पुस्तक परिचय : The Pinocchio Brief (Abi Silver)

एका शाळाशिक्षकाचा खून होतो. एका विद्यार्थ्याला अटक होते. तो विद्यार्थी अभ्यासात हुशार असतो. त्या शिक्षकाचा लाडका असतो. पण प्रथमदर्शनी पुरावे सगळे त्याच्या विरुद्ध असतात.

एक तरुण वकील मुलगी, तिला या केसमध्ये रस निर्माण होतो. तिचं वकिली मन म्हणतं की तो मुलगा निर्दोष आहे. ती एका निवृत्त वकील बाईला ही केस लढवण्याची गळ घालते. ती बाई तयार होते.
त्या दोघी केसशी संबंधित लोकांशी बोलतात. शाळा परिसराची माहिती घेतात. त्यातून खटला उभा राहतो.
तो कोर्टरूम ड्रामा म्हणजे ही कादंबरी.

यात Pinocchio हा एक फिक्शन-फँटसी अ‍ॅन्गल आहे. Pinocchio हे एक सॉफ्टवेअर असतं. आरोपीची साक्ष सुरू असताना आरोपीच्या चेहर्‍यावर त्याचा कॅमेरा रोखलेला असतो. आरोपी प्रश्नांची उत्तरं खोटी सांगतोय की खरी, हे त्याच्या चेहर्‍यावरचे बारीकसारीक, सूक्ष्म बदल टिपून सांगणं, हे त्या सॉफ्टवेअरचं काम. आधी काही वर्षं सॉफ्टवेअरचं टेस्टिंग झालेलं असतं. त्यातून सरकारने ते प्रत्यक्ष खटल्यांमध्ये वापरायला परवानगी दिलेली असते. ज्येष्ठ वकील बाईला ते मंजूर नसतं, कारण त्या सॉफ्टवेअर निर्मितीच्या काळातल्या काही गोष्टी तिला माहिती असतात. पण ती त्याचा वापर पूर्ण रोखू शकत नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर खटल्यातले सवाल-जवाब, युक्तीवाद, शह-प्रतिशह, कुरघोडी - हे सगळं मस्त लिहिलं आहे. वाचायला मजा येते.
आरोपी मुलाची हुशारी कुठे कुठे काम करते, ते जबरी वापरलंय. एकदम डोकेबाज पात्र (आणि डोकेबाज लेखिका). तो सगळा भागही थ्रिलिंग आणि एन्गेजिंग आहे.
लेखिका ब्रिटिश आहे. कथानक ब्रिटिश वातावरणातलं आहे. ते वातावरण मस्त उभं केलंय. काही काही शब्दयोजनाही टिपिकल ब्रिटिश आहेत.

कादंबरीचा आकार मात्र जरा पसरट आहे. त्यामुळे कुठे कुठे ड्रॅग होते.
पण तरी टाइमपास वाचन म्हणून एकदा वाचण्यासारखी नक्की आहे. Whodunnit पेक्षा खटल्याचा प्रवास गुन्हेगारापर्यंत कसा पोचतो, त्यावर अधिक फोकस आहे.

Comments

Popular posts from this blog

एका शर्टाची गोष्ट

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

पुस्तक परिचय : The 1982-83 Bombay Textile Strike (Hub Van Wersch)