पुस्तक परिचय - ’पंखाविना भरारी’


व्हीलचेअरवर बसलेले एखादे अपंग मूल आणि सोबत त्याचे पालक असे दृष्य सार्वजनिक ठिकाणी कधी दिसले, तर आपण काय करतो? तर, त्या मुलाचे अपंगत्त्व नक्की कशा प्रकारचे आहे त्याच्या तपशीलात शिरण्याच्या फंदात न पडता आधी नुसते हळहळतो, मग जे ‘त्यांच्या’ नशीबी आले ते आपल्याला भोगावे लागत नसल्याबद्दल मनोमन देवाचे आभार मानतो आणि पुढे चालायला लागतो. बस्स!
काही वर्षांपूर्वी प्रसाद घाडी या शाळकरी वयाच्या मुलाला ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात गाताना जेव्हा मी टेलिव्हिजनच्या पडद्यावर प्रथम पाहिले, तेव्हाही त्याच्या व्हीलचेअरकडे पाहून मनोमन चुकचुकणे हीच माझी प्रमुख प्रतिक्रिया होती. पुढे काही दिवस त्याचा प्रसन्न चेहरा, खड्या आवाजातले गाणे आठवत राहिले; नंतर ते ही विसरायला झाले.
‘पंखाविना भरारी’ हे शरयू घाडी यांनी लिहिलेले पुस्तक हातात आल्यावरही ‘हाच तो, त्या कार्यक्रमात व्हिलचेअरवर बसून गायलेला मुलगा’ हेच आधी डोक्यात आले. त्याचे व्हिलचेअरवरचे जखडले जाणे हे असे नकळत मनात रुतून बसलेले होते. व्हिलचेअरवर बसून घराबाहेर जाणे तर दूरच, मुळात अंथरुणातून उठून, खरेतर कुणीतरी दुसर्‍याने उठवून व्हिलचेअरवर बसते करणे, हाच ज्याच्यासाठी मोठा बदल होता, अशा या प्रसाद घाडीची कथा त्याच्या आईने ‘पंखाविना भरारी’द्वारे पुस्तकरूपाने वाचकांसमोर ठेवलेली आहे.
पुस्तकाला हात घालताना, एक आई म्हणून, माझे हात किंचित कापलेच. दुसर्‍याच्या लेकराच्या व्यंगात आपण आपला विरंगुळा शोधायचा या कल्पनेने कसेतरीच झाले. पण पुस्तकाच्या सुरूवातीच्या काही पानांतच माझी ही कल्पना चुकीची ठरल्याचे माझ्या लक्षात आले. या मुलाची, त्याच्या पालकांची, त्या घराची काय अवस्था झाली असेल, त्यांना कोणत्या दिव्यातून जावे लागले असेल, कशाकशाला तोंड द्यावे लागले असेल हा विचार सुरूवातीला मनाला त्रस्त करत होता. पण स्पायनो मस्क्युलर अ‍ॅट्रोपी या दुर्धर जनुकीय रोगाने ग्रासलेल्या आपल्या मुलाबद्दल लिहिताना शरयू यांनी कुठेही गळेकाढू सुरात लेखन केलेले नाही, किंवा ‘पहा, आमच्याच वाट्याला कसे हे भोग आले’ असा राग आळवलेला नाही. घाडी दांपत्याची ही सकारात्मक विचारसरणी पुस्तकभर जाणवते.
प्रसादला तल्लख बुध्दी, सुरेल गळा, कलेची आवड आणि लाघवी स्वभाव याची देणगी मिळालेली होती. त्याच्या पालकांनी त्याच्यातल्या या गुणांना सतत प्रोत्साहन दिले. गायन, चित्रकला याचे शिक्षण त्याला मिळावे यासाठी सर्वतोपरी धडपड केली. योग्य वेळी योग्य ती माणसे हेरली; जोडली; त्यांना जणू आपल्या कुटुंबात सामावून घेतले आणि प्रसादच्या उण्यापुर्‍या एकवीस वर्षांच्या संपूर्ण परावलंबी आयुष्यात एक सकारात्मक आनंद भरला. त्यांच्या या धडपडीचीच ही कहाणी आहे.
या लेखनाला पुस्तकलेखनाचे सर्वमान्य निकष लावले जाऊ नयेत असे म्हणावेसे वाटते. कारण हे एका आईने सांगितलेले आपल्या मुलाचे कौतुक आहे. त्यात त्याच्या शाळाशिक्षणासाठी करावी लागलेली धडपड आहे, त्याच्या परिक्षेसाठी लेखनिक मिळवताना आलेले कडूगोड अनुभव आहेत, विविध शाळांमधे भेटलेले माणसांचे मासलेवाईक नमुने आहेत. या सर्व बर्‍यावाईट अनुभवांमधून एकच झाले, की एक कुटुंब म्हणून या तिघांचे बंध अधिकाधिक घट्ट होत गेले. प्रसादचे संगोपन करताना त्याच्या पालकांना व्यक्तिगत आयुष्यात जी काही तडजोड करावी लागली असेल, त्याची कल्पनाच न केलेली बरी. पण काही ओझरते उल्लेख सोडले, तर त्याबद्दलही कुठेही तक्रारीचा सूर लावलेला दिसत नाही.
प्रसादच्या आजाराबद्दल समजल्यावरचा सुरूवातीला बसलेला धक्का, घरातल्यांची प्रतिक्रिया, मग सुरू झालेला त्या कुटुंबाचा दैनंदिन झगडा, त्यापश्चात त्याचे शाळाशिक्षण, गायन, चित्रकला प्रशिक्षण, त्याने मिळवलेल्या विविध पुरस्कारांचे विवरण अशा प्रकरणांमधे पुस्तकाची विभागणी केली गेली आहे. त्यांपैकी (तेव्हाचे राष्ट्रपती) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याशी झालेली भेट किंवा प्रसादने दुबईत केलेला गाण्यांचा कार्यक्रम यांची वर्णने अतिशय हृद्य आहेत. प्रसादच्या बाबतीत जे काही चांगले घडत गेले, त्याबद्दल शरयू यांनी भरभरून लिहिले आहे. या एकवीस वर्षांमधे जे सुहृद मिळाले, त्यांचा आवर्जून कृतज्ञतापूर्ण उल्लेख केला आहे.
सप्टेंबर २००९मधे तब्ब्येत अतिशय खालावल्याने प्रसाद हे जग सोडून गेला. त्याच्या मृत्यूपूर्वीच्या २-३ दिवसांचे अगदी सविस्तर वर्णन शेवटच्या प्रकरणात आहे. संपूर्ण पुस्तकभरच भरून राहिलेली शरयू यांची तटस्थता या प्रकरणात सर्वाधिक जाणवते.
प्रसादचे संगीत-शिक्षक प्रदीप श्री. जोशी, चित्रकला-शिक्षक दिगंबर चिचकर, त्याच्या चित्रकलेमुळे त्याचे दोस्त बनलेले सूर्यकांत जाधव यांची मनोगते पुस्तकाच्या शेवटी दिलेली आहेत. ती देखील वाचनीय आहेत.
पुस्तकात प्रसादचे विविध फोटो आणि त्याने काढलेली चित्रे देखील आहेत. मुखपृष्ठावरही त्याने काढलेलेच चित्र आहे - ढगांमधे आपल्या पंखांनी विहरत वाचन करणारा एक मुलगा आणि खाली पृथ्वीवर दिसणारी एक रिकामी व्हीलचेअर - हे चित्र पाहून एकाच वेळी मनात गलबलते आणि त्याच्या कल्पकतेचे कौतुकही वाटते. आपल्या हातांची केवळ कोपरापुढेच थोडीशी हालचाल शक्य असताना त्याने काढलेली चित्रे खरेच अचंबित करणारी आहेत. दुर्दम्य इच्छाशक्तीविना हे शक्य झाले नसते. त्याच्यातल्या याच गुणाचा त्याच्यासारख्या इतरांना फायदा व्हावा या उद्देशानेच हे लेखन केले गेल्याचे मनोगतात म्हटले आहे, जे खरेच आहे.
आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यातील छोट्या-मोठ्या अडचणी, समस्यांची जेव्हा तक्रार कराविशी वाटते, तेव्हा अशा एखाद्या प्रेरणादायी गाथेने सकारात्मक विचार करायला शिकवले तर त्याहून उत्तम दुसरे काही नाही. त्याद्वारे आपल्या अडचणीतून बाहेर पडण्याचा थेट मार्ग जरी दिसला नाही, तरी त्याचा शोध घेण्याची उमेद आपल्याला मिळते.
**********
पंखाविना भरारी
शरयू घाडी
ग्रंथाली. पृष्ठे १५२. मूल्य २०० रुपये.

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)