Hidden Figures : एक अप्रतिम सिनेमा

Hidden Figures नावाचा सुंदर सिनेमा पाहिला. ५०-६० च्या दशकात अमेरिकेत नासात काम करणार्‍या तीन अ‍ॅफ्रो-अमेरिकन स्त्रियांची सत्यकथा आहे. कॅथरिन जॉन्सन, मेरी जॅक्सन, डोरोथी व्हॉन.

अत्यंत हुशार, तीक्ष्ण बुद्धीच्या या तिघींना कामाच्या ठिकाणी सतत वर्णभेदाला तोंड द्यावं लागलं; त्यांच्या पात्रतेच्या मानानं हलकी कामं करावी लागली; तरीही त्याबद्दल गळे काढत न बसता त्या ठामपणे आपली योग्यता संधी मिळेल तिथे सिद्ध करत राहिल्या.

नासातर्फे १९६२ साली जॉन ग्लेनला अवकाशात पाठवण्यात आलं; तो पृथ्वीभोवती ठराविक कक्षेत फिरणारा पहिला अंतराळवीर ठरला. या प्रोजेक्टसाठी नासात विविध पातळीवर जी कामं सुरू होती त्यात अनेक 'मानवी कम्प्युटर्स' काम करत होते. विविध क्लिष्ट गणिती आकडेमोडी, समीकरणं सोडवणे हे त्यांचं मुख्य काम. त्यात अनेक स्त्रिया होत्या; कृष्णवर्णीय स्त्रियाही होत्या.

कृष्णवर्णीय स्त्रियांसाठी जेवणाची वेगळी जागा, वेगळी टॉयलेट्स, त्यांनी हात लावलेल्या कॉफीपॉट्समधून इतरांनी कॉफी न घेणे इत्यादी प्रसंग, तपशील अगदी सहजगत्या पण खूप भेदकपणे दाखवले आहेत. ते पाहताना आत कुठेतरी खूप तुटतं; पण त्याचवेळी तिघींची सकारात्मकता खूप भिडते.
या तिघींचं गणिती, इंजिनिअरिंग ज्ञानाचं नाणं खणखणीत असल्यानं त्या श्वेतवर्णीय वरिष्ठांना हळूहळू आपल्या कामाचं महत्व कसं पटवत गेल्या, त्याची कथा आहे.

जॉन ग्लेनच्या मोहिमेसाठी कॅथरीन जॉन्सननं अनेक महत्वाची गणितं केली; पुढे अपोलो-११च्या मोहिमेतही गणिती आकडेमोडीची प्रमुख जबाबदारी तिनंच पेलली.
डोरोथी व्हॉन तेव्हा अगदी नवीन असलेल्या आयबीएम मेनफ्रेमवर काम करणारी पहिली महिला ठरली.
मेरी जॅक्सन नासाची पहिली अ‍ॅफ्रो-अमेरिकन महिला एरोस्पेस इंजिनिअर ठरली.

मुळीच चुकवू नये असा सिनेमा.

Comments

Popular posts from this blog

दंगल

तूऽऽ मेनी पीपल्स!!

अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज - पिंडात ब्रह्मांड !!