जागरूक नागरिक ऊर्फ मोरू

जागरूक नागरिक असणं म्हणजे स्वतःचा मोरू करून घेणं...
गेला आठवडाभर सर्व वर्तमानपत्रांमधून ’जागरूक नागरिकांना’ आवाहन करण्यात येत होतं, की मतदारयादीत आपलं नाव असलं, तरी सोबत छायाचित्र आहे की नाही याची पडताळणी करणं देखील अत्यावश्यक आहे. यास्तव निवडणूक आयोगातर्फे कालच्या रविवारी देशभर एका विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ’जागरूक नागरिकांनी’ इतकंच करायचं होतं, की आपापल्या मतदानकेंद्रांवर जाऊन या नाव-छायाचित्र जोडीची पडताळणी करायची होती. जर कुणाचं नाव मतदारयादीत अजून समाविष्ट झालेलंच नसेल, तरी तिथल्या तिथे फॉर्म भरून ते करण्याची ’अमूल्य संधीही’ देऊ करण्यात आलेली होती.
आमच्या घरातला एक जागरूक नागरिक... गेल्या वर्षी वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेला... आपल्याला यंदा मतदान करायला मिळणार म्हणून प्रचंड उत्साही असणारा. त्याच उत्साहात सहा-एक महिन्यांपूर्वी मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून आलेला. त्यावर नंतर काहीच घडलं नाही, मतदार-ओळखपत्र आलं नाही, मतदारयादीत नावही आलं नाही म्हणून जरा नाराज झालेला...त्याच्या आणि आमच्या आशा या आवाहनाने पुन्हा पल्लवित झाल्या. आपण ’जागरूक नागरिक’ असल्याची आम्हाला नव्यानं जाणीव झाली आणि काल सकाळी (रविवार असून) वेळेवर उठून, सगळं आवरून आम्ही गेलो आमच्या मतदानकेंद्रावर. (आवाहनात वेळ छापलेली नव्हती. पण म्हटलं, की सकाळी ११:०० वाजताची वेळ ही काही अगदीच आडवेळ नाही. एकदम सेफ.)
आमचं मतदानकेंद्र म्हणजे एक शाळा. तिथे दरवाज्यापाशी होता केवळ शाळेचा सुरक्षारक्षक. तो देखील ’जागरूक नागरिक’, त्याला ठाऊक होतं, आज असं काहीतरी शाळेत असणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे अद्ययावत माहिती होती...
"मॅडम, सुबहसे बहुत सारे लोग आके वापिस गए... लेकिन इदर इलेक्सनवाला कोई नही आया है"
आमचा चेहरा, ते poker face का काय म्हणतात, तसा...
"फिर भी आप अंदर जा कर के देख लो" त्यानं त्याच्या परिनं आम्हाला सूट दिली.
आम्ही गेलो आत. तिथे एक वर्ग उघडा होता. झाडलोट करून चकाचक केलेला, आतले दिवे-पंखे चालू होते. बाहेर एक माणूस बसलेला. आम्हाला पाहून लांबूनच त्यानं नकारार्थी मान आणि हात हलवले. जवळ जाताच म्हणाला, "सुबहसे आके बैठे है इदर, ये रूम उनके लिए तैय्यार रखा है.. लेकिन कोई नही आया.. काफ़ी लोग आके गये"
सात्त्विक चिडचिड होऊन मी घरी आले. लगेच लोकसत्ता आणि म.टा. दोन्हीकडे याचा निषेध नोंदवणार्‍या ई-मेल्स पाठवल्या. (जागरूक नागरिक ना आम्ही!) ई-मेलच्या मजकुरात शेवटी वैतागापोटी लिहिलं, की ’उद्या हाच निवडणूक आयोग आकडेवारीनिशी कांगावा करेल, की विशेष मोहिमेला नागरिकांचा थंडा प्रतिसाद!’
आणि पाहते तर काय... आजच्या Times of Indiaमध्ये अगदी याच मथळ्याची बातमी आहे!!
मोरू मोरू म्हणतात तो हाच असावा... राग

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)