पुस्तक परिचय : क्लोज एन्काउंटर्स (पुरुषोत्तम बेर्डे)

पुस्तक आणि लेखकाच्या नावाची जोडी एकत्र पाहिली, तर वाटतं की नाट्य-चित्रसृष्टीतल्या काही व्यक्ती-वल्लींबद्दल किंवा अनुभवांबद्दल लेखन असेल. पण पुस्तकाचं मुखपृष्ठ काही वेगळंच सांगतं... याच क्रमाने विचार करत मी हे पुस्तक उचललं. लेखक लहानपणी कामाठीपुर्यात राहत होता. त्या काळातल्या या आठवणी, व्यक्तिचित्रं, अनुभव आहेत. एकूण २४ लेख आहेत. काही लहान, काही मोठे. त्यातली ७० आणि ८० च्या दशकातली कष्टकरी, बकाल, हलाखीची मुंबई फार रंजक आणि भेदक दोन्ही आहे. कामाठीपुर्यातल्या १६ गल्ल्या, तिथे राहणारे भाजीवाले, छोटे भंगार व्यापारी, छोटी-मोठी दुकानं नाहीतर हॉटेलं चालवणारे व्यावसायिक, या सार्यांचं आपांपसांतलं नातं, शेजारधर्म, हेवेदावे, चढाओढ, खुन्नस, काळा बाजार, हिंसाचार, हिंदु-मुसलमान तेढ... त्यांतलंच शाळकरी मुलांचं आपलं विश्व, मैत्री, आसपासचं मोठ्यांचं जग समजून घेण्याचे त्यांचे प्रयत्न... हिंदी सिनेमे, गल्ली क्रिकेट, स्थानिक राजकारण... खास बंबैय्या हिंदी-मराठी बोली... मुंबई शहराचा एक लहानसा काळ-तुकडाच पुस्तकातून समोर येतो, आणि तो पुढे पुढे वाचत रहायला आपल्याला उद्द्युक्त करतो. कामाठीपुरा या उल्लेखाने ...