पुस्तक परिचय : Goat Days (Benyamin)

'दुर्दैवाचे दशावतार' किती अवतार धारण करू शकतात ते हे पुस्तक वाचून समजतं.

केरळमधला एक गरीब अशिक्षित मजूर. त्याच्या गावातले अनेकजण गल्फमध्ये नोकरी करून थोडेफार पैसे मिळवत असतात. याला जाण्याची संधी मिळते तेव्हा कर्ज काढून, कसेतरी पैसे उभे करून तो जातो. तिथे (रियाध) पोचल्यावर कुणाला भेटायचं, कुठे जायचं काहीही माहिती त्याच्याजवळ नसते. 

त्याला न्यायला एक अरब येतो आणि त्याची रवानगी थेट वाळवंटातल्या एका मोठ्या बकर्यांच्या farm मध्ये होते. शेकडो बकर्यांची देखभाल करायची, त्यांना वाळवंटात फिरवून आणायचं, हे त्याचं काम. बदल्यात त्याला अक्षरश: गुलामासारखी वागणूक मिळते. वाळवंटात पाण्याचं दुर्भिक्ष्य, असलेलं पाणी बकर्यांसाठीच वापरायचं या कडक नियमामुळे त्याला अंघोळ, प्रातर्विधींसाठीही पाणी वापरायची मनाई असते. जेमतेम खायला मिळत असतं, कामात बारीकशी कुचराई/चूक झाली तरी चामड्याच्या पट्ट्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण होत असते.
ते सगळं वर्णन सुन्न करणारं आहे. तरीही निवेदनात एक साधा हलकेफुलकेपणा आहे. देवावरचा अढळ विश्वास, अशा परिस्थितीतही अरबी भाषा समजून, शिकून घेण्याचा प्रयत्न, वाळवंटाचं, तिथल्या ऋतूंचं वर्णन, बकर्यांशी जुळत गेलेलं नातं, परतण्याची दुर्दम्य आशा, त्याचं बकर्यांमधलंच एक बनत जाणं - हे सगळं वाचून थक्क, हतबल, अवाक, कमाल बरंच काय काय वाटतं.

असा ३ वर्षांहून अधिक काळ तो तिथे काढतो, आणि मग पलायनाची एक संधी मिळते. पुढेही मोठं दिव्य उभं असतं. ते सगळं वर्णनही पोटात खड्डा पाडणारं आहे.

कथानक काल्पनिक म्हणावं तर ते ही नाही. हे सगळं भोगलेली खरीखुरी व्यक्ती लेखकाला भेटली होती.
त्या देशात त्याच्या वाट्याला हे सगळं येतं, यामागे ट्रॅव्हल एजंटने केलेली फसवणूक हे ऑब्व्हियस वाटणारं कारण नसतं. ते खरं कारण पुस्तकाच्या शेवटाकडे उघड केलं आहे. ते वाचूनही हबकायला झालं.

अनन्वित हालअपेष्टांची करूण कहाणी, त्रयस्थपणे, गळे न काढता, काही ठिकाणी हलक्याफुलक्या पद्धतीने सांगितली आहे. त्यामुळे पुस्तक फार आवडलं.

(सोबतची cover image मी वाचलेल्या इंग्लिश अनुवादाची आहे. अनुवाद - Joseph Koyippally. मूळ मल्याळी पुस्तकाचं कव्हर त्याहून अधिक नेमकं आणि त्यामुळे अंगावर येणारं आहे. मल्याळी पुस्तकाला २००९ सालचा केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.)

Comments

Popular posts from this blog

पुस्तक परिचय : Educated (Tara Westover)

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

साडेतीनशे पानी झाकोळ (पुस्तक परिचय : Shuggie Bain, लेखक : Douglas Stuart)