इट्स टाइम फॉर आफ्रिका - २
गार्डन रूट – दगडधोंडे, डोंगर-कपारी : १
पहिल्या भागात टूर प्लॅन लिहिला. पण पुढचे लेख त्या क्रमानुसार नाहीत.
किंबहुना प्रत्येक ठिकाणासाठी एक लेख अशी विभागणी मला करताच येणार नाही.
त्याचं एक कारण- गार्डन रूटची geology. दुसरं कारण- तिथे आम्ही केलेले
nature trails, walking/hiking trails. आणि तिसरं कारण तिथला
flora-n-fauna. आणि या सगळ्यांचं समुद्रासोबतचं अद्वैत! मी ना geology ची
अभ्यासक आहे, ना botanist आहे. पण या सगळ्या गोष्टींचा एकजिनसीपणा,
परस्परावलंबित्व, एकमेकांना धरून राहणे, तिथे ठिकठिकाणी इतकं विलक्षणरीत्या
जाणवत होतं, की बस्स!
त्यामुळे random क्रमाने लिहिणार आहे. सर्वात पहिला फोकस दगडधोंडे, rock structures यांच्यावर.
नैसर्गिक खडकांबद्दल मला लहानपणापासून आकर्षण आहे. मोठाले फत्थर, शिळा, दगडधोंडे ते लहान गोटे, खडे सगळ्याबद्दल. बरं, महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या परिसरात राहणार्यांना मोठाले डोंगरकडे, शिळा वगैरेंचं नाविन्य असायचं कारण नाही. तरीही गार्डन रूटवरच्या डोंगरकड्यांनी, फत्थरांनी असं काही थक्क करून सोडलं की विशेषणं कमी पडावीत. आत्ता हे लिहितानाही मी वारंवार थबकते आहे, कारण त्यांचं वर्णन करायला नेमके शब्द सापडत नाहीयेत. त्या डोंगर-कड्यांमध्ये नजरबंदी व्हावी असं काहीतरी होतं. सवयीनं `कातळकडे’ हा शब्द डोक्यात येतो. पण तो कातळ नव्हता. मुख्यत्वे वालुकाश्म होता.
या नजरबंदीची पहिली झलक केपटाऊनमध्ये मिळाली. केपटाऊन विमानतळावरून आमच्या हॉटेलच्या दिशेनं निघालो होतो. (विमानतळ समजा ठाण्यात. आधीच्या भागात बाकी सगळी लोकेशन्स सांगितली, तर हे सुद्धा.) टिपिकल शहरी रुंद, सुंदर रस्ता, दोन्ही बाजूंना चकाचक घरं, तुरळक ट्रॅफिक... बघता बघता रस्ता चढाचा व्हायला सुरुवात झाली. शहरी वस्ती डावीकडे खाली खाली जायला लागली. आणि अचानक एका वळणानंतर डावीकडे खाली विस्तीर्ण समुद्रकिनारा, पांढरी वाळू, काठावरची लहानसहान घरं आणि उजवीकडे डोंगर दिसायला लागले. हा बदल अगदी नकळत, बेमालूम घडला. डावीकडचा समुद्रकिनारा म्हणजे false bay चा भाग. या फॉल्स-बेचा विस्तार असा आहे, की समुद्रातून दोन-एकशे किलोमीटरवरूनही किनार्यावरचे दिवे दिसू शकतात, म्हणे. १५ व्या-१६ व्या शतकांत युरोपी दर्यावर्दी इथपर्यंत यायचे तोवर त्यांच्या प्रवासाच्या आशा-आकांक्षा सगळ्या शून्य झालेल्या असायच्या. खवळलेला समुद्र, महिनोन्महिने जमिनीचं दर्शन नाही, अशा हतबल-हताश परिस्थितीत त्यांना फॉल्स-बे नजरेस पडायचा. आणि त्यांच्या good hopes पुन्हा उसळी मारून वर यायच्या- अशा आशयाचा display नंतर एका ठिकाणी बघायला मिळाला. (अधिक उत्सुकता असणार्यांनी केप टाऊनजवळ नकाशा झूम-इन करून बघा. केप टाऊनच्या दक्षिण-पूर्वेला खाली हा अर्धगोलाकार bay दिसतो.)
आमची कॅब सुसाट निघाली होती. खालचा समुद्राचा सुंदर नजारा बघावा की
उजवीकडचे डोंगर बघावेत ते समजत नव्हतं. डोंगरावर अर्ध्या उंचीपर्यंत खुरटं
पण हिरवं गवत दिसत होतं. आणि वरती हळूहळू रुक्ष, उजाड, करडा रंग होत
गेलेला. साहजिक विचार आला, इथे हिवाळ्यात बर्फ पडत असणार. ड्रायव्हरला
विचारलं. तो म्हणाला, अगदी क्वचित आणि ते सुद्धा मोजक्या स्पॉट्सवर.
आम्हाला दिसणारे स्पॉट्स त्यातले नव्हते. बर्फ न साचणारा, पण हिरवा सुद्धा
नसणारा डोंगरमाथा होता तो! त्याची उंची अशी, की त्याला लागून समुद्रकिनारा
असेल हे एरवी डोक्यातही आलं नसतं.
ते वळण, तो false bay जितक्या पटकन समोर आले तितकेच बघता बघता मागेही पडले.
तिथल्या landscape ची एक झलक तेवढी दिसली. रस्ता पुन्हा खाली उतरला. आणि
आम्ही आमच्या मुक्कामाच्या म्हणजे Fish Hoek परिसरात शिरलो.
दुसर्या दिवशी सकाळी Cape चा रस्ता पकडला. (केप टाऊनमध्ये आम्ही टाऊन
कमी, केप आणि जंगल भागात जास्त वेळ घालवला.) केप भागात ‘केप ऑफ गुड होप’
आणि ‘केप पॉइंट’ अशी दोन ठिकाणं आहेत. केपटाऊनच्या तुलनेत दोन्ही
दक्षिणेला, पण तिथे एकमेकांच्या थोडंफार विरुद्ध दिशेला. मला काही करून आधी
केप ऑफ गुड होपला जायचं होतं. म्हणून २-२ वेळा कॅब ड्रायव्हरला विचारून
खात्री करून घेतली. (दक्षिण आफ्रिकेत public transport ची सोय फारशी नाही;
जी काही आहे ती विशेष सोयीची नाही. त्यामुळे एकतर car rent किंवा cab हेच
पर्याय आहेत.)
Fish Hoek चा नीटनेटका भाग मागे पडला. रस्ता जरा सुनसान व्हायला लागला.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तुरळक गॅरेजेस, वर्कशॉप्स दिसत होती. तिथे
ॲफ्रो माणसं काम करताना दिसत होती. फुटपाथवरून क्वचित चालत निघालेली माणसं
दिसत होती, ती सुद्धा सगळी ॲफ्रोच. पुढे एका ठिकाणी काही चाळवजा बुटक्या
इमारतींचा समूह होता, शेजारी मोठं मैदान होतं, तिथे काहीजण फुटबॉल खेळत
होते, जवळ एक शाळेची बैठी इमारत दिसत होती. वस्ती सगळी ॲफ्रो माणसांची. केप
टाऊन सर्वात पहिल्यांदा वसलं ते इथे, असं ड्रायव्हर म्हणाला. आता तो भाग
पारच वेगळा वाटत होता.
ती वस्तीही मागे पडली. एकच एक रस्ता. थोडीफार वळणं घेत जाणारा. फार चढ-उतार
नव्हते. दोन्ही बाजूंना विस्तीर्ण सपाट प्रदेश. लहानसहान झुडुपं किंवा
जमिनीलगत वाढलेलं बारीक, खुरटं गवत. झाडं अगदी क्वचित दिसत होती. लांबवर
टेकड्या दिसत होत्या. त्या सुद्धा अशाच खुरट्या गवताच्या. वाटेत एका ठिकाणी
२ springboks चरताना दिसले. म्हणजे ड्रायव्हरने दाखवले म्हणून लक्ष गेलं.
पुढे एका ठिकाणी ४-५ wild ostritches दिसली. उंची भारी होती त्यांची. आसपास
फारशी झाडं नसल्यामुळे तर त्यांची उंची आणखीनच कळत होती. पण हे सगळं
कारमधून जाताना, झपकन, दिसलं म्हणेपर्यंत मागे पडलं, असं. रस्त्याच्या
कडेला मोठ्या, पिवळ्या फुलांची झुडुपं अखंड दिसत होती. हे Protea, दक्षिण
आफ्रिकेचं राष्ट्रीय फूल. हे राष्ट्रीय फूल झाडावरून तोडायला तिथे
राष्ट्रीय मनाई आहे, म्हणे. त्याचा व्यापार करायचा असल्यास विशेष परवानग्या
काढाव्या लागतात. (आपल्यासाठी springboks, protea हे शब्द क्रिकेटशी
जोडलेले आहेत.)
समुद्रकिनारा आसपासच कुठेतरी आहे हे कळत होतं, पण वळत नव्हतं. आणि एका ठिकाणी ‘केप ऑफ गुड होपकडे’ अशी पाटी दिसली. गाडी वळली. थोडं अंतर गेलो आणि पुन्हा तसंच, एका बाजूला डोंगर आणि दुसर्या बाजूला समुद्र. पण आता आम्ही अगदी समुद्रकिनार्यालगत होतो. आणि मग... रस्ता संपला. Just like that! कल्पना करा, ते त्या रस्त्याचं किंवा त्या परिसराचं शेवटचं टोक नव्हतं. ते त्या देशाचं, नव्हे आफ्रिका खंडाचंच एक टोक होतं. केप ऑफ गुड होप : एक खास cul-de-sac.
कॅबमधून उतरलो तर तिथे जो काही अशक्य वारा भणाणत होता! सॅकमधून जॅकेट्स,
टोप्या, गॉगल्स एक-एक करत बाहेर निघाले. डोळ्यांना सहन न होणारं टळटळीत ऊन
आणि प्रचंड बोचरा वारा हे कॉम्बिनेशन पहिल्यांदा अनुभवलं.
म्हटलं तर तो भाग अगदी ओसाड होता. पुरातत्व उत्खननाच्या ठिकाणांचे फोटो आपण
पाहतो, तसा. किंवा भूकंपाने पडझड झालेला गावखेड्यातला भाग दिसेल, तसा.
पण एकंदर दृश्य म्हणाल तर देखणं होतं. स्वच्छ निळं आकाश, समोर त्याहून गडद निळाशार समुद्र आणि त्याच्या अलीकडे फिकट पिवळसर, पांढुरक्या, तांबूस, लालसर, विटकरी रंगांच्या दगडगोट्यांचा, धोंड्यांचा, मोठ्या शिळांचा खच पडलेला. त्या संपूर्ण चित्रचौकटीला स्वतःची एक खास कलर-स्कीम होती. त्यात पिवळसर छटा कळत-नकळत होती. Dominant होता तो तांबडा, विटकरी रंग. ती विलक्षण रंगसंगती आजही नजरेसमोर आहे. मागच्या टेकड्यांवरच्या गवताचा हिरवा रंग नजरेच्या टप्प्याच्या १८० अंशांपलीकडे होता. त्यामुळे माझ्या आठवणीत तर तो उरलेलाच नाही.
केप ऑफ गुड होप. शाळेतल्या इतिहासापासून आपल्याला या जागेबद्दल ठाऊक असतं. पण त्या जागी प्रत्यक्ष उभं राहिल्यावर तो इतिहास खर्या अर्थानं उमगल्यासारखा वाटला. ‘वास्को द गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारतात आला’ हे वाचल्यावर वाटायचं की आफ्रिका खंडाच्या दक्षिण किनारपट्टीवर मध्यात कुठेतरी हे ठिकाण असणार. पण ही तर त्या किनारपट्टीच्या एका कोपर्यातली बारीकशी जागा. त्यापूर्वी युरोपी राज्यकर्त्यांचा जमिनीमार्गे आशियाशी संपर्क झालेला होता. आणि काही दर्यावर्दी केप ऑफ गुड होपपर्यंत येऊन परत गेले होते. वास्को द गामाने सर्वात पहिल्यांदा समुद्रामार्गे भारतापर्यंत प्रवास केला. केवढी अनिश्चितता भरली असेल त्या प्रवासात! वार्याला तोंड देतादेता तिथे नुसतं उभं राहणेही आम्हाला जड जात होतं. मग तेव्हा खोल समुद्रात तर काय परिस्थिती ओढवली असेल! तरी वास्को द गामाला खात्री होती, की त्या मार्गाने पुढे जात राहिल्यास आपण नक्की भारतात पोहोचणार. तिथे त्या दिवशी दगडगोट्यांत तोल सावरत उभ्या उभ्या समुद्राकडे पाहताना जाणवलं, की ’केप ऑफ गुड होप’ म्हणजे त्या अनिश्चिततेचं आणि सकारात्मकतेचं, दोन्हींचं प्रतीक. म्हणून तर त्याचं जुनं नाव (Cape of Storms) बदललं गेलं... त्या भणाण वार्यात तेच नाव अधिक समर्पक वाटत होतं, ते सोडा.
तिथे दगडधोंड्यांचा खच असण्यामागे वार्याचंच कारण असावं. एका बाजूला उंच, खडकाळ, कातरलेली टेकडी होती. ते दगडधोंडे म्हणजे तिचीच पिलावळ असणार. त्या जागेचे अक्षांश-रेखांश लिहिलेली एक मोठी पाटी तिथे लावलेली आहे. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला तिकडे हाकलं. तिथे आमचे फोटो काढले. आणखी ३-४ गाड्या तिथे होत्या. त्या लोकांनीही फोटोसाठी रांग लावलेलीच होती. तिथून बाजूला झालो.
जवळच आणखी एक पाटी दिसली- Cape of Good Hope Scenic walk- आणि एक पायवाट त्या टेकडीच्या दिशेनं जात होती. इतक्या वेळात माझं पहिल्यांदा लक्ष गेलं, की त्या टेकडीवर पार वरपर्यंत माणसं गेलेली दिसत होती. ती चालत (हलत) असली तरच दिसत होती. एरवी लपून जात होती. कारण- त्या टेकडीचे रंग आणि texture. अहा! काय वर्णन करायचं! उभ्या-आडव्या, लहान-मोठ्या चिरा पडलेले थर, एकावर एक कुणीतरी आणून ठेवल्यासारखे. मग त्यातून fork ने तुकडे तोडून घेतल्यासारखे... किंवा बिघडलेला केक आपसूक उकलला जातो तेव्हा कसं दिसतं, तसे ते दगडांचे गठ्ठे... किंवा चुरगाळलेला कागद? अंहं. वाळलेला चिखलाचा गठ्ठा? नाही. गुलकंद-नारळाच्या बिघडलेल्या वड्या? Maybe... म्हटलं ना, वर्णनाला नेमके शब्द सापडत नाहीत.
साधारण १०-१२ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन super-continent फुटण्याच्या अंतिम काळात गार्डन रूट किनारपट्टी तयार झाली. ऊन, पाऊस, समुद्राच्या लाटा यामुळे त्यात अनेक बदल होत गेले. त्याबद्दल नेटवर भरपूर माहिती आहे. ती वाचायला प्रवृत्त करणार्या अनेक विलक्षण नैसर्गिक रचना, असंख्य दृश्यं गार्डन रूटवर आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी माझ्यासारखी दगड-प्रेमी व्यक्ती वेडी होते. (विलक्षण रचना असं का म्हटलं ते पुढच्या लेखांमध्ये सांगेनच.)
त्या टेकडीवर चढण्याचं नक्की ठरत नव्हतं. नुकतीच गुडघ्याच्या छोट्याशा दुखापतीतून सावरत होते. त्यामुळे उत्साहाला जरा आवर घालण्याचं घरून निघतानाच स्वतःला बजावलं होतं. (गार्डन रूटनं हा निश्चय पुढे पुरता हाणून पाडला, ती बात निराळी.) पण म्हटलं, थोडंसं तरी वरती जावं. चढ फार काही अवघड, steep नव्हता. मग खरोखरच थोडंसंच वरती गेले. एक रुंद दगड पाहून बसले.
आता खालचा परिसर आणखी विस्तीर्ण, छान दिसत होता. आता गाड्यांची गर्दी वाढली
होती. वाटलं, इथे आलेल्या प्रत्येकाला इतिहासातलं केप ऑफ गुड होप ठाऊक
असेल का? की भारताशी संबंध असल्यामुळे आपल्यालाच तो इतिहास अधिक जवळचा
वाटतो?
मी बसले होते तो दगड आधी फिकट, गुलबट रंगाचा वाटला होता. बसल्यावर जवळून त्यात अनेक छटा दिसल्या.
मी त्या दगडावरून हळूच हात फिरवला. भटकंतीदरम्यान आवडलेली ठिकाणं नेणीवेत register करण्याची ही माझी आवडती पद्धत. माझ्यासाठी केप ऑफ गुड होपची वारी तिथे पूर्ण झाली होती. तो दगड ना वार्यामुळे थंडगार पडला होता, ना कडक उन्हामुळे तापलेला होता. Cape of Good Hope हे ठिकाणही मला तसंच वाटलं- balancing act साधणारं.
Comments