मोसाद : इस्त्राएली गुप्तचर मोहिमांचा थरार
मध्यंतरी जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडून MOSSAD : The
Greatest Missions of the Israeli Secret Services हे पुस्तक घेतलं. लेखक मायकेल बार-झोहार
आणि निसिम मिशाल. पुस्तक एकदम ‘स्पाय-थ्रिलर’ प्रकारचं आहे. मला या प्रकारची
पुस्तकं आवडतात.

आईकमन प्रकरणाप्रमाणेच
सुप्रसिद्ध इस्त्राएली गुप्तहेर एली कोहेन याच्या सिरियातल्या गुप्त कारवायांवरचं प्रकरणही
तोंडात बोटं घालायला लावणारं आहे. ६० च्या दशकात कोहेननं सिरिया सरकारातल्या अगदी आतल्या वर्तुळात स्थान मिळवलेलं
होतं. सिरियाच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्याचा प्रमुख
सल्लागार होण्यापर्यंत त्याने मजल मारलेली होती. कोहेनच्या त्या कामगिरीचा पुढे
मध्य-पूर्वेतल्या राजकारणावर प्रभावी परिणाम झाला. त्याच्या कारवाया उघडकीस
आल्यावर त्याला सिरीयात जाहीर फाशी देण्यात आलं होतं. याचेही पुढे बरेच पडसाद
उमटले. मोसादच्या विरोधात अनेक आरोप केले गेले. मोसादनं कोहेनला अनेक दुय्यम
बाबींसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालायला लावला, त्याच्यावर
गुप्त माहिती पुरवण्यासाठी खूप दबाव टाकला गेला, बर्याचदा
त्याला अशी माहिती मिळवण्यास सांगितलं गेलं ज्याचा मोसादला किंवा इस्त्राएलला
लौकिकार्थाने काहीही उपयोग होण्यातला नव्हता; असं बरंच काय
काय बोललं गेलं.
पुस्तकात मोसादच्या
काही फसलेल्या मोहिमांच्याही कथा आहेत. त्यामुळे एकूणच पुस्तकाला, त्यातल्या खर्याखुर्या हेरांना आपोआप एक
मानवी चेहरा मिळतो. तसंच, पुस्तकाची मांडणी करताना लेखकांनी
मोसादच्या गाजलेल्या मोहिमांवर अधिक भर देण्याचं पूर्णपणे टाळलं आहे.
म्युनिक ऑलिंपिकमधल्या इस्त्राएली खेळाडूंच्या हत्याकांडाची
परिणती ठरलेलं Operation Wrath of God, सुदानमधल्या इथियोपियन ज्यूंच्या
सुटकेसाठीची मोहिम, इराणी अणूशास्त्रज्ञांचा खातमा, अशा अनेक कथा श्वास रोखून वाचल्या जातात. या सगळ्या थरारक मोहिमांच्या
गोतावळ्यात जराशी हरवून गेलेली “Oh, That? It’s Krushchev’s Speech...” ही एक कथा
मला अतिशय आवडली. ५० च्या दशकात निकिता क्रुश्चेव्ह यांनी रशियाच्या कम्युनिस्ट
पक्षाच्या सदस्यांपुढे एक मोठं भाषण दिलं होतं. त्या भाषणात त्यांनी स्टॅलिनवर
ताशेरे ओढले होते. या भाषणाचे तपशील पुढेही बराच काळ गुप्त ठेवले गेले होते. मात्र
क्रुश्चेव्ह नेमकं काय बोलले हे जाणून घेण्यात पाश्चात्य जगताला अतिशय रस होता.
अखेर त्या भाषणाची प्रत हस्तगत करण्यात यश आलं ते मोसादला. या मोहिमेत थंड
डोक्याने केलेले खून नव्हते; कुठलीही अपहरणं नव्हती; जीवावरचे प्रसंग नव्हते; तरीही
त्या सर्व घडामोडी अत्यंत रोचक होत्या.
काही वर्षांपूर्वी नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर On The Inside नावाचा कार्यक्रम असायचा. एखाद्या
मोठ्या फॅक्टरीतलं काम कसं चालतं, मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर
दिवसभरात पडद्यामागे काय काय घडतं, अशा
प्रकारच्या गोष्टी त्यात दाखवल्या जायच्या. हे पुस्तक असंच मोसाद मोहिमा आपल्याला
आतून दाखवतं.
Comments