एक विकट हास्य... कुंच्याचं !!
एक दिवस घरातल्या कागदपत्रांच्या फाईल्स्मधे मी एक पावती शोधत होते. निरनिराळी महत्त्वाची पत्रं, पावत्या इ. गोष्टी त्या-त्या फाईलला लावण्याचं काम माझा नवराच करत असल्याने (मी त्या कामात कधी लक्ष घालत नाही हे ओघानं आलंच!) ऐनवेळेला नवर्याच्या अनुपस्थितीत हवा तो कागद अथवा पावती योग्य त्या फाईलमधे शोधणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठं कामच असतं! नवर्यानं खरं म्हणजे प्रत्येक फाईलवर व्यवस्थित नाव, नंबर इ.च्या चिठ्ठ्या डकवलेल्या आहेत. तरीही इष्ट कागद मिळण्यापूर्वी ती विशिष्ट फाईल मला कमीतकमी दोनवेळा तरी अथपासून इतिपर्यंत धुंडाळावी लागते. म्हणजे मुळात मी योग्य ती फाईल उचललेली असते, आतले कागद पालटायलाही सुरूवात केलेली असते, भसाभसा कागद चाळताना मला हवा तो कागद नेमका त्याच्या आधीच्या कागदाला चिकटून पालटला जातो आणि एकाक्षणी अचानक त्या फाईलचा मागचा रंगीत पुठ्ठाच माझ्या पुढ्यात येतो. चरफडत, नवर्यावर वैतागत, ‘नेमकी हीच पावती या फाईलला कशी नाही लावली याने...’ असं स्वतःशी बडबडत मी कपाटातून अजून तीनचार फाईल्स् धपाधप काढते. कधीकधी त्या फाईल्स्वर लावलेल्या चिठ्ठ्यांचा आणि मी शोधत असलेल्या कागदाचा आपसांत का...