एव्हरेस्ट आणि अस्मिता

(१८ जून २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत आलेला हा लेख.)


॥१॥ किर्ती

आमच्या वर्गात अस्मिता नावाच्या दोन मुली आहेत... एक अस्मिता देशपांडे आणि दुसरी अस्मिता शर्मा. एकीला हाक मारली की दोघीही वळून बघतात. म्हणून आम्ही त्यांची ‘मराठी अस्मिता’ आणि ‘हिंदी अस्मिता’ अशी नावं ठेवलीयेत. तशी अस्मिता शर्माही चांगलं मराठी बोलते. सातवीपासून आहे आमच्या वर्गात. पण घरी तिला हिंदी बोलायची सवय आहे. त्यामुळे शाळेत आमच्याशी बोलताना ती मधूनच कधीतरी हिंदीत सुरू करते. त्यामुळेही ती नावं त्यांना अगदी ‘फिट्ट’ बसतात. शिवाय, ‘काल अस्मिता भेटली होती... कोण अस्मिता? शर्मा की देशपांडे?... देशपांडे’ इतकी लांबड लावण्यापेक्षा ‘काल मराठी अस्मिता भेटली होती’ असा सोप्पा शॉर्टकटही मारता येतो आम्हाला!
या त्यांच्या नावांवरून एकदा फुल्ल कॉमेडीच झाली - रोज सकाळी शाळेत ग्राऊंडवर प्रार्थनेनंतर ताज्या बातम्या माईकवरून सगळ्यांना वाचून दाखवल्या जातात. ते काम गेली अनेक वर्षं आमच्या समाजशास्त्राच्या आचरेकर बाईच करतात. त्यादिवशी कृष्णा पाटीलनं एव्हरेस्ट सर केल्याची प्रमुख बातमी होती. ती वाचून दाखवताना बाईंनी ‘मराठी अस्मिता उंचावेल अशी एक घटना काल घडली आहे... ’ अशी सुरूवात केली. ते ऐकल्याऐकल्या अस्मिता देशपांडे नुसती एकदा टाचा उंच करून उभी राहिली. झालं, आम्हाला सगळ्यांना इतकं हसू यायला लागलं! त्यात, ग्राऊंडवरच्या त्या ‘सावधान! ’ पोझमध्ये - हसणे वगैरे ‘फालतू’ प्रकारावर जेव्हा कडक बंदी असते - साध्यासाध्या गोष्टींचंही जरा जास्तच हसू येतं!
आता, आचरेकर बाईंसमोर उंचावायला आधी ही मराठी अस्मिता त्यांच्या तासाला जागृत तर असायला हवी! कारण, समाजशास्त्राचा तास तिला जाम बोअर होतो. त्यातच आठवड्यातले चार दिवस तो तास मधल्या सुट्टीनंतर लगेच असतो. त्या तासाला तिला बाईंनी किमान दोन-तीनदा तरी, ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना ‘कॉट नॅपिंग’, अगदी तसं पेंगताना पकडलंय! बाई एकदा कसल्यातरी नोटस देत होत्या आणि त्या लिहून घेताना ही भरल्यापोटी मस्तपैकी पेंगत होती. त्यामुळे वहीत काही ओळींवर अक्षरं वेडीवाकडी, तिरकी आली होती. हे बाईंच्या लक्षात आलं बहुतेक... त्यांनी नेमकी तिचीच वही मागितली बघायला... आणि नंतर तिला आणि सगळ्या वर्गालाच लांबलचक लेक्चर दिलं! (लेक्चर देण्यात आचरेकर बाई एकदम पटाईत आहेत. कित्येक वेळेला त्यांच्या तासाला मूळ विषयाऐवजी भलत्याच विषयाला पकडून आम्हाला लंबीचौडी भाषणं देत असतात!)
त्यादिवशी ग्राऊंडवरून परत वर्गात जाताना आम्ही सगळ्यांनी अस्मिता देशपांडेची तिच्या आणि आचरेकर बाईंच्या या खास(!) गट्टीवरून जाम खेचली. आजकाल जसं पेपरमध्ये, टी. व्ही. वर ‘मराठी अस्मिता’ या शब्दांचा सतत गजर, शंख, धोशा, मारा चालू असतो, तश्याच हेडलाईन्स बनवून टाईमपास सुरू केला... आमचा वर्ग दुसऱ्या मजल्यावर आहे. त्यादिवशी बडबडण्याच्या नादात अस्मिता शर्मा जिना चढताना मध्येच एका पायरीला अडखळली. त्यावर बातमीदाराच्या थाटात तोंडासमोर माईक धरल्याचं ऍक्टिंग करत सुजी लगेच म्हणाली - ‘मराठी अस्मितेला हसतहसता हिंदी अस्मिताच ठेचकाळली. आता यातून ती लवकर सावरेल असं वाटत नाही. ’... युनिट टेस्टला अस्मिता शर्माला इतिहासात सर्वात जास्त मार्क्स मिळाले. त्यावर अजून एक ब्रेकिंग न्यूज बनली - ‘आचरेकर बाईंमुळे हिंदी अस्मिता मराठी अस्मितेपेक्षा वरचढ ठरली’!...
`मराठी अस्मिता दुखावली’ काय, ‘हिंदी अस्मिता जायबंदी झाली’ काय... अकला पाजळण्यात तर सगळ्याजणी एव्हरेस्टपेक्षाही जास्त उंची गाठायला आधी तैय्यार! मात्र, आम्ही आमचे हे तारे तोडतो ते फावल्या वेळेत - मधल्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर किंवा ऑफ पिरियडलाच. आमची ही असली बडबड जर आमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचली तर...? तर काही नाही, त्या कृष्णा पाटीलनं एव्हरेस्टची उंची गाठली; या उंचावलेल्या-ठेचकाळलेल्या सगळ्या अस्मिता, किर्ती, प्रज्ञा, सुजाता मग परिक्षेत त्या उंचीइतक्याच खोल खड्ड्यात पडतील!
॥२॥ सुजाता
"... ही प्रादेशिक अस्मिता म्हणजे नक्की काय प्रकरण आहे हे कुणी सांगेल का एकदा? कधी कधी वाटतं ती पिसासारखी किंवा कागदासारखी हलकी असेल, फुलासारखी नाजुक असेल कारण साध्या, छोट्याछोट्या गोष्टींनी तिला ठेच लागते, ती दुखावली जाते, तिला हानी पोहोचते! कधी वाटतं ती एखाद्या ज्वलनशील पदार्थासारखी असेल. खुट्ट झालं की पेट घेते, अजून दहा घरं जाळते!... " ९ वी(अ) मधला मोहित राजवाडे अगदी रंगात येऊन भाषण देत होता. हा आमच्या शाळेतला वक्तृत्त्व स्पर्धेचा ‘स्टार प्लेअर’ आहे - युवराज सिंगसारखा. दरवर्षीच तो निरनिराळ्या आंतरशालेय वगैरे स्पर्धांत भाग घेतो आणि बक्षिसंही मिळवतो. सलग नऊ वर्षं बक्षिस मिळवण्याचं त्याचं रेकॉर्ड आहे म्हणे... आणि सलग नऊ वर्षं ही असली निरनिराळी भाषणं ऐकणं हे आमचं रेकॉर्ड आहे! (युवराज सिंगनं तर सहाच सिक्सर्स मारले एका दमात; आम्ही तब्बल नऊ मारलेत! ) स्पर्धेची फायनल ज्या शाळेत असेल तिथे आम्हाला सगळ्यांना कंपल्सरी नेऊन बसवतात. बरं दांडी मारायचीही सोय नाही, तिथे सर्वांची हजेरी घेतात! मग आम्ही शक्यतो मागच्या जागा पकडतो. समोरचा बोलणारा बोअर करायला लागला की निदान आपापसांत गप्पा तरी मारता येतात. आता त्यादिवशीही तो राजवाडे चांगलं बोलत होता, नाही असं नाही. पण विषय किती चावून चोथा झालेला!
बोलता बोलता त्याच्या भाषणात एव्हरेस्ट, कृष्णा पाटील आणि मराठी अस्मितेचा मुद्दा आलाच! त्याच्या त्याच सुरात ‘की’ म्हणाली - "ही प्रादेशिक, राष्ट्रीय इत्यादी इत्यादी अस्मिता म्हणजे नक्की काय हे कुणी सांगेल का एकदा? बचेंद्री पाल एव्हरेस्टवर पोहोचली तेव्हा भारतीय अस्मितेला अभिमान वाटला. पाठोपाठ उत्तरांचली अस्मितेला आठवलं असेल की आपल्यालाही अभिमान वाटला पाहिजे... "
"उत्तरांचली नाही गं, हिमाचली... " अस्मिता देशपांडेला चुकून भूगोल आठवला!
"ए, बचेंद्री पाल उत्तरांचलची आहे... "
"गप ए, तेव्हा होतं का तरी उत्तरांचल? "
"पण आता आहे ना? "
"अगं पण अभिमान आत्ता नाही, तेव्हाच वाटला होता! "
"बरं! ऽऽ तिची जी कुठली प्रादेशिक अस्मिता असेल ती... तिनं तिचा वेगळा, स्वतंत्र अभिमान जाहीर केला असेल तेव्हा! नंतर काही वर्षांनी संतोष यादव दोनदा एव्हरेस्ट चढली... "
"ए, चढली काऽऽय? ‘चढला’ म्हण! " प्रज्ञा तिच्या हातावर चापटी मारत म्हणाली. संतोष यादव ही एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली भारतीय ‘महिला’ आहे याचा या देसाईकुलोत्पन्न प्रज्ञामॅडमना पत्ताच नव्हता!
"ए यप्पड, संतोष यादव! संतोषीमाता! बाई आहे ती! " अस्मिता शर्मानं तिला गप्प केलं. संतोष यादवचं जेंडर बदलल्यामुळे तिची व्याकरणी अस्मिता उफाळून आली बहुतेक!
"... आणि हळू बोल जरा. त्या संतोष यादवच्या हरियाणी अस्मितेनं ऐकलं तर तिलाही हा राजवाडे म्हणतो तशी ठेच लागेल, हानी पोहोचेल, ती दुखावली जाईल! "...
नंतर कितीतरीवेळ आमचा असा टाईमपास सुरू होता.
एकदम टाळ्यांचा कडकडाट ऐकू आल्यावर आमच्या लक्षात आलं की मोहित राजवाडे आपलं भाषण संपवून केव्हाच अंतर्धान पावला होता.
आम्ही त्याचं भाषण नीट ऐकलं नाही त्यामुळे त्या स्पर्धेतल्या आमच्या शालेय अस्मितेला धक्का पोहोचणार असं आता आम्हाला वाटायला लागलंय. ते होऊ नये, आमच्या शाळेची अस्मिता पुन्हा होती त्याच उंचीवर राहावी म्हणून कुठली कृष्णा पाटील येईल आमच्या शाळेच्या मदतीला? आणि तिला कुठलं एव्हरेस्ट सर करावं लागेल त्यासाठी?

(लोकसत्ता डॉट कॉमवरील या लेखाची लिंक : http://www.loksatta.com/daily/20090618/viva01.htm)

Comments

Nandan said…
लेख आवडला - सध्याच्या परिस्थितीत अगदी समयोचित आहे :). व्हिवातल्या प्रकाशनाबद्दल पुनश्च अभिनंदन!

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)