वस्ती जेव्हा रंगमंच बनते

सात ते सतरा वयोगटातली अंदाजे २३० मुलं. त्यांचे वीस गट. प्रत्येक गटाने एकेक नाटिका बसवली. नाटिकांच्या विषयांत, मांडणींत, संवाद-प्रसंगांत अनेकदा बदल झाले. जवळपास चार महिने तयारी चालू होती, तालमी होत होत्या. सगळी लगबग, गडबड सुरू होती...
ऐकून कुणालाही वाटेल की हे कुठल्या तरी ‘हाय प्रोफाइल’ नाट्यस्पर्धेचं वर्णन असणार. हो, एका अर्थाने ही नाट्यस्पर्धाच होती, पण त्यात स्पर्धेचं एलिमेण्ट शून्य होतं. उलट, तिथे होता ‘आमचे नाटक.....हमारा नाटक’ हा जल्लोष! नाटकाबद्दल असा द्विभाषिक आपलेपणा दाखवणारी कोण बरं ही पोरं? ज्यांना रंगमंच म्हणजे काय, अभिनय कशाला म्हणतात हेच ठाऊक नाही, अशी ही पोरं. पण तरीही हे नवखे कलाकार नाटकाच्या चौकटीत, रंगमंचाच्या तीन भिंतींच्या अवकाशात उभे राहिले. तिथे चौथ्या भिंतीचं नसणं हेच त्यांना त्यांच्या उपेक्षित विश्वातून बाहेर काढणार होतं, अभिव्यक्ती नामक एका गोष्टीशी त्यांची ओळख करून देणार होतं.
हा होता ‘अ स्लम थिएटर फेस्टिव्हल’, रंगभूमीवर मनस्वी जीव असणार्‍या एका बुजुर्ग कलावंताच्या अंत:प्रेरणेतून साकारलेला ‘वंचितांचा रंगमंच’. जगातला अशा प्रकारचा बहुधा पहिलाच प्रयोग.
----------
‘बालनाट्य’ ही रत्नाकर मतकरी यांची १९६२ साली स्थापना झालेली संस्था. सुरुवातीच्या ३५ वर्षांत संस्थेने लहान मुलांसाठी परिपूर्ण स्वरूपातल्या आणि पूर्ण लांबीच्या २५ नाटकांची निर्मिती केली. त्यांचे १५००हूनही अधिक प्रयोग केले. त्यातले अनेक प्रयोग महापालिका शाळा, झोपडपट्ट्या, रिमांड होम्समध्ये; काही तर अगदी रस्त्यांवर, उघड्या ट्रकवरदेखील झाले. पण एकंदरच बालरंगभूमीबद्दल समाजातल्या सर्वच थरांमध्ये असणारी अनास्था, प्रोत्साहनाचा अभाव यामुळे गेल्या काही वर्षांत ही चळवळ जरा मंदावली होती. संस्थेचा सुवर्णमहोत्सव कोणताही गाजावाजा न करता शांतपणे होऊन गेला. मात्र, त्याच वेळी मतकरींच्या मनात एक निराळीच योजना आकाराला येत होती. आजवर त्यांनी काम केलं होतं ते वंचितांपर्यंत नाटक घेऊन जाण्याचं. या वेळी त्यांनी ठरवलं, की वंचितांनी तयार केलेलं नाटक पांढरपेशा समाजाला दाखवायचं. एक वेगळा ‘नाट्यजल्लोष’ करायचा.
... ‘नाट्यजल्लोष’ची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या एका छोटेखानी पत्रकार परिषदेत मतकरी आपली भूमिका मांडत होते. इतकी वर्षं लेखनातून आणि नाटकांतून ओळख असलेल्या मतकरींना मी त्या दिवशी प्रथमच प्रत्यक्ष ऐकत-पाहत होते. अतिशय ऋजू व्यक्तिमत्त्व. रंगभूमीबद्दल मनात असलेलं विलक्षण प्रेम, तळमळ...
त्या तळमळीपायीच या नवीन योजनेचं बीज रुजलं होतं; पण ते वाढवायचं तर समोर अनंत अडचणी होत्या. पहिला प्रश्न होता तो म्हणजे हे सारं करायचं कुठे आणि कुणाच्या साथीने? मतकरींचे पूर्वापार स्नेही असलेले डॉ. संजय मंगला गोपाळ आणि त्यांच्या ठाण्यातल्या ‘समता विचार प्रसारक संस्थे’ने हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. डॉ. संजय यांनी मतकरींना ठाण्यातच हा उपक्रम पार पाडण्याबद्दल सुचवलं. संस्थेचे व्यवस्थापक, समन्वयक, गटप्रमुख आणि कार्यकर्ते असे सारे मिळून जवळपास ४० ते ५० जणांचा ताफा लगेच कामाला लागला आणि सुरू झाला ‘स्लम थिएटर’च्या जुळवाजुळवीचा डोंगराएवढा मोठा दुसरा अध्याय!
----------
‘समता विचार प्रसारक संस्था’ गेली २२ वर्षं प्रामुख्याने ठाण्यातल्या गरीब वस्त्यांमधल्या मुलांसाठी शैक्षणिक काम करत आलेली आहे. जे विद्यार्थी अडचणींवर, प्रतिकूलतेवर मात करून १०वीची परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना संस्थेतर्फे दरवर्षी ‘एकलव्य’ पुरस्कार दिला जातो. त्यांच्यासाठी ‘एकलव्य’ पुस्तकपेढीची योजना आहे. याच मुलांमधून कार्यकर्त्यांच्या नवीन फळ्या उभ्या राहतात. दोन दशकांपासून हे काम सुरू असल्याने ठाण्यातल्या वस्त्यांमध्ये संस्थेच्या कार्यकर्त्यांचं उत्तम जाळं उभं राहिलेलं आहे. पण हे झालं शैक्षणिक बाबींबद्दल. नाटकांसाठी मुलांना गोळा करायचं तर बहुतांश वस्त्यांमध्ये कार्यकर्त्यांना अक्षरशः जिवाचं रान करावं लागणार होतं.
नुसतं गरीब वस्त्या किंवा झोपडपट्टी म्हटलं तरी त्यातही बर्‍याच वेगवेगळ्या परिस्थितींतली मुलं होती. कळवा नाइटस्कूलची मुलं पोटापाण्यासाठी दिवसभर मोलमजुरी करून संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत शाळाशिक्षण घेणारी होती. त्यांना तालमींसाठी एकत्र आणायचं तर कुठल्या वेळी, यावरच आधी खल करावा लागला. त्यात पुन्हा दिवसभराच्या मोलमजुरीने ही मुलं थकून गेलेली असायची. ज्ञानेश्वरनगर हा गट कचरावेचकांच्या मुलांचा, तर कोपरी-ठाणे (पूर्व) हा गट सफाई कामगारांच्या मुलांचा होता. पानखिंड पाडा म्हणजे नव्या विस्तारित ठाणे शहराच्या वेशीवरच्या ओवळा गावालगतचा आदिवासी पाडा. त्यांना जेव्हा या उपक्रमाबद्दल समजलं तेव्हा आपला पाडा ‘गरीब वस्ती’ या अटीत बसतो का, असा प्रश्न त्यांना पडला. हा गट उपक्रमात जरा उशिराच सामील झाला. नळपाडा म्हणजे ठाणे शहरातून वाहणाऱ्या एका मोठ्या नाल्याच्या अवतीभोवतीची वस्ती, तर कळवा पाइपलाइनची वस्ती पाणीपुरवठ्याच्या मोठ्या पाइपलाइनच्या आसपास वसलेली. पाण्याचं कमालीचं दुर्भिक्ष इथल्या रहिवाशांच्या पाचवीला पुजलेलं. वस्तीच्या अस्तित्वातच असा मोठा विरोधाभास भरून राहिलेला. हा एकच गट असा होता की सहभागी मुलांपैकी कुणीच शाळेत जाणारं नव्हतं. शिक्षणापासून वंचित असलेली ही मुलं मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावणारी होती. याच्या बरोबर उलट परिस्थिती ढोकाळी गटाची होती. या गटातली सगळी मुलं ‘एकलव्य’ पुरस्कार मिळवलेली, ११वीत शिकणारी. नाटक म्हणजे काय हे त्यांना समजावणं तसं सोपं गेलं; पण ही मुलं तालमींसाठी आपापले क्लास, कॉलेज बुडवायला अजिबात तयार नव्हती. माजीवडा गट क्र.१ या गटातल्या सगळ्या मुलांच्या आया घरकाम करणाऱ्या आणि बाप सतत दारूच्या नशेत असणारे. वागळे इस्टेट गटातली सगळी सहभागी मुलं समता संस्थेचे कार्यकर्ते म्हणून काम करणारी होती. आपापलं शिक्षण, व्यवसाय आणि संस्थेचं काम हे सांभाळून या मुलांनी तालमी केल्या.
उपक्रमाच्या एक समन्वयक हर्षदा बोरकर सांगतात- ‘‘एखाद्या वस्तीत आजारपणाची मालिका, तर कुठे पालकांची नाराजी आणि नकार. घरी काम आहे, पाहुणे आले आहेत किंवा पूजा आहे, अशी कारणं सांगून पालक विशेषतः मुलींना तालमींमधून घेऊन जायचे. कुठे संध्याकाळच्या वेळी वीज नसल्यामुळे खोळंबा व्हायचा. अंधारात तालमी घ्याव्या लागायच्या. तालमींदरम्यान मार्गशीर्षातले गुरुवार आले, तेव्हा वैभवलक्ष्मीच्या व्रताचं कारण सांगून झाडून सगळी मुलं गैरहजर होती. एका गटातली मुलं लोकांच्या गाड्या धुण्याचं काम करायची. रोज कुणी किती गाड्या धुवायच्या यांची संख्या ठरलेली. एखादा दिवस त्यांना तालमींसाठी लवकर या म्हटलं तर ही मुलं स्पष्टपणे सांगायची, ‘मला अमुक इतक्या गाड्या धुवायच्या असतात. त्या झाल्याशिवाय मी येणार नाही.’ पण एवढ्या अडचणी असूनही मुलांचा उत्साह कायम होता, ही फार आश्वासक बाब होती.’’
गोकुळनगर वस्तीतले दोन किस्से फार बोलके आहेत. इथल्या आठ-दहा मुलामुलींनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून दोन दिवस चर्चा करून विषय ठरवला होता, पण पुढले तीन दिवस काही कलाकार मुली तालमीच्या ठिकाणी ङ्गिरकल्याच नाहीत. त्यांचा गटप्रमुख एका मुलीच्या घरी पोहोचला, तर त्या मुलीची आजी हातातलं काम बाजूला ठेवून तावातावाने बाहेर येऊन त्याच्यावर वस्सकन ओरडली- ‘‘आमच्या सुंदर पोरीला काय म्हणून नादी लावता वो?’ त्यावर काय उत्तर द्यावं हे गटप्रमुखाला उमगेना. तो निमूटपणे तालमीच्या ठिकाणी परतला.
अजून एक मुलगी, दीक्षिता. तिला नाटकात काम करायची आवड होती. सुरुवातीला काही दिवस लपून-छपून वस्तीतल्या जरीमरी मंदिरात सुरू असलेल्या तालमींना ती आली आणि नंतर सलग तीन-चार दिवस आलीच नाही. तिची चौकशी करायला म्हणून गट कार्यकर्त्या हर्षलता कदम एका रविवारी दुपारी तिच्या घरी पोहोचल्या. तिचं घर म्हणजे एक खोपटंच. तिथेच कोपऱ्यातल्या बारीकशा मोरीत ती पाइपने पाणी भरत होती, एकीकडे कपडे धुवत होती आणि पिऊन तर्र झालेला तिचा बाप मटणाचं जेवण जेवत बसलेला होता. त्याने अगदी शिस्तीत ‘सॉरी मॅडम’ वगैरे म्हणून दीक्षिताला पाठवायला स्वच्छ नकार दिला. झालं, या गटाच्या तालमीच बंद पडायची वेळ आली. पण उर्वरित मुलींपैकी एकीने त्यावर निराळीच शक्कल लढवली. तिने सुचवलं, की आधीचं नाटक जाऊ दे, आपण नवीन नाटक बसवू - ‘बाहर जाना मना है!’ आणि खरंच, या गटाने अखेर याच नावाचं एक नवीन हिंदी भाषिक नाटक रीतसर बसवून सादर केलं.
प्राथमिक फेरीदिवशी मी हर्षलता कदम यांना तालमींच्या वेळच्या अडचणींबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, ‘‘तरी मराठी घरांतले पालक मुलींना पाठवतात; पण हिंदी भाषिक मुलींच्या घरच्यांना तयार करणं फार अवघड जातं. नाहीच म्हणतात ते लोक.’’
समता संस्थेच्या लतिका सु. प्र. यांनी संस्कृती नावाच्या अजून एका मुलीबद्दल सांगितलं. नाटकात भाग घेतला म्हणून तिच्या बापाने तिला रात्रभर घराबाहेर ठेवलं. जेवायलाही दिलं नाही. ती बिचारी बराच वेळ थंडीत कुडकुडत बसली आणि अखेर बेशुद्ध पडली. तिच्या आईचं माहेरच्यांशी वाकडं. तरी तिच्या मावशीने तिला दवाखान्यात दाखल केलं. आम्ही तिला बघायला गेलो, तर मावशीने आम्हाला आश्वासन दिलं, की एक-दोन दिवसांत ती बरी होऊन पुन्हा तालमीला येईल. ‘‘तेवढाच तिला आनंद मिळतो.’’
अशा एक ना अनेक अडचणी आणि त्यातून मार्ग काढून बांधलेले कलाकारांचे गट. अशा वेळी नाटक बसवण्याचे सर्वमान्य निकष धरून मुलांकडून काम करून घेणं शक्यच नव्हतं. तसंच प्रमाणित भाषा आणि मुलांची त्यांची-त्यांची बोलीभाषा यातही जमीन-अस्मानाचा फरक होता. त्यामुळे कुठल्याही नाटकाचं मूळ असलेल्या लिखित संहितेला सर्वप्रथम बगल देण्यात आली. मुलांनीच विषयनिवड करायची, आपापले संवाद तयार करायचे आणि नाटिका बसवायची असं ठरवण्यात आलं.
... पत्रकार परिषदेत जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा साहजिकच मनात काही प्रश्न उभे राहिले. ज्यांनी कधी नाटक पाहिलेलंच नाही अशांकडून ते करून घ्यायचं तर कसं? विंगेची कल्पना त्यांना कशी समजावायची? लिखित संहिता नसताना मुलं आपापल्या संवादांच्या जागा कशा काय लक्षात ठेवणार?
इथे मदतीला आली ठाण्यातल्या रंगकर्मींची एक संस्था- ‘अजेय’. लेखक-दिग्दर्शक क्षितिज कुलकर्णी आणि त्यांचे काही तरुण आणि उत्साही सहकारी असा हा गट. हर्षदा बोरकर यांच्या विनंतीवरून प्राथमिक फेरीच्या आधीच्या पंधरा-एक दिवसांत ही मंडळी ‘स्लम-थिएटर’च्या विंगेत उतरली. सहभागी गटांतील काही वस्त्यांमध्ये जाऊन तिथल्या मुलांनी तयार केलेल्या नाट्यप्रवेशांना रंगमंचीय अवकाश देण्याचा प्रयत्न त्यांना करायचा होता. काही मूलभूत गोष्टी मुलांना समजावून द्यायच्या होत्या. उदा : प्रेक्षकांकडे शक्यतो पाठ करायची नाही, एका वेळी एकाच कलाकाराने संवाद म्हणायचे, बोलीभाषेचा वापर होत असला तरी शब्दांचे उच्चार स्पष्ट ठेवायचे, बोलण्याच्या वेगावर नियंत्रण ठेवायचं, वगैरे वगैरे.
पत्रकार परिषदेत ‘अजेय’चा सदस्य अवधूत याने आपल्या सहकार्यांच्या वतीने अनुभव मांडले, ‘‘झोपडपट्टीतली मुलं म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर जे उभं राहतं तसं अजिबात नाही. ही मुलं खूप मेहनती आहेत. जरा दिशा मिळाली की त्यांच्या डोक्यातून विविध कल्पना उभ्या राहतात. आम्ही नाटकवाले असूनही या मुलांकडून नकळत बरंच काही शिकलो...’’
अवधूतचं बोलणं ऐकताना मी सहज मतकरींकडे पाहिलं. त्यांच्या चेहर्‍यावर एक समाधानाची छटा होती. त्यांच्या मनातल्या योजनेला मूर्त रूप मिळायला सुरुवात झाल्याचं त्यांनी ओळखलं असावं कदाचित.
----------
पत्रकार परिषदेच्या तासाभराच्या पूर्वपीठिकेची शिदोरी घेऊन मी दुसर्‍या दिवशी रंगीत तालमींना जाऊन पोहोचले. ठिकाण होतं समता संस्थेच्या कार्यालयासमोरचा हिरवळीचा एक छोटा तुकडा.
web2014_12_25_SMM_1643_small.jpg
भरपूर चिल्लीपिल्ली जमलेली. सगळीकडे त्यांचा सामूहिक गलबला चाललेला. त्यांचे गटप्रमुख त्यांना सारखे शांत राहण्याच्या सूचना करत असलेले... प्रेक्षकांच्या जागी होतं मतकरी दांपत्य, हर्षदा बोरकर, क्षितिज कुलकर्णी आणि सहकारी, ‘समता’चे जगदीश खैरालिया, मीनल उत्तुरकर, सुधीर रायकर आणि माझ्यासारखे इतर काही मोजके. सगळे मिळून अवघे पंधरा-वीसजण.
web_2014_12_25_smm_1685.jpg
web_2014_12_25_smm_1649.jpg
web_2014_12_25_SMM_1711_small.jpg
मी तिथे पोहोचले तेव्हा दोन नाटिका होऊन गेलेल्या होत्या आणि तिसर्‍या ‘गलतफहमी के शिकार’ या मनोरमानगरच्या नाटिकेची रंगमंचीय व्यवस्था सुरू होती. व्यवस्था म्हणजे तरी काय, तर एखाद-दुसरी खुर्ची, कुठे एखादं टेबल, कलाकारांनी वापरायचं काही किरकोळ सामान- असं काहीबाही. या नाटिकेतली एक कलाकार मुलगी नुकतीच ओरिसातून मुंबईत कामासाठी म्हणून आलेली होती. ठाण्यातल्या या वस्तीत राहत होती. तिला नाटक म्हणजे काय हे तर माहिती नव्हतंच, पण इथली मराठी, बंबई हिंदी कळण्याचीही मारामार होती. तरी तिने जुजबी भाषा शिकून नाटकात भाग घेतला होता. तिकडे ओरिसात तिच्या पालकांना ते ऐकून फार आनंद झाला. ही नाटिका अंतिम फेरीत आली नाही, नाही तर ते खास आपल्या लेकीला पाहायला ओरिसातून ठाण्यात येणार होते.
या नाटिकेचा विषय होता एड्स. ऐकूनच मी मनोमन चरकले. नाटिका सुरू झाली. असुरक्षित लैंगिक संबंधामुळे एकाला एड्स होतो. त्याच्यामुळे त्याच्या बायकोला होतो. त्या दोघांना घरचे, शेजारचे वाळीत टाकतात. मग एका डॉक्टरच्या पात्रामार्ङ्गत एड्सविषयीचे लोकांचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न...त्या मुलांना ही सारी जाण आली कुठून, असा प्रश्न बघणार्‍या प्रत्येकालाच पडला. पण मुलांनी तर आपल्या आसपास घडत असलेली गोष्टच सांगितली होती. इथे या आगळ्यावेगळ्या रंगमंचाने माझ्या अंतर्मनाला पहिला धक्का दिला.
सगळ्याच नाटकांचे विषय मुलांच्या परिसरातले, त्यांनी अनुभवलेले होते. दारूच्या व्यसनापायी कुटुंबाची होणारी वाताहत, उपासमार, दारू पिऊन मारहाण करणारा नवरा किंवा बाप, काबाडकष्ट करून संसार सावरण्याचा कसाबसा प्रयत्न करणाऱ्या स्त्रिया, अंधश्रद्धेचा पगडा, घरातल्या मुलांच्या तुलनेत मुलींच्या शिक्षणाची होणारी आबाळ, स्त्री भ्रूणहत्या, कचरावेचकांच्या वस्तीतल्या समस्या, भांडणं...एकापुढे एक नाटिका सादर होत होत्या. कुठल्याही सामाजिक संस्थेच्या ‘सर्व्हे’तून आकड्यांच्या स्वरूपात पुढे येणारी तथ्यं इथे जिवंत अनुभवांच्या स्वरूपात उलगडत होती, आकड्यांपेक्षा बरंच काही अधिक सांगून जात होती.
एड्सच्या नाटिकेत डॉक्टरची भूमिका करणारी एक मुलगी समोरच्या पात्राच्या थेट डोळ्यांत पाहून संवादफेक करत होती. तिची देहबोलीही संवादांना साजेशी होती. तिचं काम आवडल्याचं मी नंतर आवर्जून तिला सांगितलं. त्यावर तिचा चेहरा असा काही खुलला म्हणता! ८वी-९वीत शिकणारी ती मुलगी...पुढे तिला डॉक्टर व्हायची इच्छा होती का? की ती कुठल्या दवाखान्यात नाही तर हॉस्पिटलमध्ये काम करत होती, जिथल्या निरीक्षणातून तिने आपली चिमुकली भूमिका साकारली होती?
मुलं ज्या जागेत नाटिका सादर करत होती तिथे रंगमंचाच्या आकाराची आणि मापाची जागा ठरवून दिलेली होती. दोन्ही बाजूंना तीन-तीन खुर्च्या उलट्या मांडून विंगांचा आभास निर्माण केला गेला होता. कारण मुलांनी छोट्याशा खोपटात नाही तर आठ बाय आठच्या चिमुकल्या खोल्यांत तालमी केलेल्या होत्या. तिथून त्यांना प्राथमिक फेरीच्या दिवशी एकदम मोठ्या रंगमंचावर न्यायचं तर हा मधला टप्पा घेणं आवश्यक होतं. तसंच रंगमंचाच्या आयताकृती जागेवर चार मोठ्या सतरंज्या अंथरलेल्या होत्या. थोडक्यात, नाटक सादर करण्यासाठी प्रत्यक्षात किती जागा मिळणार आहे हे मुलांना आपोआप कळावं आणि त्यानुसार त्यांनी आपला वावर ठेवावा अशी योजना होती. पण मुलं बिचारी त्या सतरंज्या पायदळी फार तुडवल्या जाणार नाहीत या बेताने मागच्या मागेच नाटिका सादर करून जात होती. काही गट कोपऱ्यातल्या एकाच सतरंजीच्या सीमा पकडून वावरत होते. ‘त्या संपूर्ण जागेचा वापर करा’ असं मतकरींना त्यांना वारंवार सांगावं लागत होतं. रंगमंचीय आविष्काराचं बोट धरून आपल्या वंचित विश्वातून बाहेरच्या विस्तारित जगात यायचं तर या मुलांना जाणिवेच्या पातळीवर स्वतःत किती आतवरचे बदल करून घ्यावे लागणार होते त्याची ही केवळ कणभर झलक होती.
एकेक नाटिका झाल्यावर आम्ही टाळ्या वाजवल्या की तिथेच थांबलेली कलाकार मुलंही टाळ्या वाजवत होती. मतकरी त्या मुलांना लगेच काही साध्या, सोप्या पण महत्त्वाच्या सूचना करत होते. कधी कलाकारांचा आवाज खणखणीत येत नसे. संवाद ऐकू जात नसत. कधी प्रसंग उठावदार होण्याच्या दृष्टीने काही बदल त्यांना आवश्यक वाटत. अशा वेळी विशेषतः त्या-त्या गटप्रमुखांना ते संबंधित सूचना करत होते. एका नाटिकेतल्या कलाकार मुलीने सुरुवातीला एक निवेदन वाचून दाखवलं- नाटकात काय सादर होणार आहे त्याबद्दल सांगणारं. तिला मतकरींनी ‘बोलतोय त्याचा प्रसंग करा, भाषण नको’ असा प्रेमळ सल्ला दिला.
प्रॉपर्टीचा वापर कसा करायचा हेदेखील मुलांना समजावणं आवश्यक होतं. सगळीच मुलं नाटकाच्या परिघाबाहेरची आहेत हे गृहीत धरून त्यांच्यात शिस्त आणणं गरजेचं होतं. काही मुलं सुरुवातीलाच आपापली नावं सांगून नाटक सुरू करत होती. त्या वेळी कर्टन कॉल शेवटी घेण्याबद्दल मतकरींनी सूचना केली. त्यात पुन्हा ‘कर्टन कॉल’ याचा अर्थ तरी मुलांना कसा कळावा? पण त्यांना समजेल अशा भाषेत मतकरी, हर्षदा बोरकर आणि इतर समन्वयक मुलांशी बोलत होते. काही मुलं या सूचना अगदी लक्षपूर्वक ऐकत होती. काहींच्या देहबोलीवरून त्यांना यात फारसा रस वाटत नसावा असंही दिसत होतं. काहीजणांचं लक्ष खाऊच्या पाकिटांकडे लागून राहिलेलं होतं. कारण आपापलं नाटक सादर करून झालं की खाऊ मिळणार असं त्यांना सांगितलं गेलं होतं.
खाऊवरून आठवलं. मुलांच्या उपक्रमातल्या सहभागामागे या खाऊचा फार मोठा हात होता. हर्षदा बोरकर यांनी आधीच्या चार महिन्यांतले अनेक किस्से सांगितले. त्यात हा मुद्दा फार ठळकपणे जाणवला. माजीवडा गट क्र.१ या वस्तीत कार्यकर्त्यांना असा अनुभव आला, की पहिल्या दिवशी गट बनला, मुलं जमली, विषय ठरला; पण दुसर्‍या दिवशी तालमीला त्यातली एक किंवा दोनच मुलं हजर होती. तीन-चार दिवस असंच सुरू राहिलं. शेवटी गटप्रमुखांनी नियमित येणाऱ्या एक-दोन मुलांना वडापाव द्यायला सुरुवात केली. बघता बघता इतर मुलांपर्यंत ही बातमी पोहोचली आणि मग एक-एक भिडू गोळा झाला. अर्थात हे खाऊवाटप म्हणजे कुठलंही आमिष नव्हतं. मुलांना तालमींच्या ठिकाणी सलग थांबवून घ्यायचं तर त्यांच्या पोटापाण्याची काळजी घ्यावी लागणारच होती. ‘घरून डबा आणा’ हे फर्मान इथे कामाचं नव्हतं. उलट, काही पालक तर केवळ मुलांना इथे ताजं अन्न खायला मिळेल असा विचार करून मुलांना पाठवायला तयार झाले. रंगीत तालमीच्या दिवशी ठिकठिकाणहून मुलांना घेऊन यायचं आणि परत नेऊन पोहोचवायचं एक अतिरिक्त कामही होतं. पडद्यामागच्या अशा सर्व कामांसाठी समताचे कार्यकर्ते सतत झटत होते आणि प्रत्यक्ष नाटक आकाराला येण्यासाठी ‘अजेय’चा मोलाचा हातभार लागत होता.
रंगीत तालमींच्या दिवशी प्रत्येक नाटिकेचा सादरीकरणाचा काळ किती हे पाहण्याचं काम ‘अजेय’चे क्षितिज कुलकर्णी करत होते. सर्व नाटिका जास्तीत जास्त १५ ते २० मिनिटांच्या असाव्यात असं ठरलेलं होतं. बर्‍याचशा नाटिका या नियमात बसत होत्या, तर काही नाटिका अगदीच सात-आठ मिनिटांच्या होत होत्या. मग त्या वाढवायच्या तर कशा प्रसंगांची भर घालावी की संवादांची हे सगळं गटप्रमुखांशी बोलून तिथल्या तिथे ठरत होतं. ‘अजेय’चे गौरव, अभिनव, महेश, अवधूत या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल याकडे कटाक्षाने लक्ष पुरवत होते. गटप्रमुखांवरची जबाबदारी वाढत होती. मुलांच्या मनात काही नवीन जाणिवा निर्माण होत आहेत असं दिसत होतं.
बहुतेक नाटिकांचे विषय वर सांगितलेल्या त्यातल्या समस्या हे सर्व नागरी विभागांशी निगडित होतं. पण ठाणे शहरालगतच्या येऊरच्या जंगलविभागातून आलेल्या दोन गटांनी आपल्या आदिवासी पाड्याच्या समस्याही मांडल्या होत्या. त्यातही त्यांची सादरीकरणाची पद्धत लक्षवेधी होती. येऊर म.न.पा. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ‘डोंगरापलीकडले प्रश्न’ या नाटिकेत चक्क मानवी नेपथ्य वापरलं होतं. घरं, आदिवासी खोपटं, विहीर; इतकंच नव्हे, तर गर्दीने भरलेली बसही त्यांनी मानवी नेपथ्यातूनच उभी केली होती. प्राथमिक आणि नंतर अंतिम फेरीतही मुलांच्या या कल्पकतेने प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.
web2015_01_04_SMM_2167_small.jpg
प्राथमिक फेरीच्या दिवशी मी या गटातल्या मुलांशी आणि त्यांचा गटप्रमुख पंकज गुरव याच्याशी बोलले. तो ‘समता’चा २००१ सालचा ‘एकलव्य’ विद्यार्थी. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन वर आलेला. त्याने सांगितलं, की वस्तीत तालमी सुरू असताना दोन मुख्य समस्या होत्या. मुलांचं लाजणं आणि संवाद म्हणताना हसणं. मग त्याने वस्तीऐवजी शाळेत तालमी घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून रीतसर परवानगी घेतली. हा उपाय चांगलाच कामी आला. मुलं अगदी एकाग्रतेने संवाद म्हणायला लागली. प्राथमिक फेरी आठवड्याच्या अधल्यामधल्या दिवशी होती. सर्वच गटप्रमुखांनी मुलांच्या शाळांना आधी सूचना देऊन शाळेत मुलांची हजेरी लागेल याची खातरजमा केलेली होती. पंकजशी बोलून तिथून निघताना मी मुलांकडे बघून पटकन ‘ऑल द बेस्ट’ असं म्हणाले आणि तत्क्षणी स्वतःशीच जीभ चावली. आदिवासी पाड्यातल्या मुलांना ‘ऑल द बेस्ट’चा अर्थ कळेल का, असं मला वाटून गेलं. त्याऐवजी दुसरं त्यांना समजेल असं काय बरं म्हणता येईल, असा मी स्वतःशी विचार करेपर्यंत झाडून सर्वांनी ‘थँक यू, मिस’ म्हणून मला प्रतिसाद दिला.
कोपरी, ठाणे (पूर्व)च्या नाटिकेत विद्यार्थ्यांचं मोबाइल फोन्स, सोशल नेटवर्किंग यांच्या आहारी जाणं ही समस्या मांडली होती. नंतर हर्षदा बोरकरांनी सहज या मुलांना विचारलं, की तुमच्यापैकी कोण कोण मोबाइल फोन्स वापरत नाही? त्यावर एक मुलगा सोडून बाकी सर्वांनी हात वर केले. त्या मुलाला त्यावरून छेडलं असता त्याने प्रांजळपणे कबूल केलं, की मी मोबाइलवरून व्हॉट्सअॅप आणि फेसबुक वापरतो, बाकी काही नाही तरी त्याच्या प्रामाणिकपणाचं सर्वांना फार कौतुक वाटलं.
web2015_01_04_SMM_2145_small.jpg
शाळाशिक्षण घेत एकीकडे डोंबार्‍याचे खेळ करणारा एक चिमुरडा दिनू दारूड्या बापाच्या मारहाणीला कंटाळून घरातून पळून जातो आणि शिक्षणाच्या आशेने मुंबईत येतो; पण मुंबईत त्याला भीक मागण्यावाचून अन्य पर्याय राहत नाही. योगायोगाने त्याला काही भली माणसं भेटतात आणि बालसुधारगृहात पाठवतात... असं एका नाटिकेचं कथानक होतं. नाटिकेत मुलांनी चक्क ‘फ्लॅशबॅक’ तंत्राचा वापर केला होता. नाटिकेचा शेवट असा न करता दिनूची आणि त्याच्या आईची पुन्हा भेट होते असं दाखवायला हवं, अशी हर्षदा बोरकरांनी या गटाला सूचना केली. प्राथमिक फेरीच्या वेळी या सूचनेची मुलांनी पुरेपूर अंमलबजावणी केली. नाटिकेतला दिनूची भूमिका करणारा ८-१० वर्षांचा छोटासा मुलगा तर आपली भूमिका अक्षरशः जगला. अंतिम फेरीतही त्याने झकास अॅडिशन्स घेतल्या, तोकड्या बाजू सांभाळल्या. आश्चर्याची बाब म्हणजे नाटक म्हणावं तसं वठत नाहीये असं वाटून रंगीत तालमीच्या आदल्या दिवशी या गटाने उपक्रमातून अंग काढून घ्यायचं ठरवलं होतं. पण पुढल्या ४-५ दिवसांत समन्वयकांनी कमाल केली आणि तुकड्या-तुकड्यांतल्या प्रवेशांचं मिळून एक छान नाटुकलं तयार झालं. इतकंच नव्हे, तर अंतिम फेरीत दुसर्‍या क्रमांकाचं बक्षीसही त्यांनी पटकावलं.
कल्पनाशक्तीचा अजून एक भन्नाट आविष्कार दिसला तो वागळे इस्टेट गटाच्या ‘तणाव’ या नाटिकेत. दहावीच्या परीक्षेचा ताण असह्य होऊन एक हुशार, होतकरू मुलगा आत्महत्या करतो, असं नाटिकेचं कथानक होतं. घटना मुलांच्या आसपासच घडलेली. मुलांनी सगळी पूर्वतयारी केली; पण तालमी सुरू झाल्यावर त्यांना सगळंच विस्कळीत वाटायला लागलं. मग त्यातून त्यांनी चक्क मूकनाट्याचा मार्ग शोधून काढला.
web2014_12_30_SMM_2013_small.jpg
या नाटिकेतही मानवी नेपथ्य वापरलेलं होतं. घरातलं वॉशबेसिन, शॉवर, कपड्यांचं कपाट, घराचं दार, खिडकी सगळंच कलाकारांद्वारे उभं केलं गेलं. या नाटिकेने अखेरपर्यंत सर्वांची वाहवा मिळवली. प्राथमिक आणि अंतिम फेरीतल्या सादरीकरणांमध्ये मुलांनी अशी काही एकेक इम्प्रोवायझेशन्स घेतली की बघणारे सर्वचजण अवाक झाले. या पहिल्यावहिल्या नाट्यजल्लोषाची विजेती ठरली ती हीच नाटिका.
अर्थात रंगीत तालमीदिवशी कुणालाच या कशाचीच कल्पना नव्हती. मतकरी पती-पत्नी दिवसभर तालमीच्या ठिकाणी होते. वेळोवेळी मुलांना योग्य ते मार्गदर्शन करत होते. सगळ्या नाटिका सादर झाल्या. मुलं आपापल्या घरी गेली. त्यानंतर मतकरींनी पुन्हा सर्व कार्यकर्त्यांना गोळा करून प्राथमिक फेरीच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. एकीकडे ही शक्यतादेखील बोलून दाखवली, की पडदा उघडल्यावर मुलं बुजून जाऊन काहीच न करता नुसतीच उभी राहतील, नाटिका सादर करायचं विसरून जातील. त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे.
पण तसं काहीही झालं नाही. प्राथमिक फेरी दणक्यात पार पाडली. एंट्री-एक्झिटचं तंत्र मुलांनी झक्कपैकी आत्मसात केलं होतं. एक नाटक संपत आलं होतं. पुढला गट तयार होता. तर त्यातली एक चिमुरडी डोळे मिटून मनोमन देवाला नमस्कार करताना दिसली. त्याच वेळी तिच्या शेजारची अजून एक आपल्या सहकार्यांना ‘नाटक सुरू झाल्यावर कुणीही हसायचं नाही’ अशी सक्त ताकीद देत होती.
आणखी एका गटाबद्दलचा किस्सा सांगितलाच पाहिजे. उपक्रमाबद्दल समजल्यावर कापूरबावडी गटाच्या अनेक दिवस चर्चा झाल्या होत्या. वेगवेगळे विषय आले, गेले. चर्चेसाठी मुलं आणि गटप्रमुख प्रत्येक रविवारी वस्तीलगतच्या मैदानातल्या एका झाडाच्या पारापाशी जमायचे. एका रविवारी सगळे मैदानात जमले आणि पाहतात तर काय, ते झाड आणि पार दोन्ही जमीनदोस्त झालं होतं. कारण ते मैदान एका बिल्डरच्या घशात गेलं होतं. पण यातूनच मुलांनी ‘खेल का मैदान, बिल्डरोंके नाम’ हा विषय शोधला. तालमीसाठी अन्यत्र जागाही धुंडाळली. पण रंगीत तालमीच्या दिवशी मुलांची म्हणावी तशी तयारी झालेली नव्हती. त्यामुळे ही मुलं थेट प्राथमिक फेरीलाच दाखल झाली. त्यांच्या सादरीकरणात साहजिकच म्हणावा तेवढा सफाईदारपणा नव्हता. एक मुलगा सारखे संवाद विसरत होता, पण म्हणून तो बुजला नाही. उलट, ‘कर्टन कॉल’च्या वेळी त्याने स्वतःचं नाव सांगून सोबत ‘नवीन मुलगा’ अशी स्वच्छ पुस्ती जोडून टाकली!
उपक्रम ठाणे शहरापुरता मर्यादित ठेवायचा ठरला होता, तरी त्याबद्दल कानावर आल्यावर घणसोली (दिनूची नाटिका), कल्याण डंपिंग ग्राऊंड आणि कौसा-मुंब्रा इथून आलेले तीन गट उपक्रमात उत्साहाने सामील झाले. ‘स्वच्छता अभियान’ ही कौसा-मुंब्रा गटाची नाटिका गाण्यांतूनच सादर झाली. गाण्यांच्या चाली परिचित हिंदी सिनेमांतल्या गाण्यांच्या, पण बोल मात्र मुलांनीच विषयानुरूप लिहिलेले. खरंच आश्चर्यचकित करणारं होतं सगळं! या नाटिकेने अंतिम फेरीत धडक मारून उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलं.
web_2014_12_30_SMM_1941.jpg
प्राथमिक फेरीदिवशी हे नाटक पाहत मी विंगेत उभी होते. एका प्रसंगात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करावा असं दाखवायचं होतं. त्यासाठी लाल आणि हिरव्या रंगांचे वेगवेगळे केराचे डबे स्टेजवर दोन्ही बाजूंना आधीपासूनच ठेवलेले होते. माझ्या बाजूच्या विंगेतून एक मुलगा कागदाचे कपटे वगैरे स्टेजवर टाकणार होता आणि समोरच्या विंगेतून अजून एक मुलगा संत्र्याची सालं टाकणार होता. आता झालं होतं असं, की कागद आणि संत्र्याची सालं दोन्ही गोष्टी माझ्या जवळ उभ्या असलेल्या मुलाजवळच होत्या. त्यातली संत्र्याची सालं त्वरित पलीकडे पोहोचवणं आवश्यक होतं. कारण त्यांनी तालीम तशीच केलेली होती. पलीकडच्या मुलाने या मुलाकडे पाहून काही तरी हातवारे केले आणि हा मुलगा पटकन माझ्याकडे संत्र्याची सालं देत म्हणाला, ‘ये उधर उसको देना है...’. काय गोंधळ झालाय हे लक्षात येताच माझीच जी काय घाई-गडबड उडाली की विचारू नका. नाटकाची कंटिन्युटी बिघडू न देण्याची जबाबदारी अचानक माझ्यावरच येऊन पडली होती. मी स्टेजच्या मागच्या बाजूने अक्षरश: धावत-पळत पलीकडे गेले आणि हातातली संत्र्याची सालं त्या दुसर्‍या मुलाच्या हातात कोंबली. तेवढ्यातल्या तेवढ्यात तो मला हळूच ‘थँक यू’ म्हणाला आणि तोंड भरून हसला. त्याचा एक कान स्टेजकडे लागलेलाच होता. लगेच मागे वळून त्याने ती सालं अगदी वेळेत स्टेजवर टाकली आणि मी ‘हुश्श’ केलं.
असे किती तरी किस्से, न संपणार्‍या कहाण्या. मुलांचे प्रामाणिक प्रयत्न, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि या सगळ्यातून अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या सहा नाटिका. परीक्षक-प्रेक्षकांपासून ते अंतिम फेरीला प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या मकरंद अनासपुरेपर्यंत सर्वांनाच या मुला-मुलींनी भुरळ घातली.
सहभागी वीस नाटिकांपैकी प्रत्येक नाटिकेतूनच काही तरी चांगलं गवसलं. कुठे स्त्री भूमिका उत्तम वठवणारा नऊ वर्षांचा एक तरतरीत छोकरा, तर कुठे दारूड्या बापाच्या भूमिकेत खणखणीत आवाजात संवाद म्हणणारे दोन कुमारवयीन कलाकार. एका नाटिकेतल्या एका भावानुकूल प्रसंगाला विंगेतून पार्श्वगायन करणारी सुरेल गळ्याची कुणी चिमुरडी, तर कुठे ‘अमुक एक पात्र असं का, तसं का नाही’ या मतकरींच्या प्रश्नाला अतिशय आत्मविश्वासाने उत्तर देणारा (बहुधा त्या नाटिकेचं दिग्दर्शनही केलेला) कलाकार...असे किती तरी मोती हाताला लागले. या सर्वांनाच कौतुक पुरस्कार दिले गेले. प्रत्यक्ष नाटकात सहभागी नसलेला करण अवताडे हा कुमारवयीन कार्यकर्ताही ठळकपणे सर्वांच्या नजरेत भरला. नाटकांच्या संवादांत सुधारणा करणे, कमी पडणारे प्रसंग घट्ट बांधणे, अशी अनेक कामं त्याने आपणहून उत्साहाने केली.
----------
web2015_01_04_SMM_2099_small.jpg

web2015_01_04_SMM_2279_small.jpg

नाट्यजल्लोष पार पडला. त्या दिवशी गडकरी रंगायतनच्या प्रेक्षागृहात अभिनय करणारी मुलं, समन्वयक आणि प्रेक्षक यांचं फार सुरेख मिश्रण तयार झालेलं होतं. दिवसभराचं वातावरण कौतुकाने अगदी भारलेलं होतं. एक वेगळंच, प्रयोगशील आणि अभिनव असं काही तरी पाहिल्याचं समाधान घेऊन मी प्रेक्षागृहातून बाहेर पडले, रस्त्यावरच्या रहदारीचा आवाज कानांत शिरला आणि कोण जाणे कसं, एका झाकोळून टाकणार्‍या जाणिवेने मनाला घेरलं. गुणी पण वंचित कलाकार आणि पांढरपेशे रसिक यांचं नातं एकदम संपुष्टात आल्यासारखंच वाटलं. आपण आपल्या घराच्या सुखवस्तू चौकटीत परत जाणार, ती मुलं त्यांच्या जगात परतणार... कोण जाणे, त्यातल्या एखाद्याच्या दारूड्या बापाला आपलं मूल इथे आलंय याचा त्याच्या आईने आत्तापावेतो पत्ता लागू दिला नसेल. आज ते पोर बक्षीस दाखवायला आनंदाने उड्या मारत घरी गेलं आणि त्याला बापाच्या लाथा खाव्या लागल्या तर?... या विचाराने चैन पडेना. पण मग बक्षीस समारंभाच्या वेळी रत्नाकर मतकरींनी व्यक्त केलेले विचारही लगोलग आठवले, की ‘वंचितांच्या रंगमंचाचा हा उपक्रम बालरंगभूमीपुरता मर्यादित राहू द्यायचा नाही. पुढल्या वर्षी प्रौढ कलाकार रंगमंचावर उभे राहिलेले पाहायचे आहेत.’ त्यातलाच एक तो दारूडा बाप असेल तर बरं होईल असं वाटलं. यंदा आपल्या गुणी पोराला तो लाथा घालेल, पण पुढल्या वर्षी ते मूलच त्याला मार्गदर्शन करेल, आणि मग उशिराने का होईना, बापाला आपल्या पोराचं कौतुकही वाटेल.
----------
छायाचित्र सौजन्य - स्वप्नाली मठकर.  

Comments

Popular posts from this blog

पुस्तक परिचय : Educated (Tara Westover)

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

साडेतीनशे पानी झाकोळ (पुस्तक परिचय : Shuggie Bain, लेखक : Douglas Stuart)