मी, एक ‘गजर’वंत

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. अखिल मानवजातीची ही जी काही धावपळ, धडपड चालली आहे ती या गरजा भागवण्यासाठीच. त्या धावपळीत माझाही रोजचा थोडाफार वाटा असतोच. या दैनिक धावपळीचं अविभाज्य अंग म्हणजे पहाटे लवकर उठणे आणि माझं घोडं, जागं होता होता, पहिलं तिथेच अडतं! त्यामुळे, रोजची ही धावपळ सत्कारणी लावायची असेल तर माझ्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या यादीत अजून एका गोष्टीचा समावेश होणं अतिशय गरजेचं आहे आणि ती गोष्ट म्हणजे गजराचं घड्याळ!
रोज सकाळी कानाशी घड्याळाच्या गजरानं बोंबाबोंब करणं ही माझी दिनक्रमातली पहिली आणि मूलभूत गरज आहे. त्या गजरानं जर योग्य वेळी मला उठवलं नाही तर मग (उठण्याच्या बाबतीत) माझ्यावर पूर्णपणे अवलंबून असणार्‍या बाकीच्या दोघांचं काही खरं नसतं... मग आदल्या दिवशीच्या उरलेल्या ‘अन्ना’चा नाश्ता उरकावा लागतो, इस्त्री-बिस्त्रीच्या फारश्या फंदात न पडता शाळेची आणि ऑफिसची ‘वस्त्रं’ अंगावर चढवावी लागतात आणि धावतपळत ‘निवारा’ सोडावा लागतो.
गजराच्या मदतीशिवाय स्वतःहूनच पहाटे उठणारे आणि उठल्या उठल्या टवटवीतपणे लगेच आपापल्या कामाला लागणारे तमाम ‘उषाचर’ प्राणी म्हणूनच मला अतिशय महान वगैरे वाटतात. त्यांच्या महानपणाशी बरोबरी करणं मला या जन्मीतरी शक्य नाही.

पहाटेपहाटे मस्त साखरझोपेत असताना कानाशी तो कर्कश्श गजर वाजलेला खरंतर मला अजिबात आवडत नाही. पण इलाजच नसतो दुसरा. पहाटेच्या या साखरझोपेचं एका वाक्यातलं गमतीशीर पण अगदी समर्पक वर्णन मी मागे एकदा रीडर्स डायजेस्टमध्ये वाचलं होतं की माणसाला सर्वसाधारणपणे किती झोपेची आवश्यकता असते? तर ‘फाईव्ह मिनिट्स मोअर. अजून पाच मिनिटं!’ अपवाद म्हणून काहीजण पाच मिनिटांऐवजी दहा मिनिटं मागून घेतील. पण या नियमाला माझा अपवाद त्याहीपलिकडचा आहे. रीडर्स डायजेस्टमधल्या त्या प्रश्नाला माझं उत्तर आहे - ‘फॉर्टीफाईव्ह मिनिट्स्‌ मोअर!’ मला रात्रीच्या झोपेतून पूर्णपणे जागं व्हायला तब्बल पाऊण तास लागतो. अगदीच नाईलाज असेल तर फारफारतर अर्धा तास! काटा त्याहून मागे आणणं मला आजवर शक्य झालेलं नाही. त्यामुळे मी गजर पण नेहमी तसाच लावते - पाच वाजता उठायचं असेल तर सव्वाचारचा गजर, साडेसहाला उठायचं असेल तर पावणेसहाचा गजर! फिजिक्समध्ये कसे ते कॉन्स्टंटस्‌ असतात - फॅरेडे कॉन्स्टंट किंवा मॅक्स प्लॅन्क कॉन्स्टंट, तसा पंचेचाळीस मिनिटं हा माझा ‘वेक अप कॉन्स्टंट’ आहे! त्या पंचेचाळीस मिनिटांत माझ्या वेकिंग-अपसाठी दुसर्‍या कुणालातरी कॉन्स्टंटली प्रयत्न करावे लागतात!
कोणे एके काळी मला सकाळी उठवण्याचं काम आईकडे असायचं. कॉलेजच्या रोजच्या लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स्‌च्या वेळा वेगवेगळ्या असायच्या. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वीचा आमचा एक ठरलेला संवाद असायचा. ‘उद्या किती वाजता जायचंय?’ या प्रश्नाला ‘सात वाजता’ असं साधंसरळ उत्तर कुणीही देईल. त्यात काही विशेष नाही. पण माझं उत्तर असायचं, ‘पावणे सहाला उठवायला सुरूवात कर.’ त्यावरून आईला माझी निघायची वेळ बरोबर समजायची - पावणेसहा अधिक पाऊण तास म्हणजे साडेसहा, त्यापुढे आवरायला अर्धा तास (फक्त!) म्हणजे मी सात वाजता बाहेर पडणार. मग आई आपली बिचारी मला दर तीनचार मिनिटांनी हाक मारून जागं करायचा प्रयत्न करायची.
मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना मला काहीही पूर्वकल्पना न देता आईनं एक दिवस अचानक या पहाटकामातून निवृत्ती स्वीकारली. मग मला ‘जिसका कोई नहीं, उसका तो गजर है यारो’ असं म्हणत घरातल्या जुन्यापुराण्या, ठणाणा गजर करणार्‍या घड्याळ्याच्या आसर्‍याला जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. पण त्यानं माझी फार पंचाईत व्हायची. एकतर त्या घड्याळाला झोपण्यापूर्वी आठवणीनं किल्ली द्यावी लागायची. त्यात रात्री मध्येच ते बंद-बिंद पडणार नाही ना ही धास्ती असायची. रोज रात्री झोपण्यापूर्वी लोकं देवाला नमस्कार वगैरे करतात; मी ‘उद्या सकाळी सांभाळून घे रे, बाबा’ असं म्हणत त्या घड्याळ्याच्याच हातापाया पडायचे. ते जरी रात्रभर शहाण्यासारखं सुरू राहिलं तरी सकाळी एकदाच गजर वाजवायचं. एका गजरानं माझं कसं भागणार? निम्मे दिवस झोपेतच पांघरूणातून हात बाहेर काढून तो गजर मी कधी बंद करून टाकायचे ते माझं मलाच कळायचं नाही. पुढच्या दहापंधरा मिनिटांत माझी काहीच चाहूल लागली नाही की मग शेवटी निवृत्ती मागे घेऊन आईला तिच्या जुन्या कामावर रुजू व्हावं लागायचं आणि मला तिची बोलणी निमूटपणे ऐकून घ्यावी लागायची.
लग्नानंतर तर आईची ही ‘इमर्जन्सी हेल्पलाईन’ पण बंद झाली! तसा माझा नवरा मुळात त्या पहिल्या पाच मिनिटांच्या नियमात बसणारा आहे; पण ती पाच मिनिटं त्याला जाग आल्यानंतरची! मला जागं करायचं काम त्यानं आजतागायत अंगावर घेतलेलं नाही. मुलगा लहान होता तोपर्यंत वेळीअवेळी जागा होऊन या कामात मला अधूनमधून हातभार लावायचा, नाही असं नाही! म्हणजे तो साडेतीन-चार वाजता जागा व्हायचा, खेळायचा आणि त्याची वेळ झाली की पुन्हा झोपून जायचा. पण तोपर्यंत माझी रोजची उठायची वेळ झालेली असायची. काही वर्षांनी त्याचं असं वेळीअवेळी उठणं बंद झालं आणि माझ्यापुढे पुन्हा प्रश्न उभा राहीला. दरम्यान उश्याशी छोटंसं, तळहातावर मावणारं ‘मेड इन जपान’ घड्याळ आलं होती. त्याला किल्ली देणं नको की त्याच्या हातापाया पडणं नको! त्याचा गजरही अगदी कानमोहक होता. तरी एकदोनदा त्याच्या बॅटरीनं रात्रीत कधीतरी राम म्हटल्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी माझ्यावर ‘अरे राम!’ म्हणण्याची पाळी आलीच होती. अगदी मंजूळ सुरात असला तरी एकदाच गजर वाजवण्याच्या बाबतीत मात्र त्या परदेशी मालाचं आपल्या देशी भाईबंदाशी साम्य होतं.
आठदहा वर्षांपूर्वी ‘स्नूझ’ची सोय असलेलं गजराचं घड्याळ आमच्या घरात प्रथम अवतरलं आणि माझं रोजचं पाऊण तासाचं दिव्य संपुष्टात यायची चिन्हं दिसायला लागली. माझी अवस्था अगदी ‘आनंद स्वप्नाऽऽत माझ्या मावेना’ अशी होऊन गेली. त्याच आनंदात पहिल्या दिवशी गजर वाजल्यावर मी त्याचं मुख्य बटणच बंद करून टाकलं होतं! मग कसलं स्नूझ आणि कसलं काय!
वास्तविक अशी घड्याळं स्वतः स्नूझयुक्त नसतात तर ती आपल्याला स्नूझची म्हणजे ‘अजून एका डुलकी’ची परवानगी देतात. (घड्याळानंच स्नूझ अंगिकारायचं ठरवलं तर मग कठीणच होईल. शेत खाणार्‍या कुंपणाला एक जोरदार प्रतिस्पर्धी निर्माण होईल!) हे स्नूझ प्रकरण म्हणजे माझ्यासारख्या लोकांसाठी फार मोठं वरदान आहे. म्हणजे, ते काय म्हणतात ना - ‘इन्व्हेन्शन ऑफ द सेंच्युरी’ वगैरे तसलं काहीतरी!
‘शतकातला सर्वोत्तम शोध’ ही उपाधी लाभलेला माझ्या माहितीतला पहिला शोध म्हणजे चाकाचा. खरंतर, चाकाच्या शोधामुळेच नंतर मनुष्यजातीची धावपळ-बिवपळ सुरू झाली आणि त्यापायीच ही गजराची घड्याळं वगैरे निर्माण झाली असं माझं स्पष्ट मत आहे. चाकच नसतं, तर गाड्या बनल्या नसत्या. गाड्या नसत्या तर रस्ते बनले नसते. गाड्या आणि रस्ते नसते तर लोकांनी घरापासून दूरदूरवर कामधंदे शोधले नसते. कामाची जागा घराजवळच असती तर मग पहाटे लवकर उठावंही लागलं नसतं आणि माझ्यासारख्यांना गजराची गरजही भासली नसती! तरीही, या शोधसाखळीच्या शेवटी असलेल्या गजराच्या घड्याळाच्या शोधानंतर त्याच्याकडून स्नूझची परवानगी मिळवायला मध्ये इतका काळ का जावा लागला हे मला पडलेलं एक कोडं आहे. कदाचित न्यूटन, गॅलिलिओ वगैरे मंडळींना रोज सकाळी ठरलेल्या वेळी आपोआप जाग येत असावी. नाहीतर विश्वाची कोडी उलगडण्यापूर्वी त्यांनी आधी या स्नूझयुक्त घड्याळाचा शोध लावला असता.
गजराच्या घड्याळ्यानं हे स्नूझचं लेणं ल्यालं आणि माझ्या साखरझोपेत एकदम क्रांतीच घडून आली. आता पहिल्या गजरानंतर मी पुन्हा बिनधास्त झोपू शकते. पाच मिनिटांनी माझं घड्याळ आईप्रमाणेच मला पुन्हा एकदा हाक मारतं. कूस बदलत मी दुसऱ्यांदा झोपी जाते. घड्याळानं तिसऱ्यांदा जागं करण्यापूर्वी ‘पहाटे पाचचा गजर लावून मी झोपले आहे... बरोब्बर पाच वाजता गजर वाजतो... मला ताबडतोब जाग येते... मी गजर बंद करते आणि पाच वाजून पाच मिनिटांनी अंथरुणाच्या बाहेर येऊन माझ्या कामाला लागते’ असं स्वप्नंही मला पडतं. पहाटेचं हे स्वप्नं कधीही खरं होणार नाही याची मलाच काय त्या घड्याळालाही खात्री असते. म्हणून ते मला न कंटाळता चौथ्यांदा हाक मारतं. गजर वाजायला लागून आत्ताशी वीसच मिनिटं झाली आहेत याची झोपाळू डोळ्यांनी खातरजमा करून घेऊन मी पांघरूण पुन्हा एकदा डोक्यावरून ओढून घेते. पाचव्यांदा गजर वाजतो. माझ्या लक्षात येतं की मी घड्याळ माझ्या हातात पकडूनच झोपले आहे. साहजिकच तिथल्या तिथे गजर तात्पुरता बंद करणं सोपं जातं. सहाव्यांदा घड्याळ पुन्हा आवाज देतं... आता बाहेरही उजाडलेलं असतं... पाऊण तासातला अर्धा तास बघता बघता संपलेला असतो...
‘फाईव्ह मिनिट्स मोअर’ म्हणत मी पुन्हा केव्हा झोपेच्या अधीन होते ते माझं मलाच कळलेलं नसतं...
--------------------------------
आमच्या चिरंजीवांनी, बाकी काही नाही तरी, आपल्या मातोश्रींचा हा गुण नेमका उचलला आहे. आता, त्याला सात वाजता जायचं असेल तर मी सव्वापाचचा गजर लावून झोपते! गरजूंनी हिशेब करून त्याच्या वेक-अप कॉन्स्टंटची किंमत शोधून काढावी...

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)