सेल्फी

आज तिच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस होता. दिवस उजाडला तेव्हा तिला हे ठाऊक नव्हतं; दिवस संपता संपता मात्र तो अचानक मोठा झाला... आणि आता ती मनोमनच खूप नाचतेय, गातेय, आनंद साजरा करतेय...

गेली - वर्षं असे आनंदाचे लहान-मोठे क्षण ती व्हॉट्सअपवर शेअर करायला लागली होती; तिच्या धाकट्या जावेनं तिला ती सवय लावली होती. पण आज हे कुणाशीच शेअर करता येणार नव्हतं.

जावेनंच तिला सेल्फी काढायलाही शिकवलं होतं. एकदा जावेनं आग्रह केला म्हणून घरातल्या घरात तिनं जावेची जीन्स आणि टॉप घालून पाहिला. “छान दिसतंय!” जाऊ म्हणाली होती. त्यादिवशी तिनं प्रथम सेल्फी काढला; पण, घट्ट चापून बांधलेले केस, टिकली, मंगळसूत्र आणि जीन्स! कुछ मजा नहीं आ रहा था! आपला पंजाबी ड्रेसच बरा! जाऊ किती छान राहायची; पंजाबी ड्रेस क्वचितच घालायची; घातला तरी बिनओढणीचा; खांद्यांपर्यंत केस, मोकळे सोडलेले; बाहेरून आली की गॉगल केसांत सरकवलेला...

ती जावेसारखं होण्याचा हळूहळू प्रयत्न करणार होती.

त्यादिवशी रात्रीची जेवणं उरकून मागचं आवरताना ती त्याच विचारांत होती. ओटा पुसताना बांगड्या मध्येमध्ये येत होत्या... काढूनच टाकाव्यात का, जावेच्या हातात तर कधी नसतात; तिला वाटलं. स्वयंपाकघराचा दिवा विझवून तिनं फोन हातात घेतला. ४-५ व्हॉट्सअप नोटिफिकेशन्स होती; त्यातलं एक जावेचं होतं... तिनं तेच आधी उघडलं.

‘सरप्राईजऽऽऽ...’ असं म्हणून जावेनं एक मोठा मेसेज आणि एक फोटो पाठवला होता. तिनं आतुरतेनं ‘डाऊनलोड’वर टॅप केलं आणि मेसेज वाचायला सुरूवात केली. जावेला कुणाच्यातरी ओळखीतून एका टीव्ही मालिकेच्या एका भागात एक काम मिळालं होतं. त्याच्या शूटदरम्यानच्या मेकअप-कॉस्च्युमसहितचा सेल्फी सोबत होता.

शूट, कॉस्च्युम... जाऊ किती स्टायलिश बोलते...!

तिनं त्या फोटोकडे पाहिलं... घट्ट चापून बांधलेले केस, टिकली, मंगळसूत्र, पंजाबी ड्रेस... ती आनंदाने हसत सुटली; नाचत सुटली... मनोमनच!

Comments

Popular posts from this blog

मैं और मेरी कामवाली, अक्सर ये बातें करते हैं...!

पुस्तक परिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे)

न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला)