दोन अनुत्तरित, गहन प्रश्न.
रोजच्यासारखीच एक घाईगर्दीची सकाळ. नवरा ऑफीसला निघून गेलेला होता; माझ्या कामांचं पहिलं सत्र आटोपलं होतं. (रोजच सकाळी नवरा एकदा(चा) घराबाहेर पडला की मला उगीचच एखादा गड सर केल्यासारखं वाटतं.) थोड्याच वेळात माझ्या तीन-चार वर्षांच्या मुलाला शाळेत सोडायला जायचं होतं. माझी कामाची घाई आणि त्यात मुलाची लुडबुड सुरू होती. त्याच्याबरोबर काहीतरी गाणी म्हणत, बडबड करत मी आता त्याचा किल्ला लढवत होते. मध्येच तो थोडा वेळ दुसऱ्या खोलीत जायचा आणि काही न सुचल्यासारखा परत यायचा. असं तीनचारदा झालं आणि अचानक त्यानं मला प्रश्न केला - "आई, चिमणी का असते गं? "... भरधाव वेगाने निघालेल्या गाडीसमोर अचानक एखादी म्हैस वगैरे यावी तशी मी गप्पकन थांबले. एखाद्या नवशिक्या गोलंदाजानं ऐन भरातल्या फलंदाजाला अनपेक्षितरित्या चकवून बाद करावं तसं माझ्या मुलानं हा प्रश्न विचारून मला ’क्लीन बोल्ड’ केलं. क्षणभर मी करत असलेलं काम विसरले. चिमणी का असते? म्हणजे?? मला वाटलं आपण ऐकण्यात काहीतरी चूक केली असेल. म्हणून त्याला परत विचारलं. तर मगाचच्या त्या फलंदाजाच्या विकेटचा ’ऍक्शन रीप्ले’ पाहावा लागला... "चिमणी का असते? ...