कोण ही ’टवळी’... ??

(या लेखात कुठलेही राजकीय भाष्य करण्याचा हेतू नाही। तसंच कुठल्याही (एकाच) राजकीय मतप्रवाहाला पाठिंबा देण्याचाही हेतू नाही. आमच्याच नात्यात माझ्या जन्मापूर्वी घडलेला (मी माझ्या आजीकडून ऐकलेला) हा एक प्रसंग आहे. तो सर्वांना सांगावासा वाटला इतकंच. काळ-वेळाचे संदर्भ थोडे पुढे-मागे झाले असल्यास कृपया वाचकांनी सांभाळून घ्यावे ही विनंती.)

तो १९५० किंवा फार फार तर १९६० च्या दशकाचा काळ असावा। स्वातंत्र्यानंतरचा सुवर्णकाळ म्हणून हा काळ ओळखला जातो। पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांची भाषणं, देशांतर्गत-आंतरराष्ट्रीय दौरे यांना जोरदार प्रसिध्दी मिळत असे. देशातल्या जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रांतून झळकणारी त्यांची छबी ही तेव्हा अनेकांना आश्वासक, स्वतंत्र भारताच्या भरारीच्या स्वप्नांची मूर्तरूप वाटत असणार.पण एका विशिष्ट राजकीय मतप्रवाहाची मंडळी मात्र आतून अजूनही धुमसत होती. स्वातंत्र्य तर मिळालं होतं पण त्याच्यासोबत समाधान होतंच असं खात्रीशीर सांगता येत नव्हतं; कुठेतरी, काहीतरी चुकतंय अशी भावना होती. स्वातंत्र्य मिळलं तरी ते ज्या पध्दतीनं मिळलं, त्यासाठी जी ’किंमत’ मोजावी लागली त्याचा संताप या मंडळींच्या मनात अजूनही खदखदत होता. त्यांत प्रामुख्यानं तथाकथित उच्चवर्णीय सुशिक्षित/उच्चशिक्षित लोकांचा समावेश होता.तश्यातच गेले काही दिवस नेहरूंसोबत सावलीसारखी वावरणारी त्यांची कन्या इंदिरा - हिचेही फोटो वर्तमानपत्रांत झळकायला लागले होते. नेहरूंची ती अघोषित वारसदार पाहून अनेक भुवया उंचावल्या होत्या. नेहरूंच्या सार्वजनिक जीवनातला इंदिराचा वाढता प्रभाव या मंडळींना जास्तच खुपायला लागला होता. देशातल्या बहुसंख्य अडाणी जनतेनं निवडून दिलेल्या जवाहरलालना आणि त्यांच्या मुलीला केवळ ते नेहरू आहेत म्हणून इतकं डोक्यावर घ्यायचं??...नेहरू घराणं आणि एकंदरच सत्तारूढ पक्षाबद्दल वाटणारी चीड, द्वेष, संताप (आणि थोड्या प्रमाणात असूया देखील), नुसतं बघत बसणे आणि प्रभातफेऱ्या काढणे या पलिकडे आपण काहीच करू शकत नाही याचा वाटणारा खेद - या सगळ्याचा घरगुती पातळीवरचा का होईना पण पुण्याच्या अरण्येश्वरी एका घरात स्फोट झाला.
नव्वदीच्या आसपासचे त्या घरातले आजोबा रोजच्याप्रमाणे आन्हिकं उरकून अंगणात मस्तपैकी ’केसरी’ घेऊन बसले। केसरीच्या पहिल्याच पानावर असाच एक जवाहरलाल नेहरू-इंदिरा यांचा एका सार्वजनिक कार्यक्रमातला मोठा फोटो छापलेला होता. सकाळी सकाळी त्या दोन चेहेऱ्यांचं दर्शन घडल्यामुळे त्या पुणेरी संस्कृती नसांनसांत भिनलेल्या आणि टिळकांना आदरस्थानी मानणाऱ्या आजोबांचं डोकंच तडकलं. तसेच अडखळत, चष्मा सावरत, खुर्चीचा आधार घेत ते उठले. काठी टेकत तरातरा घरात गेले. डुगडुगणारी मान, तोंडातल्या दातांचं ’ऑल डाऊन’ झालेलं, थरथरणाऱ्या डाव्या हातात केसरी पकडलेला आणि उजव्या हाताने इंदिराच्या फोटोकडे अंगुलीनिर्देश करत त्यांनी त्याहून थरथरणाऱ्या आवाजात गेल्या दशक-दीड दशकभरातली त्यांच्या पिढीची मळमळच जणू घरातल्यांना बोलून दाखवली - "या ऽ ऽ टवळीला ऽ ऽ घड्या ऽ ऽ ळ कशाला?"... कारण काय? तर फोटोत इंदिरानं मनगटावर घड्याळ घातलं होतं. जरी ती पंतप्रधानांच्या मागे विशिष्ट अंतर ठेवून होती तरी तिच्या हातात घड्याळ होतं, जरी डोक्यावरून पदर-बिदर घेतलेला असला तरी हातात चक्क घड्याळ होतं... !!

हा प्रसंग घडल्यानंतर कितीतरी वर्षांनी पु।लं.नी पुणेकरांची लक्षणं सांगितली होती - की पुणेरी शुध्द मराठी बोलीत ’दुसऱ्याला मिळालेला पैसा’ हा एक भाषा-वैशिष्ट्याचा नमुना समजला जातो. त्या फोटोतलं इंदिराच्या हातातलं ते घड्याळ म्हणजे तिला मिळत असलेली प्रसिध्दी, यश (आणि पैसा) यांचं द्योतक वाटलं त्या आजोबांना. (कदाचित तिच्या व्यक्तिमत्वाचा पडणारा प्रभावही त्यांना मनोमन पटला असेल.) पण तरी नजीकचा भूतकाळ आणि इतिहास त्यांना चवताळून प्रतिक्रिया द्यायला लावत होता.त्यांच्या त्या उद्वेगजनक वाक्यातला एक एक शब्द आपल्या सोबत काय काय बाळगून होता...!नेहरू घराणं आणि त्यांचा तो पक्ष केंद्रात सत्तेवर आहे यापेक्षा आपलं आणि आपल्या देशाचं दुसरं दुर्दैव ते काय - असं आजोबांचं स्पष्ट मत होतं. पंतप्रधान वडिलांच्या मागेमागे आत्ता माज करत फिरणारी ही ’एक बाई’!!... पण हीच एक दिवस सर्वांना पुरून उरणार हे त्यांना धडधडीत दिसत होतं. पण म्हणून तिनं असं उघड-उघड आव्हान द्यावं? आपल्या अधिकारांची अशी जाहीर गर्जना करावी? कोण लागून गेली ही? - ही सग्गळी चरफड एखादी इरसाल शिवी हासडून सहज व्यक्त करता आली असती. पण त्या आजोबांचा उच्चवर्णीय, पुणेरी सुसंस्कृतपणा त्यांना तसं करू देत नव्हता. पण म्हणून ते मागे हटले नाहीत. त्या काळी त्यांच्या पिढीत बऱ्यापैकी सर्वमान्य असलेला, एखाद्या इरसाल शिवीला आमोरासमोर टक्कर देणारा ’टवळी’ हा शब्द त्यांच्याजवळ होता. त्या शब्दवापरानं जे साधलं ते त्या इरसाल शिवीलाही जमलं नसतं! शिकरण-मटार उसळ हीच चैनीची परमावधी मानणाऱ्यांना ’सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या वडिलांच्या बरोबरीनं वावरणारी आणि त्यात वर अजून मनगटात घड्याळ घालणारी तरूण स्त्री’ ही म्हणजे चैनीची परम-परमावधी वाटली. शिवाय, तसलं एखादं घड्याळ आजोबांच्या स्वतःच्या घरातल्या लेकीसुनांपैकी एकीच्याही हातात नसणार, त्यांच्यासाठी ते घेण्याचा कधीकाळी केलेला विचार त्या घड्याळाची किंमत पाहून त्यांना सोडून द्यावा लागलेला असणार.’घड्याळ कशाला’ असं विचारताना आजोबांनी खरं म्हणजे इंदिराला मिळणाऱ्या प्रसिध्दीला मनोमन मंजुरी देऊन टाकली होती. फक्त ती प्रसिध्दी, यश, पैसा यांचं तिनं असं घड्याळ घालून जाहीर प्रदर्शन केल्याची त्यांना चीड आली होती.

... आजोबांच्या या अश्या चिडचिडीची घरच्यांना बहुदा सवय असावी। कारण त्यांपैकी कुणीच त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मनातली मळमळ बोलून दाखवल्यावर आजोबांचं डोकंही शांत झालं असावं... ते पुन्हा अंगणातल्या आपल्या खुर्चीवर जाऊन बसले आणि केसरी वाचायला लागले... नाहीतरी दररोज ते हेच तर करत होते ...

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)