दंतमनोरंजन


माणूस दंतवैद्याकडे का आणि केव्हा जातो? या प्रश्नाला खरं म्हणजे काही अर्थ नाही. का जातो? - नाइलाज म्हणून; आणि केव्हा जातो? - नाइलाज झाल्यावर! कुणालाही विचारलं तर या प्रश्नाला एवढी दोनच उत्तरं मिळतील. तसंही, कुठल्याही वैद्य अथवा डॉक्टरकडे कुणीही नाइलाज झाल्याशिवाय जातच नाही म्हणा. दंतवैद्याकडे तर नाहीच नाही. मी मात्र गेले काही महिने दंतवैद्याकडे मनोरंजन करून घ्यायला जाते आहे! म्हणजे तिथे जाण्यामागचं माझं उद्दिष्ट मनोरंजन अथवा करमणूक करून घेण्याचं नसतं पण माझी करमणूक होते, आपोआपच!
या सगळ्याची सुरुवात झाली ती माझ्या मुलाच्या दातांवरच्या उपचारांपासून. आपल्या दातांना 'ब्रेसेस' लावून घेण्याची अतिशय, नितांत, प्रकर्षानं, भयंकर गरज असल्याचा त्याला साक्षात्कार झाला आणि आमचा दंतवैद्याचा शोध सुरू झाला. 'शोधा म्हणजे सापडेल' या म्हणीच्या आड, शोधल्या म्हणजे ज्या-ज्या सापडतील अशा जगभरातल्या अक्षरशः असंख्य गोष्टींची यादी लपलेली आहे... दातांचा दवाखाना ही त्यातलीच एक. माणसं दंतरुग्ण जरी नाईलाजानं बनत असली तरी दंतवैद्य मात्र अगदी आवडीनं, आनंदानं बनत असावीत. नाहीतर रोजच्या भाजी, वाणसामान आणायला जायच्या पंधरा-वीस मिनिटांच्या रस्त्यावर मला दातांचे तब्बल सहा दवाखाने दिसले नसते! त्या सर्व शर्मा, शेट्टी, मेहता इत्यादींच्या 'डेंटल क्लिनिक्स'च्या भाऊगर्दीत एकच मराठी नाव लुकलुकताना दिसलं आणि आम्ही आमचा मराठी बाणा जपण्याचं आद्य कर्तव्य पार पाडत त्या एकमेव 'दातांच्या दवाखान्या'त शिरलो.
आमच्या येण्याचं कारण ऐकल्याऐकल्या तिथल्या दंतवैद्यिणीनं "दातांना ब्रेसेस लावण्याचं काम इथे होणार नाही" असं जाहीर केलं. मी सर्दच झाले.
'दातांच्या दवाखान्यात दातांना ब्रेसेस लावल्या जाणार नाहीत? मग कुठे लावल्या जातील? रेशनच्या दुकानात?? ', हा प्रश्न मी नकोनको म्हणत असताना माझ्या चेहर्‍यावर उमटलाच! अशा प्रश्नांनी युक्त चेहरे पाहण्याची तिला सवय असणार. कारण "त्या कामासाठी वेगळे डॉक्टर्स असतात." असा खुलासा लगेच तिच्याकडून आला.
'पण बाहेर तर दातांचा दवाखाना अशी पाटी लावलीयेत तुम्ही... ' या माझ्या (मुळ्ळीच न ऐकणार्‍या) वाक्याला थोपवत "मी एक डेंटिस्ट आहे; ब्रेसेस लावण्याचं काम ऑर्थोडाँटिस्ट करतात" असं स्पष्टीकरणही तिनं पाठोपाठ दिलं.
बाहेर पाटीवर अगदी मारे 'बी. डी. एस.' वगैरे पदवी तर झळकत होती. पण ब्रेसेस लावणार नाही म्हणे... हा म्हणजे 'आमाला पावर नाय' सारखाच प्रकार झाला!!
उद्या तुमच्या घरात झालेल्या चोरीची तक्रार करायला तुम्ही पोलिस-स्टेशनला गेलात आणि तिथल्या इन्स्पेक्टरनं तुम्हाला सांगितलं की चोरांना शोधण्याचं काम एक वेगळा 'ऑर्थो'इन्स्पेक्टर करतो तर तुमचा चेहरा कसा होईल, तशाच चेहर्‍यानं मग मी त्या वैद्यिणीला एखाद्या ऑर्थोडेंटिस्टचं नाव सुचवायला सांगितलं. तसं एक नाव तर तिनं सुचवलंच, पण त्यापूर्वी "ऑर्थोडेंटिस्ट नव्हे, ऑर्थोडॉन्टिस्ट!" असं सांगून माझ्या दंत-अज्ञानाचा नव्व्याण्णवावा अपराध पोटात घातला.
दातांवरच्या साध्या उपचारांसाठी नुसता आणि खास उपचारांसाठी ऑर्थो अशी दंतवैद्यांच्या हुद्द्याची वाटणी समजण्यासारखी होती पण ऑर्थो-बढती मिळाल्यावर 'डेंटिस्ट'चं 'डॉन्टिस्ट' का होतं, ते समजायला मार्ग नव्हता. पण शंभरावा अपराध करण्याचीही अंगात हिंमत नव्हती. त्यामुळे ती शंका मी तशीच चावून टाकली आणि त्या दुसर्‍या डॉक्टरचा पत्ता, फोन नंबर घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो.
या नव्या दंतवैद्यिणीचा (हो, ती पण वैद्यीणच निघाली) दवाखानाही त्याच रोजच्या रस्त्यावर होता. पण दोन दिवसांपूर्वीपर्यंत माझं ऑर्थो-दंतज्ञान अर्धवट असल्यामुळे तेव्हा तिच्या पाटीवर मी फुली मारली होती. साध्या दंतवैद्यापेक्षा हा दवाखाना काहीतरी वेगळा असेल अशी मी आपली उगीचच समजूत करून घेतली होती. पण तसलं काहीही नव्हतं. अगदी तिथली ती दंत-खुर्चीही आधीच्या दवाखान्यातल्यासारखीच होती.
दातांच्या दवाखान्यातली ही खुर्ची काही औरच चीज आहे. मला नेहमी वाटतं, की ती जर आपल्याला घरात वापरायला मिळाली तर काय बहार येईल! त्या खुर्चीच्या उजव्या बाजूला एक छोटंसं इकडे-तिकडे हलवता येणारं टेबल असतं, डावीकडे एक छोटं बेसीन असतं, डोक्यावर दिवा असतो आणि मध्ये निवांत पहुडायला दिल्यासारखी मुख्य खुर्ची असते. कल्पना करा की उजवीकडच्या टेबलावर मस्त चमचमीत पदार्थांनी भरलेलं जेवणाचं ताट ठेवलेलं आहे, तुम्ही मधल्या खुर्चीवर आरामात बसून त्या जेवणावर ताव मारायचा, जेवण झालं की ताट ठेवलेलं टेबल लांब सरकवून द्यायचं, डावीकडे प्यायचं पाणी आणि हात धुवायला बेसीन हजरच असतं. हात-तोंड धुतल्याधुतल्या डोक्यावरचा दिवा बंद करायचा की तुम्ही बसल्याजागी, भरल्यापोटी, शतपावलीची स्वप्नं बघत, डुलकी काढायला मोकळे! आता घरात ही खुर्ची जेवायच्या खोलीत ठेवायची की झोपायच्या खोलीत? असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. खुर्चीची जागा कुठलीही असो पण ती वापरल्यावर परिणाम एकच - आराऽऽम!
दवाखान्यात मात्र त्या खुर्चीवर बसणं आरामदायक नक्कीच नसतं आणि त्याची प्रचीती दुसर्‍या दिवसापासून माझ्या मुलाला येणारच होती. त्यापूर्वी त्या वैद्यिणीनं त्याच्या दातांच्या रचनेची पाहणी केली. ब्रेसेस लावण्याची सगळी पद्धत आम्हाला समजावून सांगितली. "त्याचं किट तुम्हाला दाखवते" असं म्हणून एक वीतभर लांबीची चपटी पेटी काढली. त्या पेटीत अनेक छोटे-छोटे कप्पे होते आणि प्रत्येक कप्प्यात बोटांच्या चिमटीतही लपून जाईल असा स्टेनलेस स्टीलचा एकएक इवलासा तुकडा ठेवलेला होता. निरनिराळ्या आकाराचे ते चमचमणारे तुकडे इतके लहान आणि नाजूक होते की मला ती एखादी दागिन्यांची पेटी असल्यासारखीच वाटायला लागली आणि ती वैद्यीण म्हणजे एखाद्या सराफासारखी! जणू ती आम्हाला ते दातांचे मौल्यवान दागिने दाखवत होती, त्यांच्या निरनिराळ्या किमती सांगत होती - हा आकार निवडलात तर उपचार सहा महिने चालतील, तो निवडलात तर वर्षभर; या आकारासाठी खर्च इतकाइतका, त्या प्रकारात खर्च जरा जास्त येईल पण आयुष्यभराची हमी, वगैरे वगैरे! वास्तविक अठ्ठावीस दातांवर एकाच वेळी लावायचे ते अठ्ठावीस निरनिराळे तुकडे होते.
'अक्कल दाढांना ब्रेसेस लावायच्या असतील तर...?' ह्या माझ्या चेहर्‍यावरच्या आगामी आकर्षणाकडे तिचं लक्ष गेलं नाही. चेहर्‍यांवरचे प्रश्न वाचण्याच्या कामात ती तितकी तरबेज नसावी किंवा 'ऑर्थो अभ्यास' करताना तो विषय तिनं ऑप्शनला टाकलेला असावा.
अक्कल दाढांना ब्रेसेस लावण्याचं काम अजून एखादा 'पॅरा'डाँटिस्ट करत असेल असं मग मीच स्वतःला समजावलं.
तिकडे तिचं किट-वर्णन सुरूच होतं. कुठल्या दातांवर कुठले तुकडे लावले जाणार त्या जागाही ठरलेल्या असतात... पेटीत प्रत्येक कप्प्याशेजारी तशा खुणा केलेल्या असतात... सुळ्याचा तुकडा पटाशीच्या दाताला चालणार नाही आणि खालच्या दाढेचा वरच्या दाढेला चालणार नाही...
सामान्यज्ञानात काय एकएक भर पडत होती!
त्या किटचं कोडकौतुक आटोपल्यावर, तब्बल दीड वर्ष चालणार्‍या उपचारांच्या खर्चाचा आकडा तिनं हळूच आम्हाला सांगितला. तिनं जो अंदाजे खर्च सांगितला ना, तेवढ्या खर्चात एखाद्याचे दातच काय तो आख्खा माणूसही वाकड्याचा सरळ झाला असता! तो आकडा ऐकून माझा खराखुरा 'आ' वासायचाच तेवढा बाकी राहिला होता. (आणि ते बरंच झालं म्हणा. चुकून मी ते केलंच असतं तर तिनं सवयीनं तेवढ्यात माझ्याही दातांची पाहणी केली असती आणि त्यांच्या डागडुजीचाही काहीतरी प्रस्ताव मांडला असता!) पण मग, ते पैसे एकरकमी भरायचे नाहीयेत, पुढच्या वर्षभरात थोडेथोडे करून द्यायचेत अशी तिनं माझी समजूत काढली आणि शेवटी मी तिला 'आगे बढो'चा इशारा दिला.
दुसर्‍या दिवशी साधारण तासाभराच्या झटापटीनंतर तिनं ते तुकडे आणि एका तारेच्या साहाय्यानं माझ्या मुलाच्या दातांना जखडून टाकलं. दातांना 'लायनीवर' आणायचं काम खरं ती तार करते. तुकडे तारेला आधार देण्यासाठी असतात. (मला नेमकं याच्या उलट वाटलं होतं. कारण आदल्या दिवसापासून या मुख्य नायिकेपेक्षा त्या बाकीच्या दोन-अडीच डझन 'एक्स्ट्राज'चाच किती ठमठमाट सुरू होता!)
आता महिन्या-दीड महिन्यातून एकदा ती ताररूपी नायिका बदलली जाते. गरजेप्रमाणे दातांना आत किंवा बाहेर ढकलायचं आपलं काम ती अधिकाधिक नेटानं पार पाडते. तारेला जागच्याजागी ठेवण्यासाठी प्रत्येक दातावर बसवलेल्या रबराच्या इवल्या-इवल्या रिंगाही दरवेळी बदलल्या जातात. ती वैद्यीण दरवेळी माझ्या मुलाला त्या रिंगांच्या रंगाचा चॉईस विचारते. तो ही अगदी कपड्यांच्या दुकानातला एखादा नवीन टी-शर्ट निवडावा इतक्याच उत्सुकतेनं दरवेळी वेगवेगळ्या रंगाच्या रिंगा निवडतो. पुढचे एक-दोन दिवस बदललेल्या तारेशी जुळवून घेईपर्यंत त्याचे दात खूप दुखतात. पण त्याला त्याची पर्वा नसते. बघावं तेव्हा मनमोहक रंगांत सजलेले आपले रत्नजडित दात निरखत तो आरशासमोर उभा असतो.
मनोरंजनाचं एक नवीन दालनच माझ्यासाठी खुलं झालेलं असतं. आता त्या वैद्यिणीच्या पुढच्या अपॉईंटमेंटची मीच जास्त आतुरतेनं वाट पाहत असते...
(मनोगत डॉट कॉम च्या २००९ च्या दिवाळी अंकात या लेखाचा समावेश झालेला आहे.)

Comments

हेरंब said…
हा हा हा.. काय भन्नाट झालाय लेख. अगदी शीर्षकापासून ते शेवटच्या पूर्णविराम पर्यंत.. अगदी "एक विकट हास्य... कुंच्याचं !!" ची आठवण झाली. त्या कुन्च्याच्या हास्यापेक्षाही जास्तच विकट हसलो आज :)

'दातांच्या दवाखान्यात दातांना ब्रेसेस लावल्या जाणार नाहीत? मग कुठे लावल्या जातील? रेशनच्या दुकानात?? ',

पण त्यापूर्वी "ऑर्थोडेंटिस्ट नव्हे, ऑर्थोडॉन्टिस्ट!" असं सांगून माझ्या दंत-अज्ञानाचा नव्व्याण्णवावा अपराध पोटात घातला.

'अक्कल दाढांना ब्रेसेस लावायच्या असतील तर...?' ह्या माझ्या चेहर्‍यावरच्या आगामी आकर्षणाकडे तिचं लक्ष गेलं नाही. चेहर्‍यांवरचे प्रश्न वाचण्याच्या कामात ती तितकी तरबेज नसावी किंवा 'ऑर्थो अभ्यास' करताना तो विषय तिनं ऑप्शनला टाकलेला असावा.

अक्कल दाढांना ब्रेसेस लावण्याचं काम अजून एखादा 'पॅरा'डाँटिस्ट करत असेल असं मग मीच स्वतःला समजावलं.

आणि ते बरंच झालं म्हणा. चुकून मी ते केलंच असतं तर तिनं सवयीनं तेवढ्यात माझ्याही दातांची पाहणी केली असती आणि त्यांच्या डागडुजीचाही काहीतरी प्रस्ताव मांडला असता!


हे काही काही तर जामच भन्नाट.
Naniwadekar said…
> "ऑर्थोडेंटिस्ट नव्हे, ऑर्थोडॉन्टिस्ट!"
> ऑर्थो-बढती मिळाल्यावर 'डेंटिस्ट'चं 'डॉन्टिस्ट' का होतं, ते समजायला मार्ग नव्हता.
>------

कालपरवापर्यंत तुमच्याआमच्यासाठी असलेला 'दत्ता' त्याच्या सासरच्या लोकांच्या भारदस्तीकरणात 'दत्तोपंत' होतो. तसा तुमचाआमचा तो दात, भारदस्तांचा (गणपती वगैरे) तो दंत. आणि अतिभारदस्त असेल (गणपतीचा तुटलेला) तर तो 'दंतोपंत'. ज़े नियम दातांना तेच दंतोवैद्‌यांना. असलेल्या दातावर उपचार करतो तो डेंटिस्ट, मुळात नसलेली पट्‌टी चिटकवते ती डॉक्टरीणबाई ऑर्थोडॉण्टिस्ट.

- नानिवडेकर
Mugdha said…
bhannat jamlay !!!
Anonymous said…
लेख तसा चांगला आहे पण दंतवैद्य ब्रेसेस लावत नाही यात नवल काही नाही.

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)