अश्वेत राष्ट्राध्यक्ष आणि अश्वेत टी. व्ही. स्क्रीन!

मी कीर्ती सुपुत्रे. इ. ९ वी.
सध्या आमच्या वर्गात वार्षिक परीक्षेसाठी निबंधलेखनाचा सराव चालू आहे. आमच्या बाई म्हणतात की "नेहमीच्या ’दूरदर्शन : शाप की वरदान’, ’फलाटाचे आत्मवृत्त’, ’जिचे हाती पाळण्याची दोरी... ’ यांसारख्या हमखास येणाऱ्या विषयांव्यतिरिक्त - (त्याला आम्ही मैत्रिणी ’हमखास भेडसावणारे विषय’ म्हणतो! ) - तर त्यांव्यतिरिक्त चालू घडामोडींपैकी एखाद्या विषयावर पण निबंध लिहिता आला पाहिजे. " आला पाहिजे तर आला पाहिजे! पण आजच्या ’चालू घडामोडी’ या परीक्षेच्या वेळेपर्यंत ’घडून गेलेल्या घडामोडी’ नाही का होणार? मग आता केलेल्या सरावाचा काय उपयोग तेव्हा? आणि परीक्षेच्या वेळी ज्या घडामोडी चालू असतील त्यावर तेव्हा बिनसरावाचा निबंध कसा काय लिहायचा?
मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर बाईंनी आम्हाला "त्यासंदर्भात एकतरी निबंध येणारच" असं ठामपणे सांगितलंय. "पुढचे काही दिवस रोजचा पेपर वाचा, अग्रलेख वाचा, त्या विषयाची तयारी करून ठेवा" असंही त्या सांगत असतात. पण रोजच्या पेपरमध्ये त्याविषयी जास्त काही माहिती मिळतच नाही. ’कसाब आमचा नाही’ आणि ’तुमच्या देशातले अतिरेकी तळ उद्ध्वस्त करा’ या दोन वाक्यांवर आधारित दोन शॉर्ट-नोटस लिहिता येतील फारफार तर, पण एक आख्खा निबंध कसा काय लिहिणार? ’आदर्श निबंधमाला’ची मदत घेतलेलीही बाईंना चालत नाही. (मदत घेतलेलं त्यांना कळतं कसं कोण जाणे!)
तरीसुद्धा, कसंतरी करून मी तो निबंध तयार केला होता; या सोमवारी शाळेत दाखवायचा होता... इतक्यात काल बाईंनी शाळेत सगळ्यांना फर्मान सोडलं - अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी होतोय, त्या निमित्तानं ’जागतिक बदलाचे वारे’ हा अजून एक निबंध तयार करा!!
मला तर ते ऐकून खारे वारे, मतलई वारे, व्यापारी वारेच आठवले. म्हणजे, त्या वाऱ्यांमुळे नाही का जगातलं हवामान, पाऊस, पीक-पाणी यांत बदल घडतो... मग तेच जागतिक बदलाचे वारे! (मराठीच्या तासाला मला नेमका भूगोल आठवतो... आणि भूगोलाच्या तासाला नेमकी झोप येते!!)
हे खारे वारे वगैरे सगळं रफ वहीच्या मागच्या पानावर लिहून मी वही उजवीकडे सुजातासमोर सरकवली। ते वाचून तिला फुस्सकन हसू आलं, ते पाहून मलाही आलं. (माझा जोक वाचून तिची झोप गेली असं तिनं मला नंतर सांगितलं. ) त्या नादात बाईंची पुढली ४-५ वाक्यं कानांच्या स्टॉपवर न थांबता तशीच निघून गेली. "... पुढच्या गुरुवारी अतिरेकी हल्ला आणि बराक ओबामा दोन्ही निबंध लिहून आणा. " पुढलं फर्मान आलं. बोलता बोलता बाईंनी ’जागतिक बदलाचे वारे’च्या जागी ’बराक ओबामा’ टाकलं. ’शब्दसमूहाच्या जागी एक शब्द लिहा’ असतं ना, तसं!
’बाई काहीपण बोलतात. ब. ओ. = जा. ब. वारे का गं? ’ मी पुन्हा रफ वहीमार्फत सुजाताला विचारलं. तर तिचं डोकं भलतीकडेच निघालं होतं... वही तिच्याकडून परत आली तेव्हा माझ्या प्रश्नाखाली तिनं ’बराकीत बसलेला बारीक बराक बराच बेरकी, बरं का, बारक्या’ असलं काहीतरी लिहिलं होतं!! ही सुजी, गधडी, कुठे काय बोलावं हिला काहीही कळत नाही. हसू आवरायचं तरी कसं? बरं तर बरं, तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली.

आता पुढचा आठवडाभर हा शपथविधी आणि निबंध मानगुटीवर बसणार... ’शपथविधी’चा विग्रह कसा होईल बरं? शपथेसाठी करावा लागणारा विधी, शपथेवर करायचा विधी की शपथ आणि विधी? सगळे मध्यमपदलोपी समासच आहेत की! म्हणजे विग्रह चुकला तरी समासाच्या प्रकाराचा अर्धा मार्क नक्की मिळेल. (बाई म्हणतात - रोजच्या संवादांचा, शब्दांचा सुद्धा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून लगेच विचार करायचा.)
न्यूज चॅनल्सवर शपथविधीचं डायरेक्ट टेलीकास्ट पाहायचं ठरवलं। शपथविधी होता रात्री साडेदहा वाजता पण टी. व्ही. वाले संध्याकाळपासूनच दळत होते. ’ब्रेकिंग न्यूज : सेंट जॉर्ज चर्च जाएंगे ओबामा’; ’चर्चसे समारोह में जाएंगे ओबामा’; ’शपथ लेनेसे पहले चर्च पहुंचे ओबामा’ - या असल्या बातम्या ऐकून काय कप्पाळ लिहिणार निबंध! तरी दुपारी मी चक्क पेपर वाचला होता त्यामुळे ’ओबामा ४४वे राष्ट्राध्यक्ष आहेत; बास्केटबॉल चांगला खेळतात; ते जिथे शपथ घेणार आहेत त्या जागेला ’कॅपिटॉल हिल’ म्हणतात; ’१६००, पेनसिल्वानिया अव्हेन्यू’ हा (बहुतेक) त्या जागेचा पत्ता आहे’ इ. गोष्टी कळल्या होत्या. ’ओबामा हे एक चांगले वक्ते आहेत आणि जॉन फेव्हर्यू नावाचा एक माणूस नेहमी त्यांना त्यांची भाषणे लिहून देतो’ अशीही एक बातमी होती. किती छान ना! त्या जॉनला शाळेत निबंधलेखनात पैकीच्या पैकी मार्कस मिळत असणार!
मध्येच एका चॅनलवर ओबामांना घेऊन जाणारी काळी लिमोझीन दाखवली. लिमोझिनला दोन एक्झॉस्ट होते आणि त्यातून भकाभक धूर बाहेर पडत होता. (तिथे पी. यू. सी. चा नियम नाहीये वाटतं!) एकीकडे ब्रेकिंग न्यूजचा सपाटा सुरूच होता - ’पहले अश्वेत प्रेसिडैंट’ वगैरे! (यांना ’प्रेसिडेंट’साठी एक हिंदी शब्द नाही सापडला.) आम्ही तेवढं इतिहासाची प्रश्नोत्तरं लिहिताना ’वर्णभेदाविरुद्ध आंदोलन’, ’अब्राहम लिंकन’ वगैरे रट्टे मारायचे आणि इथे मात्र वर्णभेदाची धडधडीत ब्रेकिंग न्यूज!
रात्री ओबामांचं भाषण ऐकायचं ठरवलं. ते इंग्रजी भाषण कितपत कळेल शंकाच होती... पण एका चॅनलवर ते हिंदीत दाखवणार होते - तेच पाहायचं ठरवलं.
घाईघाईत शाळेचा, क्लासचा अभ्यास, जेवण सगळं १० च्या आत उरकलं आणि टी। व्ही. लावला... बघते तर काय - तो टी. व्ही. स्क्रीनच अश्वेत झाला होता! केबलवाल्याकडचे लाइट गेलेले होते!
कीर्ती मॅडम, अजून लिहा... निबंध! आता दुसऱ्या दिवशीचा पेपरही वाचावा लागणार होता त्यासाठी... सगळा वैताग नुसता!

तिकडे अमेरिकेत जागतिक बदलाचे वारे वाहून उपयोग काय? लाइट जातात आणि ते वाहणारे वारे इथपर्यंत ’थेट’ पोचतच नाहीत हे कळणार आहे का त्या पहिल्यावहिल्या ’अश्वेत’ राष्ट्राध्यक्षांना?

(लोकसत्ता डॉट कॉम वरील या लेखाची लिंक : http://www.loksatta.com/daily/20090312/viva01.htm)

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)