तंत्रज्ञान? नव्हे, ही तर बदलत्या काळाची सुरेखशी पाऊले!


नुकतीच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एका मोठ्या आणि प्रसिध्द दुकानात गेले होते. निमित्त होते तिथूनच काही महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या पेन-ड्राईव्हने अचानक संप पुकारण्याचे.
तो पेन-ड्राईव्ह घेतला तेव्हा एकतर मला दुकानात शिरल्या शिरल्या कॅश-काऊण्टरजवळच मिळाला होता. शिवाय त्यादिवशी मी जरा घाईतही होते; अवघ्या पाच-दहा मिनिटांत ती खरेदी उरकून बाहेर पडले होते. थोडक्यात, तेव्हा त्या दुकानात मला नीटसा फेरफटका मारता आलेला नव्हता. पण मग माझ्या दुसर्‍या फेरीच्या वेळी मात्र मी ती कसर भरून काढली. तसेही, दुकानातल्या तथाकथित ‘सेल्स-एक्झिक्युटीव’नामक मनुष्यविशेषाने मला त्या पेन-ड्राईव्हची निर्मिती करणार्‍या कंपनीच्या कार्यालयात जाण्याचा मौलिक सल्ला देऊन दोन मिनिटांत वाटेला लावलेच होते.
माझ्या फेरफटक्याची सुरूवात अर्थातच स्वयंपाकघरात वापरात येणार्‍या वस्तूंच्या विभागापासून झाली. वॉटर-प्युरिफायर्स्‌, मायक्रोवेव्ह ओव्हन्स्‌, मिक्सर-ग्राइण्डर्स्‌, सॅण्डविच-टोस्टर्स्‌, रेफ्रिजरेटर्स्‌ ही सर्व मंडळी आपल्याला ऐकून-पाहून-वापरून बर्‍याच वर्षांपासूनची तशी चांगली परिचित असलेली. पण त्यातही असलेली विविधता, तंत्रज्ञानाची जोड घेऊन त्यांतील प्रत्येक उत्पादनामार्फत देऊ केल्या गेलेल्या अनेक सुविधा हे सर्व मला तोंडात बोटे घालायला लावणारे आहे हे मला थोड्याच वेळात ध्यानात आले. ज्या वस्तू ऐकून-पाहून-वापरून माहित असल्याचा माझा समज होता, त्या सर्व वस्तू म्हणजे पुढ्यातल्या वस्तूंच्या आजी-आजोबा किंवा गेलाबाजार काका-मामा-मावश्या शोभतील अशा होत्या.
मग मी माझा मोहरा वळवला दिवाणखान्याची मक्तेदारी असलेल्या वस्तूंच्या विभागाकडे. तर, तिथेही तेच. आठ-दहा वर्षांपूर्वी घेतलेली आमची ‘स्टेट-ऑफ-द-आर्ट’ इ. इ. असणारी अशी घरातली म्युझिक-सिस्टिम, जिचा मला कोण अभिमान वाटत असे, ती तिथल्या उत्पादनांच्या पुढे मला अगदी ‘डब्बा’ वाटायला लागली. १९९९ सालच्या क्रिकेट-वर्ल्डकपच्या मुहूर्तावर घेतलेला घरचा अत्याधुनिक(!) टी.व्ही. आणि तिथे असलेले टी.व्ही. यांत चाळीतल्या दोन कळकट्ट खोल्या आणि बहुमजली इमारतीतले आलिशान घर इतका धडधडीत दृष्यात्मक आणि गुणात्मक फरक दिसायला लागला. त्यात पुन्हा, हाताची दहाही बोटे तोंडात घातली तरी कमी पडतील अशी होती त्यांच्या किंमतीतली तुलना. आमच्या ‘डब्बा’ म्युझिक-सिस्टिमसाठी आम्ही जितकी रक्कम तेव्हा मोजली होती, त्याच्या निम्म्या किंमतीत तीच कंपनी आता बरेच काही अधिक देऊ करत होती!
टचस्क्रीन किंवा थ्री-जी मोबाईल फोन्स्‌, लॅपटॉप्स्‌, आयपॅडस्‌ यांची तर बातच करायला नको. कारण, या वस्तू मुळातच अजून कधी माझ्या दैनंदिन वापरात आलेल्या नाहीत. त्यामुळे तुलना करणे, तोंडात बोटे घालणे याचा प्रश्नच उद्‌भवत नव्हता.
विविध प्रकारच्या केबल्स्‌, माईक-स्पीकर्स्‌ हेडसेट, निरनिराळे बॅटरी-सेल्स्‌ यांसारख्या गोष्टी तर तिथे असंख्य होत्या. मोठ्या, महागड्या वस्तूंच्या समोरची त्यांची उपस्थिती म्हणजे वाण्याच्या दुकानात बाहेर कुंचे-खराटे यांचे ढीग मांडलेले असतात, तशी होती. त्या वस्तूही मी तितक्याच डोळे विस्फारून निरखल्या, जितके पन्नास अन्‌ साठ इंची टी.व्ही. निरखले होते; लाख-दीड लाखाची होम-थिएटर्स्‌ डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न केला होता.
तासाभराने मी जेव्हा तिथून बाहेर पडले, तेव्हा थक्क झालेले, आश्चर्यचकित झालेले, ‘कमाल आहे खरंच’ किंवा ‘आता मात्र हद्द झाली’ अशा प्रकारचे सर्व भाव माझ्या चेहर्‍यावर पसरलेले होते. त्या तासाभरात मला जी प्रचिती आली होती, ती निव्वळ ग्राहकांना भुरळ पाडण्याच्या किंवा भरमसाठ उत्पादने त्यांच्या माथी मारण्याच्या वृत्तीचीच केवळ नव्हती हे मला जाणवले. तंत्रज्ञानाला हाताशी धरून त्याचा मेळ थेट आपल्या दैनंदिन जीवनाशी घालण्याच्या मानवी मेंदूच्या अचाट कल्पनाशक्तीला, बुध्दीच्या भरारीला, संशोधनक्षेत्रातल्या अथक परिश्रमांना माझ्यासारख्या एका मध्यमवर्गीय, मध्यमवयीन व्यक्तीने दिलेली ती एक पावतीच होती.

अशा प्रकारच्या दुकानांमधे जाऊन काही खरेदी करण्याची गेल्या काही वर्षांत कधी वेळच आलेली नव्हती, त्यामुळेच आपली अशी अवस्था झाली असावी असे एक सयुक्‍तिक कारण मी माझे मला सुरूवातीला देऊ केले. पण मग साधारण आठ-दहा वर्षांच्या कालावधीनेच असा परिणाम घडवून आणला हे जर खरे मानले, तर एक किंवा दोन पिढ्यांच्या अंतराने किती फरक पडत असेल, कसा अन्‌ काय परिणाम होत असेल हा विचार करून पाहण्याची मला आवश्यकता भासायला लागली. त्या ओघात पंच्याहत्तराव्या वाढदिवसाला मुलांनी प्रेमाने देऊ केलेला मोबाईल-फोन विनयाने नाकारणारी माझी आजी मला आठवली; स्वतःचे इ-मेल अकाऊण्ट उघडण्याच्या नातवंडांच्या आग्रहाला निग्रहाने नकार देणार्‍या माझ्या सासूबाई आठवल्या आणि तंत्रज्ञानाच्या साथीने नित्य नवे बदल घडणार्‍या आपल्या आयुष्याला सामोरे जातानाच्या निरनिराळ्या पिढीच्या प्रतिक्रियांचा एक ठराविक साचा माझ्या ध्यानात यायला लागला.
काळजीपूर्वक आठवण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या असे लक्षात येईल, की प्रत्येक पिढीनेच तंत्रज्ञानाची त्या-त्या काळातली ‘झेप’ आपलीशी केलेली आहे; किमान ती आपलीशी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तरी नक्कीच केलेला आहे. त्या-त्या पिढीच्या परिप्रेक्ष्यात तत्कालीन तंत्रज्ञानाच्या नवनव्या ‘जनरेशन्स्‌’ जसजश्या समोर येत गेल्या, तसतशी ही आपलीशी करण्याची प्रक्रिया अधिकाधिक जटील बनत गेली आणि मग एका टप्प्यावर प्रत्येक पिढीने थांबायचे ठरवले. हे नियम म्हणून नव्हे, पण प्रातिनिधिक स्वरूपात घडत आलेले आहे.
मोबाईल फोनला नकार देणार्‍या माझ्या आजीने सॅटेलाईट टी.व्ही.च्या अत्याधुनिक स्वरूपाला मात्र अगदी व्यवस्थित आपलेसे केले. पूर्वीचे दूरदर्शनचे दिवस, त्यानंतरची केबल-ऑपरेटर्स्‌ची मक्तेदारी, चॅनल्स्‌ची वाढती संख्या आणि आता सॅटेलाईट टी.व्ही. अशा स्थित्यंतरांनी ती कधी बावचळून गेलेली दिसली नाही. तिच्या आयुष्यात उशीराने प्रवेश केलेल्या टेलिव्हिजनवर अल्पावधीत जडलेले तिचे प्रेम त्या लाटेत पूर्णपणे अबाधित राहिले. तिच्या आधीच्या पिढीने रेडियो किंवा टेपरेकॉर्डरच्या बाबतीत हेच केलेले असणार.
माझ्या सासूबाई आजीच्या पुढल्या पिढीतल्या. या पिढीला मोबाईल-फोनचा कधी बाऊ करावासा वाटला नाही. ते छोटेसे यंत्र, त्यावरचे इवले-इवले आकडे, अक्षरे यांच्याशी त्यांनी नजरेची पुरेशी साथ नसतानाही अगदी व्यवस्थित जुळवून घेतले. पण कम्प्युटर, इण्टरनेट या गोष्टींना आपलेसे करताना या पिढीची जरा तारांबळ उडते हे नक्की! अर्थात, त्यात जगावेगळे, चुकीचे काहीही नाही. परदेशी राहणार्‍या आपल्या भाचरांशी किंवा नातवंडांशी संवाद साधण्यासाठी इण्टरनेट आणि ई-मेलपेक्षा या पिढीला मोबाईल फोन अधिक जवळचा वाटतो. किंबहुना, मोबाईल फोन असताना ई-मेल हवेच कशाला असाही त्यांचा रास्त सवाल असतो. तो त्यांच्यापुरता अतिशय सुयोग्य असाच आहे. दूरदेशी उडून गेलेल्या घरातल्या पाखरांची चिवचिव फोनमधे थेट ऐकायला मिळते ही त्यांच्यासाठी फार मोठी जमेची बाजू असते. हे ऐकून मग एखादा टीन-एजर नातू आपल्या आजीला व्हिडियो-चॅटची महती सांगायला लागतो; त्याच्या मदतीने नुसता आवाज ऐकण्यापेक्षा चेहराही पाहता येईल हे पटवून देऊ पाहतो. भूमिकांची अदलाबदल झालेली असते; ज्यांना लहानपणी काऊ-चिऊच्या गोष्टी सांगितल्या, तीच नातवंडे आता आपल्याला काहीतरी शिकवतायत याचे कौतुक या आजी-आजोबांच्या चेहर्‍यावर पसरलेले असते आणि थेट संवादाचा अभाव असण्याची कायमची तक्रार असण्याच्या युगात तंत्रज्ञानाच्याच विषयावर दोन पिढ्यांमधला एक नवा संवाद सुरू झालेला असतो.
आजारी असलेल्या आपल्या एका जुन्या मित्राला भेटायला शहरात आपल्या भाच्याकडे आलेले एखादे मामा-आजोबा; मित्राच्या घराचा पत्ता लिहिलेली कधीकाळची एक बारीकशी चिठ्ठी त्यांच्या खिश्यात जपून ठेवलेली असते. पण तो पत्ता स्वतःहून जाऊन शोधण्याचा आत्मविश्वास आता त्यांच्यात नसतो. मग त्यांचा भाचा विकीमॅपियावरून तो पत्ता अचूक शोधून काढतो, तिथल्या नव्या खाणाखुणा आजोबांना नीट समजावून सांगतो, इण्टरनेटच्याच माध्यमातून त्यांच्यासाठी एक खाजगी टॅक्सी आरक्षित करतो आणि आजोबा अगदी आरामात आपल्या मित्राला भेटायला जातात. मित्रावर दुर्बिणीद्वारे केल्या गेलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेबद्दल ऐकून प्रभावित होतात. परत आल्यावर वैद्यकीय विश्वात तंत्रज्ञानाने केलेल्या प्रचंड प्रगतीची आपल्या ‘नेट-सॅव्ही’ भाच्यालाच भरभरून माहिती देतात. पुढच्या वेळेला असाच एखादा जुना पत्ता शोधण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा आपणहून त्याला फोन करतात, ‘त्या तुझ्या ऑनलाईन का काय त्या नकाशात हा पत्ता सापडेल का रे?’ असे अगदी हक्काने विचारतात.
ही सुलभता, सुकरता ज्या तंत्रज्ञानाने आपल्याला देऊ केलेली आहे, त्याबद्दल तक्रार करण्याचा मुळात आपल्याला काही अधिकारच नाही. उलट शहरी विभागात राहणार्‍यांनी तर सतत हे ऋण मानले पाहिजे, की या तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्याजोगे वातावरण आपल्या आसपास सहज उपलब्ध आहे. या वातावरणाचा रेटा मानायचा, त्याखाली दबून जायचे, की त्या लाटेवर आरूढ होऊन नित्य नवे काहीतरी शिकत राहून आयुष्य आनंदाने व्यतित करायचे हे ज्याचे त्याने ठरवायला हवे. कारण बदलाला सामोरे जाणे तर अटळच आहे. जो हे करू शकत नाही, तो काळाच्या अथक दौडीत मागे पडतो. किंबहुना, तोच मग त्याला ‘बदलत्या काळाचा असह्य रेटा’ इ. विशेषणे देऊन गळे काढतो. आपल्या भवतालाचा असा रेटा आपल्यावर आहेच; पण त्याबद्दल सतत नकारार्थी विचार करणे ही पराभूत मानसिकता झाली.
उदाहरणार्थ, इण्टरनेट म्हणजे गटारगंगा, तरूण पिढीला नादी लावणारी तद्दन फडतूस गोष्ट असा विचार करण्यापेक्षा असा विचार करून पहा, की फेसबुकवर एखाद्या ‘फ्रेण्ड’ने टाकलेल्या फुलपाखराच्या सुंदर फोटोला आपण ‘लाईक’ करतो, तेव्हा त्याचा अर्थ ‘तुझा फोटो पाहिला रे, फारच छान काढलायस, तुझ्यात एक सुप्त फोटोग्राफर दडलेला आहे, बरं का, अशीच नजर आम्हालाही लाभती तर अजून काय हवं होतं, कधीतरी तुझ्याकडचे इतर फोटो पहायला वेळात वेळ काढून आलं पाहिजे’ इतका सारा होऊ शकतो. चॅटिंगला नाके मुरडण्याऐवजी कधीतरी असा विचार करून पहा, की चॅटिंगद्वारे विविध वयोगटातल्या लोकांशी आपल्याला संवाद साधता येऊ शकतो, जे प्रत्यक्षात कदाचित होऊ शकणार नाही. एखाद्या सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमात बहुतेकवेळा समवयस्क मंडळींचे कंपू जमतात, गप्पा होतात; त्यात गैर काहीही नसले, तरी अन्य वयोगटांशी बरोबरीच्या नात्याने चर्चा करण्याची सर्वाधिक संधी आपल्याला ऑनलाईन चॅटिंगद्वारे मिळू शकते.
तंत्रज्ञानाच्या ताकदीची खरी आणि परिपूर्ण ओळख आपणच आपल्या पुढल्या पिढीला करून द्यायची असते. त्याने आरोग्यावर घातक परिणाम होतील असा सरसकट शेरा मारण्यापेक्षा त्याच्या मदतीनेही आरोग्यदायी जीवन व्यतित करणे किती महत्त्वाचे आणि तरीही शक्य आहे हे आपणच त्यांना पटवून आणि मुख्य म्हणजे आपल्या कृतीतून दाखवून द्यायचे असते आणि त्यासाठी आपण आपल्या दृष्टीकोनात आधी बदल करायला हवा.
कारण, शेवटी कुणी स्वीकारो अथवा नाकारो, तंत्रज्ञानाची घोडदौड ही सुरूच राहणार. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनातला हिस्सा सतत वाढताच राहणार. मानवी मेंदूची त्यावर विचार करण्याची ताकददेखील दिवसेंदिवस वाढतीच असणार. तेव्हा ‘गेले ते दिवस’ असे सुस्कारे टाकण्यापेक्षा या तंत्रज्ञानाने भरलेल्या आणि भारलेल्या काळाच्या मुशीत स्वतःला सकारात्मक रीतीने घडवून घेणे केव्हाही आपल्या फायद्याचेच.

Comments

आता याच तंत्रज्ञानामुळे तुमच्यासारखे मित्र मिळाले हे काय वेगळे सांगायला हवं? मस्त लिहिलंय.

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)