एक्झिट पोल
(२८ मे २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत प्रकाशित झालेला हा लेख. किर्ती आणि सुजाता या दोन मैत्रिणी पुन्हा एकदा आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत.)
॥१॥ सुजाता
आई म्हणते - त्या ‘जागतिक बदलाचे वारे’ निबंधापासून एक बरं झालंय... मी ऑलमोस्ट दररोज पेपर वाचायला लागलेय... ‘ऑलमोस्ट’ म्हणे! मला तर आईचं काही कळतच नाही... एखादी गोष्ट केली तरी बोलायचं; नाही केली तरी बोलायचं! पण ते जाऊ दे. तर मी काय सांगत होते की रोजचा पेपर... आता तो वाचायलाच हवा ना... बाई कधी कश्यावर लिहायला सांगतील काही नेम नाही. आणि पेपर वाचून सुद्धा काय काय नवीन नवीन गमती जमती कळतात!...
३-४ दिवसांपूर्वीचे सगळे पेपर्स त्या ‘एक्झिट पोल्स’नि भरून वाहत होते. ‘शपथविधी’सारखाच ‘की’नं याचाही विग्रह केलाय (मराठीच्या बाईंची ही एवढी एकच सूचना ती इमानेइतबारे पाळते) - पोल्सनंतर, म्हणजेच निवडणुकांनंतर, आपली ‘एक्झिट’ होणार की नाही हे प्रत्येक पक्षाला चाचपून पहायचं असतं म्हणून ते जी पाहणी करतात त्याला ‘एक्झिट पोल्स’ म्हणतात म्हणे! काय पण लांबलचक विग्रह!... आणि वर म्हणते कशी - हा ही मध्यमपदलोपी समासच, फक्त यात बऱ्याच मध्यमपदांचा लोप होतोय म्हणे!! (समासाचा हा एवढा एकच प्रकार तिच्या लक्षात आहे बहुतेक! मराठीच्या तासाला झोपा काढल्यावर दुसरं काय होणार! )
मला तर हे ‘एक्झिट पोल्स’ म्हणजे परिक्षेत प्रत्येक पेपर देऊन बाहेर आल्यावर आम्ही जी आपापसांत मार्कांबद्दल चर्चा करतो ना तसंच वाटतं. म्हणजे आम्ही नाही का अंदाज बांधत असतो इतके मार्क्स मिळतील, इतक्या मार्कांचं चुकलंय वगैरे तसेच तर असतात हे ‘एक्झिट पोल्स’! आणि जसे आमचे मार्कांचे अंदाज चुकतात तसेच हे ही चुकतात... बऱ्याचदा!यंदा माझ्या दादानं प्रथमच मतदान केलं. गेले दोन महिने म्हणजे अगदी निवडणुका जाहीर झाल्यापासूनच तो भलताच उत्साहात होता - मतदान म्हणजे अगदी काहीतरी जगावेगळं करतोय असा भाव होता त्याच्या चेहेऱ्यावर! त्यात, त्याच्या कोऱ्याकरकरीत निवडणूक ओळखपत्रात चक्क एकही चूक नव्हती! त्यामुळे तर तो अजूनच बागडत होता! टी. व्ही. वरच्या ‘एक्झिट पोल्स’ना नाक लावून बसला होता बाबांच्या बरोबरीनं. तो अभ्यास सोडून हे सगळं करतो म्हणून आत आईची बडबड सुरू होती! दादानं ‘मदर्स डे’निमित्त आईला दिलेल्या ग्रीटींग-कार्डचा प्रभाव संपुष्टात आला होता बहुतेक! आठवडाभर आय. पी. एल. च्या मॅचेस, जोडीला हे ‘एक्झिट पोल्स’... एका ग्रीटींग-कार्डच्या बदल्यात सवलती तरी किती घ्यायच्या!
पण बोलण्यात काही अर्थ नाही. दादाविरुद्ध काडी लावायला जावं तरी पंचाईत. आई लगेच माझ्यावर घसरते! मग मागच्या परिक्षेनंतरचे तिचे-माझे ‘एक्झिट पोल्स’, चुकलेले अंदाज - सगळं बाहेर निघतं! मग आम्ही आपल्या उभ्या - आरोपीच्या पिंजऱ्यात! तिकडे त्या कसाबला पण आपली बाजू मांडायची संधी मिळते, तो अजून अल्पवयीन आहे वगैरे त्याचा वकील बिनधास्त तारे तोडतो पण इथे म्हणजे आई काही ऐकूनच घेत नाही! आईचं म्हणजे आपल्या न्यायालयांसारखं नाहीये... सर्वांना आपली बाजू मांडायची समान संधी-बिंधी काही नाही! आईला साक्षीदार वगैरेंचीही काही गरज भासत नाही अश्या वेळी. त्यापेक्षा तिच्या बडबडीकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं असतं.
निवडणुकांचे प्रत्यक्ष निकाल जाहीर झाले तेव्हाही दादा असाच टी. व्ही. समोर बसला होता... तेव्हा पुन्हा आई अशीच चिडली होती... आणि मग मी तिची आणि दादाची मजा बघितली होती!...
॥२॥ कीर्ती
आपल्याकडे प्रसारमाध्यमांत अमेरिकेतल्या निवडणुकांची ३-४ महिने चर्चा झाली... आता आपल्या निवडणुकांवर तश्याच प्रकारे तिकडे चर्चा घडत असतील का? - असा सुजीला प्रश्न पडला होता. ही सुजी सुद्धा ना, कुठूनतरी कानाकोपऱ्यातून काहीतरी शंका काढत असते! आता, दहावी-बारावीच्या निकालांची, त्यांतल्या टॉपर्सची जशी चर्चा होते तशी आठवी किंवा नववीच्या परिक्षांची होईल का? अमेरिकेनं जागतिक बदलाचे वारे आपल्या दिशेनं पुन्हा एकदा नव्यानं वळवले, त्याचे शंभर दिवस पूर्ण झाल्याची पण बातमी झाली. ते सध्या आपल्या त्याच मस्तीत मश्गूल असतील. ‘सर्वात मोठी संसदीय लोकशाही’ वगैरे सगळं आपल्यासाठी... हे असले शब्द केवळ शिखर परिषदांत वापरण्यासाठी असतात हे त्यांना काय नव्यानं सांगायला हवं?? त्यांना काय पडलीये आपल्या निवडणुकांवर चर्चा-बिर्चा करण्याची? पण असल्या शंका ही सुजीच काढू जाणे. वर तिला हे सगळं शाळेत तास सुरू असताना सुचतं!
त्यात गेले ४-५ दिवस त्या ‘एक्झिट पोल्स’नि तिच्या डोक्यात जोरदार एंट्री मारली होती. तिच्या मते हे असले अंदाज चुकतात कारण मत देऊन बाहेर आलेले मतदार त्या ‘एक्झिट पोल’ घेणाऱ्या लोकांना खरंखुरं उत्तर देतच नसतील... ‘मी कुणाला मत दिलं?? - नाही सांगत, जा! ’ असं... किंवा मत देऊन बाहेर येईपर्यंत ते विसरत असतील आपण कुणाला मत दिलंय ते आणि बाहेर येऊन भलतंच उत्तर देत असतील! ते ‘एक्झिट पोल’वाले तरी ठरवणार कसं की समोरचा माणूस खरं बोलतोय की खोटं! त्यांना जे उत्तर मिळेल तेच ते नोंदवून घेणार! प्रत्येकाचा खरेखोटेपणा सिद्ध करायचा तर त्यासाठी ‘लाय-डिटेक्टर’ वापरायला पाहिजे, जे शक्य नाही... मग नेतात बिचारे तसंच निभावून... त्यांची दुकानं कशी चालणार नाहीतर!
माझं तर म्हणणं, लाय-डिटेक्टर वगैरे सगळं नंतर, आधी प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर एकएक ‘मतदार-डिटेक्टर’ बसवावा लागेल. एक्झिट पोल्स कसले घेता, आधी मतदार शोधा!
न्यूज-चॅनलवाले असे एक्झिट पोल्स घेणाऱ्या निरनिराळ्या संस्थांना हाताशी धरतात आणि निवडणूक निकालांच्या काळात २४ तास बरळत राहतात. त्यांनाही आपापल्या पोटांची काळजी वाहायलाच पाहिजे! आधी अंदाज वर्तवायला चर्चा करायची, त्यानंतर प्रत्यक्षात जे निकाल लागतील त्यांवर चर्चा करायची, जोडीला आधीचे अंदाज चुकले कसे त्याचीही चर्चा करायची... म्हणजे झाली ना मग महिन्याभराची बेगमी! त्यातून एखाद्याचे अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळपास जाणारे आलेच चुकूनमाकून तर आहेच मग सर्वश्रेष्ठ, सर्वात पुढे, सर्वांच्या आधी, बातमी आधी वगैरेचा डंका!
निवडणुकांचे निकाल जाहीर झाले की काही राजकीय पक्षांचे ‘निक्काल’ लागतात, काही नेते निकालात निघतात... पण त्याहीपेक्षा न्यूज-चॅनलवाल्यांना ते आई म्हणते तसं मांडवदळ लागत असेल! घरातला एखादा मोठा समारंभ संपला, पाहुणेरावणे परतले की यजमानांना दुसऱ्या दिवशी कसं मरगळल्यासारखं वाटत राहतं तसं...!
मग आहेच पुन्हा, नवीन काहीतरी खाद्य शोधा, त्यावर चर्चा घडवून आणा... ते संपेपर्यंत नवीन सरकारचे शंभर दिवस बिवस पूर्ण होतात, मग त्यावर चर्चा! आणि अश्या तऱ्हेनं त्यांचं दुकान (त्यांच्यामते) नफ्यात चालू राहतं...! दर पाच वर्षांनी का होईना पण निवडणुका, एक्झिट पोल्स इ. नसते तर हे शक्य झालं असतं का?
(लोकसत्ता डॉट कॉमवरील या लेखाची लिंक : http://www.loksatta.com/daily/20090528/viva06.htm)

Comments