पुस्तक परिचय : The 1982-83 Bombay Textile Strike (Hub Van Wersch)

 The 1982-83 Bombay Textile Strike

And the unmaking of a Labourers' City (Hub Van Wersch)


Social Anthropologist लेखकाने मुंबईत गिरणी कामगारांसोबत राहून, त्यांच्या मुलाखती घेऊन, तेव्हाची वर्तमानपत्रं पालथी घालून, तत्कालीन सामाजिक, राजकीय नेत्यांशी बोलून तपशीलांचं, माहितीचं वस्तुनिष्ठ ॲनालिसिस करून हे पुस्तक लिहिलं आहे.

पुस्तक दोन भागांमध्ये विभागलेलं आहे. पहिला भाग - The Story Of The Strike. यातलं पहिलं प्रकरण Significance of the Textile Industry जबरदस्त आहे. भारतातला आणि खासकरून मुंबईतला कापड गिरण्यांचा इतिहास, सामाजिक-व्यापारी महत्त्व, इथली सामाजिक वीण घडवण्यामागे या उद्योगाचा असणारा सहभाग, कापड उद्योग आणि तंत्रज्ञान, कामगार संघटना, जुने संप/संपांचे प्रयत्न, असं बरंच...बरंच...बरंच...काय-काय त्यात वाचायला मिळतं.

वाचताना कुठे कुठे पेशन्सशी हाणामारी करावी लागते. पण घडलं हे असं असं घडलं, हा लेखनाचा सूर पाहून आपण पुढे वाचत जातो. हे रिसर्च पद्धतीचं लेखन आहे याची सतत आठवण ठेवली तर जरा सोपं जातं. पुढची दोन प्रकरणं (The Strike, Strike Strategies) प्रत्यक्ष संपाबद्दल बोलतात. पॉप्युलर मीडियामध्ये संपाचं, डॉ. दत्ता सामंतांचं जे जे वर्णन केलं गेलं ते किती दिशाभूल करणारं होतं ते इथे साधार दाखवून दिलं आहे. गिरणी कामगार आणि दत्ता सामंत ही युती घडली कशी, यामागचेही सविस्तर तपशील दिले आहेत. ते इंटरेस्टिंग आहेत. कुठलीही एक बाजू न घेता, चूक/बरोबरचा न्यायनिवाडा न करता, पण सौम्य भाषेत खणखणीत प्रतिपादन, ही पुस्तकातली सतत जाणवणारी गोष्ट. पहिल्या विभागातलं चौथं प्रकरण आहे The Aftermath. या प्रकरणात ललित वळणाचं लेखन करण्याला पुरेपूर वाव होता; पण लेखकाने आपला वस्तुनिष्ठ बाणा कुठेही सोडलेला नाही.

पहिला विभाग संपतो तेव्हा वाचक म्हणून existential प्रश्न पडू शकतात. त्यांनी रिसर्च केला वगैरे ठीके, आपण ते सगळं वाचायलाच हवं असं कुठेय, असं स्वतःलाच म्हणावंसं वाटतं. पण त्याचवेळी पुस्तकाचा दुसरा भाग ३३३ व्या पानाच्या आडून ‘कुकुक्क’ करत असतो.

दुसर्‍या भागात ५ कामगारांच्या केस स्टडीज आहेत. हे पाचही कामगार संपाची प्रत्यक्ष झळ बसलेले, काम सुटलेले, वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीतले आहेत. लेखकाने त्यांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या होत्या. त्या मुलाखतीचे प्रश्न एका परिशिष्टात दिले आहेत. मी आधी जाऊन ते प्रश्न वाचले. आणि existential शंका दूर सारून दुसरा भाग वाचायला सुरुवात केली. त्या पाच केस स्टडीज, त्यांचं ॲनालिसिस सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे.

पुस्तकात जागोजागी भरपूर आकडेवारी, तक्ते, टक्केवारी इ. आहेत. नुसतं त्या तक्त्यांची टायटल्स, कॉलम हेडिंग्ज, summaries वाचणं हा सुद्धा उत्तम टाइमपास होऊ शकतो. त्या तक्त्यांमधून, टेबल्समधून इ-त-के बारीकसारीक तपशील, तथ्यं समजतात, की ज्याचं नाव ते. लेखकाकडे तेव्हा जी जी माहिती, आकडे जमा झाले असतील त्यातून त्याने कसकशी छाननी केली असेल, या विचाराने धाप लागते.

केवळ या पाच कामगारांच्या मुलाखतींपुरतंच नव्हे, तर एकूण या रिसर्चसाठी लेखक मुंबईतल्या चाळींत, कामगारांसहित, कामगारांच्या परिस्थितीत वर्षभर राहिला. हे समजल्यावर मला त्या माणसाला दंडवत घालावासा वाटला.

प्रत्येक प्रकरणाला शेवटी भ-र-पू-र footnotes आहेत. सुरुवातीला काही पानं मी त्या footnotes इग्नोर केल्या होत्या. पण ते चुकीचं होतं, हे लक्षात आलं. मग इमानेइतबारे superscript चा नवीन आकडा दिसला की प्रकरणाच्या शेवटी जाऊन ती-ती तळटीप वाचायला सुरुवात केली. वाचताना त्याचा उपयोग होतोय हे दिसलंच लगेच. पुस्तकात तीन बुकमार्क्स सतत ठेवावे लागले- प्रत्यक्ष पान नंबर, त्या प्रकरणाच्या तळटिपांचा पान नंबर आणि शेवटच्या परिशिष्टांचा पान नंबर. कारण हे सर्व पॅरलली वाचावं लागतं.

अशा तपशीलांमध्ये, आकडेवारीमध्ये, तळटिपांमध्ये मुख्य विषय हरवला आहे का? तर, अजिबात नाही. सोशल रिसर्च कसा असतो, कसा मांडायला हवा, आणि तो कसा consume करायला हवा, हे सगळं या पुस्तकामुळे समजतं.

गिरणी कामगारांच्या संपाकडे इतक्या अभ्यासू दृष्टीने इतर कुणीच पाहिलेलं नाही असं पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये आणि प्रस्तावनेतही म्हटलं आहे. एक परदेशी संशोधक मुंबईत येऊन, गिरणी कामगारांसोबत त्यांच्या चाळीत, त्यांच्या खोल्यांमध्ये राहून हे का करतो?

लेखकाचा मुंबईशी जुना संबंध आहे. त्याची पत्नी मराठी आहे. संप सुरू झाला तेव्हा तो आपल्या एका वेगळ्या संशोधनप्रकल्पासाठी मुंबईत आला होता. ’संपाची व्याप्तीच अशी होती, की मी त्यापासून दूर राहू शकलो नाही’ असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे. त्याने या संपाची तुलना इंग्लंडमधल्या खाणकामगारांच्या संपाशी केली आहे. त्या संपाची व्याप्ती तुलनेने लहान होती. लेखक म्हणतो, ’मुंबईतल्या संपाच्या व्याप्तीइतका संप तिकडे झाला असता तर आजवर त्यावर आधारित अनेक अभ्यास, रिसर्च प्रोजेक्ट्स आले असते.’ आणि आपल्याकडे त्याची पूर्ण वानवा आहे.

या पुस्तकाबद्दल ५-६ वर्षांपूर्वी पहिल्यांदा लोकसत्ता-बुकमार्कमध्ये वाचलं होतं. तेव्हापासून पुस्तक वाचनयादीत होतं.

मुंबईतल्या गिरणी कामगारांचा संप हा विषय मला कायमच खूप जवळचा वाटत आलेला आहे. घरातलं/परिचयातलं कुणी त्या संपात होतं का? माहितीतल्या कुणाला त्या संपाची प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष झळ बसली होती का? तर, नाही.

तरीही.

अर्धवट कळत्या वयात संपाबद्दलच्या बातम्यांच्या पेपरातल्या फक्त हेडलाइन्स वाचल्या गेल्या असतील/नसतील. तेव्हा दूरदर्शनवर ’कामगार विश्व’ कार्यक्रमात अधूनमधून गिरणी कामगारांच्या समस्यांवर नाटुकल्या दाखवल्या जायच्या, त्या पाहिल्या असतील. संपाचा social impact इ. समजण्याचंही तेव्हा वय नव्हतं. तरीही २०-२५ वर्षांनी एकदा मुंबईत फिनीक्स मिल कम्पाउंडमधल्या मॉलमध्ये गेले तेव्हा आधी त्या मॉलचा, खरं म्हणजे मॉल जिथे उभा आहे त्या जागेचा, भूतकाळच नजरेसमोर आला. कसं असेल तेव्हा इथलं चित्र, इथलं वातावरण, हा विचार डोक्यात आला. लालबाग-परळ भागात क्वचित कधी जाणं झालं तरी कायम हेच होतं. प्रस्तुत पुस्तकाचं उपशीर्षक- the unmaking of a Labourer's City- तिथे समोर दृश्यरूपात उलगडलेलं असतं. त्या रुपाकडे बघायचं की नाही हा ज्याचा-त्याचा प्रश्न. त्यात चूक/बरोबर काही नाही. पण माझ्या पोटात दरवेळी तुटतं.

असं पोटात तुटणं, हेच हे पुस्तक वाचण्यामागचं माझं एकमेव कारण होतं. नाहीतर या ५००+ पानी ठोकळ्याकडे कदाचित लक्षही गेलं नसतं.


Comments

Popular posts from this blog

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

पुस्तक परिचय : बाळूच्या अवस्थांतराची डायरी (किरण गुरव)

एका शर्टाची गोष्ट