स्त्रिया आणि ब्लॉगिंग

तुम्ही कधी उंच डोंगराच्या कड्यावर उभे राहून दरीपल्याड आवाज दिला आहेत? त्वरित ऐकू येणार्‍या प्रतिध्वनीने तुम्हाला आनंदून जायला झाले आहे? असे कधी ना कधी नक्कीच घडलेले असणार. त्या आनंदामागचे कारण एकच असते - त्या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी हाताशी असलेले एकमेव साधन आपण यशस्वीपणे वापरलेले आहे हे तुम्ही मनोमन ओळखलेले असते. प्रतिध्वनी हा खरेतर ‘बोनस’, मुळात खच्चून ओरडणे ही तुमच्या अभिव्यक्तीची त्या क्षणीची गरज पूर्ण झालेली असते.
ब्लॉग-विश्व हे काहीसे असेच आहे. समोर अथांग अशी आंतरजालाची दुनिया पसरलेली असते. त्या पसार्‍यात आपलाही आवाज कुणीतरी ऐकावा अश्या आंतरिक इच्छेपोटी आधुनिक जगातील ब्लॉगरूपी खणखणीत साधन वापरून एक साद दिली जाते. ती कुणी ऐकेल, न ऐकेल, ही झाली नंतरची बाब, ‘बोनस’च्या स्वरूपातील. पण व्यक्त होणे ही प्राथमिक गरज मात्र तिथे भागलेली असते.

ब्लॉग्ज्‌च्या माध्यमातून स्त्री-अभिव्यक्तीचे कुठले निरनिराळे आविष्कार पहायला मिळतात, त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व कशा तर्‍हेने डोकावते, त्यांच्यात काही साम्यस्थळे आढळतात का, हे पाहणे मोठे मनोरंजक ठरते.
लेखन, चित्रे, फोटो, व्हिडिओ अश्या अनेक तर्‍हा, संवाद साधण्याचे अनेक मार्ग, विषयांचे वैविध्य, त्यांच्या मांडणीतून दिसणारे त्यांच्या व्यक्तीमत्त्वांचे कंगोरे, अशा एक ना अनेक बाबी समोर येतात आणि स्त्री-ब्लॉगविश्वाची सफर हा एक अत्यंत आनंददायी अनुभव बनून जातो.
हे एक उदाहरण पहा.
एक मुंबईकर स्त्री-ब्लॉगर. तिच्या ब्लॉगवरच्या लेखनाचे विषय तसे सर्वसामान्यच. पण ब्लॉगच्या नावाखाली ब्लॉगची थोडक्यात ओळख लिहिण्याची जी जागा असते, तिथे तिने जे लिहिलेले आहे, ते वाचल्यावर वैशिष्ट्यपूर्ण वाटते. कारण त्या शब्दांकरवी आपल्या ब्लॉगला तिने सरळ सरळ पाटीची उपमा दिलेली असते. मनात आले, की त्यावर काहीतरी गिरगटावे आणि आपल्या कामाला लागावे. त्या गिरगटण्याचे महत्त्व असे कितीसे? तर, दुसरे काही लिहावेसे वाटून आधी लिहिलेले पुसून टाकले जात नाही, तोपर्यंतच; तेवढेच.
म्हटले, तर हे खरेच. दिवस-रात्र ‘कनेक्टेड’ राहण्याच्या आजच्या आंतरजालीय, सोशल नेटवर्किंगने व्यापलेल्या शहरी युगात तुमच्या अभिव्यक्तीचा एक हुंकार पुढच्या क्षणाला जुना झालेला असतो. पण खरेच तिला असेच अभिप्रेत असावे का? की त्यामागे अन्य काही विचारही असेल?
ब्लॉग सुरू करताना असा काही खास विचार नसावा असे वाटते. कारण पहिल्या वर्षी त्या ब्लॉगवर तीनच पोस्टस्‌ लिहिल्या गेलेल्या. तिचे बहुधा अजून नक्की ठरत नसावे, की खरेच इथे नियमितपणे काही लिहायचे आहे का? पुढल्या वर्षीपासून मात्र भरभरून आणि सफाईदारपणे लिखाण झालेले. त्यापैकी एक पोस्ट वाचून असे वाटते, की तिच्या आयुष्यात वर्षभरापूर्वी काहीतरी वादळ येऊन गेलेले असावे. तिने त्याचे तपशिल नाही दिलेले. तिला त्याची आवश्यकता वाटली नसावी. मात्र त्याक्षणी, त्यादिवशी त्या वादळाचा आपल्या ब्लॉगवर उल्लेख केल्याने तिला बरे वाटले असेल, हलके वाटले असेल. तदनंतर लेखनात बर्‍यापैकी नियमितता आलेली. कुठलाही आव न आणता प्रामाणिकपणे केलेले निखळ लेखन. सहज म्हणून वाचायला जावे, तर गुंगवून ठेवणारे. त्या लेखनातून ब्लॉगकर्ती आपले संवेदनशील माणूसपण जपताना नक्कीच दिसते. हळूहळू तिच्या ब्लॉगच्या वाचकांची संख्या वाढत गेलेली आपल्या लक्षात येते. त्यातील काही नावे प्रतिसादांमधे नियमित दिसतात.
मग त्याच्या पुढच्या वर्षातली एक पोस्ट लक्ष वेधून घेणारी. तिच्या ब्लॉगलेखनाचे चाहते असलेल्या दोघा-तिघा वाचकांनी त्यांना आवडलेल्या तिच्या निवडक ब्लॉग-लेखांचा संग्रह करून एक पुस्तक तयार केले, आणि तिला ‘सरप्राईज गिफ्ट’ म्हणून देऊ केले. ब्लॉगची पाटीरूपी ओळख पटवणारे शब्द हेच पुस्तकाचेही शीर्षक. जणू तीच तिच्या लेखनाची ओळख बनून गेलेली. ते पुस्तक समोर पाहताक्षणी तिची जी प्रतिक्रिया झाली, त्याचा फोटोही ब्लॉगवर पहायला मिळतो. तो पाहून आपल्याही चेहर्‍यावर कौतुकाचे हलकेसे स्मित उमटते. कारण तो फोटो लेखक आणि वाचक यांच्यात प्रस्थापित झालेल्या सुंदरश्या नात्याचे द्योतक असतो.
ब्लॉग‘विश्व’ ही संज्ञा इथे सर्वार्थाने सार्थ ठरलेली दिसते.

ब्लॉगवरील लेखन हे बहुतांशी अनुभवाधारित असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मुळात गुजगोष्टी करणे, एखादा पाहिलेला अथवा ऐकलेला प्रसंग मनातच जिरू न देता त्याबद्दल इतरांना सांगणे हा स्त्रियांचा स्थायीभाव असतो. त्यामुळे ब्लॉग-विश्वातही याचे प्रतिबिंब पडलेले दिसतेच. नाहीतरी आंतरजालीय विश्वात स्थल-काल यांच्या पारंपारिक चौकटी मोडूनच पडलेल्या असतात. तशातच मातृभाषेतून संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ब्लॉग्ज्‌वर व्यक्त होणारे विचार अधिकच मुक्त होतात.
अशा मुक्त विचारांचे दार्शनिक ब्लॉग्ज्‌ म्हणजे प्रवासवर्णनांचे अथवा मायदेश सोडून परदेशात वास्तव्यासाठी गेल्यानंतर लिहिले जाणारे ब्लॉग्ज्‌. आम्ही अश्या-अश्या ठिकाणी गेलो, अमुक गोष्टी पाहिल्या, हे त्याचे फोटो, हा झाला त्यांचा ढोबळ साचा. पण त्या ढोबळपणातही कुणी ब्लॉगकर्ती आपल्या लिखाणाला ‘परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं’’ म्हणते आणि मनाचा एक हळूवार कोपरा वाचकांसमोर उघडा करून दाखवते.
प्रवासवर्णनात्मक ब्लॉग्ज्‌प्रमाणेच अजून एक लोकप्रिय प्रकार आहे पाककृतींच्या ब्लॉग्ज्‌चा.
निरनिराळे पदार्थ करून पाहणे, अन्य मैत्रिणींच्यात त्या पाककृतींची देवाणघेवाण करणे याची बहुतांश स्त्रियांना आवड असते. आपला एखादा हातखंडा पदार्थ लोकांनीही चाखून पहावा असे वाटत असेल, तर त्यावर दोन मार्ग असतात. एक, स्वतः करून इतरांना तो खायला घालायचा किंवा त्याची पाककृती अशा रीतीने सादर करायची, की पाहणार्‍याला तो स्वतः करून बघावासा वाटेल. तसे वाटणे हेच अशा प्रकारच्या ब्लॉग्ज्‌चे अंतिम ध्येय नव्हे काय?
वाचकांनी आपल्या पाककृती करून बघाव्यात, आपल्या शंका विचाराव्यात, त्यांचे आपण निरसन करावे, या सगळ्यातही तो पदार्थ करून खायला घालण्याइतकेच समाधान मिळवता येऊ शकते, हे असे ब्लॉग्ज्‌ पाहिल्यानंतर पटते. मग त्यासाठी भाषेचा अडसर ठरेल असे वाटते आहे? तर मग त्यावर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधे पाककृती देण्याचा उपाय केला जातो. पाककृतीचे निव्वळ साहित्य आणि कृती देऊन काम भागणार नाही असे वाटते आहे? तर मग आपण स्वतः आधी तो पदार्थ करून त्याचा फोटो सोबत दिला जातो. यामुळे ब्लॉगकर्तीच्या अभिव्यक्तीला एक प्रकारची विश्वासार्हताही प्राप्त होते.
एका पाककृतींच्या प्रसिध्द अशा ब्लॉगवर ब्लॉगकर्तीने वाचकांच्या फर्माईशी पूर्ण करण्याची उपसुविधाही देऊ केलेली आहे. या सुविधेचा वापर आजवर कितीजणांनी केला असेल याच्या तपशिलात शिरण्याची ही जागा नव्हे. पण ब्लॉगकर्तीच्या या कल्पकतेला दाद मात्र दिली पाहिजे. घरच्या समस्त मंडळींच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी सांभाळणार्‍या सुगरणीची ही आंतरजालीय आवृत्ती म्हणायला हवी. फर्माईश कुणाची अन्‌ काय येईल ही नंतरची गोष्ट झाली; पण मुळात अशा प्रकारच्या फर्माईशी आल्या, तर त्या पूर्ण करण्याची तिची तयारी आहे ही बाब विशेष वाटते. त्यामागे नवनवीन पदार्थ शिकण्याची तिची आसही दिसून येते. कारण फर्माईश झालेला एखादा पदार्थ तिच्यासाठीही नवीन असू शकतो.
अजून एका पाककृती ब्लॉगवर निव्वळ पदार्थांच्या कृती न देता त्या-त्या पदार्थांमागच्या आठवणींच्या स्वरूपातल्या संक्षिप्त कथाही दिलेल्या आहेत. यामागे स्मरणरंजन आणि ललितलेखन या दोन्हींचा मेळ घातला गेलेला दिसतो. तसेच, काही पोस्टस्‌सोबत तयार पदार्थाच्या अंतिम स्वरूपाचाच केवळ फोटो न देता पदार्थ तयार करतानाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यांचे फोटो एकत्र करून त्याचा स्लाईड-शो पाहता येतो.
अशा प्रकारे व्यक्त होण्यातून त्या ब्लॉगकर्तीचे वास्तव्य कुठले, तिचा भवताल कसा, तिचे कार्यक्षेत्र कोणते हे तर आपल्याला कळतेच. त्याचबरोबर, तिच्या व्यक्तिमत्त्वातला ठामपणा अथवा मृदूपणा, तिच्या ठायी असलेली धडाडी, तिचे कुटुंबवत्सल असणे, तरीही स्वतंत्र विचारांपासून न ढळणे, याबद्दलही काही आडाखे बांधता येतात. तिच्या कुटुंबाचा तिच्यावरील प्रभाव अथवा पगडा, तिच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण यांबद्दलचे काही एक चित्र आपल्या मनात तयार होते. तिची स्वतःबद्दलची, जगाबद्दलची मते समजतात; परंपरांवरती असलेला (वा नसलेला) विश्वास कळून येतो आणि मुख्य म्हणजे तिचे बाईपण मनात ठसते.
या बाईपणात कौटुंबिक नाती सांभाळणे, घरातील ज्येष्ठांप्रति आदर व्यक्त करणे, मुलांचा लडिवाळपणे सांभाळ करणे या बाबीही अनुस्यूत झालेल्या दिसतात.
एका ब्लॉगकर्तीने आपल्या आईने छंद म्हणून केलेल्या विणकामांचे आणि क्रोशाकामाचे फोटो काढून आपल्या एका ब्लॉगवर ठेवलेले आहेत. त्यामागे स्वतःच्या आईजवळ असलेल्या कलेचे कौतुक करण्याची इच्छा दिसतेच, शिवाय ती कला तमाम जगाला दाखवावी ही हौसही दिसते. आईचा छंद मुलीनेही आत्मसात केलेला असावा. कारण तिचाच अजून एक ब्लॉग आहे, ज्यावर तिने विणकामाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ज्यायोगे विणकाम, क्रोशेकाम शिकणार्‍या नवख्या मंडळींना मार्गदर्शन मिळू शकेल. मगाशी म्हटल्याप्रमाणे, लेखक आणि वाचक यांच्यातले विद्यार्थी आणि शिक्षकरूपी अजून एक सुरेखसे नाते इथे आकाराला येताना दिसते. हा ब्लॉग केवळ निमंत्रितांसाठी राखीव असा ठेवून ब्लॉगकर्तीने त्या नात्यातले खाजगीपणही जपलेले दिसते.
आई आणि मुलगी यांच्यातल्या नात्याचा एक निराळा आविष्कार अजून एका ब्लॉगमधे दिसतो. ही आई-मुलीची जोडी वयाने आधीच्या उदाहरणापेक्षा बरीच लहान. आपल्या छोटुकलीला त्याच त्याच पारंपारिक गोष्टी, गाणी सतत ऐकण्याचा कंटाळा आल्याचे लक्षात येताच त्या आईचा मेंदू कामाला लागला. छोटी बडबडगीते, काल्पनिक कथा आकाराला आल्या. त्या दोघींचेच असे छोटेसे बंदिस्त विश्व त्याने बहरले. आणि अचानक त्या आईमधली ब्लॉगकर्ती जागी झाली. तिने विचार केला, की अरे, आपले मूल जसे यात रमले, तसेच अजून एखादीचेही रमेल, मग त्या आईसाठी या स्वरचित गोष्टी-गाण्यांचा ब्लॉग तयार का करू नये? आणि अशा रीतीने एक सुंदरसा ब्लॉग आकाराला आला. या ब्लॉगवर मुबलक प्रमाणात लेखन झालेले नसले, तरी त्यामागची कल्पकता आपले लक्ष वेधून घेते.

ब्लॉगविश्वात कल्पकतेच्या अश्या अनेक आधुनिक आविष्कारांना आपण सामोरे जातो. कारण लौकिकार्थाने ‘लेखन’ या शब्दाचा जो अर्थ आहे तो आणि तेवढाच इथे अभिप्रेत नसतो. त्यामुळे ब्लॉगकर्तीला कुठल्याही ‘इमेज’मधे अडकून राहण्याचे बंधन राहत नाही. ‘जे जे मनी आले, ते ते की-बोर्डबध्द केले’ हे इथले एकमेव घोषवाक्य!
त्यामुळे एखादा ब्लॉगवर पुस्तकांनी भरलेल्या शेल्फचा एक सुंदरसा फोटो नजरेस पडतो, वाचनप्रेमींची नजर अगदी खिळवून ठेवणारा. आणि खाली ब्लॉगकर्तीने तिच्याकडे असलेल्या तब्बल ७०-८० पुस्तकांची त्यांच्या प्रकारांनुसार यादी दिलेली दिसते; मराठी, हिंदी, इंग्रजी सगळी. बस्स, ती ब्लॉग-पोस्ट म्हणावी तर इतकीच. आता, माझ्याकडे ही-ही, इतकी-इतकी पुस्तके आहेत हे जगाला सांगण्यामागे जो आनंद, जे एक आंतरिक समाधान लपलेले आहे, ते एक पुस्तकप्रेमीच जाणे! तो आनंद मिळवण्यासाठी ब्लॉगसारख्या माध्यमाचा वापर करताना उलट त्याला ‘बूकशेल्फ’च्या फोटोचे सुरेखसे तोंडीलावणे मिळून जाते.
तर, अजून कुठल्या ब्लॉगवर स्थिरचित्रण, विविध कॅमेरे, त्यांतील तांत्रिक बाबी यांची माहिती दिलेली दिसते. उदाहरणांदाखल सोबत स्वतः काढलेली विविध उत्तम प्रतींची छायाचित्रे असतात. तांत्रिक बाबी आणि त्यामधील स्त्रियांचा सहभाग ही विजोड वाटणारी जोडी इथे पक्की जमून आलेली दिसते.

करता-करता आपण पोहोचतो स्त्रियांच्या ललितलेखनाच्या ब्लॉग्ज्‌कडे.
या लेखनाला प्रस्थापित साहित्यविश्वाचे निकष लावावेत किंवा कसे, हा मुद्दा बाजूला ठेवू. पण स्त्रियांमधे ब्लॉग-ललितलेखन हा प्रकारही बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. त्यामागेही या सुविधेचीच एक खासियत आहे. ‘लिहिणारा एक असेल, तर समोर वाचणारे दहा हवेत’ हे गृहितक ब्लॉगिंगमुळे मोडित निघाले आहे.
अशा प्रकारच्या ब्लॉग्ज्‌मधे कुठल्याही अभिनिवेशाविना केलेले लिखाण जसे दिसते, तसेच वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांमधून केलेले लेखन पुनःप्रकाशित केलेलेही दिसते. अर्थात बहुतेक ठिकाणी त्या-त्या प्रथम-प्रकाशनाचा उल्लेख हा आवर्जून केलेला असतो. कथालेखन आणि स्फुटलेखन हे अशा प्रकारच्या ब्लॉग्ज्‌मधे प्रामुख्याने दिसणारे दोन प्रकार. कथालेखनाला तशी विषयांची मर्यादा नाही. तरीही प्रेमकथा, कौटुंबिक कथा यांना प्राधान्य दिलेले दिसते.
पण अधिक लक्ष वेधून घेतो तो स्फुटलेखन हा प्रकार. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आलेले छोटे-छोटे, साधे-सुधे अनुभव, पण त्यांची मांडणी, मनात त्यांनी उठवलेली आवर्तने, त्यावरील मतप्रदर्शन हे बहुतेक ब्लॉग्ज्‌मधे अतिशय प्रामाणिकपणे आणि कळकळीने केलेले दिसते. अशा प्रकारचे लेखन हे आत्यंतिक व्यक्तीसापेक्ष ठरण्याची, त्याचे सार्वत्रिकरण शक्य नसण्याची भीती व्यक्त करण्याची एक ‘फॅशन’ प्रस्थापित जगतात रूढ आहे. पण या बाबीला ब्लॉग-जगतात थारा नाही. कारण मुळात हे विश्वच व्यक्तिसापेक्षतेवर अवलंबलेले असे आहे. त्याची उपयुक्तता संपूर्णपणे व्यक्तीनिष्ठ आहे. तुमचा ब्लॉग हे तुमचे आंतरजालावरचे एक रूप असते, तुमचे स्वच्छ प्रतिबिंब असते; किंबहुना ते तसे असणेच अभिप्रेत असते.

आजवर स्त्रियांना अभिव्यक्तीची जी-जी माध्यमे उपलब्ध झाली, त्यांचा त्यांनी स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या उन्नयनासाठी अतिशय समर्थपणे उपयोग करून घेतलेला आहे. स्त्री-अभिव्यक्तीचा हा प्रवास माजघरातील ओव्यांपासून सुरू होऊन आज ब्लॉगविश्वापाशी येऊन पोहोचलेला आहे. सुरूवातीला म्हटल्याप्रमाणेच ही दुनिया अथांग आहे. आपण जितके शोधत जाऊ, तितकी नवनवीन रत्ने गवसत जातात आणि आंतरजालाच्या मोहमयी भूलभुलैय्यात ब्लॉगिंगचे नाणे स्त्रियांनी इतके खणखणीतपणे वाजवलेले पाहून मान अभिमानाने ताठ होते.

--------------------

‘तनिष्का’ मासिकाच्या सप्टेंबर-२०१३ वर्धापनदिन विशेषांकात प्रकाशित झालेला लेख.

Comments

लेखन आवडले. या सगळ्या ब्लॉगच्या लिंक दिल्या असत्या तर ते ब्लॉग प्रत्यक्ष बघता आले असते
धन्यवाद, अमोल केळकर.
ब्लॉग्ज्‌च्या लिंक्स खाली देत आहे - (लेखात ज्या क्रमानं उल्लेख येत गेले आहेत, त्याच क्रमानं दिल्या आहेत.)

http://restiscrime.blogspot.in/

http://chakali.blogspot.in/

http://www.vadanikavalgheta.com/

http://www.rekhachitre.blogspot.in/
http://www.shikashikava.blogspot.com/

http://chhotyanchya-duniyet.blogspot.in/

http://saangatyeaika.blogspot.in/

http://prakashraan.blogspot.in/

>> लिखाणाला ‘परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं’’ म्हणते आणि मनाचा एक हळूवार कोपरा वाचकांसमोर उघडा करून दाखवते.

ही कोण असावी ;)

अजून बरेच स्री bloggers राहिलेत तरी एक स्तुत्य प्रयत्न :)
Vijay Shendge said…
खुप अभ्यासपूर्ण लेख ब्लॉगिंग विश्वात इतरांचे लेख एवढ्या बारकाईणं वाचणारे ब्लॉगर्स आणि वाचक खुप कमी आहेत. आपण एवढ्या बारकाईणं इतरांचे लेख वाचून त्यावर जे मत मांडलत प्रशांसास पात्र आहे. एका अभ्यासपूर्ण लेखाबद्दल आपले अभिनंदन

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)