पुस्तक परिचय - Hired: Six Months Undercover in Low-Wage Britain (James Bloodworth)

जेम्स ब्लडवर्थ या ब्रिटिश पत्रकाराने ठरवून, प्लॅन करून सहा महिने ब्रिटिश कामगार वर्गाप्रमाणे तुटपुंज्या पगाराच्या नोकर्‍यांसाठी अर्ज करून चार प्रकारच्या नोकर्‍या केल्या. त्या त्या नोकरीच्या ठिकाणी त्याचे सहकारी, स्थानिक ज्या प्रकारे राहायचे तसंच तो देखील राहिला. (गलिच्छ वस्त्या, एका घरात दाटीवाटीने राहणारे कामगार) त्यांच्यासारखंच जेवण, ट्रान्स्पोर्ट, त्यांच्याप्रमाणेच महिन्याच्या कमाईत(च) कशीबशी गुजराण करून, त्याच लोकांच्यात मिसळून, त्यांच्याशी गप्पा मारून त्या सर्व अनुभवांवर त्याने हे पुस्तक लिहिलं आहे.

अमॅझॉन पिकिंग ॲन्ड पॅकिंग वेअरहाऊस (Rugeley), केअर वर्कर (Blackpool), एका इन्शुरन्स कंपनीचं कॉल सेंटर (South Wales), उबरचालक (लंडन) अशा चार नोकर्‍या त्याने केल्या. पुस्तक लिहिण्याचं ठरवूनच त्यानं हे प्रोजेक्ट सुरू केलं. मात्र प्रस्तावनेत तो म्हणतो, की तो केवळ तुटपुंज्या पगारांच्या नोकर्‍या यापुरतं पुस्तक मर्यादित ठेवू शकला नाही. त्या नोकर्‍यांइतकंच त्या-त्या गावांबद्दल, तिथल्या माणसांबद्दल, पूर्वी त्या ठिकाणी भरभराटीला आलेले जुने पारंपरिक उद्योगधंदे, ते लयाला गेल्यानंतर त्या प्रदेशांवर झालेले त्याचे सामाजिक-आर्थिक परिणाम, यांच्याबद्दलही लिहिणं तितकंच कळीचं आणि गरजेचंही असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आणि ते त्यानं केलं.


या सर्व खटाटोपातून त्यानं ’gig economy’ आणि ’zero hour contract’ या दोन गोष्टींवर प्रामुख्यानं भाष्य केलं आहे. त्यानं या चारही ठिकाणांचं केलेलं वर्णन खूप चित्रदर्शी, कळकळीचं आणि पर्यायाने अस्वस्थ करणारं आहे. पैकी अमॅझॉनशी शहरी भारतीय आता चांगलेच परिचयाचे आहेत. मात्र ते कस्टमर्स म्हणून. एका क्लिकसरशी आपल्याला हवी ती वस्तू घरपोच देण्यामागे दुसर्‍या बाजूला काय काय आणि कसं कसं चालतं, त्या कामगारांची कशी पिळवणूक होते, zero hour contract चा फास नेमका कसा, तरीही अनेक कामगार नाईलाजास्तव ते काम का करतात, हे सगळं धक्कादायक आहे.
तुलनेनं तसं कमी धक्कादायक, तरी लंडनमधल्या उबरचालकाचं आयुष्य कसं असतं, gig economy चं गाजर कसं त्यांना भुलवत-झुलवत ठेवतं, उबरच्या बिझिनेस मॉडेलचं कस्टमर्सकडून कौतुक होत असताना दुसरी बाजू काय असते, हे त्यानं अनुभवांतून स्वच्छ दाखवलं आहे.
साऊथ वेल्सचा भाग पूर्वी कोळसा खाणींसाठी परिचित होता. ८०च्या दशकात हळूहळू या खाणी बंद होत गेल्या. स्थानिकांच्या उपजीविकांवर त्याचा खूप परिणाम झाला. तग धरून राहण्यासाठी त्यांना पुढे काय काय करावं लागलं, तिथली सामाजिक परिस्थिती आज कशी आहे, हे सगळं वर्णन वाचताना वाक्यावाक्याला मुंबईतला गिरणी कामगारांचा संप आठवत होता. (#)
ब्लॅकपूल हे २०व्या शतकाच्या सुरुवातीला एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेलं गावही आजघडीला इंग्लंडमधल्या अति मागास भागांपैकी एक गणलं जातं. या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेताना स्थानिक सामाजिक परिस्थितीची कशी मोडतोड होत गेली त्याचं वर्णन खूप अंगावर येतं.
पुस्तकात ठिकठिकाणी कामगार कायदे, मजुरी, बेरोजगारी, यासंबंधीची आकडेवारी, टक्केवारी दिली आहे. संबंधित वृत्तांच्या, analyses च्या लिंक्सही दिल्या आहेत. त्या अर्थाने हे लेखन ’जे दिसलं ते लिहिलं’ यापलिकडेही अभ्यासपूर्ण वाटलं.

इंग्लंडमधल्या कामगार वर्गाचं हे प्रातिनिधिक अस्वस्थ वर्तमान मला अधिक परिणामकारक वाटलं, कारण लेखकाने ते इंग्लंडपुरतं मर्यादित ठेवलं आहे. त्याच्या आधारानं तो जागतिक पातळीवरचं काहीही सांगायला जात नाही. अर्थात वाचताना जो तो आपापल्या देशाशी, भवतालाशी ते पडताळून पाहतोच. पण ते वाचणार्‍यावर अवलंबून राहतं. उदाहरणार्थ, Rugeley च्या (आणि एकूणच इंग्लंडमधल्या बाकीच्या) अमॅझॉन वेअरहाऊसमध्ये पूर्व युरोपियन स्थलांतरित कामगारांची संख्या खूप मोठी आहे. स्थानिक विरुद्ध स्थलांतरित हा भेद तिथेही आहेच. या गोष्टीशी आपण लगेच रिलेट होतो.
मला रिलेट झालेली आणखी एक गोष्ट म्हणजे ’एक आझाद इसम’ हे पुस्तक. (लेखक - अमन सेठी, अनुवाद - अवधूत डोंगरे) अर्थात हे पुस्तक आणखी खोलवर जाणारं आहे. त्यातल्या अनुभवांची पातळीही थोडी वेगळी आहे. तरी दोन्ही पुस्तकांमागची मूलभूत कल्पना मला सारखी वाटली.

Hired या पुस्तकाचा परिणाम म्हणून अमॅझॉन कंपनीला इंग्लंडमधल्या त्यांच्या कामगारांसाठी minimum wage नियम लागू करावा लागला. जेमतेम दोन-एक वर्षांपूर्वीची ही गोष्ट. पण तोपर्यंत तिथे कंपनीत हा नियम नव्हता हे खूप आश्चर्यकारक आहे. (भारतातही अशीच अवस्था असणार, असं वाटलं.)

यात आणखी एक fact मला अत्यंत भेदक आणि कळीची वाटली. लेखकाने निवडलेली लंडनशिवायची इतर तीन ठिकाणं इंग्लंडच्या उत्तर भागातली आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना तो एके ठिकाणी लिहितो, इंग्लंडच्या मध्यभागातून ट्रेन्ट नदी वाहते आणि नदीच्या दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे दिसणारं इंग्लंड एकमेकांहून पूर्णपणे वेगळं आहे. हे वाक्य माझ्या मनात खूप रुतून बसलं आहे. ते वाचल्यावर मी इंग्लंडचा नकाशा पुन्हा एकदा नव्यानं आणि बारकाईनं धुंडाळला. मँचेस्टर, लिव्हरपूल ही मोठी आणि प्रसिद्ध शहरं इंग्लंडच्या उत्तरेकडे आहेत हे माझ्या पर्यटकी नजरेला साधारण माहिती होतं, मात्र ही शहरं म्हणजे उत्तर इंग्लंड नव्हे ही fact या पुस्तकामुळे चांगलीच टोचली.
इंग्लंडसारखा विकसित देश, म्हणजे तिथे गरिबी नसणार, तिथलं कुणीच रांजलं-गांजलेलं नसणार, असा भ्रम कधीही मनात नव्हता. तरीही तिथल्या कामगार वर्गाचं हे प्रातिनिधिक अंतरंग मला हलवून गेलं.

----------

# यंदाचं बुकरविजेतं पुस्तक Shuggie Bain हे देखील या कोळसा खाणकामगारांच्या भवतालातलं आणि ८०च्या दशकातलंच आहे.

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)