... आणि कल्पनेचं वारू (कायमचं) खाली बसलं!

'स्त्री' मासिकाच्या ऑगस्ट-२०११च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला.
-----------------------------------------------------

खाद्यपदार्थांच्या काही जोड्या या ऐकताक्षणी विजोड वाटतात. जसं पिठलं-पोळी. म्हणजे, वेळप्रसंगी भुकेला ही जोडी काही वाईट नाही पण पिठलं-भाकरी ची मजा त्यात नाही हे ही खरं. आमटीभात किंवा आमटीभाकरी खाणाऱ्याला पोट भरल्याचं समाधान नक्कीच वाटेल. पण आमटी-ब्रेड? झालं ना तोंड वाकडं? चिवड्यावर दही किंवा ताक अनेकजण घेतात पण चिवड्यावर दूध कसं लागेल? किंवा चकली दुधात बुडवून खाल्ली तर? तर काही नाही; फक्त दिवाळी, फराळ आणि एकंदरच मराठी खाद्यसंस्कृतीचा बट्ट्याबोळ ठरलेला!... कल्पनेचं वारू चौखूर उधळवून सुद्धा या पलिकडे मला उदाहरणं सुचेनात. पण कधी कधी प्रत्यक्ष आयुष्यातच असे अनुभव येतात की ते वारू देखील उधळणं विसरून, आपले चारही खूर आवरून मटकन खाली बसतं. आता हेच पाहा ना...

सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक उच्चशिक्षित उत्तर भारतीय कुटुंब राहत असे. (पुढे येणाऱ्या वर्णनाचा त्यांच्या उत्तर भारतीय असण्याशी काहीही संबंध नाही. तेव्हा कृपया... सूज्ञांस अधिक सांगणे न लगे. ) माझ्याच वयाची असल्यामुळे म्हणा पण त्या गृहस्वामिनीशी माझी बऱ्यापैकी ओळख होती. बऱ्याचदा आमच्यात पदार्थांची देवाणघेवाणही चालायची. आपल्या मराठी पदार्थांचं मी नेहेमी तिच्याजवळ वर्णन करत असे आणि गप्पांमधून मला हे ही कळलं होतं की तिला विशेषतः आपले गोड पदार्थ खूप आवडायचे.
श्रावणातले दिवस होते. नारळीपौर्णिमेनिमित्त घरात नारळीभात केलेला होता. नारळीभाताचा नमुना तिच्याकडे पोहोचवायची मला हुक्की आली आणि तसा मी तिला तो दिला. दुसऱ्या दिवशी ती डबा परत करायला आली. गोष्ट एवढ्यावरच थांबवायची की नाही? पण नाही! त्या नारळीभातावरच्या तिच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची अजून एक हुक्की मला स्वस्थ बसू देईना. (कारण त्या कुटुंबानं तो पदार्थ प्रथमच पाहिला होता हे मला आदल्या दिवशी समजलं होतं. )
(मूळ संवाद हिंदीत होते. )
"कसा वाटला कालचा भाताचा प्रकार?"
"फारच छान. एकदम चविष्ट."
"त्यावर तूप-बिप घालून खाल्लंत की नाही?" (स्वस्थ बसू न देणारी) हुक्की क्र. तीन.
"नाही, नाही. आम्ही त्याच्यावर दही घालून खाल्लं. फारच मजा आली जेवायला!!"
... दही? मजा?? माझा चेहेरा कसानुसाच झाला. मला हसावं की रडावं ते कळेना.
’नारळीभात, दही आणि मजा’ हा तिढा मला आजतागायत सुटलेला नाही. तरी, दहीयुक्त नारळीभाताची ती सृष्टी दृष्टीआडच ठेवल्याबद्दल मी दैवाचे आजही आभार मानते. पण अजून एका विजोड जोडीचं तर ’थेट प्रक्षेपण’ पाहणं आमच्या नशिबात होतं, ते असं...

काही वर्षांपूर्वीचा, जुलै-ऑगस्ट महिन्यातलाच एक दिवस. बाहेर पाऊस अक्षरशः ओतत होता. दुपारपासूनच वीज गायब होती. घरात पार गुडुप अंधार होण्यापूर्वीच मी रात्रीच्या जेवणासाठी ’फ्राईड राईस’ करून ठेवला होता - एक पदार्थ, एक जेवण! आणि स्वतःच्याच कल्पकतेवर खूष होऊन मजेत खिडकीतून बाहेर पाऊस बघत बसले होते. इतक्यात परगावच्या आमच्या एका स्नेह्यांचा "जेवायला आणि रात्रीच्या मुक्कामाला येत आहे" असा फोन आला. (ते त्यांच्या कामासाठी आमच्या गावात आले होते. आपण सोयीसाठी त्यांना काका म्हणू. )
जेवणात नुसता फ्राईड राईस काकांना आवडेल न आवडेल असा विचार मनात आला आणि पावसाची मजा वगैरे सगळं विसरून मी लगेच उठले. रोजच्यासारखाच साधा स्वयंपाक - म्हणजे पोळीभाजी, आमटीभात - मी मेणबतीच्या उजेडात उरकला.... सगळे जेवायला बसलो.
"काका, मी खास काही केलेलं नाही. रोजचेच पदार्थ आहेत."
"अगं, असू दे. मला काहीही चालतं."
मग हे आधी नाही का सांगायचं? (मी, मनातल्या मनात! )
...गप्पाटप्पा करत जेवणं चालू होती. काकांना ’काहीही’ चालतं हे कळल्यामुळे मी त्यांच्यासमोर पांढरा भात आणि फ्राईड राईस असे दोन्ही पर्याय ठेवले.
"वाढ गं काहीही. मला काहीही चालतं." पुन्हा तेच!
’काहीही चालतं’ची वारंवार उद्घोषणा झाल्यामुळे मी त्यांच्या पानात फ्राईड राईस वाढला. माझ्या आंतरराष्ट्रीय पाककलेचा त्यांच्यावर प्रयोग करायची मलाच नस्ती हौस आली होती. आता काका तो फ्राईड राईस खातील आणि शिष्टाचाराला अनुसरून जरा "वा!" वगैरे म्हणतील अश्या स्वप्नरंजनात मी मग्न होते. इतक्यात...

... इतक्यात, काकांनी पानातली वाटीभर आमटी त्या फ्राईड राईसवर वाढून घेतली!! ’अरे, मुझे कोई बचा ऽ ऽ ओ! ’ असं मला ओरडावंसं वाटलं. (रामायणातल्या सीतेच्या "हे धरणीमाते मला पोटात घे" या उद्गारांचं ’बचा ऽ ऽ ओ!’ हे आधुनिक रूप समजावं. ) मी आणि माझ्या नवऱ्यानं पटकन एकमेकांकडे पाहिलं. (बॅटन-रीले शर्यतीत घेणाऱ्याच्या हातातून बॅटन खाली पडलं की ते देणारा आणि घेणारा एकमेकांकडे असंच बघत असतील. ) अश्या प्रसंगी ’हसावं की रडावं' हे दोनच पर्याय का उपलब्ध असतात? हसावं, रडावं की अजून तिसरंच काहीतरी करावं काही उमगेनासंच झालं. ’काहीही चालतं’ हे काकांनी प्रात्यक्षिकासह सिद्ध करून दाखवलं होतं. ’वाचवा ऽ ऽ’ चा मनातला आकांत काही थांबायचं नाव घेत नव्हता. त्यानंतरचं माझं जेवण मी कसं पूर्ण केलं मला काहीही कळलं नाही.

आजही चिंचगुळाची आमटी केली की मला हटकून फ्राईड राईस आठवतो. त्यावर ती आमटी ढसाढसा रडते. तिकडे कुठल्यातरी चिनी स्वयंपाकघरात तो फ्राईड राईसही उचकी लागल्यामुळे चिनी भाषेत वैताग व्यक्त करतो.
कल्पनेच्या वारूला झीट आलेली असते...

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)