उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग ४)

आमच्या महिन्याभराच्या भटकंतीचा शेवटचा दिवस.

डेन्मार्कमधल्या हेलसिंगॉर (Helsingør) इथला ‘क्रॉनबोर्ग कॅसल’ पाहायला निघालो होतो. रेनेसाँ काळातला उत्तर युरोपमधला हा एक महत्त्वाचा किल्ला. कोपनहेगन ते हेलसिंगॉर हा पाऊण तासाचा ट्रेन प्रवास, किल्ल्याचं स्थापत्य, थोडाफार इतिहास आणि किल्ल्यालगतची खाडी- त्या दिवसाच्या भटकंतीची इतकी पूंजी देखील भरपूर ठरली असती; स्वच्छ हवा, अहाहा गारवा, शांत वातावरण ही नेहमीची यशस्वी मंडळी जोडीला होतीच; मात्र आमच्या पर्यटकी ललाटावर त्याहून अधिक काही लिहिलेलं होतं आणि किल्ल्यात आतवर जाईपर्यंत त्याची आम्हाला कल्पना नव्हती.

04-Kronborg-castle-11.jpg

ठरलेली ट्रेन पकडून हेलसिंगॉरला पोहोचलो. स्टेशनवरून चालत, रस्ता शोधत शोधत कॅसल गाठला. तिकीट काढून आत शिरलो. तिथे येणार्‍या सर्वांनाच किल्ल्यात सहज मार्ग शोधत फिरता यावं अशी व्यवस्था होतीच. शिवाय तिकिटासोबत एक माहितीपत्रक आणि नकाशाही मिळालेला होता. माहितीपत्रकात लिहिल्यानुसार, क्रॉनबोर्ग किल्ल्याचा अभिजात इंग्रजी साहित्याशीही घनिष्ट संबंध आहे; कारण शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ नाटकाचं कथानक याच किल्ल्यात घडताना दाखवलं आहे. (नाटकात हॅम्लेट हा डेन्मार्कचा राजपुत्र असतो.) दरवर्षी उन्हाळ्याचे दोन महिने किल्ल्यात दररोज दोनदा नाटकातले काही महत्वाचे प्रवेश सादर केले जातात; या उपक्रमाचं नाव ‘हॅम्लेट लाइव्ह’... ओडेन्सनंतर पुन्हा इथे काल्पनिक पात्रांची प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणांशी सांगड घातलेली समोर आली; त्या कल्पकतेचं परत एकदा कौतुक वाटलं. माहितीपत्रकात पुढे नाटकाचं थोडक्यातलं कथानक, नाटकातल्या प्रमुख पात्रांची ओळख, असं काय काय दिलेलं होतं. त्यावरून नजर फिरवली. मात्र इथवर येऊन कुठेतरी एका जागी बसून नाटकातले प्रवेश पाहण्यात वेळ घालवावा असं काही वाटलं नाही. त्यामुळे आम्ही ते माहितीपत्रक पाठीवरच्या सॅकमध्ये कोंबलं आणि नकाशानुसार किल्ल्यात फिरायला सुरूवात केली.

IMG_20190717_114307.jpg
...
04-Kronborg-castle-01.jpg

किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठी, प्रशस्त खुली अंगणासारखी जागा होती. फिरता फिरता तिथे येऊन पोहोचलो. सभोवताली दुमजली-तिमजली वाड्यातली दालनं, त्यांचे छज्जे, त्यावरचं कोरीवकाम, कलाकुसर केलेल्या खिडक्या... पुरातन ऐतिहासिक वास्तूची सगळी चिन्हं, वास्तू ४०० वर्षांहून अधिक जुनी असूनही बर्‍यापैकी जतन केलेली.

04-Kronborg-castle-02.jpg

आम्ही इकडे तिकडे बघत होतो, फोटो काढत होतो; एवढ्यात एका कोपर्‍यातल्या दारातून अचानक एक भारदस्त मनुष्य बाहेर आला. तो त्याच्या शरीरयष्टीमुळे नव्हे तर वेशभूषेमुळे भारदस्त दिसत होता. राजेरजवाड्यांच्या काळचा वाटणारा भरजरी, पायघोळ अंगरखा; त्यावर कंबरपट्टा; डोक्यावर सरदार-दरकदार घालत असावेत असा टोप; भरघोस दाढी... त्याला पाहून त्याचे फोटो काढायला सरसावलेल्या आसपासच्या पर्यटकांकडे बघून (त्यांत मी देखील होतेच) त्याने दोन-तीन भरघोस इंग्रजी वाक्यं फेकली; त्याचे उच्चार, वाक्यांतली जुन्या धाटणीची इंग्रजी भाषा ऐकली आणि डोक्यात प्रकाश पडला, की आमच्यासमोर ‘हॅम्लेट लाइव्ह’ सुरू झालेलं होतं. हे लक्षात आलं आणि काही क्षण त्या मोकळ्या अंगणात आनंदाने बागडावंसंच वाटलं. ते नाटक अशा प्रकारे आपल्यासमोर येईल याची मुळी कल्पनाच केलेली नव्हती! तो भारदस्त मनुष्य म्हणजे पोलोनियस. (नाटकात त्याच्या मुलीवर, ऑफिलियावर, हॅम्लेटचं प्रेम असतं.) थोड्याच वेळात तिथे वेड्याचं सोंग घेतलेला हॅम्लेटही अवतरला. दोघांचा एक प्रवेश तिथे सादर झाला... just like that, कुठल्याही सेट-माइक-रंगमंचाविना... पण असं तरी कसं म्हणता आलं असतं? त्याहून उत्तम सेट हॅमलेटची भूमिका गाजवलेल्या भल्याभल्या अभिनेत्यांनाही लाभला नसता; तसा मुक्त रंगमंच पाहून त्यांनाही या कलाकारांचा हेवा वाटला असता. त्या एका प्रवेशाने अशी काही वातावरणनिर्मिती केली, की नाटकाबद्दल त्याआधी विशेष काहीच माहिती नसूनही आम्ही त्याकडे खेचले गेलो.

hamlet-collage.jpg

नाटकात किल्ल्याच्या तळघरात हॅम्लेटला त्याच्या बापाचं भूत भेटतं आणि आपली हत्या कुणी घडवली ते त्याला सांगतं. तो प्रवेश खरंच तिथल्या एका काळोख्या, तळघरावजा दालनात सादर झाला. हॅम्लेटच्या बापाच्या भुताची प्रतिकृती लेसर वापरून उभी केली होती. गुडूप अंधार, ४०० वर्षांपूर्वीचं किल्ल्याचं बांधकाम, अर्धगोल घुमटाकार दालन, त्याच्या दगडी भिंती... मी मुद्दाम एका भिंतीलगत, एक हात भिंतीवर टेकवून उभी होते; खाली पायाशी सुद्धा एक लहान, दगडी ओटा/कट्टा प्रकारचं स्ट्रक्चर फक्त जाणवत होतं, दिसत नव्हतं... त्या भिंतीचा, पुरातन वास्तूचा म्हणून एक अजब गारवा, आपल्या पर्यटनाच्या व्याख्येत न बसणारं काहीतरी समोर आकारत असताना पाहणं आणि ते नसतं तर या दालनात आपण असे आलो नसतो ही जाणीव, हे सगळं अमेझिंग होतं.
त्याचवेळी पहिल्या मजल्यावरच्या ‘किंग्ज अपार्टमेंट’मध्ये नाटकाचा आणखी एक प्रवेश सुरू होता. नाटकाला असा इतका मुक्त अवकाश दिला गेला होता. पर्यटकांनी एकत्र जमून ते प्रवेश पाहायलाच हवेत असा आग्रह नव्हता. अनेक पर्यटक या कलाकारांकडे विशेष लक्ष न देता अन्यत्र फिरत होतेच. अंगणातले दोन प्रवेश पाहून आम्हीही पहिल्या मजल्यावर गेलो. तिथे लेअर्टेस (ऑफिलियाचा भाऊ आणि हॅम्लेटचा मित्र) आणि क्लॉडिअसचा (डेन्मार्कचा राजा आणि हॅम्लेटचा दगाबाज काका) महालातला एक ‘हाय-टेन्शन’ प्रवेश झाला; नंतर तिथे गर्ट्रूडही (हॅम्लेटची आई) आली.

04-Kronborg-castle-04.jpg
...
04-Kronborg-castle-05.jpg
...
hamlet-collage-2.jpg

पहिल्या मजल्यावरच एक भलीथोरली, ६०-७० फुटी ‘बॉलरूम’ आहे. हे महालातले प्रवेश होईतोवर तिथे हॅम्लेटचा ‘टू बी ऑर नॉट टू बी’ प्रवेश सुरू झालेला होता. नंतरची त्याची आणि लेअर्टेसची तलवारबाजी, नाटकाचा दुःखद शेवट हे दर्शवणारे प्रवेशही तिथे सादर झाले. तिथून एका मोठ्या, पुरातन, अंधार्‍या गोल-गोल जिन्यावरून आम्ही परत खाली आलो.

hamlet-collage-3.jpg
...
04-Kronborg-castle-09.jpg
...
04-Kronborg-castle-10.jpg

सर्व मिळून साधारण एका तासाचा मामला; पण आमची महिन्याभराची भटकंती आणि ‘कल्चरल शॉक्स’ची मालिका यांचा याहून उत्तम समारोप कल्पनेतही अशक्य होता!
ओडेन्सप्रमाणेच इथेही वाटलं, का धावलो आपण या प्रवेशांमागे? नेमकं काय आवडलं आपल्याला त्यातलं? ना त्या नाटकाचे डिटेल्स माहिती होते, ना ते कलाकार परिचयाचे होते.... कदाचित ‘हॅम्लेट लाइव्ह’च्या त्या एका आश्चर्याच्या धक्क्यात अनेक लहान लहान धक्के सामावलेले होते. आपल्याकडचे किल्ले, त्यांच्याशी निगडित इतिहास, त्यावर आधारित गाजलेल्या कलाकृती यांची तिथे हटकून आठवण झाली होती... त्यामुळेच तो अनुभव एकमेवाद्वितीय ठरला.

आपण एक वेगळा देश बघायला जातो तेव्हा त्या देशातल्या रस्त्यापासून ते तिथली वाहनं, इमारती, माणसं, खाद्यपदार्थ, भाषा यातली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी अनोखी, आश्चर्यकारकच असते. किंबहुना तिथे समोर येणार्‍या प्रत्येक गोष्टीतला अनोखेपणा, वेगळेपणा, नाविन्य शोधण्यातच भटकंतीची खरी मजा असते. आणि त्यात असे धक्के म्हणजे तर विचारायलाच नको!
परत आल्यावर कधीतरी या भटकंतीचे अनेकदा पाहिलेले फोटो पुन्हा एकदा पाहताना या सर्व आश्चर्यकारक धक्क्यांची मालिका नजरेसमोर आकारत गेली. प्रवास संपला तरी आश्चर्यं संपलेली नव्हती... हा सुद्धा एक सुखद आश्चर्याचा धक्काच होता!

समाप्त.

----------

भाग १ 

भाग २ 

भाग ३ 

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)