सेंट मार्क्स स्क्वेअर : एक जातिवंत ‘इतालियानो’ अनुभव


जर्मनीच्या नितांतसुंदर ब्लॅक-प्लॉरेस्टला टाटा करून, ऑस्ट्रियातल्या एका भोज्याला शिवून आता इटलीतल्या व्हेनिसकडे निघालो होतो, तिथला ‘सेंट मार्क्स स्क्वेअर’ पाहायला. व्हेनिस शहराबद्दल ‘कालव्यांचं शहर’ आणि ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या उल्लेखांपलिकडे कधीही काहीही ऐकलेलं नव्हतं. सेंट मार्क्स स्क्वेअरबद्दल तर प्रश्‍नच उद्भवत नव्हता. तरी, ‘व्हेनिससारख्या पुरातन शहरात जाऊन पाहायचं काय, तर एक चौक?’ ही होती माझी पहिली प्रतिक्रिया! चार रस्ते जिथे एकत्र येतात अशी जागा म्हणजे ‘चौक’ ही आपली व्याख्या त्याला कारणीभूत होती. पण पुढल्या काही तासांत मी माझ्यापुरती तरी ती व्याख्या सुधारून घेणार होते. 

मुंबईतल्या ‘मे’च्या उकाड्यातून आम्ही युरोपच्या थंडीत पाय ठेवल्याला दहा-बारा दिवस होऊन गेले होते. पैकी गेले पाच-सात दिवस तर आल्प्सच्या अंगणातच होतो. पण इटलीचा रस्ता पकडून जेमतेम तासभरही झाला नसेल तोवर आधीचा आठवडाभर क्षितिजावर सतत सोबत असणारी आल्प्सची शिखरं डोळ्यांसमोरून बघताबघता गायब झाली. त्याच्याच आगेमागे कुठेतरी आमची बस ऑस्ट्रियातून इटलीत शिरली होती. युरोपमध्ये फिरताना ही एक फार मजा होती. कधी या देशातून त्या देशात जायचो कळायचंच नाही. रस्त्यांवरच्या पाट्यांकडे अगदी बारकाईने लक्ष असेल तरच त्यातल्यात्यात काही कळण्याचा मार्ग होता.

एकदा इटलीत शिरल्याचं नक्की झाल्यावर मी उत्सुकतेपोटी मोबाईलवरचा नकाशा उघडला. आमच्या ‘लोकेशन’च्या प्रदेशातच एक मोठा पाणीसाठा दिसत होता. झूम-इन करून पाहिलं तर ‘एड्रिअ‍ॅटिक सी’. इंग्रजी कादंबर्‍यांमध्ये वगैरे बर्‍याचदा हे नाव वाचल्याचं आठवलं. व्हेनिस शहर म्हणजे वास्तविक या एड्रिअ‍ॅटिक समुद्रातला शंभराहून अधिक बेटांचा समूह आहे. बससारख्या वाहनाने व्हेनिसला जायचं तर समुद्रावरचा तीन-साडेतीन किलोमीटर लांबीचा ‘पोन्त देला लिबर्ता’ (स्वातंत्रपूल) हाच एकमेव पर्याय आहे. गाईडने हे सांगताच लगेच मनात पुढचा प्रश्‍न आला - कशापासून स्वातंत्र्य? तर मुसोलिनीच्या फॅसिस्ट राजवटीपासून!..... युरोपमध्ये भटकताना कळत नकळत दुसर्‍या महायुद्धाचे संदर्भ असे अंगावर येऊन आदळतातच. तो जर तुमच्या जिव्हाळ्याचा विषय असेल तर मग काही विचारायलाच नको. मग तुमचे सहप्रवासी एखाद्या सुंदर चर्चच्या मिनाराकडे माना वर करकरून पाहत असताना तुमचं लक्ष लांब कोपर्‍यातल्या एका छोट्याशा पाटीकडे लागून राहतं. ती पाटी इंग्रजीत आहे की स्थानिक भाषेत आहे हे जाऊन पाहणं तुम्हाला अधिक गरजेचं वाटायला लागतं. दुसर्‍या महायुद्धादरम्यान त्या भागात झालेल्या बाँबहल्ल्याबद्दल किंवा एखाद्या निकराच्या लढाईबद्दल त्या पाटीवर काहीतरी लिहिलेलं असू शकतं. ‘न जाणो पाटी इंग्रजीत असली आणि आपली वाचायची राहून गेली तर??’ - हा विचार तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही! त्या स्वातंत्र्यपुलाच्या बाबतीत ही शक्यता सुदैवाने नव्हती. आश्‍चर्याची बाब म्हणजे तो पूल मुसोलिनीच्या राजवटीतच बांधला गेला होता, त्यानेच त्याचं उद्घाटनही केलं होतं. सुरूवातीला पुलाचं नाव काहीतरी वेगळं होतं; मुसोलिनीच्या अंतानंतर त्याचं नव्याने नामकरण केलं गेलं. ही माहिती आमच्या खाती जमा होईपर्यंत बस पूल पार करून व्हेनिसमध्ये शिरली होती. 
पुढच्या दोन-चार मिनिटांत आम्ही समुद्रकिनार्‍यावर एका छोट्याशा बंदरासारख्या दिसणार्‍या ठिकाणी येऊन पोहोचलो. तिथे काही छोट्या प्रवासी फेरीबोटी दिसल्या; त्यांत चढणार्‍या-उतरणार्‍या माणसांची तिथे जराशी वर्दळ होती. आम्हाला ज्या बोटीत चढायचं होतं त्याचा चालक म्हणजे एक नमुनाच होता! आडदांड देह, जीन्स, बिनबाह्यांचं आणि बिनबटणांचं डेनिम जॅकेट, टोपी, लाल-निळे रंग परावर्तित करणारा गॉगल, दोन्ही हातांवर, मानेवर, छातीवर टॅटूंचा गजबजाट - या प्राण्याला ‘बोटवाला’ म्हणायला जीभच रेटेना. त्याच्याशेजारून जाताना मी त्याच्याकडे जरासं पाहून घेतलं. तर तो माझ्याकडे बघून किंचितसं हसला. एका टॅटूयुक्त व्यक्तीने मला ‘स्माईल’ देण्याची ही पहिलीच वेळ होती! त्याला इटालियन भाषेत ‘हॅलो’ करता यायला हवं होतं असं मला वाटून गेलं. त्या कल्पनेनेच मजाही वाटली. आम्ही बोटीत बसलो. स्वतःभोवती एक पूर्ण वळसा घेऊन बोट निघाली.

दुपारची अडीच-तीनची वेळ, ऊन बर्‍यापैकी होतं. एड्रिअ‍ॅटिक समुद्राचं मोहक हिरव्या-निळ्या रंगाचं पाणी उन्हात चमकत होतं. अशा रंगाचा समुद्र पाहायची आपल्याला सवय नसते. त्यामुळे कार्टून-फिल्म्समध्ये दाखवतात तसं माझ्या डोळ्यांचा रंगही हिरवा-निळा होण्याच्या बेतात होता. बोटीच्या मार्गाच्या दोन्ही बाजूंना तुरळक लहान-मोठ्या इमारती दिसत होत्या. काही इमारतींत ऑफिसेस वगैरे होती; काही हॉटेल्स होती. सर्व इमारतींचा रंग गेरूसारखा; इमारतींच्या दर्शनी भिंतींवर खिडक्यांच्या काळ्या छोट्या-छोट्या चौकटी; समुद्राच्या हिरव्या-निळ्या पार्श्‍वभूमीवर ही रंगसंगती फारच सुंदर दिसत होती. ‘सॅन जोर्जिओ मॅजिओरी’ नावाचं सोळाव्या शतकातलं एक चर्चही दिसलं. ते चर्च पाहून हळूहळू आपण व्हेनिसच्या इतिहासाकडे निघालो आहोत असं मला उगीचच वाटायला लागलं.


बोटवाल्या नमुन्याच्या मदतनीसाकडे एक छोटासा रेडिओ होता; कुठलंतरी गाणं ऐकू येत होतं; दोघांनी हातांचा ठेका धरला होता. देश परका, माणसं परकी, पण ‘डायवर, किल्नर आन् रेड्यो’ हे चित्र मात्र अगदीच ओळखीचं होतं! त्या गाण्याची सुरावट जरा लक्षपूर्वक ऐकण्याची माझी इच्छा होती. इतक्यात बोट डावीकडे वळून थांबली. आमचा ‘मार्को स्टॉप’ आला होता. फेरीबोटीतून व्हेनिसच्या एखाद्या उपबेटावर जायचं आहे असं मला आधी वाटलं होतं. पण आम्ही मुख्य व्हेनिस बेटाच्याच साधारण दुसर्‍या टोकाला येऊन पोहोचलो होतो.

बोटीतून उतरून, समुद्राला डाव्या हाताला ठेवून आम्ही रुंद फरसबंदी रस्त्यावरून चालायला सुरूवात केली. ‘सेंट मार्क्स स्क्वेअर’ ऊर्फ Piazza San Marco कडे जाणारा हा रस्ता. फरसबंदी रस्ते म्हणजे एक भारी प्रकरण वाटतं मला! काळपट, करड्या रंगाच्या त्या ओबडधोबड, खडबडीत पृष्ठभागावर पुरातन काळाच्या पायघड्या अंथरलेल्या असतात. ‘टाईमस्टँप’चं ते एक अस्सल उदाहरण असतं. तुम्ही भारावून जाऊन त्या रस्त्यावरून चालायला लागता आणि नकळत इतिहासात प्रवेशता. हा इतिहास सन-घटना घोकायला लावणारा शाळेतला इतिहास नसतो. तो असतो तिथल्या सर्वसामान्य माणसांचा इतिहास; त्या शहराने पाहिलेल्या बर्‍या-वाईट काळाचा आलेख. व्हेनिसजवळ नवव्या शतकापासूनचा असा इतिहास आहे. त्या काळात व्हेनिस हे एक महत्त्वाचं बंदर आणि जागतिक व्यापाराचं एक प्रमुख केंद्र होतं. आंतरराष्ट्रीय व्यापारासोबत प्रगतीची इतर सर्व साधनं येतात. व्हेनिसकडेही ती आलीच. पुढल्या काही शतकांमधे व्हेनिस हे युरोपमधलं सर्वाधिक भरभराट झालेलं शहर बनलं. कला, साहित्य, स्थापत्य यांचा उत्कर्ष तिथे झाला. या सार्‍या भरभराटीचा प्रमुख साक्षीदार होता सेंट मार्क्स स्क्वेअर... गाईड भरभरून माहिती सांगत होती आणि ‘स्क्वेअर’ या शब्दापाशी माझं गाडं परत परत अडत होतं! व्हेनिसच्या इतिहासाकडे नेणार्‍या आमच्या पायाखालच्या त्या रस्त्याला आणखी तीन रस्ते कुठून आणि कसे येऊन मिळणार हे काही कळत नव्हतं.

आमच्या आसपास कोणत्याही पर्यटनस्थळी दिसतं तसंच दृश्य होतं. गर्दी, विक्रेते, कॅफे, आईसक्रीम-शॉप्स... गर्दीतला प्रत्येक चेहरा कोण जाणे जगातल्या कोणत्या कोपर्‍यातून आलेला! आमच्या उजव्या हाताला गेरूच्याच रंगातल्या इमारतींची ओळ होती. काही बेड-अँड-ब्रेकफास्ट हॉटेल्स, काही जरा मोठी, एखाद्या इमारतीवर इटलीचा आणि युरोपियन युनियनचा झेंडा दिसत होता. चालताचालता मध्येच रस्ता आठ-दहा पायर्‍या वर जात होता. दगडी पायर्‍या, व्यवस्थित बांधलेल्या. त्यावरून चढून गेलो आणि डावीकडे एकदम एक कालवाच नजरेसमोर आला. 

जेमतेम वीस-एक फूट रुंदीचा असेल; २-३ छोट्या नावांमधून पर्यटक त्यात विहरताना दिसले. नावाडी त्यांच्या हातातल्या एकच एक लांबलचक वल्ह्यांनी निवांतपणे नावा पुढे रेटत होते. व्हेनिसच्या जगप्रसिद्ध कालव्यांपैकी एका कालव्याचं हे पहिलंवहिलं दर्शन! मला पुन्हा त्याच भारावून जाण्याच्या, काळाचे अनेक पदर नजरेसमोर उलगडले जाण्याच्या जाणीवेने घेरून टाकलं... ‘रेनेसाँ’ची सुरूवात इटलीतूनच झाली. त्या काळात कसं दृश्य असेल इथे, तेव्हा या कालव्यांतून कुणीकुणी आणि कसा प्रवास केला असेल, कालव्यातल्या पाण्यावर काव्य-शास्त्र-विनोदाचे किती शिडकावे झाले असतील, असे बरेच विचार तेवढ्या दहा-पाच सेकंदांत डोक्यात आले. त्याच विचारांत आणखी थोडा वेळ हरवून जायला मला आवडलं असतं. पण तिथे थांबायला वेळ नव्हता. मग पायर्‍या उतरून मार्गस्थ झालो.

थोडं चालून गेल्यावर परत एक कालवा आला. कालव्यावर काही अंतरावर उंचीवर बांधलेला एक बंदिस्त पूल दिसत होता. बारीक जाळीच्या दोन खिडक्यांव्यतिरिक्त पुलाच्या अंतर्भागाचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नव्हता. हा ‘पोन्त दी सुस्पीरी’ ऊर्फ Bridge of sighs (सुस्कारेपूल). हा पूल १६०० साली बांधला गेला. पूर्वी पुलाच्या एका बाजूला कोर्टकचेर्‍या, तर दुसर्‍या बाजूला तुरूंग होते. जबर शिक्षा झालेल्या कैद्यांना या पुलावरून तुरूंगात नेलं जायचं. जाताना पुलाच्या खिडकीतून त्यांना रमणीय व्हेनिसचं अखेरचं दर्शन व्हायचं. त्यामुळे ते तिथे सुस्कारे टाकून पुढे जायचे. म्हणून त्या पुलाचं असं नाव पडलं.

तिथून पुढे दहा-वीस पावलांवर रस्ता उजवीकडे वळत होता; वळून एकदम बराच प्रशस्त, रुंदही होत होता. आपसूक त्या दिशेला वळलो आणि चालायला लागलो. हा ‘पियाझ्झेता’, म्हणजे छोटा चौक. आता त्या रस्त्याला ‘रस्ता’ म्हणता आलं नसतं. ती जागा चौसोपी वाड्याच्या मधल्या मोकळ्या जागेसारखी वाटत होती. हे जाणवलं आणि अचानक ‘स्क्वेअर’चा इथे अभिप्रेत असलेला दुसरा अर्थ माझ्या लक्षात आला! सेंट मार्क्स स्क्वेअर म्हणजे चार रस्ते एकत्र येणारा चौक नव्हताच. हे जगप्रसिद्ध ठिकाण म्हणजे आलिशान, ऐतिहासिक इमारतींच्या मधल्या मोकळ्या जागेचं नाव होतं!



आमच्या दोन्ही बाजूंना कमानीदार, कोरीव काम केलेल्या इमारती दिसत होत्या. पण त्या कमानींमध्ये फरक होता. डावीकडच्या कमानी वरून अर्धगोलाकृती होत्या, ही ‘रेनेसाँ’ काळातल्या स्थापत्यशैलीची खूण. ती इमारत म्हणजे पुरातन ग्रंथालय होतं. (Biblioteca Marciana). १६व्या शतकांपासूनचे अनेक दुर्मिळ आणि अमूल्य हस्तलिखित ग्रंथ इथे संग्रहित केले गेलेले आहेत. उजव्या बाजूच्या ‘डॉजेस पॅलेस’च्या कमानी वरती टोकेरी होत गेलेल्या होत्या. ही गॉथिक स्थापत्यशैली. गाईडने सांगितलं नसतं तर हा फरक लक्षातही आला नसता. कारण, प्रदीर्घ इतिहास मिरवणार्‍या जागी इतपत कोरीव वगैरे बांधकामं असणारच असं आपण नकळत धरून चाललेलो असतो. त्यामुळे इतकं लक्षपूर्वक ते पाहिलं जातंच असं नाही. ‘डॉजेस पॅलेस’ व्या शतकात उभारला गेला. हा राजवाडा म्हणजे या ठिकाणी झालेल्या अगदी सुरूवातीच्या बांधकामांपैकी एक आहे.



पुढल्या २-४ मिनिटांत पियाझ्झेतात आम्ही जसजसं पुढे जात राहिलो तसतसा प्रशस्त, ऐसपैस मुख्य पियाझ्झा सामोरा येत गेला. चौसोपी वाड्यातलं मधलं मोकळं अंगण, वरती खुलं आकाश, ही जागा जशी त्या वाड्यातल्या सर्वांच्या एकत्र येण्याचं प्रमुख ठिकाण बनते, वाड्यातल्या सर्व घटना-प्रसंगांवर तिथे चर्चा झडतात, आनंद साजरे होतात, दुःख वाटून घेतली जातात, अगदी तसंच शतकानुशतकं व्हेनिसच्या बाबतीत या ‘पियाझ्झा’त होत आलेलं आहे. एकदा हे स्पष्ट झाल्यावर माझा त्या जागेकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला!

उजव्या हाताला डॉजेस पॅलेसच्या ओळीतच पुढे होतं ‘सेंट मार्क्स बॅसिलिका’. ते आतून पाहण्यासाठी पर्यटक रांग लावून उभे होते. आम्ही पण त्या रांगेत सामिल झालो. पण माझी नजर आता सेंट मार्क्स स्क्वेअरमधे सर्वदूर भिरभिरत होती. ऐसपैस, प्रशस्त चौक एका दृष्टीक्षेपात मावत नव्हता. डावीकडून उजवीकडे संपूर्ण चौकावर नजर फिरवायची तर शंभर ते एकशेवीस अंशात मान  फिरवावी लागत होती. डावीकडे (दक्षिण दिशा) पुरातन ग्रंथालयाची इमारत काटकोनात वळून सरळ लांबवर जात होती; तिला काटकोनात जोडणारी तिच्याच तोडीस तोड आणखी एक इमारत बरोबर समोर (चौकाची पश्‍चिम बाजू), आणि तिला काटकोनात तिसरी इमारत उजवीकडे (उत्तर दिशा). दुमजली तीन इमारती, एकसलग अर्धगोलाकृती कमानींमुळे अगदी एकाच साच्यातून काढल्यासारख्या वाटत होत्या. डावी-उजवीकडच्या दोन्ही इमारती जवळजवळ दीड-एकशे मीटर लांबीच्या तरी असाव्यात. पण इमारतींची उंची अशी होती की चौकाची शान आधी पाहणार्‍याच्या डोळ्यात भरावी; इमारतींकडे नंतर लक्ष जावं. बॅसिलिका म्हणजे सेंट मार्क्स स्क्वेअरची चौथी बाजू होती.

एकीकडे गाईडकडून काय काय माहिती कानावर येत होती. अमुक इमारत १२व्या शतकातली; तमुक कोरीव काम १४व्या शतकातलं; १५व्या शतकात इथे हे झालं; १६व्या शतकात तमुकच्या स्वारीत असं असं नुकसान झालं... सगळं काय ते १७व्या शतकात नाहीतर त्याच्या आधीच! असं वाटलं जणू त्यानंतरच्या काळाला या ठिकाणाने विस्मृतीतच ढकललं असावं. १८व्या शतकाच्या अखेरीस व्हेनिसवर नेपोलियनने कब्जा केला. नेपोलियनच्या पाडावानंतर इथे काही काळ ऑस्ट्रियाचं राज्य होतं. युरोपच्या आणि इटलीच्या दृष्टीने इतक्या पुरातन महत्त्व असलेल्या या ठिकाणी त्यादरम्यानही काही ना काही घडलंच असणार. पण किमान पर्यटकांना तरी त्यातलं काही सांगितलं जात नसावं असं मी माझ्यापुरतं अनुमान काढलं.

बॅसिलिकाच्या पुढ्यातच त्याचा अवाढव्य ‘कँपनाईल’ ऊर्फ ‘बेल टॉवर’ उभा होता. आमच्या आसपास पर्यटकांची ‘भाऊगर्दी’ म्हणावी इतपत गर्दी होती. कुणाचं फोटोसेशन चाललेलं होतं; कुणाचं सेल्फीसेशन सुरू होतं. सेल्फीचा सारा आटापिटा ‘मी अमुकतमुक जागी जाऊन आलो/आले’ हे जगाला सांगण्यासाठी असतो अशी आपली माझी सर्वसाधारण समजूत. मग अशा फोटोत तो ‘मी’ अधिक महत्त्वाचा की ती जागा हे ही मंडळी कसं ठरवतात, फोटोचा अँगल ठरवताना नक्की काय विचार करतात, याची मला कायमच फार उत्सुकता असते. इथे तर जगभरातले सेल्फी-मास्टर्स माझ्या सभोवताली एकवटलेले होते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येकाच्या कॅमेरात डोकावण्याची माझी इच्छा होत होती.

दरम्यान रांग कुठवर आली हे पाहावं म्हणून मी वळले तर रांगेतल्या सर्वांच्या नजरा बॅसिलिकापासून काही अंतरावर असलेल्या ‘क्लॉक टॉवर’वर खिळलेल्या होत्या. सेंट मार्क्स स्क्वेअरमधल्या उजवीकडच्या लांबलचक इमारतीच्या शेवटी हा क्लॉक टॉवर आहे. तीन मजली टॉवर, दुसर्‍या मजल्यावर एक मोठी ‘डायल’ होती. त्याच्या बाहेरच्या वर्तुळावर दिवसाचे चोवीस तास दर्शवणारे ते २४ रोमन आकडे लिहिलेले होते. सूर्याचं सोनेरी रंगातलं चित्रं असलेला तासकाटा १५व्या घरात दिसत होता. तिसर्‍या मजल्यावर मध्यात एक पुतळा होता. पुतळ्याच्या डावीकडे तासाचा रोमन आकडा आणि उजवीकडे मिनिटांचा अरेबिक आकडा होता. हा अरेबिक आकडा दर पाच मिनिटांनी बदलतो. मी घड्याळ पाहिलं. ३:३५ होत आले होते. काही सेकंदांत तो उजवीकडचा आकडा ३० चा ३५ झाला. माना वर करून पाहणार्‍या गर्दीत एक सार्वजनिक आनंदी लहर उमटली.

एव्हाना रांगेत सरकत आम्ही बॅसिलिकाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो होतो. भव्य कोरीव खांब, वरती घुमट, त्यातली मोझेक चित्रकला, सगळं डोळे दिपवून टाकणारं होतं! चौकातल्या इतर तीन बाजूंच्या इमारतींच्या मानाने बॅसिलिकाचा ठमठमाट जास्त होता. पूर्वी बॅसिलिकाशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचारीवर्गाची निवासाची व्यवस्था उर्वरित तीन इमारतींमध्ये केली जात असे असं कळलं. बॅसिलिकाच्या प्रवेशद्वाराच्या भव्यतेच्या मानाने आतलं चर्च तसं लहान होतं. चर्चच्या छतावर आणि जमिनीवरही सोनेरी रंगातली मोझेक कलाकुसर होती. त्यावर पाय देऊन चालायला खरं म्हणजे नको वाटत होतं. पूर्वी माणसं एकतर हे असलं काहीतरी करत असावीत, नाहीतर सरळ युद्धावर जात असावीत. कारण जाऊ तिथे कला हात पसरून स्वागताला उभी, सोबत तोंडी लावायला युद्धखोरीच्या नाहीतर विध्वंसाच्या कहाण्या! बॅसिलिकाच्या आत फोटो काढायला परवानगी नव्हती. त्यामुळे तिथे १०-१५ मिनिटं घालवून बाहेर आलो.

आता परत एकदा चौकात हरवून जायचं होतं. मात्र नवव्या शतकापासून इथे काय काय, कसं कसं घडत गेलं, या चौकात कोणते सोहळे झाले, सभा झाल्या, विजयांचे जल्लोष झाले की पराभवांची झाडाझडती घेतली गेली, कुणा तत्त्ववेत्याने आपल्या वक्तृत्वाने इथल्या श्रोत्यांना मोहित केलं, की कुणा कलाकाराला इथे आपल्या कलेचं प्रदर्शन करण्यात सार्थकता लाभली याचे बारीकसारीक तपशील आता मला नको होते. त्यामुळे गाईडला हळूच ‘सायडिंग’ला टाकून आम्ही डावीकडच्या कोपर्‍यापासून चौकाची फेरी सुरू केली. 

कमानीदार पायी चालण्याचा मार्ग, इमारतींच्या तळमजल्यातून जाणारा, चालताना डाव्या हाताला दुकानं, मुंबईतल्या फोर्ट भागाची आठवण येत होती. इतका पुरातन तो चौक, तिथल्या इमारती, तेव्हा अधूनमधून त्यांची डागडुजी झालीच असणार; कारण तिथल्या बांधकामांची कुठे पडझड अशी झालेली दिसत नव्हती. हा चौक समुद्राच्या अगदीच जवळ असल्याने दमट हवामानाचा परिणामही होत असणार. काहीवेळा समुद्राच्या भरतीचं पाणी चौकात शिरतं असंही कळलं. असं सगळं असूनही इमारतींच्या बांधकामांना कुठेही आधुनिकतेची ठिगळं जोडलेली दिसत नव्हती. भिंतींना काळपटपणा आला होता, पण तो अभिमानाने मिरवावा असा दिसत होता. कमानींचे खांब कुठेकुठे जुनाट, जरासे ओबडधोबड दिसत होते, पण तो जुनाटपणा टाकाऊ नव्हता. अशाच एका जराशा ओबडधोबड वाटणार्‍या खांबापाशी मी थांबले. ‘नेपोलियन या खांबाला टेकून उभा राहिलेला असू शकतो’ असा विचार करून मी त्या खांबाच्या दगडावरून अलगद हात फिरवला. नेपोलियनचा इतिहास मला मुखोद्गत आहे किंवा त्याच्याबद्दल मनात अपार आदर वगैरे आहे अशातला काही भाग नाही. पण अशा प्रकारे इतिहासात फिरून यायला मला फार आवडतं. अशा वेळी तो इतिहास परकीय की एतद्देशीय हा मुद्दा माझ्यासाठी गौण असतो.

चौकाच्या मधल्या मोकळ्या जागेत दोन-तीन ठिकाणी कॅफेज दिसत होते. उघड्यावरच टेबलं-खुर्च्या मांडून ठेवलेली होती. सर्वात भारी म्हणजे प्रत्येक कॅफेचा स्वतःचा ‘लाईव्ह बँड’ होता! छोटीशी आकर्षक स्टेजसारखी जागा, तिथे एक मोठा पियानो (सिंथेसायझर नव्हे), अकॉर्डियन, व्हायोलिन, सेलो (खुर्चीवर बसून वाजवायचं मोठं व्हायोलिन), एक-दोन प्रकारची क्लॅरिनेटस् आणि काळ्या-पांढर्‍या टापटीप वेषातले तिघं-चौघं वादक... ही म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच होती! झकास मंद वारा होता, छान सावली होती, हातात कॉफीचा कप घेऊन ते संगीत ऐकत मी तिथे तास-दोन तास सहज घालवले असते. पण कॅफेच्या मेनूकार्डवर नजर टाकल्यावर, त्यातल्या आकड्यांना ७०-७५ ने गुणल्यावर मला माझा बेत बदलावा लागला. म्हटलं कॉफीचा कप जाऊ दे, असं प्रत्यक्ष संगीत ऐकणं महत्त्वाचं... तर कॅफेच्या एका माणसाने मोडक्यातोडक्या इंग्रजीत सांगितलं, की काही न खाता-पिता नुसतं बसायलाही परवानगी नव्हती. त्याचंही बरोबर होतं. नुसतं बसून संगीत ऐकून पर्यटक निघून गेले तर त्याचं, त्या वादकांचं पोट कसं भरायचं! मग म्हटलं, बाबा, आम्ही इथे उभे राहिलो तर तुझी काही हरकत आहे का? त्याची हरकत नव्हती. अशा रीतीने तास-दोन तासांची माझी पर्वणी पंधरा मिनिटांवर आली. पण तरी शेवटी पर्वणी ती पर्वणीच! मला पाश्‍चात्य संगीतातलं काहीही कळत नाही. पण ते वादक जे वाजवत होते ते ऐकताना जे काही वाटत होतं ते केवळ अवर्णनीय होतं! पर्यटनाच्या माझ्या संकल्पनेत ज्या ठिकाणी जायचं तिथले स्थानिक खाद्यपदार्थ चाखून पाहणं अग्रक्रमावर असतं. त्या पंधरा मिनिटांनी त्यात एक नवीन कलम टाकलं - ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणचं स्थानिक संगीत ऐकणं.

व्हेनिसने, ‘पियाझ्झा सान मार्को’ने मला हे नवीन कलम देऊ केलं; ‘चौक’ शब्दाचा व्यापक अर्थही सांगितला. असं कणाकणाने स्वतःच स्वतःचं प्रबोधन करून घेण्यात वेगळाच आनंद असतो. आमची निघायची वेळ झाली होती. बोटीतून परतताना कानांत ते संगीतच वाजत होतं. त्या संगीताच्या संगतीत एड्रिअ‍ॅटिक समुद्राचं हिरवं-निळं पाणी, गेरूच्या रंगातल्या इमारती, बोटवाला नमुना, १४व्या शतकातलं चर्च, सर्वांचंच ‘इतालीयानो’पण अधिकच एकजीव झाल्यासारखं वाटत होतं.



-----

(२०१६ साली ‘मुशाफिरी’ दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख)

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)