न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला)

न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच!
न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा

----------

‘नेचर अँड पार्क्स’ थीम ठरवून टूरचं प्लॅनिंग करत असताना ‘काय करायचं नाही’ ते डोक्यात पक्कं होतं. त्यामुळे, एखादा बीच-वॉक, एखादा जंगल-ट्रेल करायला मिळाला तरी भरून पावलो, अशी भावना होती. कारण, करायचं नाही असं ठरवलेलं खरंच न केल्याचा आनंद अधिक होणार होता. प्रत्यक्षात या टूरमध्ये आम्ही ११ वॉक्स/ट्रेल्स करू शकलो; आणि त्यांपैकी तब्बल ७ मूळ प्लॅनमध्ये नसलेले, उत्स्फूर्तपणे/ऐनवेळी ठरवून केलेले होते. त्यांतल्या सर्वात आवडलेल्या अनुभवापासून सुरूवात करते...

ते-पुईयाची चार-एक तासांची ‘जिओथर्मल’ रपेट करून जस्ट बाहेर पडलो होतो. तिथून आमचं हॉटेल तसं फार लांब नव्हतं; पण येताना टॅक्सीनं आलो होतो हे कारण काढून टॅक्सीनंच परत जायचं ठरवलं. रस्त्यापर्यंत जाऊन पाहिलं तर टॅक्सी-स्टँड वगैरे कुठे दृष्टीक्षेपात आलं नाही. येताना वाटेतही तसं काही दिसलं नव्हतं. मग सरळ तिथल्या रिसेप्शन डेस्ककडे गेले. तिथे आम्हाला दुपारी माओरी-सैर करवणारी बाई बसलेली होती. तिला म्हटलं, हॉटेलपर्यंत टॅक्सी हवी आहे; बस असेल तरी चालेल, कुठून पकडायची ते सांगा. बस होती, पण तिथून बस-स्टॉप जरा उलट्या दिशेला लांब होता. तिनं तिच्या फोनवरून आमच्यासाठी टॅक्सी मागवण्याचा प्रस्ताव दिला; आम्ही कशाला नाही म्हणतोय. झालं; एक फोन कॉल, आणि ती म्हणाली ५ मिनिटं थांबा, टॅक्सी येतेच आहे. मला प्रश्न पडला, की तिला आम्ही हॉटेलचा नाव-पत्ता वगैरे काहीच सांगितलेलं नव्हतं... तिथे जायला टॅक्सीवाला नाही म्हणाला तर... अशी कशी अर्धवट माहितीवर लगेच टॅक्सी बोलावली... पण मी जरा १-२ सेकंद धीर धरला असता तरी चाललं असतं; कारण ती म्हणाली, तुम्हाला जिथे जायचंय तिथे टॅक्सी नेऊन सोडेल. हे एकदम अनपेक्षित!

तिला थँक्यू म्हणून वळताना तिच्या समोरच्या डेस्कवर काही नकाशे, माहितीपत्रकं ठेवलेली दिसली. तिला विचारून त्यातला एक नकाशा मी उचलला. तो अर्थातच रोटोरुआचा टुरिस्टी नकाशा होता. आपण आत्ता कुठे आहोत, आपल्या आसपास काय आहे ते मी त्यात बघायला लागले. जीपीएसच्या मदतीविना असं छापिल नकाशावर ‘You are here’ ठरवायला मजा येते.
त्या भागातलं आणखी एक प्रमुख आकर्षण होतं, माओरी व्हिलेज, शो आणि माओरी डिनर. पण आम्ही ते सगळं पाहियात करून आलेलो होतो. त्यामुळे मी बाकीचं बघायला लागले. माओरी व्हिलेजच्या आसपास बराच मोठा जंगलाचा, हिरवागार भाग दिसत होता. एव्हाना मला तिथल्या अशा माहितीपत्रकांमध्ये माओरी नावं किती आहेत आणि इंग्रजी नावं किती आहेत हे बघायचा नाद लागला होता; त्यातल्या माओरी नावांचे उच्चार करून बघताना आधी बोबडी वळायची, मग हळूहळू ते मोठाले शब्द मध्येमध्ये कुठे तोडायचे हे लक्षात यायला लागलं होतं. असं सगळं पाहत असताना नकाशात ‘Redwoods Forest Walk’ हे शब्द दिसले. शेजारीच त्याची त्रोटक माहिती देणारे काही icons होते; चालणे, पळणे, सायकलिंग, व्हील-चेअर, इत्यादीसाठी सोयिस्कर; कुटुंबासहित जाऊ शकता; वगैरे. मी घड्याळ पाहिलं तर पाच वाजत आलेले होते. हॉटेलवर परतून आणखी काही करायचं ठरलं नव्हतं. ८:००/८:३० शिवाय अंधार पडत नाही हे देखील आता समजलेलं होतं; त्यामुळे टॅक्सी आल्यावर हॉटेलवर परतायचा बेत पुढे ढकलून टॅक्सीवाल्याला म्हटलं, ‘चलो, रेडवूड्स फॉरेस्ट...’

टॅक्सी ड्रायव्हर (इंडियन नावाचा) फिजीयन होता. (न्यूझीलंडमध्ये आम्हाला बहुतेक सगळे असेच टॅक्सीवाले भेटले.) त्यानं काही चुकीचं ऐकलं, की आमचे उच्चार त्याला समजले नाहीत, कोण जाणे, पण त्यानं तिथून बाहेर पडून २-४ मिनिटांत टॅक्सी एका मोठ्या गेटपाशी आणून उभी केली. तिथे माओरी-शो, माओरी-डिनरच्या जाहिरातींचे मोठाले बॅनर्स दिसत होते. आधी वाटलं, माओरी शो आणि रेडवूड्स दोन्हींसाठी तिथूनच प्रवेश असेल. तरी नकाशावरून केलेला अंतराचा अंदाज आणि आम्हाला लागलेला वेळ याचं गणित काही जुळत नव्हतं. टॅक्सीतून उतरून पैसे देताना ड्रायव्हरला ‘रेडवूड्स फॉरेस्टला इथूनच जायचं ना?’ हे विचारलं. आणि ते बरंच झालं, कारण आता त्यानं ते बरोबर ऐकलं आणि आम्हाला चुकीच्या ठिकाणी आणल्याचं त्याच्या (आणि आमच्याही) लक्षात आलं. मग मी त्याच्यासमोर हातातला नकाशा नाचवला; ‘इथे इथे बैस रे मोरा’ करत त्याला ती जागा दाखवली. त्यानं परत आम्हाला टॅक्सीत घातलं आणि आमच्या अंतराच्या अंदाजाशी साधारण मेळ खाईल इतकं अंतर खरोखर काटून आम्हाला रेडवूड्स फॉरेस्टच्या दारात नेऊन सोडलं.

तिथे नमनाला आधी i-SITE ची एक शाखा दिसली. आणि मला कसं अगदी परिचित ठिकाणी आल्यासारखंच वाटलं. ‘फॉरेस्ट-वॉक’ची माहिती विचारावी म्हणून तिकडे मोहरा वळवला. तर दरवाज्याच्या बाहेरच भिंतीवर संबंधित सविस्तर माहिती असलेला मोठा नकाशा लावलेला होता. मग परत You are here वगैरे करून, नकाशा ट्रेस केला. फॉरेस्ट ट्रेलचे एकूण ६ मार्ग होते. आम्ही त्यातला ३.४ किमी.चा ‘वायटावा वॉक’ (Waitawa Walk) निवडला. त्यासाठीचा कलर-कोड पाहिला. ‘तो रंग फॉलो करा’ असं तिथे म्हटलं होतं. म्हणजे नेमकं काय करायचं ते तिथे उभं राहून कळलं नसतं. मग आम्ही इमानेइतबारे ‘Start here’ची पाटी शोधली आणि चालायला लागलो.
आता हमरस्ता आमच्या मागे होता. त्यावरून धावणार्‍या गाड्यांचे आवाज येत होते. आसपास काही चिल्लीपिल्ली बागडत होती. एका बाजूला तिथे आलेल्यांच्या गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या... इकडेतिकडे बघत जेमतेम शंभर-एक मीटर गेलो असू, आणि आसपासची माफक वर्दळ मागे पडलेली जाणवली; हमरस्त्यावरची वाहनं ऐकू येईनाशी झाली; आजूबाजूची झाडं अधिक सरळसोट आणि मोठाली व्हायला लागली... आम्ही शिस्तीत त्या झाडांच्या, म्हणजे रेडवूड्सच्या जंगलात शिरलेलो होतो. मागे पाहिलं, तर पार्क केलेल्या गाड्या, आय-साईटचं ऑफिस काहीही दिसत नव्हतं. चौफेर नजर फिरवू तिकडे केवळ ती सरळसोट, गगनाला भिडणारी रेडवूड झाडं. तांबूस झाक असलेली, खडबडीत खोडं; आणि वरती उंचावर त्यांच्या फांद्या आणि पानं. जमिनीलगत खोडाचा घेर हा एवढा... आपले दोन्ही हात पसरले तर त्याचा व्यास जेमतेम कव्हर होईल, असा. पायांखाली जरा ओलसर, दमट माती आणि काट्याकुट्या.

IMG_20171109_095245_compressed-COLLAGE.jpg

आणखी एक भारी जाणीव झाली- कानांत आता अवर्णनीय शांतता भरून राहिली होती. दिवसाउजेडी, डोळे मिटून एका जागी उभं राहिलं आणि कानांना कुठला आवाजच आला नाही तर कसं वाटेल? मी शब्दशः तशी उभी राहिले काही सेकंद. इतक्या शांततेचं काय करायचं हे शहरी भारतीयांना सहसा माहितीच नसतं! त्या शांततेला सरावायला मला जरा वेळच लागला. हवा सुखावह गार होती. जंगलाचा ‘calm and quiet’पणा अगदी ‘caaaalmly’ आणि ‘quieeeetly’ आत आत उतरत होता. त्यानंच मला उचंबळून आल्यासारखं झालं. ओळखीतले, नात्यातले जे-जे चेहरे आठवले त्या सर्वांना त्याक्षणी त्या शांततेचं वर्णन करून सांगावं असं अगदी आतून वाटलं. आणि ती शांतता अल्पजीवी नव्हती. जसजसं आत आत जात होतो तसतशी तिची पातळी वरवर जाताना जाणवत होती. मला अशा शांततेचं खूप अप्रूप आहे.

चालताना अधेमध्ये व्यायामासाठी येणारे तुरळक स्थानिक दिसत होते. आपापल्या पाळीव कुत्र्यांना फिरायला घेऊन आलेली काही मंडळी दिसत होती. त्या सर्वांचा मला फार हेवा वाटला.
आमच्या पायवाटेला मधूनच आणखी एखादी पायवाट छेद देत होती. अशा ठिकाणी कलर-कोड्सच्या पाट्या लावलेल्या होत्या. तुमच्या रंगाचा बाण ज्या दिशेला असेल त्या दिशेला जात राहायचं. रोज येणार्‍यांना नंतर नंतर त्या बाणांचीही आवश्यकता भासत नसणार. तशी बाणांची पहिली पाटी दिसली तिथे आपला रंग निळा की जांभळा यावरून आमचा ‘गांधी, की नेहरू, की काहीतरी रोड’टाईप एक संवाद झडलाच. पण दोघांमधल्या अधिक काटेकोर आणि शिस्तशीर भिडूनं चालायला सुरूवात करण्यापूर्वी नकाशाच्या विवक्षित भागाचा फोटो काढून ठेवला होता. त्यानं तो लगेच ‘एक्झिबिट नं. १’ म्हणून सादर केला. त्यावरून आमचा रंग निळा असल्याचं सिद्ध झालं. मग दुसर्‍या भिडूला युक्तिवादासाठी बोलण्यासारखं काही उरलं नाही. Rather, बाण, रंग, दिशा वगैरेंची चिंता तो भिडू करेल या आनंदात दुसरा भिडू अधिकच मुक्तपणे शांतता प्यायला मोकळा झाला.

गंमत म्हणजे, तिथे पक्ष्यांचे आवाजही नव्हते. मुळातच त्या भागात सतत गंधकाचा वास भरून राहिलेला असल्यामुळे इतरत्र किलबिलणार्‍या पक्ष्यांची संख्या तिथे कमी असण्याचीही शक्यता होतीच. वाटेत कुठेकुठे कडेला छोट्या छोट्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून राहिलेलं दिसत होतं. तिकडे लक्ष गेलं, की काहीतरी चुकतंय असं वाटत होतं; ‘अरे, हे उकळत कसं नाहीये’ असा प्रश्न पडत होता. दुपारच्या ते-पुईयातल्या फेरफटक्याचा तो परिणाम होता.

मुद्दामहून लागवड करून वाढवलेलं जंगल आहे हे कळत होतं; मात्र कुठेही मानवी हस्तक्षेप नावालाही नव्हता. वाटेत एका झाडापाशी एक पाटी दिसली- The Mary Sutherland Memorial Redwood. २०व्या शतकाच्या सुरूवातीला इंग्लंडमध्ये मेरी सुदरलंड नावाची एक जंगल-अभ्यासक होऊन गेली. जगातली ती पहिली स्त्री जंगल-अभ्यासक होती. तिनं १० वर्षं न्यूझीलंड फॉरेस्ट सर्विसमध्ये काम केलं. त्यापैकी काही काळ ती इथल्या जंगलपरिसरात येऊन राहिली होती. तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ लावलेलं ते झाड होतं. खरं म्हणजे ते सगळे वृक्षच होते; त्यांना झाडं म्हणणे म्हणजे ‘सशाच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्या’च्या उलट जे असेल, ते होतं. त्यांच्या खडबडीत खोडांना अधूनमधून हात लावत, माना वर करकरून त्यांचे शेंडे पाहण्याचा प्रयत्न करत, जमेल तसे फोटो-व्हिडिओ काढत चालत होतो.
अवघ्या पाऊण-एक तासात तो वॉक संपला; पण काय बहार आणली त्यानं!

परतल्यावर आय-साईटला विनंती करून टॅक्सी मागवली. टॅक्सीची वाट पाहत थांबलो होतो, तर समोर अनेक उंच रेडवूड्सना जोडणारा अरुंद आणि जरासा झुलता पूल दिसत होता. जमिनीपासून उंची असेल १०-१५ फूट. काही तुरळक पर्यटक त्यावरून बिचकत बिचकत चालत होते. एका झाडाच्या खाली एक लहानशी लाकडी केबिन दिसत होती. केबिनमध्ये त्या जंगलातल्या स्टाफपैकी एक जण बसलेला होता. मला कुठे राहावतंय; मी तडक गेले त्याच्याकडे आणि त्या ‘ट्री-टॉप वॉक’ची चौकशी केली. Day-walkची वेळ संपत आली होती. पण ‘तुम्ही नाईट-वॉक ट्राय करू शकता’ असं त्यानं सुचवलं. रात्री ८:३० नंतर तो करता येणार होता. It’s very much safe अशी पुस्तीही त्यानं जोडली. क्षणभर त्या कल्पनेनं माझे डोळे चमकले. पण त्यासाठी आम्हाला एकतर आणखी दोन-अडीच तास तिथे वेळ काढावा लागला असता; जवळचं अबरचबर खाऊन जेवणाची वेळ मारून न्यावी लागली असती; (कारण तिथे जुजबी स्नॅक्स मिळत होते आणि त्यातलेही बरेचसे संपत आलेले होते) किंवा मग हॉटेलवर जाऊन, जेवून परत यावं लागलं असतं. यायच्या-जायच्या टॅक्सीचं भाडं अधिक ट्री-टॉप वॉकसाठी भरावे लागणारे प्रत्येकी २०-२५ NZ डॉलर्स अशी सगळी बेरीज केल्यावर मी तो ट्री-टॉप नाईटवॉकचा विचार गपगुमान सोडून दिला. जो फॉरेस्ट वॉक करून आलो होतो तो देखील बरेच दिवस पुरून उरणारा होताच.

असं अचानक नकाशात दिसलं जंगल, ठरवलं आणि गेलो तिथल्या वॉकला, हे मी करू शकेन असं त्याच्या ४ दिवस आधी कुणी मला सांगितलं असतं तर मला ते खरं वाटलं नसतं. पण त्यामागे खरंच ४ दिवसांपूर्वी केलेल्या अशाच आणखी एका वॉकचा कॉन्फिडन्स होता.

----------

Cut to ४ दिवस आधी, पाहिया....

पाहियातल्या (आणि न्यूझीलंडमधल्याही) भटकंतीचा पहिला दिवस. सकाळचा अर्धा दिवस ‘वायटँगी ट्रीटी ग्राऊंड्स’ परिसरात घालवून, जेवण उरकून आता आम्ही ‘ओपुआ फॉरेस्ट लूक-आऊट’ला (Opua Forest Lookout) निघालो होतो.
घरून निघण्यापूर्वी त्या रॉस टेलरच्या इंटरव्ह्यूच्या आगेमागेच कधीतरी नकाशावर मला या ओपुआ जंगलाबद्दल समजलं होतं. ते आमच्या हॉटेलपासून जवळ दिसत होतं. तेव्हाच मनाशी नोंदवून ठेवलं होतं, की जमल्यास/वेळ मिळाल्यास या जंगलात जायचं... आणि आता बहुतेक ते जमणार असं दिसत होतं.

सकाळी हॉटेलवरून चालत येताना ओपुआच्या पत्त्यातल्या ‘स्कूल रोड’ची पाटी कुठेतरी पाहिल्याचं आठवत होतं. तरी आधी i-SITE मध्ये जाऊन चौकशी केली. त्यांनी रस्ता सांगितला; लगेच एक नकाशाही हातात कोंबला; त्यात ओपुआ ट्रेलचे दोन पर्याय मार्क केले- एक १.४ किमीचा आणि दुसरा ५.२ किमीचा. सकाळी आमची बर्‍यापैकी पायपीट झालेली होती. शिवाय टूरच्या पहिल्याच दिवशी वयाला न शोभणारं साहस नको असा मध्यमवयीन विचार करून आम्ही पहिला छोटा पर्याय ठरवून टाकला.

मुख्य रस्त्यावरून त्या स्कूल-रोडवर वळलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटी छोटी, टुमदार बंगलेवजा घरं होती. मध्येच ‘स्कूल-रोड’मधल्या स्कूलचं मैदान दिसलं. शाळा सुटलेली होती; मैदानात, शाळेत सामसूम होती. माझा जरा विरसच झाला. नाहीतर मी शाळेतली मुलं, त्यांचे गणवेष, एकंदर तिथली चहलपहल पाहत ५-१० मिनिटं नक्की थांबले असते.
सर्व घरांच्या बाहेर garbage-bags ची बोचकी ठेवलेली दिसत होती. केर-कचरा गोळा करणार्‍या गाडीची वेळ झालेली असावी. बहुतेक घरांच्या बाहेर जुन्या पद्धतीच्या लाकडी पत्रपेट्या दिसत होत्या. प्रत्येक घराबाहेर लहानशी का होईना बाग होती. बागेत पाणी घालण्यासाठी काय सोय आहे, नळांची पद्धत, पाईप कोणते वापरले जातात, अंगणांमध्ये कोणकोणती झाडं-फुलं लावलेली आहेत, कुंड्या साधारणपणे कशा दिसतात, घरांच्या दारांचे-फाटकांचे प्रकार कसे आहेत, अशा बारीकसारीक गोष्टी पाहण्यात मला फारच रस होता; निव्वळ कुतूहल म्हणून, परका प्रदेश जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणून; पण तसं निरखत घरांसमोर उभं राहणे हे अर्थातच बरं दिसलं नसतं. त्यामुळे चालता-चालता जेवढं दिसत होतं तेवढ्यावर समाधान मानत निघाले होते.

IMG_20171106_114233_compressed.jpg

जरावेळाने किंचित चढाचा रस्ता सुरू झाला. आपण गेली दहा-एक मिनिटं हातातला नकाशा रिफर केलेला नाही हे जाणवलं. परक्या देशातल्या भटकंतीच्या पहिल्याच दिवशी इतका निष्काळजीपणा या वयात बरा नव्हे, असं एकमेकांना सुनावत आम्ही तो नकाशा उघडला. नव्याने You are here करून, आता पुढचा लँडमार्क कोणता दिसायला हवा हे नक्की करून पुढे निघालो.

समोरून एक मध्यमवयीन बाई येत होती. रस्ता सरळसोट असल्यामुळे बर्‍याच आधीपासून ती दिसलेली होती. व्यायामाचा पेहराव, कानाला हेडफोन्स; आम्ही नकाशा पाहतोय हे तिनं पाहिलं होतं. आमच्याजवळ आल्यावर तिनं आपणहून हेडफोन्स काढले आणि चौकशी केली : ‘You guys looking for Opua Forest?’ आम्ही ‘हो’ म्हणताच तिनं आपणहून सविस्तर रस्ता सांगायला सुरूवात केली- ‘असंच सरळ जा. एका ठिकाणी कार-पार्किंगची जागा दिसेल. (हे सांगताना तिनं दोन्ही हात पसरले. त्यावरून ती जागा बर्‍यापैकी मोठी असावी असा आम्ही अंदाज केला.) जंगलात शिरायचा रस्ता त्या पार्किंगच्या एका कोपर्‍यात आहे. There’s a small green and yellow signboard. हा रस्ता उजवीकडे वळेल. तिकडे जाऊ नका. माझं घर त्याच रस्त्यावर शेवटी आहे. बरेच जण तिकडे वळतात आणि मग येऊन आम्हाला रस्ता विचारत बसतात.’ शेवटचं वाक्य बोलताना तिनं कपाळाला हात टेकवून वैताग दर्शवला. (तिचा सूर पाहता तिनं घराबाहेर एखादी ‘पाहिया-पाटी’ही लावली असावी.) माणसांची काही-काही gestures जगभरात एकसारखीच असतात, हे किती बरं असतं. तिच्या वैतागाशी मी लगेच कनेक्ट झाले.
तोंडभरून हसत तिला थँक्यू म्हटलं. तिनंही ‘थम्ब्स-अप’ करत Enjoy म्हटलं आणि हेडफोन्स परत कानांवर सरकवत ती निघून गेली. टूरिस्ट-सीझनमध्ये त्या बाईच्या दाराशी घडणारे सीन्स-संवाद इमॅजिन करत पुढची पाच मिनिटं आम्ही जरा टाईमपास केला. आणि ती रस्ता उजवीकडे वळणारी जागा आली. पण ती मोठी कार-पार्किंगची जागा काही दिसेना. शिवाय पार्किंगची जागा म्हणजे तिथे एखाद-दुसरी गाडी तरी उभी असणारच असं आम्ही धरून चाललो होतो. तसंही नव्हतं. तो ग्रीन-अँड-यलो बोर्डही दृष्टीपथात नव्हता.

20171106_185907_compressed.jpg

दोघांमधल्या काटेकोर आणि शिस्तशीर भिडूनं त्या बाईचा ‘उजवीकडे वळू नका’ हा इशारा चक्क नीट digest केलेला नव्हता. त्यामुळे त्या तिठ्याशी जंगलाचा रस्ता पटकन दिसेना म्हणताना त्या भिडूनं ‘गांधी, की नेहरू, की काहीतरी रोड’ हा संवाद सुरू होण्याआधीच उजवीकडचा रस्ता पकडून चालायला सुरूवात केली. दुसर्‍या भिडूची absent-minded म्हणून अधिक ख्याती असल्यामुळे त्याला युक्तीवादाला बोलण्यासारखं काही उरलं नाही; आणि दुसरा भिडूही गपगुमान पहिल्या भिडूच्या मागे चालायला लागला.
तो रस्ता आता आणखीनच चढाचा होता; तशीच दोन्ही बाजूंना घरं, बागा. थोडं चालून गेल्यावर पहिल्या भिडूच्या लक्षात यायला लागलं, की हे काही खरं नाही. तशी कुणकूण लागताच दुसर्‍या भिडूला चेव चढला. मात्र टूरचा पहिलाच दिवस असल्यामुळे भांडणाचा बेत रहित करून दोघं उलटे वळले.

एखादी वस्तू घरभर शोधून मिळाली नाही की परत पहिल्या जागीच व्यवस्थित शोधावी तसं पुन्हा मी तिठ्यापाशी येऊन तो हिरवा-पिवळा बोर्ड शोधायला सुरूवात केली. आणि यावेळी तो सापडला. बुटकासा, अगदी जमिनीलगत तो अगदी एका कोपर्‍यात लावलेला होता. त्या बाईनं बरोबर सांगितलं होतं. मात्र तो कोपरा धरून त्याच्या अलिकडची मोकळी जागा म्हणजे हात पसरून दाखवण्याजोगी मोठी पार्किंगची जागा अजिबातच नव्हती. तिथे जेमतेम २-३ छोट्या cars, त्या देखील कशाबशा पार्क करता आल्या असत्या. ‘पार्किंगची मोठी जागा’ याच्या जगभरातल्या व्याख्या वेगवेगळ्या असतात हे यानिमित्तानं सिद्ध झालं.

हिरव्या-पिवळ्या बोर्डालगत एक बारीकशी पायवाट आत शिरत होती. गोरज मुहूर्तावर त्या पायवाटेने आम्ही अखेर ओपुआ जंगलात शिरलो. गंमत म्हणजे, आधीच्या शोधाशोधीत मी जवळपास तिथपर्यंत जाऊन परत आले होते. तेव्हा बोर्ड शोधायचा होता, त्यामुळे वाटेकडे लक्षच दिलं नव्हतं. ते सगळं आठवून हसायला यायला लागलं. १० मिनिटं उगीच वाया घालवली होती.

गर्द झाडीतून चालायला सुरूवात केली. थोड्यात वेळात पायवाट वर चढायला लागली. एक बारीकसा ओहोळ लागला. झुळझूळ पाणी वाहत होतं. तो पार करण्यासाठी लहानसा लाकडी पूल होता. तो ओलांडला आणि झाडी आणखी गर्द झाली. बाहेर तिठ्याशी लख्ख ऊन असलं तरी जंगलात तुलनेनं चांगलंच अंधारून आलेलं. इथे मला जरा बाकबूक वाटायला सुरूवात झाली. जायचंय का शेवटपर्यंत, पुढे आणखीनच अंधारून येणार, परतताना तर काळोखच होईल, काही साप-सरडे असले म्हणजे, वगैरे नाना शंका-कुशंका यायला लागल्या. TripAdvisor वर तर जंगल एकदम सुरक्षित वगैरे मतं वाचलेली होती. तरी ‘अंदर की आवाज’ स्वस्थ बसू देईना. आम्ही सावकाश चालत, वर वर जात होतो. सुरूवातीलाच पायवाटेच्या कडेला कुठल्यातरी झाडाच्या दोन फांद्या पडलेल्या दिसल्या होत्या. बर्‍यापैकी सरळसोट, बारीक, हातात ठेवण्याजोग्या वजनाच्या. त्या आम्ही उचलून घेतल्या होत्या. चढताना त्या काठ्यांचा सपोर्ट कामी येत होता. एका क्षणी जाणवलं, की हे जरासं ट्रेकिंगसारखं होत चाललं आहे. ही जाणीव भारी होती. त्यामुळे मनातली बाकबूक किंचित मागे पडली.

जंगलात पूर्ण शांतता होती; आणखी कुणी तिथे असेल असं वाटत तरी नव्हतं. चढताना मला बर्‍यापैकी दम लागत होता. त्यामुळे तर शेवटपर्यंत जायचंच हा निश्चय आणखी पक्का व्हायला लागला. जरा वेळाने समोरून एक बाई आणि तिचा कुत्रा येताना दिसले आणि काय हायसं वाटलं. ती आमच्याकडे पाहून हसली, ‘हॅलो’ म्हणाली. १.४ किमी.चं अंतर आहे हे ठाऊक असूनही तिला मी ‘आणखी किती रस्ता आहे?’ असं विचारलं. ती ‘Ohh, just 10 or 15 minutes more...’ असं किरकोळीत म्हणाली आणि निघून गेली. मनात म्हटलं, तुझं काय जातंय किरकोळीत काढायला, तू रोज येत असशील, आम्हाला नाही सवय अशी रोज जंगलात भटकायची...

हपापत, धापा टाकत चढत होते. वाटेत आपापल्या कुत्र्यांना घेऊन आलेली आणि आता परत निघालेली आणखी २-३ मंडळी दिसली. मध्ये एक पॅच पायर्‍यांचा आला. चढाच्या रस्त्यावर पायर्‍यांसारखा महावैतागवाणा प्रकार नाही. १५-२० पायर्‍याच होत्या म्हणून नशीब. त्या चढून गेलो आणि मग जरा सरळ वाट सुरू झाली. गर्द झाडी होतीच; पण आता जरा उंचावर आल्यामुळे की काय, अंधारून आलेलं कमी झालं होतं. झाडांमधून कुठे कुठे ऊन दिसायला लागलं होतं. सपाट वाटेच्या कृपेनं काटेकोर भिडूला दिशा वगैरे ठरवायला थोडासा अवसर मिळाला... म्हणेपर्यंत परत चढ सुरू झाला. एका ठिकाणी वाट झपकन उजवीकडे वळली. तिथे काटकोनात दोन बाक दिसले. बाकांपाशीच आमची वाट संपत होती.

एका बाकावर एक चिनी रंगरुपाची तरुण मुलगी एकटीच बसलेली होती; हातातल्या फोनवर काहीतरी करत होती. बाकाच्या पुढ्यात झाडीतून खाली Paihia-bay दृष्टीस पडत होता.

IMG_20171106_104933_compressed.jpg
.
DSC05371_compressed.jpg

निळं, नितळ पाणी; वरती निळं, नितळ आकाश; फारच झकास दृश्य होतं ते. हीच ती lookout ची जागा असावी हे लक्षात आलं. तिथे एक लाकडी रेलिंग होतं. सर्वात वरच्या लाकडी पट्टीवर कॅलिग्राफी, चित्रकला, खोदकाम, कोरीवकाम वगैरे केलेलं दिसत होतं. काही शब्द, नावं लिहिलेली दिसत होती. सार्वजनिक ठिकाणी असली ग्राफिटी चितारण्याची वृत्ती जगभरात सारखीच असते, असा त्याचा अर्थ होता. (त्यातला एकही शब्द/नाव भारतीय नव्हतं; ते पाहून मला उगीच हायसं वाटलं.) एका बाकाच्या मागे एक खडबडीत उंचवटा होता. त्यावर चढून खालच्या दृश्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. पण फारसं काही हाती आलं नाही.

तिथे आम्ही आपांपसांत बोलत होतो, समोरचं दृश्य आवाजी दाद देऊन admire करत होतो; फोटो-व्हिडिओ काढत होतो; आमचं हे सगळं सुरू असताना ती चिनी मुलगी फोनवर अखंड काहीतरी ब्राऊज करत होती. फोनच्या स्क्रीनवर हलणारा तिचा अंगठा वगळता ती जराही हललेली नव्हती. इथवर येऊन फोनच बघत बसायचं, तर ते ती खाली समुद्रकिनार्‍यावर किंवा तिच्या हॉटेलमध्ये बसूनही करू शकली असती, असं मनोमन वाटलं. (मनोमन कशाला, हे मी मोठ्यांदा बोलले असते तरी तिला थोडीच कळणार होतं.) बरं, तिच्याबरोबरही कुणी नव्हतं. तिथे एकटीनं येऊन फोन बघत बसावंसं तिला का वाटलं असेल कोण जाणे. आम्ही तिथून निघालो तरी ती जागची हललेली नव्हती. वाट पुन्हा झपकन डावीकडे वळली आणि मी त्या मुलीचा विचार सोडून दिला.

आता उताराचा रस्ता होता. चालायला लागलो. वेग आपोआपच जास्त होता. ‘जमलं तर करू’ म्हटलेली गोष्ट पहिल्याच दिवशी जमवली होती. त्या जाणीवेनंच खूप आनंद झाला होता. शिवाय, ट्रेकिंगचा feel, रस्ता शोधताना आलेली मजा, हा added bonus होता. डोंगरवाटा तुडवायला तर काय मला कायमच आवडतं. मग ते अंतर १ किमी असो, नाहीतर १० किमी! १०-१५ मिनिटांत खाली पोहोचलो. वाटेत परत काही ठिकाणी अंधार अगदी दाटून यायला लागला होता. तासाभरापूर्वी इथून जाताना आपल्याला बाकबूक वाटली होती याचाही आता मला विसर पडला होता.

जंगलातून बाहेर पडून परत ‘स्कूल-रोड’ला लागलो. दुपारी परिसरात सामसूम होती. आता जरा वर्दळ दिसत होती. मुख्य रस्त्याला लागताना समोरून ३-४ बायका येताना दिसल्या; छान कपडे, मेकअप, शूज, पर्सेस; त्यांतून अचानक आमच्या दिशेनं प्रश्न आला, ‘Could you find the road? How was the lookout?’ आधी काही कळेचना, की या बायांना कसं काय समजलं आपण कुठे गेलो होतो. तेवढ्यात ट्यूब पेटली, की दुपारी आम्हाला रस्ता सांगणारी बाईच आताही चौकशी करत होती. मी तिला अजिबात ओळखलं नाही. तिचा दुपारचा अवतार आणि आताचं रूप यात खूपच फरक होता. पण तिनं आम्हाला बरोबर ओळखलं होतं. तिला परत तोंडभरून हसून उत्तर दिलं, थँक्यू म्हटलं आणि हॉटेलचा रस्ता धरला.
७:००/७:३० वाजत आले होते. अजूनही लख्ख उजेड होता. दक्षिण पॅसिफिक समुद्र निवांत पहुडलेला होता. माझ्या मनात मात्र काहीतरी achieve केल्याच्या विचारानं उकळ्या फुटत होत्या...

त्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी Hole in the Rock Cruise करून परत येताना (त्याबद्दलही लिहायचं आहेच.) आमच्या बोटीत काहीतरी किरकोळ तांत्रिक बिघाड झाला. म्हणून बोटवाल्यानं वाटेत एका लहानशा बेटापाशी बोट थांबवली. Paihia bayमध्ये अशी लहान-मोठी मिळून जवळजवळ १०० बेटं आहेत, म्हणे. आम्ही सगळे खाली उतरलो. दुसरी बोट बोलावली होती. ती यायला किमान २०-२५ मिनिटं लागणार होती. ते चिमुकलं बेट झकासच होतं. अर्धा तास तिथेच समुद्रकिनार्‍यावर वेळ काढायला काहीच हरकत नव्हती.

IMG_20171107_040055_compressed.jpg

पण आमच्या बोटीतले काहीजण उतरल्यावर एका दिशेला चालायला लागले आणि जवळच्या टेकडीवर दिसेनासे झाले. मी जरा त्यांचा माग काढला, तर त्या मार्गावर परत एक हिरवा-पिवळा बोर्ड दिसला. Motuarohia Track आणि Way to viewing platform..

20171107_120830_compressed.jpg

आदल्या दिवशीच्या माफक adventure चा हँगओव्हर अजून उतरलेला नव्हताच. मी बोटीवरच्या स्टाफपैकी एका मुलीला माहिती विचारली. तर तो रस्ताही आवाक्यातला आहे, असं दिसलं. त्या जागेला Captain Cook’s Lookout असंही म्हणतात, असं तिच्याकडून कळलं. कॅप्टन कूक तिथून समुद्रावरच्या हालचालींवर लक्ष ठेवायचा म्हणे. आम्ही मग जराही वेळ न दवडता तिला सांगून तडक ती दिशा पकडली. अंतर जास्त नव्हतं; मात्र चढ आदल्या दिवशीच्या तुलनेत खूप होता. शिवाय अर्धा रस्ताभर लाकडी जिने होते. (न्यूझीलंड सेनादलाने १२-१५ वर्षांपूर्वी या पायर्‍या तिथे बसवल्या, म्हणे.)

अधिक हपापत, अधिक धपापत १५ मिनिटांत वर पोहोचलो. आणि वरून जे काही amazing दृश्य दिसलं! प्रचंड वारा होता; गारठा होता; फोटो काढताना हात स्थिर ठेवणे कठीण जात होतं. पण त्या दृश्यानं डोळे जसे निवले त्याला तोड नव्हती. जवळपास २७० अंशातला देखावा पाहता येत होता. १० मिनिटं तिथे थांबलो आणि निघालो.

20171107_114953_compressed.jpg

माफक का होईना, पण Unplanned adventure आणि ते कमालीचं निसर्गसौंदर्य यामुळे मला परत एकदा उचंबळून आल्यासारखं झालं. (खरं म्हणजे, हे पहिलं; रेडवूड्समध्ये उचंबळून आलं ते नंतर होतं.)
तसंच परत ५ मिनिटांत खाली आलो. तोवर दुसरी बोटही आलेली होती. या बेटाचं नाव Roberton Island असं नंतर नेटवर समजलं. मी मात्र ते ‘कॅ. कूक आयलंड’ या नावानंच लक्षात ठेवलंय. आजही ते नाव आठवलं, की मी डोळे मिटते आणि मनानं त्या viewing platform वर पोहोचते. तिथला वारा आजही माझ्या कानांत घुमतो; गारठ्यानं आखडलेली बोटं आठवतात. त्यापेक्षाही ज्या ऊर्मीनं मी ती वाट पकडली ती ऊर्मी परत एकदा शरीरात, मनात जागी झाल्यासारखी वाटते.
त्या ऊर्मीचं अप्रूप मनात कायम राहो अशी माझी इच्छा आहे.

<क्रमशः>

Comments

व्वा! अगदी स्वतः जाउन आल्यासारखं वाटलं!! आणि नुझीलंड मध्येही पुणेकर असतात हे लक्षांत येऊन मजा वाटली!! पुढच्या भागाची वाट पाहतोय. धन्यवाद. -मिलींद

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)