्छ दिसत होतं. लीडरसकट सगळे तिला पुढे चलण्याचा आग्रह करत होते. तिला एकदम तिचा कोणे एके काळचा रायगड-ट्रेक आठवला. गड चढून गेल्यावर पुढे लांबवर दिसणाऱ्या टकमक टोकाकडे जायला तीच आधी सरसावली होती... इतरांना चलण्याचा आग्रह करत होती! पण त्यादिवशी मात्र - कुणाच्या आग्रहाला बळी न पडता - तिनं न जाण्याचं ठरवलं. तिच्या या निर्णयाचा तिला अजिबात धक्का बसला नाही. वीस वर्षांच्या खंडानंतर ’जायचं का?, जमेल ना?, जमेल-जमेल.., जमणारच! ’ या चार पायऱ्यांचं गिर्यारोहण तिनं निर्धारानं पूर्ण केलं होतं...

शिवाय अजून एक निश्चय आता तिच्या मनाशी पक्का झाला होता... घरी परतल्यावर दुसऱ्या दिवसापासून लिफ्ट न वापरण्याचा, जिने आणि फक्त जिनेच चढण्याचा...

तिच्या या निश्चयाचा मात्र तिला स्वतःलाच आश्चर्यकारक धक्का बसला होता...!!

Comments

Anonymous said…
मस्त लिहिलंय. तुमचा ब्लॉग आवडला.
"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-सभा ६/७ जून २००९ मध्ये होऊ घातली आहे. अधिक माहिती http://marathi-e-sabha.blogspot.com/ येथे मिळेल. सहभागी होण्याची इच्छा असल्यास shabdabandha@gmail.com येथे लवकरात लवकर कळवा. अधिकाधिक लोकांनी यात सहभागी व्हावं ही इच्छा.
HAREKRISHNAJI said…
सिध्दगडाच्या कुशीत असलेल्या वीर कोतवाल स्मारकाकडे अप्रतिम धबधबा आहे व वाटेवर सुरेख तलाव आहे, आपण तेथे गेल्या आहात काय ?
हेरंब said…
अम्मेझिंग !! सॉलिड आहे हा लेख. एवढा जुना लेख वाचायला मिळाला याबद्दल खरं तर बझचे आभार !!
हरेकृष्णजी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी सिध्दगडावर गेलेले नाही.

हेरंब,
काल गोरखगडाची पोस्ट टाकल्यावर मला जाणवलं की या लेखालाही ’दुर्गभ्रमण’ हे लेबल जोडलं पाहीजे. ते केल्यावर हा लेख बझवर आलेला दिसतोय. :)
HAREKRISHNAJI said…
पावसाळ्यात जरुर जा , अगदी वीर कोतवाल स्मारकापर्यंत गाडी जाते. मस्त धबधबा तेथेच आहे. फारसी गर्दी नसते

Popular posts from this blog

दंगल

तूऽऽ मेनी पीपल्स!!

अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज - पिंडात ब्रह्मांड !!