पुस्तक परिचय : Mr. Penumbra’s 24-hour Bookstore (Robin Sloan)

Lockdown book #7


या पुस्तकाचं एका ओळीत वर्णन करायचं तर ’नव्या युगाचं, नव्या पिढीचं, वेगळंच झकास पुस्तक’ !

पण मग नव्या पिढीच्या या पुस्तकाच्या शीर्षकात एक bookstore कसं काय?

तर, इंटरनेटी तंत्रज्ञान आणि प्राचीन छापिल पुस्तकं यांचे ऐसपैस चौपदरी रस्ते या पुस्तकाच्या चौकात एकत्र येतात. तिथे आपण वाचक उभे असतो, सुरक्षितपणे, traffic island च्या आत... या रस्त्यांवरून आपल्या दिशेनं येतात पुस्तकांच्या जगतात रमलेले, त्यापल्याड पाहू न शकणारे पन्नाशी आणि त्यापुढचे ’अंकल-आँटी-आजोबा’ वयाचे लोक आणि तंत्रज्ञानात मुरलेले, सिलिकॉन व्हॅलीत जमेल त्या प्रकारे घाम गाळणारे, इंटरनेटी जगतात व्यवसायाच्या नवनव्या वाटा शोधणारे तरुण तंत्रज्ञ... ते चौकात वाचकांसमोर ज्या प्रकारे एकमेकांना भेटतात, एकमेकांच्या जगतात प्रवेश करतात, आणि मग जी काही मजा घडते, ते म्हणजे हे पुस्तक.


Mr Penumbra च्या या पुस्तकाच्या दुकानाच्या माध्यमातून एका ५०० वर्षं जुन्या कोड्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न सुरू असतो. ते कोडं एका तितक्याच जुन्या पुस्तकात सांकेतिक स्वरूपात लिहिलेलं असतं. ते कोडं सुटण्यासाठी हे पुस्तकांचं दुकान २४ तास चालू ठेवणे आवश्यक असतं.

जागतिक मंदीमुळे सिलिकॉन व्हॅलीतली चांगली नोकरी गमवावी लागलेला नायक या दुकानात रात्रपाळीचा क्लार्क म्हणून कामाला लागतो. त्याला या शोधाबद्दल काहीही कल्पना नसते. मात्र तो ऑनलाइन तंत्रज्ञानात मुरलेला, त्याच मुशीत विचार करणारा, डोक्याला सतत त्याच प्रकारचं खाद्य हवं असणारा... त्या जुन्या, कोंदट, धूळभरल्या आणि वाचता न येणारी पुस्तकं असलेल्या दुकानातही त्याला स्वस्थ बसवत नाही. तो त्या दुकानाकडे एका वेगळ्याच दृष्टीकोनातून बघायला लागतो. त्यातून त्याला जे काय काय कळत जातं आणि मग जी काही मजा घडत जाते, ते म्हणजे हे पुस्तक.

त्यात Aldus Manutius हा प्राचीन इटालियन प्रकाशक आहे; एक काल्पनिक प्राचीन ’टाइप-फाँट’ आहे, तंत्रज्ञानाच्या काळातही टिकलेली त्याची अस्सलता आहे, जुन्या चित्रविचित्र गोष्टी जतन करणारी म्युझियम्स आहेत... book piracy आहे, त्याचं समर्थन करणारी इंटरनेटी तरुणाई आहे.

नायक आणि कथानकात येणारी त्याची तरुण मित्रमंडळी यांची जी जबरदस्त ऊर्जा कादंबरीभर आहे, ती मला फार आवडली. लेखकाची शैलीही त्याच प्रकारची आहे. ते सगळं रसायन फार मजा आणतं. अर्थात, एक मात्र आहे, ही वाचन-मजा पुरेपूर उपभोगण्यासाठी इंटरनेटवर ऐसपैस बागडण्याचा अनुभव हवा; इंटरनेटी संज्ञांचा परिचय हवा; नाहीतर बर्‍याच गोष्टी डोक्यावरून जाऊ शकतात. (म्हणजे नेमकं काय ते जाणून घ्यायचं असेल तर ही ब्लॉगपोस्ट वाचा.)

पुस्तक वाचून झाल्यावर मी नेटवर त्याचे काही reviews वाचले, लेखकाचा एक इंटरह्यू वाचला. त्यातून समजलं, की पुस्तक प्रथम बाजारात आलं तेव्हा छापिल प्रतीच्या कव्हरवरची शीर्षकाची अक्षरं अंधारात चमकणारी केली गेली होती. त्याचा संदर्भ बहुदा book-store च्या दर्शनी भागाचं पुस्तकात जे वर्णन येतं त्याच्याशी असावा आणि त्या प्राचीन ’टाइप-फाँट’शीही असावा... ते वाचून वाटलं, की अरे, किंडलपेक्षा ते पुस्तक प्रत्यक्षातच हाती लागायला हवं होतं...

कादंबरी हेच सांगणारी आहे - नवनवं तंत्रज्ञान आत्मसात केलं तरी जुनी मूल्यं विसरून चालत नाहीत.

हा सार्वकालिक महत्वाचा विचार मांडण्यासाठी जे जगावेगळं कथानक निवडलं आहे, त्याची मजा म्हणजे हे पुस्तक!

(या पुस्तकाचं prequel ‘Ajax Penumbra’ हे पण विकत घेऊन ठेवलंय.)


Comments

Popular posts from this blog

इट्स टाइम फॉर आफ्रिका - १

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

पुस्तक परिचय : Educated (Tara Westover)