पुस्तक परिचय : गोठण्यातल्या गोष्टी (हृषीकेश गुप्ते)
या पुस्तकाचं नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हापासून शीर्षकाचा अर्थ मी वेगळाच लावत होते. गोठणे हे क्रियापद मानून abstract शीर्षक असावं अशी समजूत करून घेतली होती. (मनं गोठतात त्याच्या गोष्टी, वगैरे.) पण, हे तसं काहीही abstract नाही. गोठणे हे गाव आहे. (नागोठणेचा संदर्भ लेखकानेच सुरुवातीला दिला आहे.) लहानपणीच्या गावातल्या आठवणी असं पुस्तकाचं स्वरूप आहे. मुख्य भर व्यक्तिचित्रणावर आहे. मित्रमंडळींच्या गप्पाटप्पांमध्ये किस्से सांगण्यासारखी लेखनाची धाटणी आहे. ते सगळं वाचायला मजा येते. काही व्यक्ती एकाहून अधिक लेखांमध्ये प्रसंगानुरूप, कधी केवळ एखाद्या उल्लेखापुरत्या येतात. त्यातून गावाचं एकजिनसी चित्र समोर उभं राहतं. खेडेगावातल्या/निमशहरी गावातल्या व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभावविशेष, विशेष अशा ठिकाणीच उद्भवू शकतील असे प्रसंग, पात्रांची बोलीभाषा हे सगळं टिपत टिपत चवीचवीने वाचण्याचं पुस्तक आहे. निवेदनाच्या ओघात आलेले ट्रक मालवाहतुकीच्या व्यवसायातले बारकावे, मूर्तीकारांच्या कामांशी संबंधित वर्णनं किंवा अगदी गावाकडचे पतंग उडवण्याच्या युनिव्हर्सचे तपशील वाचायला मला फार आवडले. युनिव्हर्स अशासाठी म्हटलं, क...