सेंट मार्क्स स्क्वेअर : एक जातिवंत ‘इतालियानो’ अनुभव
जर्मनीच्या नितांतसुंदर ब्लॅक-प्लॉरेस्टला टाटा करून , ऑस्ट्रियातल्या एका भोज्याला शिवून आता इटलीतल्या व्हेनिसकडे निघालो होतो , तिथला ‘सेंट मार्क्स स्क्वेअर’ पाहायला. व्हेनिस शहराबद्दल ‘कालव्यांचं शहर’ आणि ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या उल्लेखांपलिकडे कधीही काहीही ऐकलेलं नव्हतं. सेंट मार्क्स स्क्वेअरबद्दल तर प्रश्नच उद्भवत नव्हता. तरी , ‘ व्हेनिससारख्या पुरातन शहरात जाऊन पाहायचं काय , तर एक चौक ?’ ही होती माझी पहिली प्रतिक्रिया! चार रस्ते जिथे एकत्र येतात अशी जागा म्हणजे ‘चौक’ ही आपली व्याख्या त्याला कारणीभूत होती. पण पुढल्या काही तासांत मी माझ्यापुरती तरी ती व्याख्या सुधारून घेणार होते. मुंबईतल्या ‘मे’च्या उकाड्यातून आम्ही युरोपच्या थंडीत पाय ठेवल्याला दहा-बारा दिवस होऊन गेले होते. पैकी गेले पाच-सात दिवस तर आल्प्सच्या अंगणातच होतो. पण इटलीचा रस्ता पकडून जेमतेम तासभरही झाला नसेल तोवर आधीचा आठवडाभर क्षितिजावर सतत सोबत असणारी आल्प्सची शिखरं डोळ्यांसमोरून बघताबघता गायब झाली. त्याच्याच आगेमागे कुठेतरी आमची बस ऑस्ट्रियातून इटलीत शिरली होती. युरोपमध्ये फिरताना ही एक फार मजा होती. कधी या ...