पुस्तक परिचय : Grey Sunshine: Stories from Teach For India (Sandeep Rai)
Lockdown book #8
Teach for India बद्दल काही वर्षांपूर्वी एक लेख वाचनात आला होता. त्यातले तपशील आठवत नव्हते, भारतातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी चालू असलेली ही एक चळवळ आहे, एवढं आठवत होतं. त्यामुळे किंडल suggestions मध्ये हे पुस्तक दिसल्यावर लगेच विकत घेतलं.
उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी दोन वर्षांसाठी आपलं नेहमीचं काम-नोकरीधंदा बाजूला ठेवून
गरीब वस्त्यांमधल्या मुलांच्या प्राथमिक शाळेत शिकवण्याचं काम करायचं, ही Teach for India मागची मूळ कल्पना आहे. त्याची प्रेरणा आहे Teach for America या मोहिमेत. लेखक संदीप राय या Teach for America मोहिमेत सामिल झालेले; अमेरिकेतल्या गरीब मुलांच्या शाळेत शिकवण्याचा
अनुभव असणारे; भारतात शाहीन मिस्त्री यांनी या मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली होती,
त्याला हातभार लावण्यासाठी, आपल्या अनुभवांचा काहीतरी फायदा व्हावा यासाठी म्हणून
इथे आले. त्यानंतरच्या दहा-एक वर्षांच्या वाटचालीवर आधारित हे पुस्तक आहे.
या मोहिमेत सामिल झालेले काही तरुण-तरुणी, गरीब वस्त्यांमधल्या प्राथमिक शाळांत
शिकवायला सुरूवात केल्यानंतर त्यांनी खाल्लेले टक्केटोणपे, त्यातून पुढे त्यांची त्या-त्या
मुलांशी जमलेली गट्टी ... असं एकूण चित्र उभं करण्याचा लेखकाचा उद्देश आहे.
मात्र, मला व्यक्तिशः पुस्तक म्हणून हे तितकंसं भावलं नाही. Stories from Teach For India - हे उपशीर्षक वाचून मी
ज्या अपेक्षा केल्या होत्या तसं हे पुस्तक निघालं नाही. एकतर पुस्तकाचं निवेदन खूप
तुकड्या-तुकड्यात येतं. शिवाय त्यात मोठमोठे उपदेशपर संवाद सतत येतात, ते वाचायला
नंतर नंतर कंटाळा यायला लागतो.
गरीब वस्त्यांमधल्या प्राथमिक शाळा सरकारी पाठबळावर उभ्या असलेल्या. त्याच्या आधाराने
Teach for India चे हातही आठव्या
इयत्तेतल्या मुलांपर्यंत पोहोचू शकतात. त्यानंतर ती मुलं कुठे जाणार, काय करणार हा
मोठा प्रश्न. बहुतांश मुलं आठवीपर्यंत शिकून शाळा सोडतात. हे आजचं वास्तव. यावर TFI च्या काही fellows नी उपाय शोधला, धडपड केली; i-Teach ही एक मोहिम सुरू केली. पदरचे पैसे घालून ९वी-१०वीचे वर्ग सुरू केले. त्यासाठी
त्यांना अतोनात अडचणींना तोंड द्यावं लागलं. १-२ प्रतिनिधिक उदाहरणांमधून ते
सांगितलं गेलं आहे. पण ते देखील असंच बहुतांशी
preachy पद्धतीने लिहिलेलं आहे.
इतके अस्सल अनुभव हाताशी असूनही ते वाया घालवलेत असं राहून राहून वाटतं.
पुस्तकाचं मुखपृष्ठ खणखणीत आहे, content देखील सकस आहेच, मात्र narrative त्या तोडीचं दमदार नाही. त्यामुळे जरा वाईट वाटलं. विरस झाला.
तरीही, Teach for India बद्दल आधी काहीही
वाचलेलं नसेल तर हे पुस्तक आवडू शकतं.
Comments