पुस्तक परिचय : Reshaping Art (T. M. Krishna)

कर्नाटकी शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा यांनी कला, कलासाधना यासंदर्भातली सहसा चर्चा न होणारी एक मिती या पुस्तकात सुस्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकानुनय, रसिकानुनय, आनंद, विरंगुळा - कलाविष्कारांवरचे असे जगमान्य पापुद्रे काढून टाकून जगण्याचा शोधक प्रवास म्हणून कलेला आपलंसं केलं पाहिजे; कलेला जातीभेद, वर्गभेद, धर्मभेद यांच्या चौकटीत अडकवून ठेवता कामा नये; कला ही त्यापलिकडचीही एक वेगळी जाणीव आहे; असं ते ठासून सांगतात. हे सांगत असताना त्यांनी आपल्या अनुभवांतून आलेली काही खणखणीत विधानं केली आहेत. उदा. कर्नाटकी संगीत कार्यक्रम म्हणजे निव्वळ श्रवणभक्ती उरत नाही, तिथे ब्राह्मणी संस्कृतीचं पुरेपूर प्रतिनिधित्व दिसतं. (ते स्वतः कर्नाटक संगीत शिकत असतानाच्या काही गोष्टी, निरिक्षणं त्यांनी पुस्तकात थोडक्यात सांगितली आहेत.) रसिकांना, श्रोत्यांना, डोळ्यांसमोर ठेवून कलानिर्मिती करण्यातच कलाकारांना जास्त रस असतो. कलारसिकांकडे सहप्रवासी म्हणून नव्हे, तर एक ग्राहक (कन्झुमर) म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे, कलाकार आनंदाचे पुरवठादार बनून राहतात. कला जेव्हा धार्मिक अनुष्ठान बनून र...